नवीन लेखन...

पाऊस – कवीच्या मनात दडलेला



पाऊस – कवीच्या मनात दडलेला
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे…मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच ! असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो.लहानपणीच्या ईवल्याश्या छत्रीत….मित्रांसोबत सोडलेल्या कागदी होड्यांत…, तरुणाईत धबधब्याखाली लुटलेल्या त्या मजेत…असा हा पाऊस..कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गँलरीत मनसोक्त धडकणारा.सृष्टीला नवचैतन्य देणा-या प्रत्येकाला वेड लावणा-या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडले असेल तर ते कवीने. आपल्या सुंदर शब्दामध्ये पावसाला बंदिस्त करण्याचे धाडस फक्त हा कवीच करु शकतो.म्हणूनच मराठी कवितांमध्ये, गाण्यांमध्ये या पावसाची विविध रुपं उलगडत गेलेली दिसतात. पाऊस जसा वर्षानुवर्षे पडतोय ,पडत राहणारही आहे तसतसे हे बालगीतही प्रत्येकला आपल्या बालपणात भेटत राहील
<येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा,

<पैस झाला खोटा , पाऊस आला मोठा.

हे बालगीत लहानपणापासूनच मनात पक्क बसतं.हे बालगीत गुणगुणतच आपल्याला पावसची ओळख होते.शाळेत जातांना पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंद कायम रहावा आणि शाळेला सुट्टी मिळावी यासाठी बालमने
<सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

<शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल काय ?

अशी आर्जव करतात. बालमनातील ही इच्छा पाडगावकरांनी किती अलगद पकडली आहे पहा.
मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत
<जांभळासारखे पिकून आले, ढग हे टपोरे झुकून आले.

<सरी नी सरी झडेल रे,पाऊस पाऊस पडेल रे.

असे पावसाचे वर्णन केले आहे.
तर पावसाळी वातावरणाची शब्दरूपी मांडणी बा.भ.बोरकरांनी फार सुंदररित्या केली आहे.
<गडद निळे, गडद निळे जलद भरून आले

<शितल तनू, चपल चरण ,अनिल गण निघाले.

बोरकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे. पावसाचा आनंद जितका लहान मुलांना होतो तितकीच काळजी घराबाहेर पडलेल्या आपल्या पतीची एका पत्नीला असते.प्रत्येकाच्या घरामध्ये सहजपणे जाणवणारे हे दृश्य कवी अनिल यांनी फार सुंदर रेखाटले आहे.
<बाई या पावसानं लावली झिमझिम

<भिजली की माळरान ,उदासल मन ,

<नदी नाले एक झाले ,पूर भरूनीया आले

<जीवलग पडे बाई कुठे अडकून,

<नच पडे चैन बाई य जीवाला

एका बाजूला पतीची काळजी करणारी व्याकुळ पत्नी तर दुसरीकडे पावसात मनसोक्त भिजण्या-या तरुणीचा ओसंडून वाहणारा आनंद शांता शेळके यांनी शब्दामध्ये अगदी सहज पकडला आहे.
<आला पाऊस मातीच्या वासात गं

<मोती गुंफीत मोकळ्या केसात गं.

मुसळधार पडणारा हा पाऊस गुलाबी असा गारवा घेऊन येतो आणि या गारव्यात गरमागरम चहा आणि भजी खाण्याची इच्छा अनावर होऊन जाते.आद्य कवियत्री बहिणाबाईंनी प्रत्येकाच्या मनातील इच्छा केव्हाच ओळखली.आणि ती शब्दात पकडूनही ठेवली.
<येता पाऊस पाऊस .पावसाची लागे झडी

<आता खा रे वडे , भजे

<घरामध्ये बसा दडी

बहिणाबाई पावसाबद्दल पुढे असं म्हणतात.
<देवा पाऊस पाऊस , तुझ्या डोयातले आस

<देवा तुझा रे आरास, जीवा तुझी रे मिरास

नव्या दमाचे कवि संदीप खरे यांनी पावसाल आगदी सुंदर सोप्या भाषेत शब्दबध्द केलय
<गोष्ट सुरू होईल ,तेव्हा सुरू झाला पाहिजे

<गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे.

असा हा पाऊस..
अनेक कवींना जसा तो दिसला ,भावला त्यांनी अनुभवला तसा तो त्यांनी शब्दबध्द केला.असा हा पाऊस..कधी अचानक गायब होणारा , बळीराजाला आभाळाकडे पहायला लावणारा तर कधी सारे काही जलमय करून टाकणारा.कुणाला तो हवाहवासा वाटतो.. तर कुणाला कंटाळवाणा.विद्यार्थ्यांची शाळा बुडवणारा..तरुणांना प्रेमात पाडणारा ,वृद्धांना गारठवणारा तर आईला काळजीत टाकणारा.त्यांने अनेकांना सावरलं तर अनेकांना उध्वस्तही केलं. असा हा पाऊस..तो कसाही असला तरी मराठी कवितांच्या पुस्तकांच्या पानावर कवीच्या शब्दातून तो बरसत राहिला आहे आणि पुढेही बरसेल.
………………………………………………….
.

— श्री.सुनिल पाटकर उर्फ सनी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..