व्यासपूजन

विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर ल. गावडे सरांनी २० जून २०१६ रोजी त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय.

वंदनीय गावडे सरांनी वीस जून दोन हजार सोळा रोजी, त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय ! २० जून १९२४ ही सरांची जन्मतारीख आहे. आजच्या मंगलदिनी गावडे सरांच्या घरी, दिवसभर त्यांच्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकगणांचा, पत्रकारांचा, साहित्यिक, शासकीय, कला, अश्या विविध क्षेत्रातील जाणत्यांचा वावर असतो. मी तो सर्व अनुभव गेली अनेक वर्षे जवळून बघत आलोय. होय, बरोब्बर पन्नास वर्षे माननीय गावडे सरांचा मला अगदी जवळून सहवास लाभत आलाय ! जणू आज सरांच्या जन्मदिनी आम्ही विद्यार्थी गुरुपौर्णिमा साजरी करतोय, व्यासपूजन करतोय !

“गावडे सर” हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, एवढे त्यांचे कार्य महान आहे !

मला आजही लख्ख आठवतंय, पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या, डेक्कन जिमखान्यावरील भावेस्कूलमध्ये, एकोणीसशे त्रेसष्ठ साली गावडे सर आले. सर त्यापूर्वी नूतन मराठी विद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करीत होते. एक व्यासंगी शिक्षक म्हणून सरांची कारकीर्द महान आहे, भरीव आहे !

सरांना त्यांच्या शालेय जीवनांत मराठी विषयाबरोबरच चित्रकलेचीही गोडी होती, हे ऐकतांना खरं वाटतं कां ? होय, त्यांना चित्रकलेची खूप आवड होती, त्यांना त्यावेळी चित्रकलेची पारितोषिकेही मिळाली होती. गावडे सरांनी काढलेल्या, जलरंगातील निसर्गचित्राला बाँबे आर्ट सोसायटीतर्फे मुंबई येथे भरलेल्या प्रदर्शनात प्रशस्तिपत्रक मिळाले होते. तसेच “जीव जिवाचे जीवन” आणि पर्वती व पार्वती ही दोन छायाचित्रे, बाँबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित झाली होती. प्रदर्शनातील त्यांची चित्रे पाहून, जाणते कलारसिक आबासाहेब मुजुमदार ह्यांनी गावडे सरांना, चित्रकार होण्याचा सल्ला दिला होता !

गावडे सर, आजही त्यांच्या सर्व गुरुजनांविषयी मनापासून बोलतात, त्यांच्या अनेक आठवणी सांगतात ! सर, आपल्या यशाचे सर्व श्रेय विनम्र भावनेने त्यांच्या गुरुजनांना प्रांजळपणे देतात, हे पदोपदी जाणवते !

१९६७ साली, आम्हांला अकरावीला गावडे सर मराठी शिकवायचे, सरांचे ते तास आजही जसेच्या तसे मनावर ठसले आहेत. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान असो की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांची “सागरा प्राण तळमळला” असो, सर विषयाशी पूर्णपणे एकरूप झालेले असायचे आणि आम्ही विद्यार्थी, सरांचे बोलणे ऐकण्यात तल्लीन व्हायचो ! विद्यार्थी घडविण्याचा वसा, हेच सरांच्या उभ्या आयुष्याचे मर्म होय !

आमच्या विद्यार्थीदशेतील सरांचा आदर्श सांगणारी एक आठवण सांगू कां ? स्नेहसंमेलनाची शाळेत तयारी चालली होती. साहजिकच घरी निघायला सर्वांना उशीर व्हायचा. शाळेपासून सायकलवर सरांचे घर तसे जवळ होते. दिवेलागणी नंतर शाळेतून सगळे घरी निघाले, तेव्हां सर सायकल हातात धरून पायी चालू लागले, एका शिक्षकांनी त्यांना विचारले, “गावडे सर, पायी कां चाललात ? सायकल पंक्चर झाली कां ?” त्यावर गावडे सरांचे उत्तर ऐकून सगळेच स्तिमित झाले . ते म्हणाले, “आज सायकलचा दिवा नाही, आणि अंधार झालाय, मग दिव्याशिवाय सायकल चालवून नियम कसा मोडू ?” त्याकाळी सायकलला रॉकेलचा दिवा असायचा. गावडे सरांची ती शिस्त, नियमांची अंमलबजावणी आम्ही जवळून पाहिली, कळत नकळत ते सुसंस्कार आमच्या पिढीवर घडले, एवढे मात्र निश्चित !

मागे एकदा सर अमेरिकेला गेले होते, तेव्हां गावडे सरांच्या एका हुशार विद्यार्थ्याने एक शक्कल लढविली. त्याने अमेरिका स्थित असलेल्या, सरांच्या अनेक विद्यार्थ्यांना एकत्र जमवून, एक स्नेहमेळावा आयोजित केला, तेव्हां सर्वांनी गावडे सरांना आग्रह केला की आज पुन्हा तुमच्याकडून ज्ञानेश्वरी शिकायची आहे. झाले, सरांनी तिथेच “पसायदान” विषयी दीर्घ शिकवणी घेतली.

गावडे सरांच्या स्वभावामध्ये वाकयुदध कधीच नसते, हं, सरांचा वाग्यज्ञ ऐकणे, म्हणजे मोठी पर्वणी असते ! सरांची मृदू, मवाळ भाषा, समोरच्याला जिंकून घेते. सरांनी ज्ञानेश्वरी फक्त अभ्यासली नाही तर आत्मसात केली, हे सरांच्या सहवासात येणा-या प्रत्येकाला जाणवते !

गावडे सरांना शालेय जीवनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. ह. ना. आपटे, वि. स. खांडेकर, अश्या अनेक नामवंतांचे विपुल साहित्य सरांच्या वाचनात आले. “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” हे तर सरांचे श्रद्धास्थान ! एकदा तर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या समक्ष, एका कार्यक्रमात गावडे सरांना गाणं म्हणण्याची सुसंधी लाभली होती. सावरकरांच्या समग्र साहित्याचा आणि जीवनपटाचा अभ्यास सरांनी केला. महत्वाचे म्हणजे, पुणे विद्यापीठामध्ये ह्या विषयावरील पीएचडी करण्याचे पहिले भाग्य डॉ. प्र. ल. गावडे सरांना लाभले, ही खरोखरीच अभिमानाची गोष्ट आहे !

आपल्या गावडे सरांनी, श्रीक्षेत्र आळंदीच्या, श्रीज्ञानेश्वरमहाराज संस्थांचे विश्वस्त तसेच प्रमुख विश्वस्त म्हणून १९८६ ते १९९५ या कालावधीमध्ये मनोभावे सेवाकार्य केले होते. त्या काळातील, माझ्या आठवणीतील एक सुखद प्रसंग! तो दिवस होता, १७ नोव्हेंबर १९८९ चा ! पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचा “अमृताचा घनु” चा पहिला कार्यक्रम श्रीक्षेत्र आळंदी येथे देऊळवाड्यात झाला होता ! कार्याक्रमापुर्वीच गावडे सरांनी होणा-या गर्दीचा अचूक अंदाज बांधून, अजानवृक्षा जवळील अंगणात कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. बघता बघता गर्दी वाढू लागली. वाड्याच्या भिंतीवर, कट्ट्यावर, जागा मिळेल तिथे लोक बसले, अगदी देऊळवाड्याबाहेरही जनसागर जमला होता. साडे आठ वाजता सुरु झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक प्राचार्य राम शेवाळकर सरांनी “अमृताचा घनु”चे निरुपण केले होते तर पंडितजींची अमृतमयी अभंगवाणी, असा अद्वैत शब्दस्वरांचा संगम श्रोत्यांनी अनुभवला. मध्यरात्री अडीच-तीनचे सुमारास कार्यक्रमाची सांगता झाली. त्यापुढे गावडे सरांनी आम्हां सर्वांना श्रीप्रसाद दिला! गावडे सरांचा जन्म श्रीक्षेत्र नेवासा येथील आहे, मला वाटतं हा खरोखरी दैवी योगायोग आहे !

गावडे सरांनी अध्यापनाबरोबरच शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपयोगी उपक्रम अवलंबिले होते. १९७४ ते १९८० ह्या कालावधीमध्ये सरांच्या अध्यक्षतेखाली “गरवारे शालेय भजन दिंडी” हा नामांकित उपक्रम नावाजला गेला.

गावडे सरांच्या प्रदीर्घ अनुभवाची छाप अनेक संस्थांवर राहिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, कोषाध्यक्ष, संपादन मंडळ सदस्य, ग्रंथ समीक्षक सदस्य, अशी विविध पदे सरांनी भूषविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनात सरांचा चर्चासत्रात सहभाग होता. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे अध्यक्षपद सरांनी भूषविले आहे. मराठी अध्यापक संघाचे (कनिष्ठ महाविद्यालय) अध्यक्षपद असो वा किर्लोस्कर स्वच्छ सुंदर शाळा योजना, सल्लागार समितीचे सदस्य असो, किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक परीक्षण समितीचे सदस्य असो, सर त्या त्या उपक्रमामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करीत आले. विशेश म्हणजे सरांनी कामायनी मतीमंद मुलांच्या संस्थेचेही आस्थेवाईकपणे काम केले. मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्गांचे संचालन सरांनी केले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गावडे सरांनी दैनिक केसरीमध्ये सातत्याने तीस वर्षे लेखन केले आहे. महाराष्ट्र टाईम्स मुंबई आवृत्तीमध्ये एक वर्षभर शैक्षणिक विषयावरील सदराचे लेखन केले आहे.

गावडे सरांनी विपुल ग्रंथ लेखन केले आहे. (१) सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, (२) कवी यशवंत – काव्यरसग्रहण,(३) सावरकरांचे साहित्य विचार, (४) माध्यमिक शिक्षण – विचार आचार व्यवहार, (५) दहावी अभ्यास – तंत्र आणि मंत्र, (६) विचार प्राथमिक शिक्षणाचा, (७) मुक्तांगण ते मुक्तविद्यापीठ – शैक्षणिक ग्रंथ, (८) राष्ट्रगुरू संत तुकडोजी, (९) भटकंती – प्रवासवर्णन , ही काही वानगीदाखल दिलेली नावे आहेत !

गावडे सरांनी आजवर अनेक शैक्षणिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे ! त्यामध्ये शैक्षणिक पुस्तकांचाही समावेश आहे ! साहित्य विचार, कथाकौस्तुभ शालेय मराठी व्याकरण, मराठी भाषेची काही पाठ्य पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. लोकमान्य टिळक विशेषांक, स्वातंत्र्यसमर विशेषांक, तसेच विद्यामंदिरातील चैतन्यदीप -प्राचार्य न. शं. जमदग्नी, आदी उच्च ग्रंथांचे संपादन सरांनी केलंय !

आपल्या गावडे सरांची ओघवती अमृतमय वाणी ऐकण्याची सुसंधी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली आहे ! उल्लेख करायचा झालाच तर, अनेक दाखले देता येतील. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, साहित्य संघ, वसंत व्याख्यानमाला, सावरकर साहित्य व्याख्यानमाला, लोकहितवादी व्याख्यानमाला, सांगली येथील गुरुवर्य शिराळकर व्याख्यानमाला, बृहन महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित व्याख्यानमाला, संतसाहित्य विषयक व्याख्यानमाला, गीतारहस्य जयंती व्याख्यानमाला. अजून एक विशेष म्हणजे, दोन हजार दहा साली, नागपूर येथे आयोजित सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गावडे सरांनी भूषविले होते !

श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, ह्यांनी प्रकाशित केलेल्या, श्रीतुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, श्रीज्ञानेश्वर वाड्मय सूची, श्रीनामदेवकृत समाधी अभंग, संजीवन, आदी महान ग्रंथांचे, गावडे सरांनी संपादन केले आहे !

आदरणीय गावडे सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या मौल्यवान कार्याची नोंद अनेक मान्यवर संस्थांनी घेतली आणि सरांचा यथोचित गुणगौरव केला !

गावडे सरांनी कला क्षेत्रामध्ये भरारी घेतली आहे ! कलोपासक संस्थेने सादर केलेल्या, मो. ग. रांगणेकर लिखित, “माझं घर” ह्या संगीत नाटकात नायकाची भूमिका साकारली होती. शिशुपालवध आणि भार्गवगर्वहरण या संगीतिकांचे लेखन सरांनी केले होते. भार्गवगर्वहरण ही संगीतिका पुणे आकाशावाणी केंद्रावरून प्रक्षेपित झाली होती. आकाशवाणीच्या विविध मुलाखती, श्रुतिका व्याख्याने, चर्चा, ह्यामध्ये सरांचा अजूनही सहभाग असतोच.

वंदनीय गावडे सरांचा मला अगदी घरगुती सहवास लाभत आलाय. गावडे सर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डे. जि. भावेस्कूलचे मुख्य होते, तर माझे वडील पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी, पुण्यातील त्याच संस्थेच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे आणि नंतर भावे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. मा. गावडे सर आणि माझे वडील ह्यांच्यामध्ये स्नेहाचे अकृत्रिम नाते होते. आज माझ्या वडिलांच्या माघारीही तोच स्नेहाचा ओलावा, गावडे सरांकडून मी अनुभवीत आहे. माझ्या मनात गावडे सरांच्या विषयी अनेक आठवणी आहेत, किती आणि कोणत्या सांगू ?

दोन डिसेंबर २०१० रोजी “घ्यावी भरारी आकाशी” ह्या माझ्या पाचव्या अल्बमचे प्रकाशन पुण्यात झाले होते ! गावडे सरांनी त्याचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी माझी मनःपूर्वक इच्छा होती. सरांनी माझी विनंती लगोलग मान्यही केली. कार्यक्रमाचे दिवशी सकाळी गावडे सरांचा वाईहून मला फोन आला, ते म्हणाले, “अरे माझ्या मोठ्या बहिणीची तब्येत ठीक नाही म्हणून मी वाईला आलोय, पण तू काळजी करू नकोस, मी कार्यक्रमाचे ठिकाणी, संध्याकाळी वेळेवर पोहोचतो”! मी क्षणभर गांगरलो आणि संध्याकाळी अगदी वेळेवर, सर वाईहून, कार्यक्रमाचे ठिकाणी, पुण्यातील मयुर कॉलनीमधील बाल शिक्षण मंदिरच्या सभागृहात दाखल झाले ! गावडे सरांचे भाषण छे, छे, अमृताचे बोल ऐकून समस्त श्रोतृवृंद भारावला, अन मी तर … विचारूच नका. कार्यक्रम झाला अन् गावडे सर पुन्हा वाईला गेले. वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षीसुद्धा सरांनी, आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या प्रेमापोटी केलेली धावपळ थक्क करणारी होती !

अगदी अलीकडचा म्हणजे सोमवार, दिनांक २० मे २०१३ चा एक प्रसंग सांगू कां ? गावडे सर मला म्हणाले, “अरे उपेंद्र, आपल्या एअर मार्शल भूषण गोखले ह्यांना “अग्नी पुरस्कार” जाहीर झालाय, त्यांचे कौतुक करायची इच्छा आहे”. झालं ! मा. एअर मार्शल भूषण गोखले सरांना मी फोन केला अन् भेटीची वेळ ठरवली. त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता, मा. गावडे सर, श्री. ना. वा. अत्रे सर, उत्कर्ष प्रकाशनचे श्री. जोशी आणि मी स्वतः मा. गोखले साहेबांचे निवासस्थानी गेलो. सुरुवातीच्या गप्पागोष्टी झाल्यावर, मा. गोखले सरांनी स्वतः केलेला एक अनमोल संग्रह दाखविला. आम्ही सगळे बघत होतो आणि गावडे सर, कुतुहलाने प्रत्येक गोष्ट विचारून, जाणून घेत होते.

पुणे येथील निवारामध्ये, शतायुषी संस्थेने, सोमवार, दिनांक एक जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या, “छंदातून भेटलेली माणसं” ह्या माझ्या गप्पांच्या कार्यक्रमास गावडे सर आवर्जून उपस्थित तर राहिलेच, शिवाय कार्यक्रम संपताच, तोंडभरून माझे कौतुकही केले अन् प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला !

अगदी अलीकडची म्हणजे बुधवार, दिनांक दहा जुलै २०१३ ची एक आठवण ! श्री. कृष्णा देशपांडे लिखित, “असावे घरटे आपुले छान” पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील कर्वे रोडवरील, महाराष्ट्र पत्रकार सभेच्या सिद्धार्थ हॉल येथे संध्याकाळी सात वाजता झाले. आॅस्ट्रेलियातील माझे मित्र चेतन देशपांडे ह्यांनी मला फोन करून सांगितले कि, “माझ्या वडिलांच्या पुस्तक प्रकाशनाला, गावडे सरांना प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही बोलवा “. नंतर पुण्यात आल्यावर चेतन देशपांडे, कृष्णा देशपांडे ह्यांचे समवेत मी गावडे सरांचे घरी समक्ष आमंत्रण करण्यासाठी गेलो, तो काय, सरांनी तत्काळ होकार भरून आमंत्रण स्वीकारले !

कार्याक्रामचे दिवशी, गावडे सरांना कार्यक्रमस्थळी घेऊन जाण्यासाठी, मी सरांच्या घरी, संध्याकाळी सव्वासहा वाजता गेलो, पाहतो तर काय, टेबललँपच्या प्रकाशात, गावडे सर, खुर्चीवर बसून प्रकाशित होणा-या पुस्तकाचे वाचन करीत होते, मी म्हणालो, “सर निघायचं ना?” “हो, हो, मी तयार आहे”, सर उत्तरले. वास्तविक सरांनी पुस्तक वाचले होते, तथापि पुन्हा एकदा नजरेखालून घालण्याची सरांची जिज्ञासू वृत्ती निश्चितच उल्लेखनीय आहे. प्रत्यक्षात, पुस्तक प्रकाशनाचे वेळी, सरांनी सारा श्रोतृवृंद निमिषात, आपल्या अभ्यासपूर्ण वाणीने जिकला, हे कां मी वेगळे सांगू ?

मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०१४ रोजी, दुपारी साडेचार वाजता, मएसो भावे प्राथमिक शाळेच्या वार्षिक संमेलनाचे वेळी आमची भेट झाली. संध्याकाळी कार्यक्रम संपताच, मी गावडे सरांना म्हणालो, “सर चला, मी तुम्हांला घरी सोडतो”. सर म्हणाले, “उपेंद्र, आधी साहित्य परिषदेमध्ये जायचं आहे”. मी रिक्षा थांबवली. सर म्हणाले, “अरे, रिक्षा नको, संध्याकाळचे पायी चालायचं आहे. तू नुसतं बरोबर चल, हात नको धरू”. आम्ही साहित्य परिषदेत गेलो.

अश्या महान व्यासंगी गुरूंचे आपण विद्यार्थी आहोत, हे म्हणवून घेताना, उर अभिमानाने फुलून येतो. मला असं वाटतं, कि फक्त गुरुपौर्णिमेलाच पूजन होत नाही तर, जिथे जिथे, जेव्हां जेव्हां आपल्या गुरूंचे नित्यनेमाने स्मरण करतो, तेच गुरुपूजन, तीच व्यास पूजा होय !

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर प्र. ल. गावडे सरांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो, अशी श्री ज्ञानेश्वर माउलींचे चरणी मनोभावे प्रार्थना,

लेखक : उपेंद्र चिंचोरे
20 June 2016

ऊपेंद्र चिंचोरे
About ऊपेंद्र चिंचोरे 14 Articles
श्री उपेंद्र चिंचोरे हे विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. त्यांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…