नवीन लेखन...

चंपी मॉलीश !

दोन दिवस झाले.मी हॉस्पिटल मधून आमच्या घरी आले.आमचं घर त्या हॉस्पिटलपेक्षा एकदम वेगळं आहे बरं! इथे पांढऱ्या कपड्यातली नरसं नाही व कॉटवर पण पांढर्‍या चादरी नाहीत.आणि मुख्य म्हणजे इथे संध्याकाळी सात वाजता कर्कश घंटा वाजत नाही व

भेटायला आलेल्या माणसांना इथे कुणी हाकलून पण देत नाही!!

मी दिवसभर माझ्या आईकडेच असते,तरीपण मला माझ्या इतर मित्र-मैत्तिणींची खूप आठवण येते.आम्ही सगळे एकाच खोलीत असायचो.आम्ही सगळे मिळून हसायचो,सगळे मिळून रडायचो,दररोज सगळे मिळून शंभर दुपटी भिजवायचो तर कधी-कधी रंगवायचो!!

आमच्या घरात माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी,एक वेगळीच खोली आहे.खोलीत भिंतीवर मोठमोठी रंगीबेरंगी चित्रं चिकटवलेली आहेत.माझ्यासाठी तर स्पेशल कॉट. कॉटवर फुला-फुलांची रंगीत चादर.छोटिशी उशी.त्याखाली आईच्या आणि आजीच्या जुन्या साड्यांची मऊ-मऊ दुपटी! कपडे ठेवायला वेगळं कपाट.ह्या कपाटात औषघं ठेवायला,माझ्यासाठी खाऊ ठेवायला वेगवेगळे खण. माझ्यासाठी उघड-बंद होणारी खास रंगीत मच्छरदाणी.आणि दोन-दोन बादल्या भरून खेळणी!! नुसती मज्जाच-मज्जा!! मला वाटतं ह्या घरात इतर कुणाचे इतके लाड होतच नसणार!

हॉस्पिटलमधे संध्याकाळीच दिसणारी खूपशी मंडळी,आता आमच्या घरात कधी-मधी दिसतात.मला कळेना,ह्यांना कसं कळलं आमचं घर? आमच्या पाठोपाठ ही मंडळी इकडे कशी काय आली?मी मोठ्या माणसांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं,तेव्हाच मला सारं समजलं.

जे अधे मधे येऊन माझे लाड करतात,माझ्या आई बाबांशी गप्पा मारतात ते आमच्या आजूबाजूचे काका मावशी.म्हणजे आमचे शेजारी.

जे खूप-खूप प्रेमळ आहेत ते माझे आजी आजोबा.आमच्याच घरात राहतात हे माझे आजी आजोबा.दिवसभर माझ्या आजूबाजूला असतात हे माझे आजी आजोबा.पण ह्या आजी आजोबांचा मुलगा मात्र,मला फक्त संध्याकाळीच भेटतो.

अहो,असं काय बघताय?माझे बाबा हो ते!! माझे बाबा सकाळी लवकर जातात,तेव्हा मी झोपलेली असते नां! काय

करणार? ‘बाबांना टाटा करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं ‘मी ठरवलं होतं…..पण कसंचं काय? नी कसंचं काय? हे माझ्या दिवसभर लक्षात राहतं..पण रात्री

आईच्या कुशीत झोपल्यावर,सगळं विरघळून जातं! काल संध्याकाळी बाबा आले,तेव्हा बाबांनी मला उचलून घेतलं. मी खूश झाले!मी लगेच बोलायला

सुरुवात केली, “गुर्र गुर्र,गुर्र फुर्र,फुर्र गुर्र!!”पण हाय रे दैवा! बाबांना काही कळलंच नाही.मी बाबांना सांगत होते, “आज पारवती बाई आल्या होत्या.त्यांनी मला घाबरवलं,मग मी काय-काय केलं…….”हं तर काय झालं,आज सकाळी-सकाळी पारवती बाई आल्या.मी झोपले होते.आई म्हणाली, “उठवू नका हो बब्बडला.आत्ताच झोपलीय ती.”पारवती बाई ठसक्यात म्हणाल्या, “आवो,आनखी चार घरची कामं हैत.तुमी काय बी काळजी करू नका.मी समदं ठीक करते.”

मी काही गाढ झोपले नव्हते.तशी माझी झोप सावधच आहे.पारवती बाईंनी पडदे ओढले.चांगली सकाळ असून पण त्यांनी दिवा लावला! दार बंद केलं.कोपर्‍यात ठेवलेला उभा पाट घेतला आणि तो जमिनीवर आडवा ठेवला.त्यांनी साडी वर खोचली. आणि पाय लांब करुन बसल्या की पाटावर! पाटावर बसून आईला म्हणाल्या, “द्या तिला इकडे..” मी हळूच एक डोळा उघडून आईकडे पाहिलं.आई मला उचलणार इतक्यात,पारवती बाईंनी बसल्या-बसल्या हात लांब केला,मला उचललं आणि पायावर सरळ आडवं घातलं!!

ही काय वागण्याची पध्दत? लहान मुलांना कडेवर घेतात,कुशीत घेतात की,स्वत: पाटावर बसून मुलांना पायावर आडवं घालतात?? मला काही कळेचना.मी डोळे उघडून पाहिलं तर….मला जमिनच दिसली!! म्हणजे,’खाली पोट,वरती पाठ.पोटाखाली जमिन सपाट’इतक्यात,माझ्या पाठीवर कुठलीतरी चिकचिकीत,बुळबुळीत,थलथलीत,बलबलीत,थंडगार वस्तू पडली!! ती बुळबुळीत,बलबलीत वस्तू ,माझ्या पाठीवरच इकडून तिकडे पळू लागली!! पाठीवर सरपटू लागली! पळू लागली!

मला किळस आली! माझ्या पाठीवर ‘हे कोण रांगतंय’ तेच मला कळेना? मी हाताच्या मुठी आवळून मोठ्याने ओरडले, “ई।।।।थूर्र।।।।फूर्र।।।।…” मला आईची पावलं,इकडून तिकडे पळताना दिसली. त्याचवेळी,पारवती बाईंनी ती वस्तू,माज्या पाठीवर खसाखसा चोळायला सुरुवात केली.उगाच आई घाबरेल म्हणून,न ओरडताच मी पडून राहिले.पारवत बाईंनी कमालच केली! मी ओरडत नाही.त्यांना काही बोलत नाही.हूं का चूं करत नाही हे पाहिल्यावर त्यांना चेव चढला!! त्या काय वाट्टेल ते करायला लागल्या.पाठ चोळता-चोळता त्या माझे पाय चोळू लागल्या! पाय चेपू लागल्या.पायाची बोटं ओढू लागल्या.पोटर्‍या कुस्करू लागल्या! तरी पण मी शांत राहिले! मी शांत राहिल्याने,पारवती बाई धीट झाल्या!त्या आता माझे खांदे चेपू लागल्या. माझ्या पाठीवरच्या चिकचिकीत चिखलात,त्या आपली बोटं नाचवू लागल्या! तरीपण मी धीराने घेतलं!! त्या आता माझी मान चेपू लागल्या.आईचं लक्ष नाहीसं

पाहून चिमटे काढू लागल्या! मी डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करू लागले…..तर…

त्या माझं डोकंच चेपू लागल्या! माझ्या डोक्यावर “धा धिन् आपटा,धा धिन् आपटा,धिन् धिन् धिन् धा आपटा-थोपटा” असा तबला वाजवू लागल्या! “कडकट् धोपटा,कडकट् धोपटा”असा ताशा बडवू लागल्या.मी हैराण होऊन चुळबूळ करायचा प्रयत्न करणार…तर…मला जाम दाबून धरत,त्यांनी माझे कान धरले. “तुडूम तुडूम छुन्,तुडूम तुडूम छुन्,” माझ्या कानाच्या त्यांनी झांजा केल्या!

पारवती बाईंना बहुधा झांजा आवडत नसाव्यात.म्हणून त्यांनी लगेचच,’चिक चिक चून चून चूं,चिक चिक चून चून चूं,’माझ्या कानाच्या चिपळ्या केल्या.

तबला-ताशा,झांजा-चिपळ्या,सतार-बेन्जो,सनई-पिपाणी,गिटार-फिटार अगं आई।।ग! माझ्या डोक्यात पुरा ऑर्केस्ट्रा वाजायला लागला!! माझं डोकं गरगरू लागलं!भरभरू लागलं!!इतक्यात,माझं डोकं फिरलं!संपूर्ण डोकं फिरलं!! गर्रकन डोकं फिरलं!!!म्हणजे,’मी उपडी झोपले होते ना,ती आता उताणी झाले!’मी भीत भीत पारवती बाइंकडे पाहिलं,आणि…..नक्की कुणाचं ‘डोचकं फिरलंय’ तेच मला समजेना?पारवती बाईंनी

पाय जुळवून घेतले.हातातल्या बांगड्या मागे केल्या.कपाळावरचे केस मागे सारले;तेव्हा मला त्यांचे चिकचिकीत, तेलकट हात दिसले.

माझ्याकडे पाहात,डोळे मोठे करुन आई हसली.आई माझ्या बाजूला बसली. माझ्या

चिकचिकीत डोक्यावरून आईने मायेने हात फिरवला.आई पारवतीबाईंना म्हणाली, “जरा जपून हं.तेल लावून घ्यायचा,बब्बडचा आजचा पहिलाच दिवस आहे.जरा बेतानंच! नाहीतर बब्बड घाबरायची.” मग माझ्याकडे पाहून हसत-हसत म्हणाली, “तशी ही धीटूकली आहेच म्हणा! पण अगदी एक नंबरची आईवेडी!! म्हणून तर आम्हा दोघींना एकमेकींच्या मनातलं बरोब्ब्रर समजतं! हो किनई बब्बड?” मी काही बोललेच नाही.मी फक्त खुदकन हसले!मला तेल घासतच पारवतीबाई म्हणाल्या,’आवो,तुमची मुलगी लई-लई गुणी हाय बगा! रडत नाय की ओरडत नाय.गप-गुमान चंपी मालीश करुन घेते.

पण बाकीची पॉरं तर नुसता धिंगाणा घालतात! लाथा झाडणार, ओरडणार, रडणार, केकाटणार, नुसता जीव नकोसा करतात बगा!हां,पण एक मात्र खरं,तुमी जवळ असलात की, बब्बडचं डोचकं ठिकाणावर असतं बगा.आईने कौतुकाने माझ्या गालावरून हात फिरवला.मी चुळबूळ करत आईकडे पाहिलं.आईला सारं समजलं! आईने मला अलगद उचलून मांडीवर घेतलं.आई माझ्या डोक्यावरून,गालावरून, हातावरून,पोटावरून,पायावरून प्रेमाने मायेने हात फिरवू लागली.

आईच्या त्या प्रेमळ उबदार स्पर्शाने मला खूप-खूप बरं वाटलं.तोच,पारवतीबाई कडाडल्या, “आवो।।।।।। तिला खाली ठेवा!! तुमची चांगली साडी खराब होईल! द्या तिला इकडे….”आ।।।णि,मला वाटलं होतं तेच झालं……….माझी वाट बघत…….पारवतीबाई बसून राहिल्या पाटावर.आणि मी मात्र………माझ्या प्रिय आईच्या मांडीवर!!

त्यादिवशी मला समजलं, ज्यांना मुलांपेक्षा चांगल्या साड्या आवडतात,अशा बायका मुलांची तेल लावून चंपी करतात!! त्यांना ती मुले “चंपी काकू” म्हणतात!

आणि,ज्यांना चांगल्या साड्यांपेक्षा सुध्दा तेलकट तूपकट मुले आवडतात.अशा मुलांना त्या बायका मायेने आपल्या मांडीवर घेतात!त्यांना ती मुले प्रेमाने “’आ।।।।ई।।।” म्हणतात!!

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..