नवीन लेखन...

पैसा म्हणजे काय?

दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. मूल्यमापन हे पैशाचे महत्त्वाचे कार्य आहे. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो.


पैसा म्हणजे काय ? त्याचे महत्त्व मनुष्याच्या व्यक्तीगत जीवनात आणि एकूणच अर्थव्यवस्थेत पैशाचं महत्त्व / त्याचे विविध प्रकार

पैसा या विषयावरच्या अंकात लेख लिहायला सांगितल्यावर माझ्या मनात ‘पैसा ये पैसा, पैसा ये कैसा, नही कोई ऐसा! आ मुसिबत, न हो मुसिबत- आ आ आ’ कर्ज सिनेमातलं ऋषी कपूरचं हे गाणं डोळ्यासमोर नाचू लागलं. पैसा म्हणजे काय तर विनिमयाचं एक साधन. मग ती खरेदी असो, व्यवसाय असो की घेतलेली सेवा.

जेव्हा चलन स्वरूपात पैसा नव्हता तेव्हा वस्तूंची देवाण – घेवाण करून व्यापार – आपापसातले व्यवहार चालत असत. शेतकरी आपल्या जवळचं धान्य देऊन मीठ मसाला घेत असे. तर मजूराला आपल्या कष्टाच्या बदल्यात धान्य मिळत असे. ज्यावेळी प्रगत मनुष्यजातीला हे व्यवहार गैरसोयीचे वाटू लागले त्यावेळी वस्तू विनिमय पध्दत सुरू झाली. पिसे, हाडे, धान्य,हत्तीचे दात, वाघाचे कातडे, घोडे, हत्ती आदी वस्तूंचा आणि जनावरांचा जगाच्या विविध भागात विनिमय माध्यम म्हणून उपयोग सुरू झाला. त्याचा पुढील टप्पा म्हणजे नाणी, कागदी चलन आणि पतपैसा हे होत.

दाम करी काम

दैनंदिन जीवनात पैशाचं महत्त्व फार मोठं आहे. आज आपल्याकडे पैसा असेल तर बरेच प्रश्न सुटतात. मग ते प्रश्न निवासाचे असोत, शिक्षणाचे असोत वा रोटीचे असोत. व्यक्तिगत जीवनात पैसा नसेल तर अनेक गोष्टींची पूर्तता आपल्याला करता येत नाही. पैसे असतील तर आपण मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतो. पैसे असतील तर आई- वडिलांचा औषधोपचाराचा खर्च करू शकतो. पैसे असतील तर चांगला आहार करू शकतो. पैसे असतील तर सुट्टीमध्ये मुला-बाळांना घेऊन प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकूण काय तर जवळजवळ आपल्या प्रत्येक कृतीला पैशांची साथ आवश्यक असते. पैसा कमी अथवा जास्त असू शकतो. मात्र तो असलाच पाहिजे, अशी परिस्थिती आहे. आजच्या काळातील बहुतांश सुजाण नागरिक, आपला खिसा तपासूनच, आपल्या खर्चाच्या मर्यादा ओळखूनच जीवनाचा आनंद घेत असतात. ‘सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही’. ही म्हण प्रचलित होण्याचं कारणचं हे आहे की, पैसा नाही तर काही नाही.

पैसा म्हणजे सबकुछ हे खरं असलं तरी,काही बाबतीत मात्र पैशामुळे नाते संबंध बिघडतात. अती पैशांमुळे माणसाला घमेंड, गर्व होऊ शकतो. सुरूवातीला नमूद केल्याप्रमाणे पैसा ही एक मुसिबत होऊ नये याची काळजी मात्र सर्व संबंधितांनी घ्यायला हवी.

अर्थव्यवस्थेतील पैशांच महत्त्व

दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. मूल्यमापन हे पैशाचे महत्त्वाचे कार्य आहे. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो.

पैशाचे मूल्य पैशाच्या खरेदीशक्तीवर अवलंबून असते. वस्तू महागल्या की पैशाची खरेदीशक्ती कमी होते. उलटपक्षी वस्तूंच्या किंमती खाली आल्या म्हणजे पैशाची खरेदीशक्ती वाढते. वस्तूंच्या किंमतीचा आणि पैशांचा असा परस्पर संबंध असतो. चलनवाढीमुळे भाववाढ होत असते. परंतु तूटीचे अंदाजपत्रक सरकारकडून सादर केले जाते आणि तूट भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो. याचा प्रत्यक्ष परिणाम भाववाढीत होतो.

पैशाचे विविध प्रकार

आज भारतात आपण ज्या प्रकारात पैसे बघतो, त्याचा प्रारंभ इ.स. पूर्व 6 व्या शतकात झाला. काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग या राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. विविध आकारांची, तसेच विविध धातूची उदा. चांदी, तांबे, शिसे इतकचं नव्हेतर सोन्याचीही नाणी पाडण्यात आली. या नाण्यांवर त्या त्या काळातील व राजवटीतील प्रभावाप्रमाणे चिन्हे – मुद्रा अक्षरे उमटवण्यात येत असत. त्यामध्ये बुध्द, बोधीवृक्ष, स्वस्तिक, अश्वमेध, श्री राजा शिवछत्रपती असेही आढळून येत असे.

नाणी वापरायला जड म्हणून कागदी नोटा वापरायला सुरूवात झाली. कागदी नोटांचे जनक म्हणून चीन देशाकडे पाहिले जाते. परंतु कागदी नोटांचा प्रसार अमेरिका, व युरोपमध्ये अधिक झाला. भारतात 18 व्या शतकात कागदी चलन छापण्यास प्रारंभ झाला. 1944 पासून कागदी चलनात सुधारणा होऊन त्यात सुरक्षा धागा व वॉटरमार्क टाकण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1949 साली सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चौमुखी सिंहाची मुद्रा भारताच्या कागदी चलनावर छापण्यात आली.

या ज्ञात चलनाबरोबरच चलनाचे विविध प्रकार अस्तित्वात यायला सुरूवात झाली. ज्याला प्लॅस्टिक मनी असं म्हटलं जातं, ते म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गिफ्ट कार्ड याची चलती सुरू झाली. भारतामध्ये 1987 साली आयसीआयसीआय बँकेने डेबिट कार्ड द्यायला सुरूवात केली. ज्याद्वारे बँकेत न येता, थेट एटीएम् मधून रोख रक्कम काढणे शक्य झाले. डेबिट कार्ड म्हणजे ज्याद्वारे स्वत:च्या खात्यातील रक्कमेचा वापर बँकेत न जाता करता येणे. त्यापुढची पायरी म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे थोडक्यात उधारीवर खरेदी करण्याची मुभा. भारतात पहिले क्रेडीट कार्ड सेंट्रल बँक ऑफ इंडियाने द्यायला सुरूवात केली.

या अदृष्य स्वरूपाच्या पैशात नेट बँकींग, मोबाईल बँकींगची भर पडली आहे. एन्पीसीआय या आस्थापनेने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून पैशांची देवाण घेवाण सहज सोपी केली आहे. आपला देश कॅशलेस होणे अशक्यप्राय असले तरी, लेस कॅशकडे मात्र जोमाने वाटचाल सुरू आहे. आज करोडो व्यवहार युपीआय् मार्फत होत आहेत, हे निश्चितच उल्लेखनीय आहे.

काळाबरोबर गरजा बदलल्या, पैशाचं स्वरूप बदललं पण पैशाचं महत्त्व काही कमी झालं नाही, होणारंही नाही. पैसा माणसाला जोडतो, तसंच माणसाला तोडतोही. फक्त त्याचा उपयोग करण्याचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे, एवढचं!!

(बँकिंग अभ्यासक)

–उदय पेंडसे

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

3 Comments on पैसा म्हणजे काय?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..