नवीन लेखन...

दिग्दर्शनाचा मानस आहे

”त्याच्या शब्दांना सुरांची जादू आहे, कवितेतून वास्तवाचं प्रतिबिंब खुबीने उमटतं. तसंच अनेक कलांमध्ये मुशाफिरी करुनही लेखन आणि व्यंगचित्रावरचं त्याचं प्रेम कायम अग्रस्थानी राहिलंय.” रुपेरी पडदा, नाटक व मालिकेतून दर्जेदार साहित्याची पर्वणी देऊन नवरंजनाचा अनुभव देणारे सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकूर सांगत आहेत त्यांच्या कारकीर्दीविषयी खास मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या मुलाखतीतून..

कलाक्षेत्रात कारकिर्द घडवायची असं तुम्ही केव्हा ठरवलं ?

गुरु ठाकूर: कलाक्षेत्रात कारकिर्द घडवायची असं मी ठरवलेलं वगैरे नव्हतं. पण वयाच्या अवघ्या दिड-दोन वर्षापासूनच चित्र रेखाटण्याची मला सवय होती. शाळेत असताना मी या शैलीत अधिक सुधारणा केली. कारण अनेक व्यक्तींच्या चित्रांवर मला थोडे प्रयोग करुन पहायला आवडतं आणि मग त्याला व्यंगचित्राचं स्वरुप प्राप्त होतं. आमच्याकडे रोज ‘टाईम्स्’ वृत्तपत्र येत असल्यामुळे आर. के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा प्रभावही होताच. महाविद्यालयात लेक्चर सुरु असताना मी प्राध्यापकांचं चित्र रेखाटत होतो आणि मला त्यांनी ‘रंगेहाथ’ पकडलं. ते मला महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे घेऊन गेले, तर त्यांना माझं रेखाटन इतकं आवडलं की माझं नाव त्यांनी आंतरमहाविद्यालयीन चित्रकला स्पर्धेसाठी पाठवलं. तिथे मला पारितोषिक मिळालं तेव्हा मला माझ्यातला खरा कलाकार सापडला. तसंच ‘हिन्दुस्तान टाईम्स्’ वृत्तपत्रातर्फे देशभरात व्यंगचित्रांची स्पर्धा आयोजित केली जाते. माझ्या प्राचार्यांनी चांगली चित्रं मला काढून आणायला सांगितली. त्या चित्रांचंही सिलेक्शन झालं व जगभरातल्या नामवंत व्यंगचित्रकरांच्या चित्रांसोबत त्यावेळी माझी चित्रं सुध्दा डिस्पले करण्यात आलेली होती. त्यानंतर मार्मिकमधून मी व्यंगचित्र रेखाटू लागलो. त्याकाळचे संपादक ह.नो.मराठे आणि श्रीकांत ठाकरे यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत गेलं. निरीक्षण करण्याची वृत्ती यानिमित्ताने जडल्यामुळे माझ्यातला लेखक, अभिनेताही सापडला. त्याचदरम्यान मी ‘थिएटर’ करत असल्यामुळे खर्‍या अर्थाने मी प्रगल्भ झालो. याचा उपयोग मला श्रीयुत गंगाधर टिपरे सारख्या मालिकेचं लेखन करताना झाला. शिवाय अगं बाई अरेच्चा व इतर चित्रपटांचं लेखन करताना होत राहिला.

तुमच्या काव्यरचना थोड्या गंभीर आणि वाचकांना विचारही करायला लावणार्‍या आहेत, तर यामागचं कारण काय?

गुरु ठाकूर: माझ्या कारकिर्दीतली दोन-अडीच वर्षे व्यंगचित्रासाठी मी काम केलं. पण त्यानंतर ज्यावेळी मी लेखनाला सुरुवात केली तेव्हा सुद्धा समाजात घडणार्‍या घडामोडी मला अस्वस्थ करायच्या. तर ते व्यक्त करण्यासाठी मी कविता हे माध्यम निवडलं. आणि कवी तोच असतो ज्यावेळी त्याच्या कवितेतून समाजाचं प्रतिबिंब उमटतं. जर मी फक्त छान छान विषयांवर सतत लिहित राहिलो तर ते सगळंच ‘गुडी गुडी’ वाटत राहिल. आणि मुळात कवी म्हणून मला असं वाटतं की निराश मनांना जागं करण्याची जबाबदारी आणि असामाजिक घटनांवर प्रहार करण्याची क्षमता असेल तेव्हाच ती कविता ठरते.

गीतांची रचना करत असताना तुम्ही कोणता अभ्यास करता ? आणि तुमच्या गीतांमध्ये विविधता असते. एकीकडे ‘खेळ मांडला’ सारखं नायकाच्या मनातलं व्यथा सांगणारं तर दुसरीकडे ‘मन उधाण वार्‍याचं’ सारखं मनस्पर्शी गीत आणि त्याच्या अगदी उलट ‘कार्निव्हल सॉंग’ किंवा नटरंग चित्रपटासाठी लावणी. कशी बांधणी केलीत शब्दांची?

गुरु ठाकूर: चित्रपटांसाठी गाणी लिहिताना मी कथानकाचा सर्वप्रथम विचार करतो. त्याचप्रमाणे संगीताच्या चालींवर माझे शब्द आधारीत असतात. याशिवाय नायक-नायिकांच्या मनातील त्यावेळच्या भावना काय आहेत याचा विचारही मी गीतकार म्हणून करतो. ‘मन उधाण वार्‍याचे’ हे थीम सॉंग लिहिताना मी सर्व सामान्य माणासांचा, त्यांना आपलंसं वाटेल याचा विचार केला. दुसरं म्हणजे मी जुने ग्रंथ वाचतो. जिथे विपुल प्रमाणात मराठी शब्द व त्याचे अर्थ मला सापडतात. विशेषत: नटरंग चित्रपटातल्या लावणी आणि चांगभलं सारखं गीत लिहिताना याचा मला खुप उपयोग झाला.

सध्याच्या चित्रपट, टि.व्ही. आणि नाटकांमधून ज्या प्रकारच्या विनोदाची निर्मिती होते यामध्ये तोचतोचपणा जाणवतो आहे का?

गुरु ठाकूर: मला असं वाटतं की विनोद नेहमी प्रसंगनिष्ठ असावा. पण सध्या शाब्दीक कोट्या करुन किंवा भयंकर असे अंगविक्षेप करुन विनोद निर्मिती होत असते. बर्‍याचदा ती माध्यमांची गरज असते. त्यानुसार लेखकाला त्याची मांडणी करावी लागते. पण त्यामुळे नटाची अनेकदा गोची होत राहते. तेव्हा त्याला जाणवतं की प्रेक्षकांनाही तेच-तेच पाहून कंटाळा आलाय. हाच प्रकार ज्यावेळी चित्रपटांच्या बाबतीत घडतो त्यावेळी तो प्रेक्षकांवर झालेला अन्याय असतो असं मला वाटतं. कारण तो तिकिट काढून चित्रपट पहायला येत असतो. ज्यावेळी त्याला जाणवतं की सतत प्रसंगात तेच त्याच त्याच धाटणीचे विनोद आहेत तेव्हा मात्र तो अशा चित्रपटांकडे पाठ फिरवतो. पण अलिकडच्या काळात वैविध्य विषयांवरचे चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे अशा चित्रपटांचा ट्रेंड सध्या कमी झाला आहे.

मराठी चित्रपट कथेच्या दृष्टीने इथून पुढे कसे असतील असं आपल्याला वाटतं? आपल्याला कशा प्रकारच्या कथा रचना चित्रपटासाठी करायच्या आहेत?

गुरु ठाकूर: कथेच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास एक तर नवनवीन प्रयोग आपल्याकडे होत असून, त्यामुळे साहजिकच प्रगल्भताही येत्या काळात मराठी सिनेमात असेल. तसंच आपला मराठी प्रेक्षकही ज्यावेळेस ‘मॅच्युअर्ड’ होईल, त्याचं प्रतिबिंब सुद्धा आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल. मी स्वत: सध्या अशा चित्रपटांसाठी गीतं लिहितोय की ज्याचे विषय ‘अगदीच नवखे’ आहेत. त्यावेळी लेखक म्हनून मी स्वत: आश्चर्यचकित झालो. थोडक्यात ‘ऑफ बीट’ कथांसाठी आता निर्मातेही मागे लागतात, जी आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या भविष्यासाठी सुद्धा सुखावणारी बाब आहे.

‘दूरचित्रवाणी’, ‘चित्रपट’, ‘नाटक’ आणि ‘रेडिओ’ यापैंकी कोणतं माध्यम एक लेखक म्हणून जिव्हाळ्याचं वाटतं.?

गुरु ठाकूर: लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरचित्रवाणी हे माध्यम समर्पक आहे, असं मी म्हणतो. पण मला व्यक्तीश: चित्रपट हे माध्यम अधिक प्रभावी वाटतं आणि आवडतंही. कारण ती एखाद्या कादंबरीसारखी असते जी पंचवीस वर्षांनी सुद्धा तुम्ही वाचलीत तरी तुम्हाला ती नवीन असते. कारण त्यात सुरुवात आणि शेवट असतो जो सहसा मालिकांच्या बाबतीत दिसून येत नाही. तिथे लेखकाला कथेचा मध्य व अंत माहित नसल्यामुळे लिहिण्याचं पुर्ण समाधान मिळत नाही. नाटक ही सुद्धा एक सुंदर कलाकृती आहे. सध्याच्या घडीला दर्जेदार नाटकं दाखल होत असली तरी ‘अनेकदा’ असं होतं की कलाकारांच्या तारखा मिळणं मुश्कील होतं. आणि मग चांगली नाटकं बंद पडतात. तसंच चित्रपट चिरंतन असल्यामुळे मी त्यामध्ये काम करणंही ऐन्जॉय करतो.

आज तुमच्याकडे मराठी चित्रपटांचा एक अग्रगण्य कथा, पटकथाकार आणि गीतकार म्हणून पाहिलं जात आहे, यावर तुमची जबाबदारी आणि भूमिका काय असेल?

गुरु ठाकूर: मला एका गोष्टीचं समाधान आहे की सध्या आपल्याकडे चांगले प्रयोग होत आहेत. त्याच प्रकारची चांगली कलाकृती मला प्रेक्षकांसाठी द्यायची आहे. तशा अनेक कथा विचारधीन आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मी या माध्यामाचा सखोलतेने अभ्यास करत असल्यामुळे दिग्दर्शन सुद्धा करायचंय. पण मी जे काही सादर करीन त्यामध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासारखं काहीतरी अनोखं असेल एवढं मात्र नक्की.

या माध्यमात ‘साहित्याची धुरा’ सांभाळणार्‍यांना कमी मान-सन्मान दिला जातो असं आपल्याला वाटतं का ?

गुरु ठाकूर: ही बाब जरी सत्य असली तरीपण सध्या याचं प्रमाण कमी आहे. फक्त नाटक लिहिताना हे लेखकाचं म्हणून ओळखलं जातं. पण चित्रपट हा दिग्दर्शक आणि कलाकारांचं माध्यम असल्याने तिथे लेखकाची ती एकट्याची कलाकृती राहत नाही. त्याचप्रमाणे गीतकार म्हणून जर काही नाविन्य नसेल किंवा जोपर्यंत त्या गाण्यांचे शब्द रसिकांपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत तुमचीही दखल घेतली जात नाही. त्यासाठी तुमचं काम दाद मिळण्याच्या तोडीचं असावं लागेल, हे मी आवर्जून सांगेन.

‘व्यंगचित्रकार’, ‘गीतकार’, ‘कवि’, ‘पत्रकार’, ‘अभिनेता’ आणि ‘फोटोग्राफर’ म्हणून तुम्हाला स्वत:ला भावलेलं काम कोणतं?

गुरु ठाकूर: मला व्यक्तीगत स्तरावर कवि म्हणून काम करणं आत्तापर्यंत भावलं आहे. याचं कारण म्हणजे पत्रकारिता, स्तंभलेखन करताना बर्‍याचदा काटछाट करुन छापून येतं किंवा अनेकदा असंही घडलंय की मी व्यंगचित्र काढली आहेत पण ती छापलीच गेली नाहीत. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध आशय असलेल्या कविता किंवा गीतं जवळची वाटतात. आज जेव्हा केव्हा लोक माझ्या कविता व गीतं गुणगुणतात तेव्हा मी सतत त्यांच्या बरोबर असल्याचं मला जाणवतं. कारण मुळातच शब्दांमुळे आपण व्यक्त होत राहतो.

(मुलाखत व शब्दांकन : सागर मालाडकर)

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

1 Comment on दिग्दर्शनाचा मानस आहे

  1. सागर मालाडकर यांनी गुरु ठाकुर ची मुलाखत मला खुप आवडता….
    ” त्यांच्या शब्दांना एक वेगळीच सुरांची जादू आहे”

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..