एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात मोठी क्रांती घडत होती ज्याच्या आगमनानं येणारी सर्व शतकं, अनेक पिढ्या “टेक्नो सॅव्ही” होणार होत्या, क्लास ए, बी, च्या प्रतिष्ठेला मानाचा तुरा प्राप्त झाला, “टाईप रायटर” च्या रुपानं कार्यालयीन कामकाजात लिखापढी वाढल्यानंतर मनुष्यबळाची मर्यादा लक्षात येऊ लागल्या व लेखन यंत्राची गरज ही भासू लागली. यामध्ये वेग, नेटकेपणाची सुद्धा अपेक्षा होती. म्हणून काही तज्ज्ञ मंडळींनी “रायटींग मशीन” ची निर्मिती केली जी टाईपरायटर ची प्राथमिक अवस्था होती, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यात आले; “टाईप रायटर” साठी महत्वाचा घटक असतो “कार्बन पेपर” ज्याची निर्मिती खूप आधीपासून करण्यात येत होती. हे दोन्ही घटक एकत्र आल्यामुळे कामकाज बरचसं सुरळीत होऊ लागलं.
खरंतर या टाईपरायटर ने अनेकांना करियरची दिशा दाखवली अनेक गरीब व मध्यमवर्गीय घरातील तरुण मुला-मुलींना रोजगार मिळवून दिला मुख्य म्हणजे संगणकाची क्रांती, निर्मिती प्रक्रिया यासाठी दिशा दाखवण्याचे काम टाईपरायटरने केले; हा टाईपरायटर कमावण्याचं साधन बनला ज्यामुळे व्यक्तीला पद, प्रतिष्ठा तर मिळालीच पण टाईपरायटर त्यांच्या घरातील व मनातील सदस्या सारखा झाला होता. कालांतराने संगणकाचं आगमन झालं व टाईपरायटरचा वापर हळुहळू कमी झाला, बहुतांश कार्यालयातनं टाईपरायटर हद्दपार होऊ लागले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून त्याची जागा संगणक घेऊ लागले, टाईपरायटर निवृत्तीच्या मार्गाला लागले; आणि आता तर जवळपास सर्वच सरकारी तसंच निमसरकारी संस्था, कार्यालय “डिजिटाईज्ड” झाली आहेत. खेडोपाड्यात संगणक पोहोचले, आणि आता “टच सक्रीन” चा जमाना आहे; त्यामुळे “टाईपरायटर” ही “टेक्नो सॅव्हींसाठी” एखादी अॅण्टीक वस्तू वाटावी तशी बनली असून, अनेकदा भंगारवाल्यांकडे किंवा चोरबाजारात सुद्धा पुरातन वस्तु म्हणून विकली जात आहे, व त्याला अव्वाच्या सव्वा भाव प्राप्त झालेला आहे. खरंतर टाईपरायटर म्हणजे “तंत्रज्ञानाची” पहिली पायरी म्हणता येईल, म्हणूनच की-बोर्ड ने त्याची जागा घेतलेली दिसत आहे, या नव्या युगात जुनीच कर्तव्य अगदी कुशलतेनं पार पाडताना दिसत आहे.— सागर मालाडकर


Leave a Reply