नवीन लेखन...

बिग बॉस!

गेली पंचवीस वर्ष ते एकमेकांचे सख्खे शेजारी. अगदी लहानपणापासून ते एकमेकांचे मित्र. कुठल्याही कामात एकमेकांशिवाय दोघांच पान हलत नाही. पण गंमत म्हणजे दोघांचे स्वभाव अगदी वेगवेगळे. त्यांचा आकार वेगळा. त्याचं वागणं वेगळं. त्याचं दिसणं वेगळं. त्यांच्या कामाची चव वेगळी म्हणजे कामाची पध्दत वेगळी.

यातला एकजण आहे अगदी शिडशिडीत. जणूकाही वाऱ्यावर डोलणारी काठी. आणि तो दुसरा एकदम डेरेदार. लांबून पाहिलं तर पाटावर बसलेला गणपतीच वाटेल तो! पहिल्याची ऊंची प्रचंड पण त्यामानाने दुसरा बुटकाच. या दोघांना गप्पा मारताना फार त्रास होतो. पहिल्याला काही सारखं खाली वाकता येत नाही. आणि दुसर्‍याला काही सारखं वर पाहता येत नाही. नाहीतर पहिल्याचं कंबरडं तरी मोडायचं किंवा दुयार्‍याची मान. पण म्हणून ते काही गप्प बसलेले नाहीत.ते दोघे पाणी पिताना गप्पा मारतात. मिळणारं पाणी आपापसात न भांडता वाटून घेतात.

दुसर्‍याच्या घरी लख्खं हिरव्या कैर्‍या आल्या होत्या.ते पाहून पहिला म्हणाला, “खूप वर्षापासून तुला एक गोष्ट सांगायची राहूनच जातेय बघ..”हे ऐकल्यावर आंब्याच्या झाड सळसळलं आणि नारळाचं झाड काय बोलतंय ते पान टवकारुन ऐकू लागलं.“मला वाटतं जगात तुझ्यासारखा तूच एकटा आहेस!”आंब्याला काही कळलंच नाही. त्याने विचारलं, “म्हणजे?”अरे आधी तू हिरवागार आंबट मिट्ट असतोस. पण नंतर मात्र पिवळा आणि गोड घट्ट होतोस! हा चमत्कारच आहे की!! तूझा रंग, वास,चव सारंच काही बदलतं. आणि यात पुन्हा गंमत म्हणजे, तू आंबट असताना, लहान असताना तुला ‘ती’ म्हणतात, पण तू मोठा झाल्यावर, पिकल्यावर मात्र तुला ‘तो’ म्हणतात!!

हे तर भारीच आहे! आणि तू आंबट असलास किंवा गोड असलास तरी तुझ्यापासून इतके वेगवेगळे पदार्थ करतात, तसं भाग्यं इतर कुठल्याच फळाच्या नशीबी नसावं, असं

वाटतं मला.

“अरे पदार्थ

परवडले.

ते करताना आपल्या जीवाचे एकदाच काय ते हाल होतात. पण ही माणसं माझे जीवंत पणीच हाल-हाल करतात. म्हणून एकदाच

मरो मग त्यांनी आपलं काहीही करो’ असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही.”“म्हणजे काय करतात काय तुला?”“ही माणसांची घरं म्हणजे माझ्यासाठी छळछावण्याच आहेत! मी लहान असताना,कच्चा असताना, आंबट असताना ही क्रुर माणसं मला कापतात, चिरतात. या माझ्या जखमांवर ती तिखट मिठ लावतात आणि मग आनंदाने टाळ्या पिटत मला चावनू चावून खातात. काही क्रुरकर्मी मला तिखट मीठ लावल्यावर माझ्या अंगावर उकळतं तेल ओततात. नंतर मला हवाबंद बाटलीत, तेलात बुडवून ठेवतात. आणि मग बाटलीत घुसमटून व तेलात बुडून माझा जीव गेला की ही माणसं, वर्षभर माझे तुकडे खातात! मिटक्या मारत खातात!!..” आंब्याला पुढे बोलवेना.

“बाप रे! म्हणजे ‘आपल्याच दारात उभं असणाऱ्याचे तुकडे-तुकडे करायचे आणि तेच तिखट मीठ लावून मिटक्या मारत खायचे” असं राक्षस सुद्धा करत नसतील!!.. .. … .. .आता विषयच निघाला म्हणून तुला माझी गोष्ट सांगतो. तुला कसं झाडावरुन अलगद काढतात. तसं माझं नाही. मला वरतून खाली ढकलून देतात. माझा कपाळमोक्ष करतात. मग धारदार सुरा घेऊन मला तासतात. कोयता घेऊन मला फोडतात. इतकं करुनही त्यांचं समाधान होत नाही. तेव्हा ते माझे मधोमध दोन तुकडे करतात. मग धारदार विळी घेऊन मला खवण-खवण खवणतात. माझी करवंटी करुन टाकतात. ही माणसं सर्वांशीच अशी वागतात?ठनारळाचं हे बोलणं ऐकून आंब्याला क्षणभर काही सूचेना. मोहोर सावरत आंबा म्हणाला, “अं.. मला वाटतं जाऊ दे तो विषय. ‘झालं गेलं मातीला मिळालं” असं समजूया. हे बघ.. आपल्यामुळे त्यांना आनंद होतो. त्यांना चवीने खाता येतं, असा पॉझिटिव्ह विचार आपण करुया! खरं म्हणजे मीच तुला एक गंमत सांगणार होतो..

झावळ्या हलवत नारळ म्हणला, “सांग लवकर सांग.”

“अरे नारळा या जगात तुझ्या सारखा तूच एकटा आहेस!”“फ्रुट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मधे याची एंट्री पण आहे! इतक्या ऊंचावरून खाली उडी मारणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही! खाली पडून कपाळमोक्ष झाला तरी इतरांना आपल्यातलं गोड पाणी व मऊ

लुसलुशीत खोबरं देणारा असा तू एकटाच आहेस बरं! आणि तुला या आपल्या देशात केव्हढा मान आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तर तुझ्या शिवाय होऊच शकत नाही! आणि पूजा करायची तर तू हाताशी हवाच ना? म्हणून तर तुला म्हणतात ‘श्रीफळ’. आमच्या सगळ्यांचा बिग बॉस आहेस तू.हे ऐकल्यावर नारळ आनंदाने, समाधानाने डोलला.

नारळ डोलता-डोलता मधेच थांबला. आंब्याकडे पाहून म्हणाला,’ मित्रा ‘घरावर आंब्याचं टाळं लावल्याशिवाय नारळाचं श्रीफळ होत नाही’, ही कोकणी म्हण तुला माहितच असेल म्हणा.

हे ऐकताच आंबा क्षणात असा काही मोहोरला की आंब्यावर बसलेला पोपट दचकला!

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..