नवीन लेखन...

येणार्‍या काळात मराठी भाषेचं भवितव्य काय?

 

|| हरि ॐ ||

मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी साहित्य संमेलनात तर हमखास केली जातात. भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत. आणि थोडी देशाबाहेर दृष्टी टाकली तर जगातील सर्वच लोकांना आपापली भाषा कशी वाचवायची आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे कसे रक्षण करायचे असा प्रश्न पडू लागला आहे. त्याला इंग्रजी भाषेची मायभूमी ब्रिटन आणि अमेरिका यांचाही अपवाद नाही. हजारो वर्षांत जगातील विविध भाषांचा एकमेकांशी जेवढा संपर्क आला नसेल तेवढा गेल्या शंभर-दीडशे वर्षात आला. पण गेल्या शंभर वर्षाच्या शेवटच्या दशकात डिजिटल क्रांतीने परस्पर संवादाचा वेग आणि आवाका प्रचंड प्रमाणावर वाढला. वाहतुकीची साधने आणि त्यांची गती वाढली तशी जगातील सर्वभाषिक लोकांचा विविध स्तरावर आणि क्षेत्रांत परस्परांशी इतका व्यापक आणि विस्तृत संपर्क व संवाद होऊ लागला आहे की त्याला मानवी इतिहासात तुलना नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान वाढीच्या गतीने वेग घेतला असताना करमणुकीपासून ते विज्ञान-तंत्रज्ञानांना पर्यंत बहुतेक विषय सर्वांना समजू शकतील अशी जागतिक भाषा उत्क्रांत होणे अपरिहार्य आहे. सर्वांना भीती तीच आहे – या जागतिक सुपर-भाषेपुढे आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा कसा टिकाव लागणार? युरोपातील छोट्या देशांमधील भाषांनाच नव्हे तर सर्व देशातील भाषांप्रेमिकांपुढे हा प्रश्न पडला आहे. चिनी आणि रशियन भाषिकांनी जगाच्या बाजारात टिकाव धरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या भवितव्याबद्दल गंभीर विचार व्हायला पाहिजे. खरे म्हणजे महाराष्ट्राचा प्रश्न जेवढा गंभीर आहे तेवढाच तो दक्षिण आणि अतिपूर्वेकडील राज्यांचा आहे. जसे या भाषिकांची सरकारे आणि लोक अस्मिता व संस्कृती संरक्षणासाठी टोकाची अतिरेकी भूमिका घेतात तसे महाराष्ट्रात होत नाही. हे औदार्याचे आणि सहिष्णुतेचे लक्षण वरवर वाटत असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की मराठी माणसाचा न्यूनगंड, भाषेबद्दलची बेफिकीरी आणि शासनाचा व मराठी बुद्धिवंतांच्या इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टीच वरील सदगुणांना कारणीभूत आहेत असे वाटते. त्यामुळे भाषेची अधिक हेळसांड होते ही दुदैर्वी पण खरी वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ महाराष्ट्राने दक्षिण आणि अतिपूर्वेकडील राज्यांसारखे वागावे असा म्हणायचे नाही. उलट भाषेच्या प्रश्नाकडे व्यापक आणि सुसंस्कृतपणे कसे बघावे त्याचे दिशादर्शन महाराष्ट्र करू शकतो. मात्र त्यासाठी देखील आपल्या सत्ताधाऱ्यांना आणि सांस्कृतिक पुढाऱ्यांना इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी हवी.

खरे म्हणजे संपूर्ण भारतानेच भाषाप्रश्नाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. घटनासंमत अशा २१ अधिकृत भाषा भारतात असल्या तरी एकूण १७०० बोलीभाषा मातृभाषा म्हणून वापरल्या जातात. जगातील दुसऱ्या कोणत्याही देशात एवढे भाषावैविध्य आढळणार नाही. भाषा हे निव्वळ संवाद साधन नसून तिचा संबंध इतिहास, संस्कृती, अस्मिता आणि वंश यांच्याशीही जोडला जातो. पुढील काही वर्षांत म्हणजे आथिर्क प्रगतीची घोडदौड होत असताना हे भाषिक व सांस्कृतिक संघर्ष वाढणे अटळ आहे. म्हणून भारताची एकता टिकवून प्रगतीची वाटचाल कायम ठेवण्यासाठी भाषेचा प्रश्न चिघळण्याआधीच ऐरणीवर येणे अपरिहार्य आहे. दुसऱ्याबद्दलचे प्रेम, विचार, सहानुभूती, आवड आणि सबुरी हे गुण मराठी माणसाला अनाहूतपणे चिकटले आहेत त्यांचा फायदा घेऊन महाराष्ट्र या विषयात धोरणात्मक पुढाकार घेऊ शकतो.

प्रत्येक शब्द ‘क’ आणि ‘प’ पासून सुरु करुन केवढा मोठा परिच्छेद लिहिता येतो यावरून मराठी भाषेची ताकद आणि वैविधता दिसून येते.

“कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला” “पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला. पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले. पंतांना परमेश्वरच पावला!”

मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी राज्यातील सर्व विद्यापीठांची आहे असे महाराष्ट्रातील विद्यापीठांसाठी असलेल्या १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कायद्यातील कलम ५ अन्वये दिसून येते. परंतु या तरतुदीचा राज्यातील विद्यापीठांनी योग्यतो विचार आणि वापर न केल्याने गेली पाच-सहा दशके मराठी भाषा उच्च शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये ज्ञानभाषा झालेली नाही.

ज्या भाषेचा वापर ज्ञानार्जनासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी व ज्ञान आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भवितव्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. पहिल्या परिच्छेदात आपण पहिलेच आहे की जगातील अनेक भाषांवर ही वेळ आलेली आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी बऱ्याच व्यासपीठावरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. यासाठीही समित्या वगैरेचे गठण करण्यात आल्याचे वाचनात आहे.

मराठीला केवळ राजभाषा म्हणून मान्यता मिळून पुरेसे नाही. तिच्या विकासासाठी लोकभाषा आणि ज्ञानभाषा या दोन्ही पातळ्यांवर तिचे महत्त्व प्रस्थापित होणे आवश्यक आहे. प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या लोकव्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात तिचा वापर वाढायला हवा. प्रसंगी त्यासाठी युक्ती, शक्ती, सक्ती, संधी आणि काही कठोर निर्णय घ्यावे लागल्यास घेणे जरुरीचे आहे. दाक्षिणात्य राज्यांना हे कसे जमले? असे विचारण्यापेक्षा आपण नेमके काय करायला पाहिजे याचे उत्तर शोधले तर मराठीची खरी अस्तीमिता आणि लाज राहील असे वाटते!

मुख्य मुद्दा आहे नेत्यांच्या इच्छाशक्तीचा आणि दूरदृष्टीचा. मातृभाषेविषयी आदर कमी राहिला आणि अभाव कायम राहिला तर भाषा विषमता वाढीस लागून गंभीर परिस्थिती उदभवू शकते. आपण मराठी माणसे एका बाजूला इतरांपेक्षा मातृभाषेविषयी अत्यंत कमी विचार करणारी असून तिचा व्यवहारात वापर कमी प्रमाणात करतांना दिसतो.

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

1 Comment on येणार्‍या काळात मराठी भाषेचं भवितव्य काय?

  1. जगदीश पटवर्धन साहेबांनी मराठी भाषेबाबत सुंदर विवेचन केलय. क आणि प अक्षराने सुरू होणारे लेख खूप छान.
    न्यून गंड हा महत्त्वाचा मुद्दा.
    महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत मराठी चा वापर करीत नसतात. इतर भाषिक पत्रकारांना सोयीचं व्हावं म्हणून. बर्याच वर्षांपूर्वी मनमाड या अंतर्गत रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सूचना मराठी वगळून कानडी भाषेत करण्यात येत असे. त्याचं कारण तेथून जाणाऱ्या बर्याच गाड्या कर्नाटक राज्यात जात होत्या असं दिलं गेलं. कानडी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मराठीची गळचेपी. अशी आपली मानसिकता. दुर्दैव मराठी चं. आणखी काय?

Leave a Reply to Vijay Likhite Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..