नवीन लेखन...

श्री क्षेत्र नरसोबावाडी महात्म्य

नरसोबावाडी ही साधु-संतांची तपोभूमि आहे. श्रीराम चंद्रयोगी तेथे राहिले होते. नंतर नारायणस्वामी आले. काशीकर स्वामी, गोपाळस्वामी तेथेच राहिले. येथे प्रसिद्ध मौनीस्वामी सिद्धपुरुष होऊन गेले. ब्रह्मानंद स्वामी, गोविंदस्वामी येथे रहात असत प.पू. श्रीटेंबेमहाराज येथे वरचेवर येत होते. योगी वामनराव गुळवणी महाराज दर गुरुद्वादशी वारी करीत असत.

श्रीगुरुचरित्रांतील अठरावा अध्याय ११ ते ३१ श्लोक

पुढे कृष्णातटाकांत । श्रीगुरु तीर्थ पावन करीत पंचगंगा संगमास्थान । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११ । अनुपम तीर्थ मनोहर । जैसे अविमुक्त काशीपुर । प्रयाग समानु तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥ १२ ॥ कुरुवपुर ग्राम गहन । कुरुक्षेत्र तेचि जाण । पंचगंगा संगम कृष्णा । अत्योत्तम परियेसा ॥१३ ॥ कृष्णाक्षेत्री जितके पुण्य । तयाहून अधिक असे जाण । तीर्थ असती अगम्य । म्हणोनि राहिले श्रीगुरु ॥ १४ ॥ पंचगंगा नदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर । पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका ऐकचित्ते ॥ १५ ॥ शिवा-भद्रा-भोगावती । कुंभीनंदीसरस्वती । पंचगंगा ऐसी ख्याती । महापातक संहारी ।। १६ ।। एैसी प्रख्यात पंचगंगा । आली कृष्णेचिया संगा । प्रयागाहुनि असे चांगा । संगमस्थान मनोहर ॥ १७ ॥ अमरापूर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम । जैसा प्रयाग संगम । तैसे स्थान मनोहर ॥१८ ।। वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु । देव असे अमरेश्वरु । तया संगम षट्कुळी ॥१९ ।। जैसी वाराणासीपुरी । गंगा भागिरथी तीरी । पंचनदी संगम थोरी । तत्समान परियेसा ॥२०॥ अमरेश्वर संन्निधानी । आहेत चौसष्ट योगींनी । शक्तितीर्थ निर्गुणी । प्रख्यात असे परियेसा ॥ २१ ॥ अमरेश्वर लिंग बरवे । त्यासी वन्दुनि स्वभावे। पूजित नर अमर होय । विश्वनाथ तोचि जाणा ॥ २२ ॥ प्रयागी करिता माघस्नान । जे पुण्य होय साधन । शतगुण होय तयाहून । एक स्नाने परियेसा ॥ २३ ॥ सहज नदी संगमांत । प्रयागसमान असे ख्यात । अमरेश्वर परब्रह्मवस्तु । तया स्थानी वास असे ॥ २४ ॥ याकारणे तिया स्थानी । कोटी तीर्थे असती निर्गुणी । वाहे गंगा दक्षिणी । वेणीसहित निरन्तर ॥ २५ ॥ अमित तीर्थ तथा स्थानी । सांगता विस्तार पुराणी । अष्टतीर्थ ख्याति जाण । तया कृष्णतटाकांत ॥२६॥ उत्तर दिशी असे देखा । वाहे कृष्णा पश्चिमाभिमुखा । शुक्लतीर्थ नाम एका । ब्रह्महत्या पाप दूर ॥२७॥ औदुंबर सन्निधेसी । तीनी तीर्थे परियसी । एकानन्तरी एक धनुषीं । तीर्थं असती मनोहर ॥२८॥ पापविनाशी ‘काम्यतीर्थ’ । तिसरे सिद्ध ‘वरदतीर्थ’ । अमरेश्वरसन्निधानी । अनुपम्य असे भूमंडली ।।२९ ।। पुढे संगमषट्कुळांत । ‘प्रयागतीर्थ’ असे ख्यात । ‘शक्तितीर्थ’ अमरतीर्थ । कोटितीर्थ परियसा ॥३०॥ तीर्थ असती अपारी । सांगता ग्रंथ विस्तारी । याकारणें श्रीगुरु त्या पुरी । राहिले तेथे द्वादशाब्दे ॥ ३१ ॥

श्रीगुरुचरित्रांतील एकोणिसावा अध्याय ७३ ते ९४ श्लोक

श्रीगुरु निघतां तेथोनि । आपल्या चौसष्ट योगिनी । विनविताती करुणावचनी । आम्हां ठेवोनि केवीं जाणा ॥७३॥ नित्य तुझ्या दर्शनेशी । तापत्रय हरती क्षणेसी । अन्नपूर्णा तुम्हापाशी । केवी राहू स्वामिया ॥७४ ॥ येणेपरी श्रीगुरुंसी । योगिनी विनविती भक्तीसी । भक्तवत्सले संतोषी । दिधला वर तये वेळी ॥७५ ॥ श्रीगुरु म्हणती तयांसी । सदा असो औदुंबरापाशी । प्रगटार्थ जाण पूर्वेसी । स्थान आमुचे येथेचि असे ॥७६ ॥ तुम्ही रहावे येथे औदुंबरी । अमर पश्चिमतीरी । अन्नपूर्णा निर्धारी । औदुंबरी ठेवितो ॥७७॥ कल्पवृक्ष औदुंबर । तेथे असा तुम्ही स्थिर । अमरपूर पश्चिम तीर । अमर स्थान हेचि जाणा (नरसोबावाडी) ॥७८ ॥ प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करित । मनकामना होय त्वरित । तुम्ही त्यासी साह्या व्हावें ॥ ७९ ॥ तुम्हांसहित औदुंबर । आमच्या पादुका मनोहर । पूजा करिती जे तत्पर । मनोकामना पुरती जाणा ॥८० ॥ येथे असे अन्नपूर्णा । नित्य करिता आराधना । तेणे होय मनकामना । चतुर्विध पुरुषार्थ ॥८१ ॥ पापविनाशी काम्यतीर्थ । सिद्धतीर्थ स्नान करित । सात वेळा स्नपन करित । तुम्हांसहित औदुंबरी ॥८२ || साठ वर्षे वांझेसी । पुत्र होती शतायुषी । ब्रह्महत्यादि पापे नाशी । स्नान मात्रे त्या तीर्थी ॥८३ ॥ सोमसूर्यग्रहणासी । अमावस्या संक्रातीसी । स्नान करितां भक्तीसी । अनंत पुण्य असे देखा ॥८४ ॥ सोमवारी अमावस्येसी । व्यातिपातादि पर्वणीस । स्नान करितां फले कैसी । ऐका श्रोते एकचित्ते ॥८५ ॥ सुवर्ण शृग रौप्यसुरेसी । अलंकारुनी धेनूसी । सहस्र कपिल ब्राह्मणासी । सुरनदीतीरी दिले फळ असे ॥८६॥ भक्तिभावें करोनि देखा । अन्ना घालितां ब्राह्मण ऐका । कोटी ब्राह्मण भोजन ऐका । पुण्य असे परियेसा ॥८७ ।। औदुंबर वृक्षातळी । जप करितां मन निर्मळ । कोटी गुणे फळे आगळी। होम केल्या ऐसेचि ॥८८ ॥ रुद्र जपोनि एकादश । करितां पूजा मानस । अतिरुद्र केले पळ सदृश । एकचि पुण्य परियेसा ॥८९ ॥ मंदगति प्रदक्षिणा । करितां होय अनंत पुण्य । पदोपदी वाजपेय यज्ञ फळ असे परियेसा ॥९० ।। नमन करिता येणेपरी । पुण्य असे अपरंपारी । प्रदक्षिणा दोनचारी  ।करूनि करणे नमस्कार ।।९१ ।। कुष्टे असे अंगहीन । त्याने करणे प्रदक्षिणा । लक्ष वेळ करितां जाणा । देवासमान होय देह ।।९२ ।। ऐसे स्थान मनोहरु । सहज असे कल्पतरु । म्हणोनि सांगताति गुरु । चौसष्ट योगिनीसी ॥९३ ॥ विश्वरूप जगन्नाथ | अखिलां ठायी असे वसत । औदुंबर प्रीती बहुत । नित्य येथे वसतसे ॥९४ ।।

श्रीगुरुंनी आम्ही येथेच राहतो, असे गाणगापुरातील भक्तांना सांगितले. कुरगड्डी व नरसिंहवाडी येथे श्रीगुरुंनी असेच सांगितले. ते एकटे सर्व ठिकाणी कसे राहतील? असे वाचकास वाटेल. श्रीगुरुंना काय विचारतां? श्रीगुरुंचा महिमा काय वर्णावा? मनुष्यबुद्धीने पाहणाऱ्या लोकांना अशी शंका येते. सर्वज्ञ सर्वशक्ती त्रैमूर्ती स्वरूपी श्रीदत्त भगवान अघटित घटनापटू आहेत. त्यांनी कारंजपुरांत एकाच दिवसांत घरोघरी सर्व ठिकाणी भिक्षा घेतली. दिवाळीमध्ये एकच दिवशी आठ रूपाने आठ गावी राहून भक्तांना संतोष दिला. श्रीशैल पर्वतास गेल्यावर पुन्हा भक्तांना गाणगापुराच्या मठात दर्शन दिले. त्याकारणाने श्रीनृसिंहवाडी, कुरगड्डी, गाणगापूर इत्यादि स्थानातच ते सतत राहिले आहे. ज्या ज्या ठिकाणी राहिले, तेथे ते गुप्त रूपाने आहेत व निजभक्तास ते दर्शन देतात.

नरसिंहवाडीला श्रीदत्तांची राजधानी असे म्हणतात. जेथे राजा राहतो त्या ठिकाणाला राजधानी म्हणतात. ह्या त्रैलोक्याधिपतीची गादी औदुंबर वृक्षातळी असून त्या कल्पवृक्षाने या यति राजावर आपले छायाछत्र अखंड धरून त्यांच्या सेवेने तो आपणाला देखील सर्व वृक्षांचा राजा म्हणून घेऊ लागला व पुज्यही झाला. बाकीचे अन्य वृक्ष सोडून औदुंबर वृक्षातळीच श्रीदत्तगुरु नरसिंह-सरस्वती कां राहत?  याचे कारण नरसिंह नामक आपल्या पूर्वीच्या अवतारांस हिरण्यकश्पूचे पोट नखांनी विदारिले असता, त्याच्या पोटांतील काळकूट विषाने त्यावेळी श्रीगुरु फार तप्त झाले होते. तेव्हा लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून त्यांच्यापुढे ठेविली. त्यांत नखे खुपसल्याबरोबर त्यांच्या अंगातला दाह शांत झाला. लगेच त्यांनी औदुंबर वृक्षाला ‘मी सदा वसे तुजपाशी । लक्ष्मीसहित संतोषी’ असा वर दिला.

औदुंबर वृक्षातळी । असे तापसी महाबळी ॥
अवतार पुरुष चंद्रमौळी । तुझी वांछा पुरवील ॥

ह्या आपल्या वराच्या सत्यतेकरितां नरसिंहमूर्ती श्रीगुरु औदुंबरंतरूतळवासी झाले व त्याच्या सान्निध्यामुळे तो वृक्ष भक्तांना इच्छित फळे देण्याच्या योग्यतेला पोहोचला. त्याचप्रमाणे संगम, तीर्थ, अश्वत्थ किंवा हे नरसोबावाडी क्षेत्र, यांना देखील श्रीगुरुमहाराजांच्या वास्तव्यामुळेच महत्व प्राप्त झाले. अस्तु !

नरसोबावाडी हे साक्षात् दत्तगुरु महाराजांचेच हृदय आहे असे समजावे. वारंवार आमचे स्थान हेच आहे, आम्ही येथेच राहतो असे उद्गार सद्गुरुनाथांनी कां काढिले असावेत? श्रीगुरु येथे फक्त बारा वर्षे राहिले होते. नंतर ते येथून गेले आता ते येथे नाहीत. अशी अज्ञानी जनांची पुढे समजूत कदाचित होण्याचा संभव त्यांना दिसला म्हणून तन्निवारणार्थ लोककल्याणासाठीच त्यांना असें वारंवार बोलून दाखवावे लागले. भक्तलोकांना येथे नेहमी श्रीगुरु स्वप्नांत दृष्टांत देतात.

त्यांच्या कामना पूर्ण करतात. नवसाला पावतात, नवस केलेले लोक तो पुरा झाल्याबद्दल नेहमी येथे येऊन कबुली-जबाबहि देतात, असे असून दत्तमहाराज येथे असल्याबद्दल कित्येकांना संशय यावा ही आश्चर्याची गोष्ट होय ! किंवा आश्चर्य तरी कसले? अज्ञानी जीवांचा हा ईशनिमित्त संशयी स्वभावच होय ! हीच ईश्वरी माया होय !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..