नवीन लेखन...

तेथे कर माझे जुळती

सिंगापूर सरकारने अनेक उत्तम योजना राबवत ज्येष्ठ नागरिकांचे महत्व राखले आहे आणि म्हातारपण हे सुखकारक होण्यासाठी हातभार लावला आहे. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी सिंगापूरचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे कायदे आणि नियम तपासले. सिंगापुरात कायद्याने 60 वर्षाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते.

सिंगापूरला, पहिल्यांदा  मी 1994 मध्ये आले  होते त्यावेळी  सिंगापूर माझ्यासाठी फक्त एक टुरिस्ट डेस्टिनेशन –  एक आकर्षक पर्यटनस्थळ होते. पण त्यानंतर  2009 नंतर दरवर्षी, मे महिन्याच्या सुट्टीत मी  इथे यायला लागले. का? कारण मला सिंगापूर इथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण, लक्षात घेण्यासारख्या बाबी आढळल्या. केवळ भटकंती किंवा खवैयेगिरी करण्यासाठीच नव्हे तर इथली हिरवाई, स्वच्छता, कायदा व्यवस्था, नियम आणि सुरक्षितता, वक्तशीर वाहतूक आणि स्त्रियांना मिळणारा  आदर हे सगळे अनुभवताना  निर्भेळ आनंद मिळतो.

इथे  स्थायिक होण्यासाठी आले तेव्हा सिंगापूरच्या जीवन शैलीकडे  बारकाईने पाहू लागले आणि एक लक्षात आले की इथले तारुण्य सुरक्षित  आहेच पण वृद्धत्व हे इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे. विमानतळ, रेस्टॉरंट, वेट मार्केट म्हणजे  स्थानिक बाजार, हॉकर सेंटरमध्ये, गार्डनमध्ये, पर्यटनस्थळांमध्ये सुरकुतलेले, वाकलेले वृद्ध सराईतपणे काम करताना, वावरताना आढळले. मी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. माझी एक मैत्रीण म्हणाली,

‘स्थानिक लोकांना, म्हाताऱ्या लोकांना काम करून द्यायला काहीच कसे वाटत नाही? मला दया येते या वयात काम करणाऱ्या ज्येष्ठ लोकांची.’ मला तिचे म्हणणे तितकेसे पटले नाही. कारण मेहनत  करून, स्वतःच्या पायावर उभी असलेली ही म्हातारी माणसे दयेसाठी पात्र नसून सॅल्यूट करण्याच्या योग्यतेची वाटली. त्यांना तशी उभी राहायला  मदत करणाऱ्या  सरकारचे कौतुक वाटले. वृद्धत्व ही प्रत्येकाच्या आयुष्यात चढावी लागणारी एक पायरी आहे. जो जन्माला आला तो कधीतरी वृद्ध होणार. हे प्रत्येकाने स्वीकारले तर समाजात पुष्कळशी कामे सोपी होतील. ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तसेच आपल्या भविष्याची तरतूद आपण वर्तमानात करायला उद्युक्त होऊ. पण होते काय की अनेकदा आपल्याला जे आवडत नाही ते आपण टाळायला बघतो. आपले वय वाढणार आणि कधीना कधी आपल्याला चालण्याचे, बोलण्याचे, स्मरणशक्तीचे प्रश्न उद्भवणार या वास्तवापासून आपण दूर जायला बघतो किंवा विनाकारण बाऊ करतो. जसे वय वाढते तसे ऐकू येणे, दिसणे, जिने चढणे, उतरणे, सामान आणणे, नेणे, स्वयंपाक करणे, बँकेचे व्यवहार करणे यात अडचणी येऊ लागतात. याशिवाय आपल्या वयाचे कोणी सोबती मिळत नाहीत.एकटेपणा वाढत जातो. आत्मविश्वास कमी होतो. या अडचणी लक्षात घेऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आणि सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा सोयीचे नियोजन करणे आवश्यक ठरते.

आणि सिंगापूर सरकारने अनेक उत्तम योजना राबवत ज्येष्ठ नागरिकांचे महत्व राखले आहे आणि म्हातारपण हे सुखकारक होण्यासाठी हातभार लावला आहे. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी सिंगापूरचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे कायदे आणि नियम तपासले. सिंगापुरात कायद्याने 60 वर्षाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते. सरकारी, प्रायव्हेट कंपनीत निवृत्त होण्याचे वय 62 आहे आणि लवकरच ते 63 होण्याच्या मार्गावर आहे. सिंगापूर हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे आणि त्यामुळेच टॅक्सी चालवणे हा मुख्य व्यवसाय आहे. इथे टॅक्सीचालकांना वयाची  मर्यादा नाही. मेडिकली फिट असणाऱ्या व्यक्तीला – स्त्री आणि पुरुष दोन्हींना टॅक्सी चालवायची परवानगी आहे. कित्येक मोठ्या पदावरील ज्येष्ठ नागरिक लवकर सेवानिवृत्त होऊन टॅक्सी चालवताना दिसतात. अंकल टॅक्सी  चालकांशी (यात आंटी सुद्धा येतात)झालेल्या गप्पा मनोरंजक, ज्ञानात भर घालणाऱ्या ठरतात.

सिंगापूरमध्ये पिआर (पर्मनंट रेसिडेंट )आणि नागरिक असणाऱ्या 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना अनेक सुविधा मिळतात. यात त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे यावर सुविधांचे प्रमाण कमी जास्त असते. मेडिकल, बँकिंग, रेस्टॉरंट, तसेच राहण्यासाठी जागेची व्यवस्था मोफत किंवा कमी पैशात मिळते. तसेच मुलांना ज्येष्ठ पालकांच्या जवळ राहण्यासाठी जागेच्या किमतीत सवलती दिल्या जातात. स्थानिक नागरिकांसाठी, उत्तम सरकारी वसाहती ज्याला ‘एचडीबी’ असे म्हणतात स्वस्त दरात  उपलब्ध आहेत. या इमारतींची बांधणी उत्तम असते आणि दिसतातही सुरेख. या इमारतींना क्रमांक दिलेले असतात आणि ते दुरूनही दिसतील इतके मोठे असतात. इमारतीच्या  खालीच  काही पावलांवर  वेट मार्केट असतात जिथे स्वस्त दरात भाजीपाला, मासे, मटण आणि घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू (अगदी पिनपासून मोठ्या इलेक्ट्रिक वस्तूंपर्यंत)मिळतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळीच कॅरीबॅग घेऊन बाजारहाट करताना दिसतात.

इथले ज्येष्ठ टापटीप राहणे पसंत करतात. अस्वच्छता,  गबाळेपणा यापासून  सिंगापूर कोसो दूर आहे. इमारतीखालीच बांधलेल्या स्वच्छ आणि स्वस्त अशा उपहारगृहातून जेवण, न्याहारी, खाण्यापिण्याचे पदार्थ सकाळी सात ते रात्री 10 पर्यंत मिळतात. अशा ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे अड्डे गप्पा मारत हसत खेळत खात पित बसलेले मी अनेकदा पाहिले आहेत. आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे रस्त्यावर पादचारी मार्ग असून सगळीकडे व्हील चेअर चालवण्याची सुविधा आहे. प्रत्येक एचडीबी जवळ कम्युनिटी सेंटर असून तिथे ज्येष्ठांच्या करमणुकीची सोय केलेली दिसते. सिंगापूरच्या लोकांनी हिरवाई,  निसर्ग कसोशीने जपला आहे. हातात भरपूर वेळ असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कम्युनिटी सेंटरमधून झाडे लावणे, बगीचा संवर्धन करणे, व्यायाम करणे इत्यादी छंद जोपासले जातात. त्यासाठी बक्षिसे दिली जातात. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या अॅक्टिव्हिटीत प्रोत्साहन मिळते.सिंगापुरात बस आणि रेल्वेची सुविधा अतिशय सोयीची आहे. इमारतीपासून  काही पावलांवरच बस स्टॉप असतात. तिथे जायलाही संपूर्ण छप्पर असलेले पक्के रस्ते असतात. हवेशीर, हिरवाईने वेढलेल्या अशा बस स्टॉपवर ज्येष्ठ नागरिकांना चढे उतरेपर्यंत थांबणाऱ्या वातानुकूलित बसेस असतात. व्हील चेअरवाल्या व्यक्तींसाठी बस चालक स्वतः खाली उतरून मदत करतो. तसेच यांच्यासाठी कमी दरात वाहतूक उपलब्ध आहे.सिंगापूर सरकार तर्फे चालवलेली अछढणउ ही संस्था आहे. या संस्थेतून ज्येष्ठ आजारी व्यक्तींच्या मदतीला ट्रेंड माणसे पाठवण्याची कमी दरात असलेली  सोय आहे. यामध्ये जेवण करून देणे, रुग्णाला अंघोळ घालणे, औषधे देणे तसेच सकाळी किंवा रात्री सोबतीला राहणे अशासाठी माणसे नोकरीवर ठेवता  येतात. खरेतर अशी सेवा मिळणे ही आजच्या व्यस्त जीवनशैलीची गरज आहे. कारण ज्येष्ठ व्यक्तींसाठी पूर्ण वेळ देणे हे आजच्या पिढीला अवघड आहे. नोकरीसाठी, शिक्षणासाठी तरुण, मध्यमवयीन लोकांना आपल्या आयुष्यातला कितीतरी वेळ द्यावा लागतो. नोकरी,व्यवसाय टिकवण्यासाठी ते आवश्यक आहे. शिवाय घरातली माणसाची संख्या कमी होत चालली आहे. तरुण मुलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशी, बाहेरगावी जाणे अनिवार्य ठरते. पैशासाठी मेहनत शिक्षण,नोकरी,व्यवसाय हे जितके आवश्यक आहे तितकेच कुटुंब संस्थेतील ज्येष्ठांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. अशावेळी असा ‘हेल्पिंग हॅन्ड’ असणे अतिशय आवश्यक गोष्ट झाली आहे.

सिंगापुरात एकूणच अन्न, निवारा, कपडे यांची उत्तम सोय ज्येष्ठांसाठी आहेच त्याशिवाय आजच्या जमान्यात लागणारी wifi इंटरनेट साधने शिकण्यासाठी त्यांना मदत मिळते. रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत. घरी येऊन मेडिकल ट्रीटमेंट देणाऱ्या खासगी कंपन्या आहेत. पण यासाठी जास्त पैसा  लागू शकतो. सरकारने चालवलेली हॉस्पिटल्स कमी दारातली आहेत. ही हॉस्पिटल्स वाटत नसून सप्ततारांकित हॉटेल्स वाटतात. अर्थात हे सगळे वर्णन करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आणून द्यावीशी वाटते. ती म्हणजे या देशाने लोकसंख्या अतिशय कंट्रोल मध्ये ठेवली आहे. एकच राजकीय पक्ष अनेक वर्षे इथे सत्तेवर आहे. त्यामुळे सिंगापूर एखाद्या कंपनी सारखे चालवले जाते. लोकही कायदा आणि व्यवस्थेला मान देतात. त्यामुळेच या चिमुकल्या  देशात सुबत्ता आणि सुव्यवस्था गुण्या गोविंदाने नांदताना दिसते.

21 ऑगस्ट हा दिवस ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून गौरवला जातो. या दिवसाचे महत्त्व खरे तर पूर्ण वर्षात 365 दिवस मानले पाहिजे. घराघरात ज्येष्ठ नागरिकांना योग्य तो सन्मान आणि वेळ दिला पाहिजे तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही आपले वय,अनुभव याचे तारतम्य राखून तरुणाईला योग्य तो मान देत, सामंजस्याने घरात आणि समाजात आपला मान राखला पाहिजे हा विचार नोंदवून मी इथेच थांबते.

-मोहना कारखानीस

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..