नवीन लेखन...

गुंतवणूक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर



दिवाळीच्या निमित्ताने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची प्रथा श्रद्धेने पाळली जाते. सोने, शेअर्स, मालमत्ता यातील गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देतेच, पण सोन्यातील गुंतवणुकीकडे भावनिक दृष्टीकोनातून पाहणे बंद करायला हवे. या बरोबरच अलिकडे चांगल्या कलाकृतींमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड येऊ

घातला आहे. या ट्रेंडचाही विचार करायला हरकत नाही.आपल्याकडे दसरा-दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर सोनेखरेदीची परंपरा आहे. पण आता सोनेखरेदीच्या मानसिकतेत हळूहळू बदल होऊ लागला असून या सणांच्या निमित्ताने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार केला जातो. अर्थात सोने हाही गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सोनेखरेदीची परंपरा पूर्णपणे विस्मृतीत जाणार नाही तर सोने खरेदीबरोबरच इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढेल; किंबहुना, ते वाढू लागले आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर नेमकी कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न विचारला जातो. सध्या ‘एल अॅन्ड टी’चा नवीन इश्यू येत आहे. यात गुंतवणूक केल्यास 80 सीसीएस कलमा अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकेल. त्यावर 7.75 टक्के दराने व्याज मिळू शकेल. त्यामुळे केवळ एकाच दिवाळीचा विचार न करता सलग अनेक वर्षे चांगली दिवाळी पाहायची असतील तर या कंपनीत गुंतवणूक करायला हवी. या इश्यूमध्ये 20 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.सोन्याचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय सोन्याच्या किंमतीत शेअर्सप्रमाणे अचानक मोठी घट होण्याची शक्यता नसते. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक शेअर्सच्या मानाने अधिक सुरक्षित ठरते. पण, देशात सोन्याकडे अजूनही कमोडीटी किंवा वस्तू म्हणून पाहिले जात नाही. सोन्याला सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि भावनिक संदर्भ असतात. सोने खरेदी केल्यानंतर विकणे अप्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे सोन्
ामधील गुंतवणूक निव्वळ गुंतवणूक राहात नाही तर ती केवळ सोनेखरेदी होते. असे असले तरी सोन्याची खरेदी दिवाळीपूर्वी न करता दिवाळीनंतर करावी. कारण दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव वाढतात. या काळात सोनेखरेदी करावी असा सामाजिक आणि सांस्कृतिक संकेत असल्याने मोठ्या

प्रमाणावर सोनेखरेदी होते. त्यामुळे मागणीनुसार सोन्याची किंमत वाढते. दिवाळीनंतर या किंमतीत थोडी घट पहायला मिळते. त्यामुळे आपले आर्थिक हित पाहता दिवाळीनंतर सोने खरेदी करणेच योग्य ठरते.शेअर बाजारात काहीशी जोखीम पत्करून गुंतवणूक करणे आता मध्यमवर्गीयांच्याही अंगवळणी पडले आहे. सध्या शेअर बाजारात तेजीचे वातावरण असून शेअर निर्देशांकामध्ये सातत्याने वाढ होत आहे. विविध कंपन्यांचे शेअर्स चांगली कामगिरी करत असताना शेअर बाजारातील गुंतवणूक ग्राहकांना आकर्षित करत आहे यात नवल नाही. सध्या इतर कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यापेक्षा सरकारी बँकांमध्ये गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरेल. सध्या या बँकांची शक्ती खूपच वाढली आहे. त्यांच्या शाखांचे देशभर जाळे असल्याने या बँकांना स्थैर्यही आले आहे. त्यांच्या शेअर्सच्या किंमतीही वाढत असल्याने या बँकांचे शेअर्स विकत घेण्यात शहाणपण आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायचा निर्णयही योग्य ठरू शकेल. सध्या रुपयाच्या तुलनेत डॉलर वाढण्याची शक्यता नसल्याने या कंपन्या चांगला नफा कमवत आहेत. ‘टेक महिंद्रा’ या कंपनीचा शेअर सध्या चर्चेत असून तो घेण्यास प्राधान्य द्यावे. तसेच इन्फोसिस, टीसीएसआर या कंपन्यांचे शेअर्स घ्यायला हरकत नाही. पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणे योग्य ठरते; परंतु मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराला कर्तव्याची फार काळ वाट पाहणे शक्य होत नाही. या क्षेत्रात मोठा परतावा मिळण्याचा
ालावधी (जेस्टेशन पिरिएड) काहीसा अधिक असतो. त्याऐवजी वाहनक्षेत्रातील गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देऊ शकते. अर्थात, आपल्याकडील वाहन निर्मिती कंपन्या आपली उत्पादने फारशी निर्यात करत नाहीत. त्यांची विक्री मुख्यत: भारतीय बाजारपेठेतच केली जाते. यावरून या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे योग्य नसल्याचे मत होईल; परंतु भारतीय बाजारपेठ खूप मोठी आहे आणि अजूनही केवळ 10 टक्के जनतेकडेच स्वत:ची वाहने आहेत. त्यामुळे देशांतर्गत वाहन विक्रीलाही मोठी संधी आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक वाहननिर्मिती कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकेल. स्वस्तात मिळणार्‍या चीनी दुचाकी लवकरच भारतात येतील आणि भारतीय कंपन्यांना हादरा बसेल असे बोलले जात असेल तरी त्यात तथ्य नाही. ही वाहने प्रत्यक्षात भारतात येतील की नाही याबाबत निश्चिती नाही. तसेच ही वाहने ग्रामीण भारतातील रस्त्यांवर कितपत टिकतील याबद्दलही शंका आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या शेअर्सवर त्यांच्या आगमनाचा परिणाम होणार नाही.स्थावर मालमत्तेतील गुंतवणूकही महत्त्वाची मानली जाते. सध्या या क्षेत्रात नव्याने बदल होऊ लागले आहेत. आतापर्यंत जमिनीचे भाव वाढत होते. त्यामुळे खरोखरच गरज म्हणून घर घेणार्‍यांची पंचाईत होत होती. घरांकडे केवळ गुंतवणूक म्हणून पाहिले जात होते. आता या मानसिकतेत बदल होऊ लागला आहे. आता गुंतवणुकीपेक्षा राहण्यासाठी घर घेण्याची गरज वाढू लागली आहे. जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता नसली तरी बांधकामासाठी लागणारे साहित्य सतत महाग होत आहे. तसेच इंधनाच्या दरात वाढ झाल्याने त्यांची वाहतूकही महाग होऊ लागली आहे. याचा परिणाम म्हणून घराच्या किंमती वाढतच राहतील. त्यामुळे घर घेऊन भाड्याने राहायला द्यावे आणि त्या भाड्यात गृहकर्जाचे हप्ते भरावेत असा विचार अस
ल तर तो रास्त नाही. यापुढील काळात भाड्यामध्ये मोठी वाढ होऊन हप्ते भरले जाण्याची शक्यता कमी आहे. घर घेऊन किमान पाच वर्षे ठेवण्याची क्षमता असेल तरच या क्षेत्रात गुंतवणूक करावी.सध्या गुंतवणुकीच्या बाबतीत नवीन ट्रेंड येऊ घातला आहे. अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रांमध्ये हा ट्रेंड प्रस्थापित झाला असला तरी आपल्याकडे त्याची केवळ सुरुवात झाली आहे. अर्थात, हा ट्रेंड केवळ उच्चभ्रूपुरताच मर्यादित आहे. यात चित्रकला, पेंटिग, कलात्मक वस्तू यामध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजे एखाद्या नवकलाकराची चांगली कलाकृती स्वस्तात विकत घ्याची आणि पाच-दहा वर्षांनी तो

कलाकार लोकप्रिय झाल्यानंतर त्या कलाकृतीची किमत वाढते तेव्हा ती मोठ्या किमतीला विकून टाकायची. ही गुंतवणूक मध्यमवर्गीयांच्या लगेच पचनी पडणार

नाही; परंतु उच्चभ्रू वर्गात अशा कलाकृतींना ‘स्टेटस सिंबॉल’ म्हणून महत्त्व असते. त्यामुळे आपले स्टेटस जपण्यासाठी आणि आपले कलेक्शन इतरांना दाखवण्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत मोजून या कलाकृतींची खरेदी केली जाते. याचा फायदा घ्यायचा असेल तर आजच विविध कलाप्रदर्शनांना भेट देऊन कलेची नजर विकसित करायला हवी आणि नवोदित कलाकारांची चांगली कलाकृती स्वस्तात घेऊन पुढे त्यावर नफा कमावण्याची वृत्ती अंगी बाणायला हवी. पाश्चिमात्य देशांमधील हा ट्रेंड आपल्याकडेही रुजेल. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन अशी गुंतवणूक करण्यास हरकत नाही. (अद्वैत फीचर्स)

— चंद्रशेखर चितळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..