नवीन लेखन...

यंत्रसंपदा आणि आरोग्य

आपल्या देशातली आरोग्याची आकडेवारी पाहिली तर असे आढळून येईल की हृदयरोगी, मधुमे आणि स्थूलता असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवन पद्धती. आज जे चाळीस ते साठी च्या दरम्यान आहेत त्यांना विशेष करून मी काय म्हणतो ते पटेल. रोज च्या जीवनात यंत्रांचा, मशिन्स चा,  गाड्यांचा सढळ वापर, बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि बदललेली जीवनशैली ह्या सर्वांमुळे हे नवे आजार डोके वर काढून राहिले आहेत आणि तरुण मंडळी (अगदी १०-१५ वयोगटातील मुले सुद्धा) ह्या रोगांना बळी पडत आहेत.

यंत्रयुग, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्यांनी आपली जीवनपद्धती पार बदलून टाकली आहे.

पूर्वी घरोघरी विहिरी होत्या. अजूनही गावागावात आहेत. मुंबई मध्ये होत्या. पुण्यात वाड्यांमध्ये होत्या. जाड दोरीने ओढून विहिरीतून पाणी काढताना आणि बोरवेल चा पम्प हापसताना जबरदस्त व्यायाम होत असे. विहिरी, ओढे आणि तलाव जात घरापासून दूर असतील तर त्या अंतरावरून पाण्याची भांडी वाहताना होत असे तो व्यायाम वेगळा.  आता विहिरीवर अँड बोरवेल वरती पम्प लावले गेले. पूर्वी चाळ संस्कृती आणि वाडा संस्कृती मध्ये पाण्याचे नळ घराबाहेर मध्यवर्ती ठिकाणी असायचे अशा ठिकाणी पाणी भरून घरी आणताना पण पाणी आणताना दमछाक होत असे.  शहरामध्ये घरोघरी नळ आले. पुढे पाणी भरताना करावी लागणारी मेहनत संपली.

एके काळी जाते दळण्यासाठी वापरले जात असे. घराघरात जाती असायची. काही जुन्या घरात जाती जमिनीतच बसवलेली असायची. घरातल्या बायका सकाळी किंवा रात्री ओव्या म्हणत दळणकाम करत असत.. गल्लोगल्ली पिठाच्या गिरण्या आल्या आणि घरातली जाती केंव्हा दिसेनाशी झाली कळलेच नाही. आता घरात गहू दळण्याच्या विजेवर चालणाऱ्या चक्क्या मिळतात. जेवढे हवे तेवढे गहू दळून घ्या. रेडीमेड आटा आता वाण्याच्या दुकानात मिळू लागला आहे. आता तर पिठाच्या गिरण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पुढच्या पिढीला जर सांगितले की पूर्वी घरीच धान्य दळले जात होते किंवा जागोजागी धान्य दळायच्या पिठाच्या गिरण्या असायच्या  जेथे लोक धान्य दळायला घेऊन जायचे तर त्यांचा विश्वास बसणार नाही.  आता पिठाच्या गिरण्यांचे फोटो काढून ठेवायला हवेत.

शहरामध्ये तीस चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येक घरात असणारा पाटा -वरवंटा किंवा रगडा पण आता इतिहास जमा होण्याची वेळ आलेली आहे. मिक्सर आता गावोगावी दिसू लागले आहेत. गावच्या घरात उखळ असे. त्यात मुसळ घालून कांडप केले जात असे. धान्य घरात कांडले जात असे. मसाले घरी बनवले जात होते. धान्याचे कांडप मसाले कुटणे इत्यादी कामे आता यंत्रावर केली जातात.

गावच्या ठिकाणी धुणी धुण्यासाठी कोसभर लांब नदी वर जावे लागत असे. तिथे दगडावर आपटून व रगडून कपडे धुवावे लागत असत. कपड्यातले पाणी काढण्यासाठी ते जबरदस्त पिळावे लागत असत आणि मग घरी आणून सुकण्यासाठी दोरीवर टाकावे लागत असत. आता वाशिंग मशीन ने हे सर्व श्रम संपवून टाकले आहेत.

किचन चा ओटा नावाचा प्रकार पूर्वी न्हवताच मुळी. स्वयंपाक शक्यतो बसूनच केला जायचा. चूल असेल तर ती पेटवण्यासाठी फुंकणी फुकून गाल दुखू लागत असत. चूल खाली – डबे वरती – अशी सारखी उठ बस करावी लागत असे. आता ओटे आले मॉड्युलर किचन आले उभ राहून स्वयंपाक करायची पद्धत आली. उठ बस बंद झाली आणि पायाचे व्यायाम थांबले.

शेतात नांगर चालवणे, मोट ओढणे, जमीन करणे, जमीन चोपणे व सपाट करणे, पेरणी करणे अशी अनेक कामे श्रमाची होती. अजून ही होत असतील. पण आता यंत्रांचा वापर शेती मध्ये सुरु झाला.

सांगायचा मुद्दा असा की आपण बरेचसे यंत्र सामग्री वर अवलंबून आहोत. यंत्रयुगात आपण वावरतो आहे आणि त्यामुळे असे अवलंबून असणे ह्यात आक्षेपार्ह असे काही नाही. पण ह्यामुळे आपण एक लक्षात घेतले पाहिजे की यांत्रिकीकरणामुळे  आपली जीवनशैली आपल्या नकळत बदलली आहे. रोजच्या आपल्या दिनक्रमातून मेहनत वजा झाली आहे. शरीराला व्यायाम नसल्याने स्थूलपणा वाढला आहे. रोगांना आमंत्रण दिले आहे. तरुण माणसे हृदय रोगाला, मधुमेहाला  बळी पडू लागली आहेत. जीवनात ताण तणाव वाढू लागला आहे त्यामुळे नैराश्य मधून मधून डोके वर काढू लागले आहे. अशा रोगांपासून दूर रहायचे असेल तर आपण पूर्वीची जीवनशैली तर विचारात घेऊ शकत नाही. आज जर घरात जात्यावर दळायचे म्हटले तर कोणाला ते जमणार नाही, तेवढा वेळ पण नाही आणि आजच्या आधुनिक काळाला ते अनुसरून पण नाही. पण जिम जॉईन करणे शक्य नसेल तर आपण काही सध्या गोष्टी करू शकतो – जशा की

– थोडे अंतर (एखाद किलोमीटर) असेल तर चालत जाणे / सायकल वापरणे

– बाईक / कार आपल्या गत्यंत ठिकाणापासून थोडी दूर लावून चालत जाणे

– शक्य असले तेथे चार – पाच माळे जिन्याने चढणे – उतरणे

– बैठे काम असेल तर उठून बसणे, अंग मोकळे करणे, शक्य असले तर थोडे चालणे

– बगीचा असेल तर बाग काम करणे

– कमीत कमी आठवड्यातून तीनदा निदान एक तास जलद चालण्याचा व्यायाम करणे

– घरात लहान मुलांशी खेळणे

– भरपूर पाणी पिणे (दिवसाला दोन ते अडीच लिटर)

– योगाभ्यास, मेडिटेशन

– जंक फूड खाणे टाळणे

परदेशात लोकांना ह्या गोष्टीची जाणीव झालेली आहे. तिकडे ते लोकं जमेल त्या पद्धतीने आपल्या शरीराची हालचाल होईल हे पाहात असतात – स्पोर्ट्स करतात, सायकली वापरतात, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, धावण्या- चालण्याचा व्यायाम करतात आणि आपल्या मुलांना पण स्वत: बरोबर करायला लावतात. आपली जीवनशैली बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या इथे पण काही लोकं आता आपली जीवनशैली बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. कारण ह्या लोकांना निरोगी जीवनशैली कशी अंगिकारायची ह्याची जाणीव झालेली आहे.

आपले आरोग्य आपल्या हाती आहे ह्याची जाणीव आपल्याला व्हायला हवी – त्यासाठीच हा लेख-प्रपंच. यंत्रसंपदा पण वापरायची आणि आरोग्य पण राखायचे ह्याचा मंत्र समजून घ्यायला हवा. आपण वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि पुढच्या पिढीला जाणीवपूर्वक सांगितले पाहिजे.

— प्रकाश दिगंबर सावंत

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..