नवीन लेखन...

किपचोगेचं यश

सन २०१७मध्ये जी चाचणी आयोजित केली गेली, ती पादत्राणे बनवणाऱ्या नायकी या जगप्रसिद्ध कंपनीकडून. मोंझा येथे झालेल्या या चाचणी स्पर्धेत एलिऊड किपचोगेबरोबरच जागतिक दर्जाच्या, इतर दोन धावपटूंनीही भाग घेतला होता. त्याचबरोबर, या मुख्य धावपटूंचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं, या चाचणी शर्यतीत तीस इतर धावपटूंना आळीपाळीनं उतरवण्यात आलं. (या सहकारी धावपटूंना ‘पेसर’ म्हटलं जातं.) हे धावपटू सहा-सहाच्या गटानं मुख्य धावपटूंच्या पुढे विशिष्ट प्रकारची त्रिकोणी आकाराची रचना करून धावत होते. ही चाचणी शर्यत किपचोगेनं पहिल्या क्रमांकानं, २ तास, ० मिनिटं आणि २५ सेकंदांत पूर्ण केली. या अगोदरची त्याची स्पर्धात्मक शर्यतीतली सर्वोत्तम वेळ होती, २०१६ सालच्या लंडन मॅरॅथॉनध्ये नोंदवलेली २ तास, ३ मिनिटं आणि ५ सेकंद. म्हणजे किपचोगे ही चाचणी शर्यत जरी दोन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करू शकला नसला, तरी ही शर्यत पूर्ण करण्यास किपचोगेला लंडन मॅरॅथॉनमध्ये लागलेल्या वेळेपेक्षा तब्बल २ मिनिटं आणि ४० सेकंद कमी लागले.

त्यानंतरच्या काळात एलिऊड किपचोगेनं मॅरॅथॉन स्पर्धांतली आपली कामगिरी आणखी उंचावत नेली. सन २०१८मधली बर्लिन मॅरॅथॉन त्यानं २ तास, १ मिनिट आणि ३९ सेकंद, या विक्रमी वेळात जिंकली. साहजिकच आता दोन तासांच्या आत मॅरॅथॉन शर्यत पूर्ण होऊ शकते का, याची चाचणी पुनः घेण्याचं ठरलं. ही चाचणी घेण्यासाठी इनिऑस ही रसायन उद्योगातील कंपनी पुढे आली. सन २०१९मध्ये व्हिएन्नात घेतली गेलेली ही चाचणी आता फक्त किपचोगेवर केंद्रित केली गेली. या स्पर्धेत किपचोगेचा वेग वाढवण्यासाठी त्याला एकूण ४१ धावपटूंनी साथ दिली. हे धावपटू विशिष्ट रचनेत सात-सातच्या गटानं, आळीपाळीनं, किपचोगेबरोबर धावत होते. यापैकी किपचोगेच्या पुढे असणाऱ्या पाच खेळाडूंनी इंग्रजी ‘व्ही’ अक्षराचा आकार राखला होता; तर त्याच्या मागे असणारे दोन खेळाडू हे एकमेकांबरोबर जोडीनं धावत होते. या चाचणीत, किपचोगेनं मॅरॅथॉनचं अंतर १ तास, ५९ मिनिटं आणि ४० सेकंदांतच पार केलं. मॅरॅथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करणं शक्य असल्याचं, एलिऊड किपचोगेनं या चाचणीत दाखवून दिलं.

मोंझा आणि व्हिएन्ना येथे आयोजित केलेल्या चाचण्यांमध्ये पेसर धावपटूंचा वापर केला गेला होता. स्वतंत्रपणे आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक मॅरॅथॉन स्पर्धांत, अशा सहकारी धावपटूंचा सहभाग असतो. एकत्र धावत असल्यानं, मुख्य धावपटूला आपला अपेक्षित वेग कायम राखण्यास या धावपटूंची मदत तर होतेच, परंतु वायुगतिशास्त्राच्या दृष्टीनंही त्याला या धावपटूंची मदत होत असते. मुख्य धावपटूच्या पुढे-मागे धावणाऱ्या इतर धावपटूंमुळे, मुख्य धावपटूच्या आजूबाजूच्या हवेतील दाबात किंचितसा फरक पडत असतो. उदा. पुढे धावणारे खेळाडू हे समोरच्या हवेनं निर्माण केलेला विरोध स्वतः झेलतात आणि त्यामुळे मुख्य धावपटूला होणारा हवेचा विरोध कमी होतो. मुख्य धावपटूच्या धावण्यावर याचा अनुकूल परिणाम घडून येऊ शकतो. अशा परिणामाचं प्रमाण हे या इतर धावपटूंच्या रचनांवर अवलंबून असतं. एलिऊड किपचोगेच्या व्हिएन्नातील चाचणीतल्या यशानंतर, फ्रांसमधील लिऑन विद्यापीठातील मासिमो मारो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सहकारी धावपटूंच्या कोणत्या रचना वायुगतिशास्त्राच्या दृष्टीनं मुख्य धावपटूला फायदेशीर ठरू शकतात, हे प्रयोगांद्वारे शोधायचं ठरवलं.

आपल्या प्रयोगांसाठी या संशोधकांनी ‘विंड टनेल’ नावाच्या साधनाचा वापर केला. हे साधन वायुगतिशास्त्राच्या अभ्यासासाठी, विमानविद्येसह अनेक क्षेत्रांत वापरलं जातं. विंड टनेल म्हणजे बोगद्यासारखं एक नळकांडं असतं. ज्या वस्तूवरील हवेच्या प्रवाहाचा परिणाम अभ्यासायचा असतो, ती वस्तू वा त्या वस्तूची छोटी प्रतिकृती या नळकांड्यात घट्टपणे बसवली जाते. त्यानंतर या नळकांड्याच्या एका बाजूनं, हव्या त्या नियंत्रित गतीनं हवा सोडून, त्यात ठेवलेल्या वस्तूच्या विविध भागांवर, विविध परिस्थितीत, या हवेच्या झोतामुळे निर्माण होणारं बल मोजलं जातं. मासिमो मारो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनासाठी दीड मीटर लांबीचा विंड टनेल वापरला. या विंड टनेलची उंची आणि रुंदी चाळीस सेंटिमीटर होती. या प्रयोगासाठी धावपटूंच्या १७ सेंटिमीटर उंचीच्या (म्हणजे प्रत्यक्ष उंचीच्या एक दशांश आकाराच्या) प्रतिकृती वापरल्या गेल्या. या सर्व प्रतिकृती नळकांड्यात हव्या त्या ठिकाणी घट्टपणे बसवण्याची व्यवस्था होती. मुख्य धावपटूच्या प्रतिकृतीचा पाया हा, हवेच्या प्रवाहानं त्या प्रतिकृतीवर निर्माण केलेलं बल मोजण्याच्या यंत्रणेला जोडला होता. या मुख्य धावपटूच्या प्रतिकृतीच्या पुढे-मागे, इतर धावपटूंच्या प्रतिकृती, वेगवेगळ्या रचनेत ठेवण्यात येणार होत्या. त्यानंतर या नळकांड्यात हवेचा प्रवाह सोडून, इतर धावपटूंच्या विविध रचनांदरम्यान मुख्य धावपटूवर निर्माण होणाऱ्या हवेच्या बलाचं मापन केलं जाणार होतं. हवेच्या बलानं धावपटूच्या धावण्याला होणारा विरोध कमी करणारी रचना, ही अर्थातच धावपटूला वेग वाढवण्याच्या दृष्टीनं अनुकूल ठरणार होती.

आपल्या प्रयोगात मासिमो मारो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण दोन धावपटूंपासून ते आठ धावपटूंपर्यंतच्या विविध रचना अभ्यासल्या. तसंच प्रत्येक रचनेत त्यांनी विविध धावपटूंची, एकमेकांतली अंतरंही बदलून पाहिली. या रचनांत अर्थातच, मोंझा आणि व्हिएन्ना येथे एलिऊड किपचोगे ज्या रचनांद्वारे धावत होता, त्या रचनांचाही समावेश होता. खात्रीशीर निष्कर्षांसाठी प्रत्येक प्रयोग हा किमान तीसवेळा पुनःपुनः करून पाहण्यात आला. प्रयोगाद्वारे गोळा केल्या गेलेल्या माहितीवरून, मुख्य धावपटूला कोणत्या रचनेमुळे किती फायदा होऊ शकेल, याचं गणित या संशोधकांनी मांडलं. या गणितानुसार, मोंझा येथील चाचणीत वापरलेल्या त्रिकोणी आकाराच्या रचनेद्वारे, किपचोगेवरचा हवेचा विरोध (एकट्यानं धावण्याच्या तुलनेत) सुमारे ४० टक्क्यांनी कमी होऊन, एकूण वेळेच्या बाबतीत २ मिनिटं ४९ सेकंदांची बचत झाली होती. व्हिएन्ना इथल्या रचनेमुळे त्याच्यावरचा हवेचा विरोध (एकट्या धावपटूच्या तुलनेत) ५० टक्क्यांनी कमी होऊन, एकूण ३ मिनिटं ३३ सेकंदांची बचत झाली होती. या संशोधनानं दाखवल्यानुसार, जर ‘पुढे १, १, २, १ धावपटू आणि मागे २ धावपटू’, अशी विशिष्ट रचना वापरली गेली, तर धावपटूवरचा हवेचा विरोध सुमारे साठ टक्क्यांनी कमी होऊन, मॅरॅथॉन शर्यतीतील एकूण वेळेत सव्वाचार मिनिटांपेक्षा अधिक बचत होऊ शकते.

मासिमो मारो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे उपयुक्त संशोधन ‘दी रॉयल सोसायटी पब्लिशिंग – प्रोसिडिंग्ज ए’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सहकारी धावपटूंच्या विविध रचनांमुळे मुख्य धावपटूवर होणाऱ्या परिणामांचं चित्र या संशोधनानं उभं केलं गेलं आहे. या संशोधनावरून, सहकारी धावपटूंची विशिष्ट रचना वापरल्यास मुख्य धावपटूला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून आलं आहे. शर्यतीचे डावपेच आखताना, ही बाब अतिशय महत्त्वाची ठरू शकते. किपचोगेनं चाचणीत दोन तासांचा ‘उंबरठा’ पार करण्यात यश मिळवलं आहेच. आता अशा प्रकारचे योग्य ते डावपेच आखल्यास, किपचोगे भविष्यात अधिकृत मॅरॅथॉन शर्यतींतही दोन तासांचा उंबरठा ओलांडू शकेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. आणि एलिऊड किपचोगे स्वतःसुद्धा मॅरॅथॉन शर्यत दोन तासांच्या आत पूर्ण करण्याबद्दल आशावादी आहे!

(छायाचित्र सौजन्य – INEOS /Massimo Marro, et al)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..