नवीन लेखन...

गावोगावी गंमत शाळा

या शाळेत शिक्षकांना बसायला खूर्ची नाही. शिक्षक मुलांतच बसतात. लहान गटातील मुले तर काहीवेळा शिक्षकांच्या मांडीवर ही बसतात. सरांनी विचारलं ‘चांगला नारळ कसा ओळखायचा?ठ मुलांचे सरासर हात वर झाले. उत्तर तुम्हा आम्हाला माहित असलेलंच. पण त्यातूनच खरी कलाटणी मिळाली. ‘आपण नारळ वाजवून का पाहातो?ठ या प्रश्नाचं उत्तर वर्गातल्या एकाही मुलाला योग्यप्रकारे देता आलं नाही. अनेक मुलं म्हणाली की ‘तशी पध्दतच आहे. नारळ आधी हलवतात व मग वाजवतात.’ सरांनी काही न बोलता नकारार्थी मान हलवली. आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला,’ पण का वाजवतात?’ आता मुलांची उत्सुकता वाढली.

वर्गात तर फक्त पालेभाजी होती. नारळ नव्हता. तर मग आता ही गोष्ट मुले स्वत:हून कशी शिकणार? कशी अनुभवणार? याबाबत मलाही उत्सुकता वाटू लागली.
सरांनी समोरच बसलेल्या मुलाची वॉटरबॅग घेतली. ती अर्धी रिकामी होती. ‘आता होणारा आवाज लक्षपूर्वक ऐका’ असं सांगत वॉटरबॅगेच्या रिकाम्या आणि पाणी असणाऱ्या भागावर त्यांनी सावकाश टिचक्या मारल्या. मुलांनी हात वर केले. पण तिथे दूर्लक्ष करत त्यांनी वॉटरबॅगेचं झाकण काढलं. आता मघाचच्याच ठिकाणी पुन्हा तशाच टिचक्या मारल्या. यावेळी आवाज वेगळा आला. मगाशी वर झालेले हात हळूच खाली गेले. मुलांचा अंदाज घेत सर म्हणाले,’समजा, अशी कल्पना करा की ही वॉटरबॅग म्हणजे नारळ आहे! तर आपल्याला या आवाजांवरून काय समजू शकेल?ठ मुले उत्सफूर्तपणे आनंदाने ओरडू लागली.’नारळाला भोक पडलय का ते कळेल? नारळाला फट पडलीय का ते कळेल. फुटका नारळ लगेच कळेल!’
त्यानंतर सरांनी प्रत्येक मुलाला बोलतं केलं. आपापल्या वॉटरबॅगवर हा प्रयोग करुन पाहण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं. त्याचप्रमाणे पाणी कमी जास्त करुन व झाकण घट्ट व सैल करुन आवाजात होणारा बदल मुलांनी अनुभवला. मग सरांनी पालकांना गृहपाठ दिला.

अशाप्रकारे आपण कधी शिकल्याचं मला तर आठवेच ना! नकळत मला त्या मुलांचा हेवा वाटू लागला. या आनंददायी गंमतशाळेतला हा दोन तासांचा वेळ, फुलपाखरांसारखा कसा भूर्रकन उडून गेला हे कळलंच नाही. आजच्या तासिकेविषयी व गंमतशाळे बाबत बोलताना राजीव तांबे म्हणाले,’गंमतशाळा म्हणजे ‘जे देत नाही शाळा, ते देते गंमतशाळा.’ गंमतशाळा ही शाळेला व पाठ्या*माला पूरक आहे. आम्ही इथे मुलांना शिकवत नाही तर, मुलांनी स्वत:हून शिकावं यासाठी त्यांना प्रेरित करतो. मुलांसोबत शिकतो. कुठलाही रेडीमेड निष्कर्ष इथे मुलांना सांगितला जात नाही. त्याचं त्याने शोधून काढलं पाहिजे. यासाठी शिकण्याच्या नवनवीन पध्दतींची त्याला इथे ओळख करुन दिली जाते. ‘कसं शिकावं हे शिकण्यासाठीच’ तर आहे, ही गंमतशाळा. इथे आम्ही मुलांना गृहपाठ देत नाही तर पालकांना देतो. आमच्यासाठी गृहपाठाची व्याख्या, घरी करायचा अभ्यास नव्हे तर ‘घराने करायचा अभ्यास’ अशी आहे. जसे मुलांच्या शिकण्यात समाजाचा, घराचा सक्रीय सहभाग हवा त्याचप्रमाणे मुलांच्या मूल्यमापनातही ही सक्रीयता अपेक्षितच आहे. पालक मुलांशी खूप कमी बोलतात किंवा काही बाबतीत मुलांना गृहित धरतात त्यामुळे मुलांची शिकण्याबाबतची उत्सुकताच कमी होते. समोरच्या मोठ्या माणसांना आपण कुठलाही प्रश्न विचारू शकतो, असं निर्भय वातावरण घरात आणि शाळेतत हवं. म्हणजे मग मुलांचं कुतूहल जागं राहील, त्यांची शिकण्याची उमेद वाढत राहील. काहीवेळा पालकांना असं वाटतं की विज्ञाना विषयी बोलण्याची जबाबदारी ही शाळेतल्या शिक्षकांची आहे. आणि अनेक शिक्षकांनी तर विज्ञान हे पाठ्यपुस्तकातच बंद करुन टाकलंय.

त्यामुळे विज्ञान आणि माझे दैनंदिन जीवन यांचा काही सहसंबंध आहे याची जाणीवच मुलांना नाही. आमच्या शाळेत आम्ही ‘बालभारती’ वर अजिबात अवलंबून राहात नाही. मुलांच्या मनात आपल्या मातृभाषेविषयी अरुची निर्माण करण्यात बालभारतीचा सिंहाचा वाटा आहे. बालभारतीतली भाषा मुलांना इंग्रजीपेक्षा ही परकी वाटते. इंग्रजी कधीतरी कानावर पडण्याची शक्यता तरी असते पण बालभारतीय भाषा ही अजबच आहे. सारांश, आम्ही आमच्या शाळेत, बालभारती मधील मुलांना समजेल / आवडेल एव्हढाच भाग काढून घेतो बाकीचा बराच चोथा बाजूला ठेवतो. मुलांना आवडतील, त्यांच्या भावविश्वाशी,त्यांच्या परिसराशी निगडित असतील असे काही पाठ आम्ही मुलांच्याच मदतीने तयार केले आहेत.
बालभारती मधले स्वाध्याय हा आणखी एक अजबच प्रकार आहे. मुख्य म्हणजे हे स्वाध्याय स्मरणशक्तीवर आधारित आहेत,आकलनशक्तीवर नाहीत! त्याचप्रमाणे हे स्वाध्याय हे निव्वळ पाठावर आधारित आहेत,पाठातील आाशयावर नाहीत! आणि त्यामुळेच पाठ्यपुस्तकातील धडे/कविता ह्याविषयी एक तिरस्कार मुलांच्या मनात निर्माण होतो!
स्वाध्यायातील प्रश्न हे बहुआयामी असायला हवेत.त्या प्रश्नांना अनेक उत्तरे असायला हवीत.मुलांच्या विचाराला चालना मिळणे,त्याच्यातील सूप्त सर्जनशीलता जागी होणे,विचार करण्याच्या विविध पध्दतींची त्यांना ओळख होणे आणि मी स्त:हून शिकू शकतो/नवीन शोधू शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होणे हे स्वाध्यायाचे मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे.

आमच्या गंमतशाळेतील एक उदाहरण पाहू.
इयत्ता तिसरीला विज्ञानाच्या पुस्तकात ज्ञानेंद्रियांची ओळख आहे व त्याखाली बालभारतीय स्वाध्याय आहेत. नाकाने वास समजतो व हाताला स्पर्श समजतो असे एक वाक्य आहे.
यासाठी एका प्रयोगाचे आयोजन केलं. एक सुती रुमाल आणला त्याचे तीन सारखे तुकडे केले. मग मेणबत्ती पेटवली. एक तुकडा हातात घेऊन मुलांना विचारलं,हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? मुलांनी काहीही उत्तरे दिली. ‘एक तास,अर्धा तास, दहा मिनिटं वगैरे’. प्रत्येकाने आपापले अनुमान वहीत लिहून ठेवले. आत्तापर्यंत कापड जाळण्याची मुलांना मुभा नसल्याने कापड जळण्यासाठी किती वेळ लागेल हे मुलांन सांगणे अपेक्षितच नव्हते.

तो तुकडा अकरा सेकंदात जळला. मग आम्ही सर्वांनी जळलेल्या कापडाचा वास घेतला. दुसरा तुकडा पाण्यात भिजवला व पिळला. आता हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाला सगळ्या मुलांनी आता ‘सेकंदात’ उत्तरे दिली. हा तुकडा जळण्यासाठी वीस सेकंद लागले. आम्ही सर्वांनी मिळून पाण्यात भिजून जळलेल्या कापडाचा वास घेतला. तो पहिल्यापेक्षा वेगळा होता.

तिसरा तुकडा तेलात भिजवून मग मेणबत्तीवर धरला. हा तुकडा जळायला बत्तीस सेकंद लागली. कारण तेल आधी जळले मग कापड. हा वास ही वेगळाच होता. मग मुलांनी अशा पदार्थांची यादी केली जे सुके,ओले व तेलात भिजून जळले असता वेगवेगळा वास येतो. त्यानंतर अशा पदार्थांची यादी केली की, पदार्थ एकच पण वेगवेगळ्या स्टेजेसवर त्याचे वेगवेगळे वास येतात. उदा. ऊतू जाणारं दूध, लागलेलं दूध, आटणारं दूध इ. त्याचप्रमाणे डोळे बंद करुन ओळखता येणारे वास. मुलांनी सुमारे 182 वासांची यादी तयार केली. नाकाने आपल्याला फक्त वास समजत नाही तर त्या वासामुळे आपल्याला खूप माहिती समजू शकते, आणि तीच खरी महत्वपूर्ण असते. अशी विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी वास हे केवळ एक माध्यम आहे आणि त्यासाठी नाक हे एक साधन आहे. पण त्या वासामागे दडलेली माहिती शोधणं हे आपलं खरं साध्य आहे.

गंमतशाळेतील मुले जसे विज्ञानाचे प्रयोग स्वत:हून करतात. तसेच गणित, भाषा, इतिहास किंवा नागरिकशास्त्र अशा विषयांचे खेळ ही खेळतातत. निबंधलेखनाच्या विविध दहा पध्दती आम्ही विकसित केल्या आहेत. भाषिक कौशल्ये व संवाद कौशल्य विकसित करण्यासाठीसुध्दा काही खेळ तयार केले आहेत.

महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी मुलांसाठी खास वेगळा कार्या*म असतो. या दिवशी गावातील मान्यवरांशी मुले गप्पा मारतात. त्यांची मुलाखत घेतात. त्यातूनच नवीन गोष्टी शिकतात. मागच्या वर्षी मुलांनी डॉक्टरांच्या मदतीने इंजेक्शन देण्याचा अनुभव घेतला. मुलांनी पालकांना नव्हे तर वांगी, दुधीभोपळा व पपईला इंजेक्शन्स दिली. मग डॉक्टरांची मुलाखत घेतली. डेंटीस्टच्या मदतीने दातांची रचना तर पोलीस इन्सपेक्टरांच्या मदतीने वाहतुकीचे नियम व खुणा मुलांनी समजून घेतल्या. नगरसेवकांशी गप्पा मारून पालिकेचे कामकाज कसे चालते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ज्यांना ही गंमतशाळा सुरू करायची आहे त्यांनी दोन दिवसांचं प्रशिक्षण घेणं अपेक्षित आहे. आता हे प्रशिक्षण कोण घेऊ शकतं? हा प्रश्न आलाच. जो किंवा जी नवनवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक आहे व मुलांसाठी काम करण्याची आंतरीक तळमळ आहे ते कुणीही प्रशिक्षण घेऊ शकतात. अशा गंमतशाळा सुरू कराव्यात असं का वाटलं? या प्रश्नाचं तांबेसरांनी दिलेलं उत्तर त्यांच्याच शब्दात सांगायला हवं.

ते म्हणाले,’लहानपणी शाळा म्हणजे मला छळछावणी वाटायची. गणित, विज्ञान, भूगोल अशा विषयांची सदैव धास्ती. आनंदाने शाळेत गेल्याचं कधी आठवतच नाही. संपूर्ण शालेय जीवनात इंग्रजीतल्या गोपाल, अहमद, सीता आणि यास्मीन यांनी आम्हाला पार वेठीस धरलं. शिकण्यातली मजाच कधी अनुभवली नाही. पण जेव्हा तोत्तोचान वाचलं.गिजूभाईंचं दिवास्वप्नं वाचलं तेव्हाच ठरवलं आपण मुलांसाठी धमाल शाळा सुरू करायची. मुलांना निरंतर शिकत राहण्याची गोडी लावायची. यापुढे बालक, पालक आणि शिक्षक यांच्यासाठीच काम करायचं, लेखन करायचं. मुलांचं शिकणं आनंददायी व्हावं, सहज व्हावं हेच आता आपल्या आयुष्याचं मिशन! मुलं कशी शिकतात, हे मी पुस्तकं वाचून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकलो आहे. आज तुम्ही ही गंमतशाळा पाहात आहात पण या आधी अशीच शाळा मी ‘सृजन घर’ या नावाने पाच वर्ष चालवली आहे. मी अध्यापनशास्त्राचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही याचा मला खूप फायदा झाला. त्यामुळेच मी वेगळा विचार करू शकलो. आणि माझ्या स्वप्नातील शाळा प्रत्यक्षात आणू शकलो. हे जर मला जमू शकतं तर ते कुणालाही जमू शकतं! आपण सारे एकत्र येऊ. परिसरातल्या मुलाचं पालकत्व स्वीकारू. आणि आपल्याला न मिळालेली ही गंमतशाळेची अलीबाबाची गुहा मुलांसाठी खुली करू. गावोगावी गंमतशाळा सुरू करू.

गावोगावी अशा गंमतशाळा सुरू व्हाव्यात. मुलांना शिकण्याची धास्ती न वाटता त्यांची शाळेशी मैत्री व्हावी, असा विचार करतच मी जड पावलाने घरी परतले.
संपर्कासाठी फोन : 0251 2454343

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..