नवीन लेखन...

श्रीसूक्ताचे सौंदर्य

कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.

रोजच्या जीवनातल्या बारीक-सारीक गोष्टींचा गंभीरपणे विचार करणाऱ्या आणि इवल्या इवल्या सौंदर्यात अपार तेजाचा अंश पाहणाऱ्या ऋषींची ही संस्कृती.

हिनं ऐहिक सुखांची गुलामी स्वीकारली नसेल, पण म्हणून जीवनातलं त्याचं महत्त्व मान्य केलं नसेल हे पटायचं नाही. त्याशिवाय का या संस्कृतीच्या ऐहिक आणि आध्यात्मिक वैभवाची भूल उभ्या जगाला पडली?

पुढे श्रीसूक्ताचा अर्थ समजून घेताना खात्रीच पटली की, या संस्कृतीनं ऐहिक जीवनाला तुच्छ वगैरे मुळीच मानलं नाही. ते जास्तीत जास्त समृद्ध, सुखी, शांत तरीही सामर्थ्यसंपन्न कसं होईल याचा विचार केला. मात्र मानवी जीवनाचं अंतिम कल्याण फक्त ऐहिक जीवनाच्या तृप्ततेत नाही तर त्यापलीकडे जाण्यात आहे. याचं भान ठेवलं म्हणूनच इथला राजादेखील ‘राजर्षि’ बनला, बहकला नाही.

‘लक्ष्मी’ म्हटलं की डोळ्यासमोर येते उंची वस्त्रालंकार घालून कमळात उभी असलेली आणि सुवर्णाच्या नाण्यांचा वर्षाव करणारी प्रतिमा.

पण ‘लक्ष्मी’ म्हणजे फक्त नोटा किंवा नाणी नव्हेत. आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय ऋषीमुनी यांचे याबाबतील विचार अगदी सारखे आहेत. लोकांच्या हातात भरपूर पैसा आला तर निर्माण होते ती चलनवाढ, ती समृद्धी नव्हे. भरपूर पैसा आणि वस्तूंची टंचाई महागाई निर्माण करते – सुख नव्हे. सुख नव्हे. म्हणूनच ऋषींनी श्रीसूक्तात मागितलेली लक्ष्मी फार वेगळी आहे.

त्यांनी अग्निदेवतेला अशा लक्ष्मीला बोलवायला सांगितलं, जी कधीही जाणार नाही. पण ती लक्ष्मी यावी मात्र उजळ माथ्यानं, रथामध्ये बसून, हत्तींच्या चित्कारांनी आनंदित होत, वाजतगाजत यावी. कुठल्याही अनीतीच्या मार्गानं येणारा पैसा मानसिक ताणतणावच घेऊन येत असतो, म्हणून उघडपणे, राजमार्गाने येणाऱ्या लक्ष्मीचंच आवाहन यात केलं आहे.

असं म्हणतात की, समुद्रमंथनातून आधी ‘ अलक्ष्मी ‘ निर्माण झाली. ‘अलक्ष्मी’ म्हणजे क्षुधा, तहान, अभावात्मक परिस्थिती या ‘अलक्ष्मी ‘चा नाश करण्याची विनंती लक्ष्मीला केली आहे. लक्ष्मी म्हणजे तृप्तता. बंगालमध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळाच्या वेळी असं सांगतात की, लोक खिशात पैसा असताना मेले. कारण जवळ पैसा होता, पण भूक शमवायला लागणारं धान्यच नव्हतं. संपूर्ण बंगाल-सोन्याचा बंगाल अन्नाविना भुकेनं तडफडत होता. धान्य पिकलंच नाही तर विकत मिळणार कुठून? ही ‘क्षुधा’ तृप्त करण्यासाठी लक्ष्मी हवी. ती कशी? धान्याच्या स्वरूपात.

ऋषी म्हणतात

लक्ष्मीचा पुत्र कर्दम माझ्या घरी येऊ दे. पुत्राच्या मोहानं त्याची आई (लक्ष्मी) माझ्या घरी राहिल. हा कर्दम म्हणजे चिखल. ‘श्रीसूक्त हे कृषिप्रधान अर्थ-व्यवस्थेतलं एक सुंदर काव्य आहे. धान्य पिकवण्यासाठी चिखल हवा. धान्य म्हणजे लक्ष्मीच. या लक्ष्मीसाठी पशुधन हवं. म्हणून ऋषींनी गाई, घोडे, बैल असं पशुधनही मागितलं.

जीवन समृद्ध करायचं तर घरात नोकरचाकर हवेत. त्यांचं सहकार्य हवं. कामवाली आली नाही म्हणून दिवस नुसता कामात गेला तर कंटाळा येतो. जीवनाचा आनंद घेता येत नाही म्हणूनच नुसती नोकर ठेवण्याची आर्थिक क्षमता नव्हे तर त्यांचं सहकार्य श्रीसूक्तात मागितलं आहे. धन, धान्य, पशु, दास दासी अशा सगळ्या स्वरूपातली समृद्धी मागून ऋषी थांबले नाहीत. त्यांना हेही माहीत होते की, समृद्धीचा सुखानं उपभोग घ्यायचा तर त्यासाठी उत्तम आरोग्यासहित दीर्घायुष्य हवं. तसंच मन शांत हवं.

भय, शोक, मनस्ताप, हातून घडलेलं किंवा मनात दडलेलं पाप, अपमृत्यू, आजार, कर्ज यापैकी काहीही असलं तरी समृद्धीचा आनंद भोगता येणार नाही म्हणून हे सारं नाहीसं व्हावं अशीही प्रार्थना केली आहे.

आणि हो- भौतिक सुखसमृद्धी मागतानाही आंतरिक समुद्धीचं, मनाच्या श्रीमंतीचं भान ऋषींनी सोडलं नाही. भोवती सारी सुखं हात जोडून उभी असताना समृद्धीत लोळत असतानासुद्धा काही लोक सुखी होऊच शकत नाहीत. कधीकधी त्यांचं मन क्रोधानं भडकलेलं असतं तर कधी मत्सरानं ग्रासलेलं असतं. स्वतःजवळ भरपूर असूनही इतरांकडे पाहून लोभानं अस्वस्थ झालेलं असतं. असं मन जीवनातलं सौंदर्य पाहू शकेल? म्हणूनच ऋषींनी क्रोध, मत्सर, लोभ यापासून मुक्तता मागितली.

जीवन सुखी होण्यासाठी आवश्यक म्हणून अपार समृद्धी मागत असतानाच त्याविषयीचा लोभ मनात असू नये ही मागणीच केवढी दिव्य आहे ! पैसा हवा पण पैशाची हाव नको. समृद्धीतला सगळा आनंद भोगूनही मन त्यापलीकडे जाण्यासाठी सदैव शुद्ध असावं ही कल्पनाच अस्सल भारतीय.

म्हणूनच लक्ष्मीची भव्योदात्त कल्पना करून तिचं सूक्त गाणारे ऋषी तिच्या मोहात कधीच गुंतले नाहीत आणि नागरी जीवनापासून दूर वल्कलं धारण करून झोपडीतही तृप्त, समृद्ध जीवन जगू शकले. त्यानंतर कित्येक वर्षांनी एकोणिसाव्या शतकात भगिनी निवेदितांना कंगाल आणि खेडुत भारतीयांच्या नजरेतही एक तृप्तीची मस्त चमक दिसली ती आपल्या संस्कृतीचीच देणगी नव्हती का?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..