नवीन लेखन...

श्रीराम – सामाजिक समरसता

संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे.त्यांनी रामाला ईश्वर, देवत्व प्रदान केले नाही. आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् ।

राम मानव असल्याने त्याचे जीवन सामान्य मानवी भावभावनांनी युक्त आहे.रामांना दु:ख, क्रोध, मोह सुद्धा झाला आहे. पण राम त्या भावनांच्या आहारी न जाता भावनांवर विजय मिळवून श्रेष्ठ, आदर्श पदाला पोहोचले.रामांना उत्तम पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम म्हणतात. मनुष्याच्या आयुष्यात सुख दु:ख येतात जातात. माणूस सुखाने हुरळून जातो अन् अनिर्बंध, अमर्याद, अहंकारी वागतो तर दु:खानी होरपळतो, खचतो, आत्मभान विसरून हातपाय गाळून आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतो.या दोन्ही अतिशय टोकाच्या भूमिका न घेता सुवर्णमध्य साधून, संतुलित आयुष्य जगण्यासाठी रामचरित्र मार्गदर्शन करते.देव असूनही रामाने जीवनात अनेक दु:खे भोगली. सामान्यांचा तोल गेला असता पण रामाने स्वजीवनात दु:खाघाताने  कधीही मर्यादा ओलांडली नाही. उत्तम राम चरित नाटकात राम म्हणतो

“रामो ।़ स्मि सर्वं सहे ।” मी राम आहे.सर्व सहन करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. जीवनात अनेक दु:खे आलीत तरी न डगमगता परिस्थितीला कसे सामोरे जायचे हेच रामांनी जगाला दाखविले. बंधुप्रेमाचा आदर्श स्वआचरणाने जगाला दाखवून दिला. खरं तर भरत रामाचा सावत्र भाऊ पण त्याच्या सुखासाठी हसत वनवास स्वीकारला अन्  आज त्याच्या विपरीत दृश्य दिसते. सख्खे भाऊ संपत्तीच्या वादात न्यायालयात वर्षानुवर्षे भांडतात. त्या सर्वांनी रामायणाचा अभ्यास आवर्जून करावा.

वाल्मिकींनी रामाची विविध रूपे सांगितली आहेत.

1)  सुमंता कडून अयोध्या वासियांना, प्रियजनांना आपले ह्रदगत् कळविणारा भावनिक राम.

2)  भरत भेटीत भरताला माघारी परतवितांना मानवी जीवनावर भाष्य करणारा (पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा) तत्त्वचिंतक राम.

3)  लक्ष्मणाला पंचवटीत कुटी कशी बांधावी हे शिकवितानांचा रसज्ञ राम.

4)  सुग्रीवाला रणनीतीचा पाठ देणारा पाठक राम.

5)  वालीला वधाच्या आधी नीतिमत्ता शिकविणारा नीतितज्ञ राम.

6)  युद्ध टाळण्यासाठी शत्रूला संधी देणारा राजधर्मी राम.

7)  रावणाचा अंत्यसंस्कार बिभीषणाकडून करवून घेणारा संस्कृति रक्षक राम.

8)  लंका विजयानंतर सीतेची सत्त्वपरीक्षा घेणारा कर्तव्य कठोर राम.

9)  अग्निदेवतेच्या साक्षीने सीतेचा स्वीकार करताना डोळ्यात आसवांची नदी थोपविणारा कृतार्थ राम.

10) किष्किंधा आणि लंका जिंकूनही तिथे राज्य न करणारा निर्मोही राम.

11) समाजाला दहशतीतून मुक्त करणारा,आश्वस्त करणारा प्रजाप्रेमी,समाजप्रेमी राम.

12)निषाद, मातंग,रिछ,भिल्ल,कोल अशा वनवासी नरांना वानरां बरोबर संघटीत करणारा समरसता योगी राम.

वनवासी रामाचे संपूर्ण जीवन सामाजिक समरसतेचे अनुकरणीय पाथेय आहे. केवटला आज वंचित समुदायाच्या श्रेणीत सामिल केले जाते, परंतु रामाने केवटला आलिंगन देऊन सामाजिक समरसताचे अद्भूत उदाहरण घातले आहे. रामांनी वनातील प्रत्येक पावलावर समाजातील अंतिम व्यक्तीची सस्नेह भेट घेतली अन् संपूर्ण मानवी समाजाला महत्त्वाची शिकवण दिली की प्रत्येक मनुष्याच्या आंत एकच आत्मतत्त्व, जीवात्मा आहे. बाहेरचे रूप भिन्न असले तरी अंतर्यामी सर्व समान आहेत. रामाला पाहून शबरी म्हणते, अधम ते अधम अति नारी । तिन्ह महं मैं मतिमंद अघारी। त्यावर राम म्हणतात, मी तर केवळ एक भक्तीचाच संबंध मानतो. जातीपाती,कुलधर्म,धन,बल, कुटुंब,गुण आणि चतुरता हे सगळं असूनही भक्तिरहित मनुष्य हा पाण्याविना ढगासारखाच असतो.

सीतेच्या  रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा गिद्धराज जटायू पक्षी जो वर्तमानात एक निकृष्ट पक्षी श्रीरामांनी त्यांच्या कर्मांमुळे, पितृतुल्य मानून त्याचा विधिवत अंत्यसंस्कार केला. श्रीरामांनी शहरी व ग्रामीण हा भेदभाव मिटविण्यासाठी उच्च नीच जातीपातीला तिलांजली दिली. श्रेष्ठतम भारताच्या निर्माण कार्यासाठी संपूर्ण जीवन समाज समर्पित जगले. राष्ट्रसमर्पित कार्य करण्यासाठी श्रद्धेने , विश्वासाने रामाच्या गुणांचा स्वीकार अन् आपल्यातील दुर्गुणांचा त्याग करणे आवश्यक आहे. श्रीराम सकल गुणनिधान, संस्कृतीचे प्राण आहेत. श्रीरामाची कार्यपद्धती आज कलियुगातही उपयोगी पडते.आज दहशतवादी शक्ती जगभर आतंक माजवित आहेत.वाढती अराजकता आणि दहशतवादाचे समूळ निर्मूलनासाठी श्रीरामांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आचरण केल्यास निश्चितच यश मिळेल.

महामंडलेश्वर प.पू.स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांची मुलाखत “राष्ट्र सर्वोपरी” या मालिके अंतर्गत पाहिली, त्यात त्यांनी ठामपणे सांगितले की,आतापर्यंत त्यांनी बारा लाख नागा साधूंना शास्त्र शिक्षणाबरोबरच शस्त्र शिक्षण देऊन सुसज्य ठेवले आहे.देशाच्या रक्षणासाठी, उत्कर्षासाठी वेळ आली तर सैनिकांसह शत्रूंशी दोन हात करतील.अध्यात्माबरोबर समाजाला निर्भय,आश्वस्त करण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.इतकी मोठी संघटना उभी करताना देव अन् देशासाठी सर्वस्वाचे दान करण्यास तरुणांना तयार केले.राजसत्ता अन् धर्मसत्ता एकाच प्रेरणेने कार्य करतात, हे सर्व पाहून भारत विश्वगुरु होणार यांत तीळमात्र शंका नाही.

माझी वाणी रंगली राम नामी ।

तुझा माझा नित संग घडो स्वामी ।

नित्य घडू दे निष्काम विश्व सेवा ।

हीच माझी प्रार्थना तुला देवा ।।

।। श्रीराम जयराम जय जय राम ।।

-श्रीमती रंजना राम शास्त्री – पुणे
भ्रमणध्वनी : 9890839666  

विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित श्री रामार्पण या खास ग्रंथातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..