नवीन लेखन...

मुले हिंसक बनतात तेव्हा…

हिंसाचार आपल्याला आता नवीन नाही. आता कुतूहल उरले आहे ते केवळ हिसाचार नव्या कुठल्या पद्धतीने केला जात आहे याचेच. त्यातल्या त्यात अनपेक्षित समाजघटकाने हिसाचार केला तर समाजमन थोडे गुंगीतून जागे होऊन डोळे किलकिले करून पाहू लागते. गेल्या काही दिवसांतील हिसाचारात कुतूहल जागे करणार्‍या दोन अशा गोष्टी आढळतात. एक- हिसाचार लहान शाळकरी विद्यार्थ्यांच्या हातून घडला आहे. दोन- आपल्याच दोस्ताचा व प्रत्यक्ष आईचा खून या मुलांनी केला आहे. या हिसाचारामागील कारणांचा काथ्याकूट आता केला जाईल. तो तसा व्हायला हवाच. मात्र, तो थांबविण्याचे पर्याय उपलब्ध झाले नाहीत तर ती एक शोकांतिकाच ठरेल. सुखासीनतेत लडबडून निष्क्रिय, अर्थशून्य झालेली श्रीमंत बाळे, शालेय शिक्षण घेणारे मध्यमवर्गीय विद्यार्थी असोत वा रस्त्यावर जीवनानुभव घेऊन शिकणारी रस्त्यावरची दुर्लक्षित, समाजाच्या दृष्टीने गाळ व कचरा असलेली तिरस्कृत मुले असोत-भवितव्यात प्रयोजनाची, सुखाची वा निदान तगण्याची आशा नष्ट झालेली, वर्तमानात आयुष्याची दिशा हरवलेली ही बहुसंख्य मुले आहेत. जगण्याचे प्रयोजन हरवलेली ही आयुष्ये. पूर्वी अशी मुले थोडीफार सहनशक्ती शिल्लक असल्याने घरातून पळून जात व रस्त्यावर आपले आयुष्य फेकून एक प्रकारचा जुगार खेळत. आज असमाधान असह्य झाल्याने, असंतोष सहन करण्याचे शिक्षण न मिळाल्याने उद्वेगाने ती स्वकियांवरच हल्ला करताना आढळतात. नेमका शत्रू न समजल्याने वा सारेच शत्रू वाटल्याने ही मुले सूडाच्या क्षणिक समाधानासाठी पेटून उठतात व हत्याकांड करतात. जगणे अर्थशून्य ठरल्याने असे जगणे देणार्‍या जन्मदात्रीवर हल्ला केला जातो. त्यात हल्लीच्या प्रघाताप्रमाणे पालक व्यवहारदक्ष, वास्तववादी व भविष्याविषयी सजग असतील तर ते अधिकाधिक अधिकारशाही वापरून मुलांचे दमन करीत राहतात. त्यामुळे नैसर्गिक जगणे हरवून यंत्रवत जगणारे मूल अधिकाधिक हतबल, भित्रे व अमानुष बनत जाते. असे मूल हिसाचार वा आत्मघाताशिवाय कोणत्या प्रकारे आपली उद्विग्नता व्यक्त करणार? अचूक असण्याच्या समाधानाच्या कितीतरी पट जास्त चूक असण्याची शिक्षा देणारा समाज व त्याची अमानुष शिक्षणव्यवस्था (यात शाळा व बहिःशालेय व्यवहार दोन्ही अंतर्भूत आहेत.) मुलांसमोर कोणते पर्याय ठेवते? चूक लपविण्यासाठी खोटे बोलावे लागते. अपयश टाळण्यासाठी खोटे वागावे लागते. व्यवस्थेतून बाहेर फेकले जाऊ नये यास्तव व्यवस्थेतच दोष व बळी शोधावे लागतात.

आक्रमकतेचा गौरव सिनेमा जन्मास येण्याआधीपासूनच समाजात केला जातो. ऐकून घेणार्‍यास उपदेशाचे डोस पाजले जातात, उद्धटाच्या वाटेला कुणी जात नाही. अहंकारी माणसाची प्रौढी माणसे निमूट ऐकून घेतात. इतरांच्या मनात धाक निर्माण करणारी आक्रमकता स्वतःच्या अस्तित्वाला गौरवास्पद बनविते. त्यात गेली कित्येक वर्षे हा समाज पौंगडावस्थेतून बाहेर न आलेला. अशात आक्रमकतेचे, हिसाचाराचे गूढ आकर्षण व हिसाचाराच्या परिणामांविषयी बेफिकिरी वाढलेली. आजही समाजजीवनात आपण अग्रभागी राहणार्या व्यक्तींमध्ये अनाकलनीय प्रौढी, अहंकार व आक्रमकता पाहतो. प्रसारमाध्यमांनीही आक्रमकता बाजारात खपते म्हटल्यावर हिसाचार विकण्याचा धंदा मांडलेला.

गाडीत दिसणार्‍या गुंड मुलांकडे नीट पाहा. प्रत्यक्षात टोळीत असूनही ही मुले एकाकी, अस्थिर, भयग्रस्त असतात. गाडीतील इतरांच्या त्यांच्याविषयीच्या नजरेत या मुलांना दुर्लक्ष, तुच्छता वा तिरस्कार दिसतो. तो त्यांना सहन होत नाही. आपले अस्तित्व ठळक करण्यासाठी, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही मुले वेडेवाकडे आविर्भाव करतात. जोरजोरात गलिच्छ बोलतात. उगीचच वेडेवाकडे आवाज करीत राहतात. हात-पाय आपटत राहतात. असे केल्यावर आपले अस्तित्व आता दुर्लक्षित राहिलेले नाही, हे त्यांच्या लक्षात येते. आपल्या विचित्रपणामुळे इतरांच्या डोळ्यांत आता तिरस्काराऐवजी भय निर्माण झालेले पाहताच या मुलांना आत्मगौरवाची प्रचीती येते. त्यांच्या आतल्या आक्रमकतेला वाट करून द्यायची, तर या मुलांना कुणीतरी हटकावे लागते. मग ही मुले बेभान, आक्रमक होतात. समोरच्याच्या शक्तीचा अंदाज घेऊन रणनीती ठरविली जाते. पण आपण आलो तेव्हाच्या चित्रात लक्षणीय बदल झालेले त्या मुलांना जाणवत असते.

समाजात हे असेच चालत असते. शोषितांचा आक्रोश रस्त्यावर आणला गेला, प्रस्थापितांचा रस्ता काही काळ रोखला गेला, तरच कायदा, सुव्यवस्था, न्याय जागे होतात. मनोरुग्ण स्वतःच्या विश्वात गुरफटून शांतपणे पडला असेल तर त्याच्याकडे घरचे दुर्लक्ष करतात. बेभान होऊन तो त्रासदायी ठरला, तरच त्याच्यावर उपचार केले जातात. ही समाजाची शिकवण रस्त्यावर फेकल्या गेलेल्या दुर्लक्षित मुलांना त्वरित कळते. शिक्षण व रोजगार नाकारून अशी कित्येक मुले-माणसे रस्त्यावर रोज ओतली जात आहेत. त्यांच्या वैफल्याला हिंसेचे फळ धरले तरच ती बातमी होते. उद्वेग चिखलात फार काळ दडपता येत नाही. त्याला हिसेचे पंख फुटतातच. आक्रमकतेने इतरांच्या भयग्रस्त मनावर काही काळ सत्ता गाजविण्याचे सुख ही अशी माणसे मग उपभोगतात.

जीवनाची अनिश्चिती, अस्थिरता चटके देते तेव्हा तात्कालिक सुखाकडे माणसे धाव घेतात. सुखासाठी सतत प्रयत्न करीत राहणे मूर्खपणाचे वाटते. पुढे दीर्घकाळ नफा देणार्‍या कंपनीत गुंतवणूक करण्यापेक्षा त्वरित फायदा देणार्‍या जुगारी हालचाली करणार्या शेअरमध्ये व्यवहारी (!) माणसे गुंतवणूक करताना दिसतात. रुजून वाढणारे, फळ देणारे सुख शोधण्यापेक्षा दुसर्‍याचे सुख ओरबाडणे शहाणपणाचे वाटू लागते. ग्रीक राजा व्हिटेलियसला चवीचे व्यसन लागल्याने तो म्हणे खाऊन झाल्यावर उलटी करायचा आणि पुन्हा चवदार जेवण जेवायला बसायचा. उत्तम चवीचे, अति प्रमाणात अधाशीपणे खाणे, हा नव्या चंगळवादी संस्कृतीचा परिणाम आज सर्वत्र दिसतो आहे.

शाळाही वेगळ्या अर्थाने हेच शिकविताना दिसतात. विषय समजून घेणे म्हणजे ज्ञान ग्रहण करणे असेल व असे ज्ञान मुलांनी मिळविलेले आहे की नाही, हे समजून घ्यायचे असेल तर पूर्वसूचना न देताच परीक्षा घ्यायला हव्यात. पण प्रत्यक्षात अशा परीक्षेचे परिणाम काय होतील,

हे माहीत असल्याने अध्यापनातील अपयश टाळण्यासाठी शाळा परीक्षेची पूर्वसूचना देतात, नेमके केवढे

आणि काय पाठ करा, ते सांगतात. स्मरणशक्ती ही आकलनापेक्षा श्रेष्ठ मानणारी परीक्षा पद्धती अशाप्रकारे अध्यापनाशीच बेइमानी करीत असते. जॉन होल्टच्या मतानुसार, मग मुलेही हे जाणून घेऊन परीक्षेत वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढून अपयश टाळू पाहतात. एक प्रकारे हा जुगारच ठरतो. निकृष्ट ते अपयशी होऊन रस्त्यावर येतात. मध्यम दर्जाच्या विद्यार्थ्याला मात्र अपयश सहन होत नाही. जीवनातल्या आकांक्षा व मोह खुणावत राहतात. पर्याय राहतो- तो पळवाट शोधण्याचा. एक्स्प्रेस वे वर बैलगाडीला स्थान नसते, तशातलाच हा प्रकार.

— भालचंद्र हादगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..