नवीन लेखन...

स्वामी विवेकानंदांचा धर्मविषयक दृष्टीकोन

मला विवेकानंदांचा धर्मविषयक दृष्टिकोन अतिशय आवडतो. त्यांनी हिंदू धर्माचा विचार कुठेही प्रचारकी थाटाने मांडलेला दिसून येत नाही. त्यांनी कोणत्याही चालीरीतीला निष्कारण नांवेही ठेवलेली नाहीत.

प्रत्येक सामाजिक रूढी परंपरांमध्ये ते तत्कालीन संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून त्याज्य भाग वजा करून त्या रुढीतली निखळ निरागसता शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचा विचार कुठे चुकत असेल तर ते प्रांजळपणे चूक मान्य करतात.

कोलकत्यात ते एकदा नर्तकीचा कार्यक्रम संन्याशाने कसा बघायचा? अशा विचाराने आतमधील खोलीत निघून गेले, त्या नर्तकीने अतिशय सुंदर भक्तीगीत गायल्या नंतर त्यांनी बाहेर येऊन तिची साश्रु नयनांनी माफी मागितली होती.

विवेकानंदांचा जगातील विविध धर्मांकडे बघण्याचा एकसमान दृष्टिकोन स्पष्ट करणारी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.धर्म पुजापद्धतींमध्ये विभागले गेले आहेत आणि त्यांच्यामधले वाद सुद्धा पुजापद्धतीवरूनच आहेत. हिंदू धर्मात सर्वप्रकारच्या पूजापद्धतींचा समावेश होतो, तसेच प्रत्येक प्रकारचे तत्वज्ञान हिंदूंमध्ये मान्य आहे. एकेश्वर वाद, निरीश्वर वाद, परमेश्वर वाद, सोहम् , तत्वमसि, किंवा चराचरात भरलेला ईश्वर किंवा साकार मानवी रूपातील देव, देव विषयक या सर्व संकल्पना हिंदूंना मान्य आहेत. आई वडिलांना मान्य असलेली देवविषयक संकल्पनाच मुलांनी मानायला हवी याचा कोणताही दबाव हिंदूंवर नसतो. किंवा आपल्या नवऱ्यापेक्षा वेगळी देवाची संकल्पना ठेऊन जगण्याचा पूर्ण आधिकार हिंदू स्त्रीला आहे. सुर्यपूजा, पंचमहाभूतांची पूजा, निसर्गपूजा, प्राणी पूजा, प्रतिक पूजा, मूर्ती पूजा, मृत्तिकापूजा, व्यक्ती पूजा, मृतपूजा अशी कोणतीही पूजा हिंदूंना त्याज्य नाही. पूजा करणाऱ्यांच्या निरपेक्षतेला तात्विक दृष्ट्या हिंदूंमध्ये सर्वात जास्त महत्व आहे.

काही स्वार्थी आणि लोभी लोकांनी आपल्या भौतिक इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी देवाचा वापर सुरू केला आणि देवाच्या संकल्पनेचा त्यांनी धंदाच मांडला. त्याचा हिंदू धर्माशी किंवा तत्वज्ञानाशी कसलाही संबंध नाही. तो मनुष्य स्वभावातील दोषांचा परीणाम आहे.

हिंदूंची परमेश्वर विषयक प्रत्येक संकल्पना हे जगण्याचे एक वेगळे तत्वज्ञान असल्याचे मानले जाते. यातील प्रत्येक तत्वज्ञानाचा अर्थ हा एकच होतो आणि कोणतेही तत्वज्ञान दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्यावर अन्याय होत असल्यास सहन करावा, अशी शिकवण देत नाही. याचे सोदाहरण स्पष्टीकरण भगवद्गीतेमध्ये दिलेले आहे. कोणत्याही तत्वज्ञानाचा अंतिम उद्देश, स्वातंत्र्य समता आणि बंधुता हाच आहे, हे भगवद्गीतेमध्ये विशेषकरून सांगितले आहे. प्रत्येक तत्वज्ञानाच्या अतिशय सोप्या आणि मोजक्या शब्दांत केलेल्या निरुपणामुळे भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ मानला जातो. मृतपुजा सर्व धर्मात केली जाते. मुस्लिम मजारीमध्ये जाऊन मृतपुजा करतात, तर हिंदू पितरांचे श्राद्ध कर्म करून मृतपुजा करतात. ईजिप्शियन ममीज बरोबर त्या व्यक्तीची सर्व संपत्ती दास दासी आणि रोजच्या उपयोगी गोष्टी पुरल्या जायच्या, त्या व्यक्तीच्या परलोक प्रवासासाठी उपयुक्त म्हणून त्या गोष्टी ठेवल्या जात असत. मुस्लिमांमध्ये, मृत व्यक्ती अल्लाहच्या सर्वात जास्त जवळ असते असे मानले जाते, म्हणून त्या व्यक्तीला पवित्र मानले जाते आणि तिची पूजा म्हणजे अल्लाहची पूजा मानली जाते. एकदिवस सर्वांचा मुक्तीदिन असणार आहे, त्यानंतर सर्वांना स्वर्गात जागा मिळणार आहे, अशी मुस्लिम व्यक्तीची श्रद्धा असते, त्या मुक्तीदिनाची सर्वजण थडग्यात वाट पहात आहेत असे मानले जाते. मुस्लिम पुनर्जन्म सुद्धा मानतात. हिंदू मृतपुजा म्हणून प्रतिकांची पूजा करतात, श्राद्ध विधीमध्ये सातू किंवा भाताच्या मुदी हे त्या व्यक्तीचे प्रतिक मानले जाते. प्रत्येक व्यक्तीचे शरीर अन्नापासून बनते, त्यामुळे अन्न हे मृत व्यक्तीच्या ऐहिक शरीराचे प्रतिक म्हणून वापरले जाते.
प्रत्येक व्यक्तीचा पणतू आपल्या पणजोबाची शेवटची आठवण काढतो आणि तो आपल्या पणजोबाच्या स्मृतींना या जगातून मुक्ती देतो असे हिंदू मानतात.
हिंदूंमध्ये मुलगा होणे, या घटनेला त्यामुळेच अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे. स्त्री मार्फत सुद्धा वंश पुढे चालतो, याचा विचार हिंदूंनी केलेला नाही.

आयुष्यात आनंद मिळवायचा हा मूळ उद्देश सोडून देऊन तो आनंद कसा मिळवायचा यावरून जगामध्ये भांडणं आणि कट्टरता सुरू आहे. आपल्या धर्माकडे तटस्थ वृत्तीने बघून जे त्याज्य आहे ते टाकून देऊन जे उपयुक्त आहे जे आधुनिक सुधारीत जगामध्ये उपयुक्त आहे तेच स्वीकारायचे, हा विवेकानंदांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजानेही आत्मसात करावा, या मताचा मी आहे.

भारताचा सांस्कृतिक इतिहास हा दोन संस्कृतींच्या कॉन्फ्लुअन्सचा इतिहास असल्याचे स्पष्टपणे वारंवार लक्षात येते. जे दोन निरनिराळ्या संस्कृतींच्या सामंजस्यातून टिकून राहते तेच पुढे संस्कृतीतून वहात येते, बाकी सर्व नष्ट होते. सामंजस्य नसेल तर तो समाजच नष्ट होण्याच्या मार्गाला लागतो. हे आजवर वारंवार सिद्ध झालेले आहे.

शंकर हा स्मशानात डोंगरात जंगलात राहणारा आदिवासी देव आहे. तो चिताभस्म अंगाला लावतो, साप व्याघ्र्याजिन वापरतो, डमरू हे अतिशय बेसिक वाद्य वाजवतो.त्याच्यावर शेती संस्कृतीतील नागर ब्राह्मण राजा दक्षाची कन्या सती प्रेम करू लागते. दक्ष त्या लग्नाला विरोध करतो आणि शंकराची मूर्ती दारात रखवालदार म्हणून बसवतो, सती त्या मूर्तीला हार घालून त्याला वरते, त्या मूर्तीतून शंकर प्रकट होऊन तिच्याशी लग्न करून तिला घेऊन जातो.
या दोन संस्कृती मधील मिलाफामधून जन्माला आलेला मुलगा म्हणजे गणेश.

गणपती हि देवता जंगल संस्कृती आणि नागर संस्कृती यांच्या मिलाफ झाल्याचे प्रतिक आहे, गणेशाला त्यामुळेच प्रत्येक पूजेत अग्रमानांकन मिळालेले आहे.
जंगल संस्कृती आणि नागर संस्कृती यांचा मिलाफ म्हणजेच भारतीय संस्कृती आहे, याचा अजून एक पुरावा म्हणजे देवतांना असणारी वाहने हा आहे.
विष्णू लक्ष्मी देवी इत्यादी नागर देवतांची वहाने हिंस्त्र आणि जंगली पशू हि आहेत. विष्णू गरुड, देवी आणि लक्ष्मी वाघ आणि सिंह, इत्यादी.
स्मशानात राहणाऱ्या शंकराचे वाहन मात्र शेतामध्ये राबणारा नंदी आहे. हा सांस्कृतिक काँफ्ल्यूअन्सचा सर्वात मोठा पुरावा आहे. हिंदूंमधील जातीभेद हि तत्कालीन सामाजिक परिस्थितीची उपज आहे, इतकेच.

जगातील कोणताही धर्म असो, हिंदूंना तो वेगळा वाटतच नाही, हिंदूंच्या सर्वसमावेशक विशाल विचारसरणीचे, लवचिकतेचे हिंदूंना नुकसान झालेले आहे. हिंदूंच्या लवचिकतेचा आणि सर्वसमावेशकत्वाचा अर्थ इतर धर्मीयांकडून कणाहीन कमजोर असा घेतला गेला.जगाला हिंदूंची हि सर्वसमावेशकता मान्य केल्याशिवाय जग सुखी आणि समाधानी होणार नाही हे मात्र निश्चित आहे.

— विनय भालेराव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..