नवीन लेखन...

श्री गुरुदेव दत्त

श्री विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख WhatsApp द्वारे लोकप्रिय झाला. 

श्री दत्तस्थान, गिरनारपर्वत इथले माझे अनुभव काही मित्रांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे लिहित आहे. तिथे जायची इच्छा असणाऱ्यांना या अनुभवांचा फायदा व्हावा हा उद्देश्य.

आम्हा पती-पत्नीच्या वाढदिवशी [२ मार्च.. हो दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी.. त्यामुळे विसरायचा काही चान्सच नाही.. असो] दोघांनी गिरनार पर्वतावर श्री दत्तस्थानी जायचे ठरवले. त्या ठिकाणी साक्षात श्री दत्तगुरूंनी १२००० वर्षे तपश्चर्या केली व आजही ते त्या स्थानी आहेत असे माझ्यासह अनेक भक्त मानतात….

श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती याची प्रचीती घेवू शकते…. आम्हाला आली…

मात्र…. तिथे यापूर्वी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आम्हाला भेटल्या त्यांनी तुम्ही एसीमध्ये वावरणारे मुंबईकर शेवटपर्यंत जावूच शकणार नाही असेच आम्हाला प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सुचवले…. प्रचंड थकल्यावर पायात गोळे आल्यावर डोलीच्या मदतीने अर्ध्या रस्त्यावरून त्यांना कसे परतावे लागले याचीही रसभरीत वर्णने आमच्यासमोर केली गेली….

यामुळे एक मात्र झाले…. काहीही करून…. अगदी काहीही करून…. श्री दत्तस्थानी जायचेच हा आमचा दोघांचाही निर्धार अगदी पक्का झाला….

माझी बायको जास्त सात्विक व भाविक आहे…. सतत उपास-तापास वगैरे करत असते…. [यावर आमच्या एका नातेवाईकाने विनाकारण केलेली कुजकट कॉमेंट…. “तुझ्याबरोबर संसार करायचा म्हणजे सतत देवपुजा व उपास-तापास करणे भागच आहे रे तिला”…. तर ते असो….]

गेली अनेकवर्षे गिरनारला जायचे मी ठरवत आहे. पण राहून जात आले. मात्र यावेळी बायकोने पाठीमागे लकडाच लावला. केवळ तिच्या प्रयत्नांमुळे व इच्छाशक्तीमुळे यावेळी श्री दत्तस्थानापर्यंत जायचा आमचा योग जुळून आला. तिथे जायचे सारे पुण्य तिचेच आहे. तिला ते मी दिले आहे. II श्री गुरुदेव दत्त II

२८ फेब्रुवारी रोजी जुनागढ येथे आम्ही उभयता पोहोचलो…. रेल्वेस्टेशन समोरच Click Hotel म्हणून सुंदर हॉटेल आहे…. [हॉटेल अतिशय स्वच्छ आणि शांत आहे. स्टाफ अतिशय सेवातत्पर आहे. शक्य असेल त्यांनी या हॉटेलमध्येच मुक्काम करावा असे मी तरी सुचवेन. हॉटेलचा संपर्क क्रमांक/व्हिजिटिंग कार्ड हवा असेल तर मला इनबॉक्समध्ये अवश्य संपर्क करा.]

बायकोने प्रवासात काढलेल्या माहितीमुळे…. १ मार्च रोजी अनपेक्षितपणे आम्हा उभयतांना सोरटी सोमनाथ येथे जायची संधी मिळाली…. तिथे शंकराच्या प्राचीन व जागृत पिंडीचे अतिशय अप्रतिम व दिव्य दर्शन आम्हाला झाले.
भर दुपारची वेळ…. सोरटी सोमनाथ मंदिरात थोडी गर्दी होतीच…. अचानक मनात आले…. ही गर्दी ओसरावी…. गाभाऱ्यात आम्ही उभयता आणि पुजारी एव्हढेच काही काळासाठी असावेत…. आणि मग शांतपणे व स्थिर मनाने महामृत्युंजय मंत्र म्हणता यावा….

आश्चर्य म्हणजे….
अकल्पितपणे गर्दी ओसरली तब्बल १५-२० मिनिटे गाभाऱ्यात आम्ही उभयता आणि पुजारी एव्हढेच होतो…. शिव शंभो….

उपस्थित पुजाऱ्याला काय वाटले कुणास ठावूक, त्यांनी पिंडीवरील साठलेली फुले, बेलपाने वगैरे काढण्यासाठी आमची मदत मागितली…. हे म्हणजे नेकी और पुछ पुछ…. संपूर्ण पिंडीला स्वत:च्या हाताने स्पर्श करायची सुवर्णसंधी…. आम्ही भाग्यवान खरे…. ते काम आम्ही अतिशय आनंदाने केले…..

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही ४ वाजता पायरीजवळ पोहोचलो. श्री दत्तगुरु व श्रीपाद श्रीवल्लभांचे नाव घेतले….
पहिल्या पायरीची पूजा केली… माथा टेकवला…. मनात म्हणालो….
तुझा भक्त म्हणून डोंगर चढून तुझ्या पायाशी येत आहे…. माझी इच्छा आता तूच पुरी करून घे रे बाबा…. तूच सांभाळ….

जंगलातून पायऱ्या चढत जातांना वाटेत जागोजागी सुंदर छोटी-छोटी मंदिरे लागतात…. सुरुवातीला सोबतच्या अनेक व्यक्ती भराभर डोंगर चढत होत्या…. तरुणवयात [म्हणजे अजूनही मी तरुणच आहे…. तर ते जावू दे..] स्पोर्ट्समध्ये पुष्कळ वेळ घालवलेला असल्यामुळे पत्नीला म्हणालो, त्यांच्याकडे लक्ष देवू नकोस…. अंतर मोठे आहे…. एक ह्रिदम, एक चाल, एक स्पीड ठेवूनच आपल्याला डोंगर चढायचा आहे. स्पीड जराही कमी किंवा जास्त करायची नाही…. थकत आहे असे वाटले किंवा घश्याला कोरड पडली असे वाटले तर थांबायचे…. पाणी प्यायचे पण ते घटा-घटा प्यायचे नाही तर घसा ओला होईल एव्हढेच पाणी छोटे छोटे घोट अथवा थेंबा-थेंबाने प्यायचे…. शरीराचा व पावलांचा भार शक्य तेवढा हातातल्या काठीवर टाकायचा…. पाउल टाकतांना काठी प्रथम मजबुतीने व ठोसपणे पुढच्या पायरीवर आपटायची…. तिचा तो आवाज आपल्याला हिम्मत देतो….

हातामध्ये काठी घ्यायचा व ती आपटत चालण्याचा अजून एक उद्देश्य म्हणजे काळोखात त्या जंगलात आपण चालत असतांना आजूबाजूला रानटी जनावरं वावरत असणार…. असतात…. होतीच…. आपल्या हातातली काठी म्हणजे त्यांच्या दृष्टीने शस्त्रच…. त्यामुळे आणि श्री दत्तगुरूंची कृपा यामुळे आम्हालाच काय पण यापूर्वी कुणालाही इजा झाल्याचे उदाहरण नाहीय…. असो….

२८ फेब्रुवारीला तो डोंगर आम्ही पायथ्याकडून खालून पाहिला होता…. उंच ठिकाणी मंदिर व त्यावर भगवा फडकतांना दिसत होतं. तो डोंगर आपण सहज पार करू याची मला खात्री होती….

मात्र शिखरावर गेल्यावर कळले की साधारण ४००० पायऱ्यांवर असलेल्या त्या डोंगरावरचे ते श्री दत्तगुरूंचे नाही तर भगवान श्री नेमिनाथांचे मंदिर [जैन] व स्थान आहे.

आणि….
तो एकच डोंगर नाही तर असे तीन डोंगर चढायचे तेव्हा कुठे श्री कमंडल कुंड आश्रम या श्री दत्तगुरुंच्या आश्रमापर्यंत पोहोचणार. [असे असूनही पहाटे आम्हाला पाठीमागे टाकून स्पीडने पुढे जाणारे अनेक महानुभाव साधारण ४००० पायऱ्यांवर असलेल्या या श्री नेमिनाथांच्या स्थानापर्यंत देखील पोहोचत नव्हत्या. जे पोहोचत होते ते पाय कुरवाळत बसले होते व तिथूनच परत फिरायचे ठरवत होते.]

“घाईची कामे कशी बिघडतात…. तसेच योग्य अभ्यास व धीर नसेल तर क्षमता असूनही एखादी व्यक्ती कशी यशस्वी होवू शकत नाही” यावर पत्नीला एक छानपैकी व्याख्यान देवून थोडावेळ तिथे थांबून व विश्रांती घेवून आम्ही श्री दत्तगुरूंच्या स्थानी जाण्यासाठी कूच केले.

त्यानंतर श्रीअंबामातेचा डोंगर लागतो. तेथील मंदिरामध्ये श्रीअंबामातेचे दर्शन घेवून पुढे निघालो. काही पावलांवरच समोरच लांबवर श्री दत्तगुरूस्थान दिसते.. अगदी उर भरून आला आमचा ते स्थान पाहिल्यावर…. सर्व श्रम विसरलो…. तिथूनच लोटांगण घातले.

अजून फारच मोठा पल्ला गाठायचा होताच. पण श्री दत्तगुरूस्थान पाहून पायामध्ये हत्तींचे बळ आले.
श्रीअंबामातेच्या डोंगर शिखरावरून श्री दत्तगुरुस्थानी जातांना वाटेत श्री गोरक्षनाथांचे गुप्त वास असलेले स्थान गोरक्षनाथ शिखर पार करावे लागते. या स्थानावरून श्री दत्तगुरूस्थान स्पष्ट दिसते. हा गोरक्षनाथ डोंगर गिरनार पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच डोंगर आहे.

मला फार आश्चर्य वाटले….
गुरूपेक्षा जास्त उंचीवर शिष्याचे स्थान कसे? याबाबत मिळालेली माहिती अशी की परमशिष्य गोरक्षनाथांनी श्री दत्तगुरूंना प्रार्थना केली की मला सतत तुमचे व तुमच्या पादुकांचे दर्शन झाले पाहिजे अशी जागा मला द्या. स्वत:चे व स्वत:च्या पादुकांचे दर्शन आपल्या या प्रिय शिष्याला व्यवस्थितरित्या व्हावे म्हणून दत्तगुरूंनी ते उपासना करत असलेल्या उंच सुळक्यापेक्षाही जास्त उंच सुळक्यावर गोरक्षनाथांना स्थान दिले.
त्यांच्या भेटीला येणाऱ्या सर्व भाविकांनी आपल्या प्रिय शिष्याचे दर्शन प्रथम घ्यावे व नंतर आपल्याकडे यावे असे नियोजन करूनच श्री दत्तगुरूंनी हे केले आहे. धन्य तो शिष्य व धन्य श्री गुरुदेव….
श्री गुरुदेव दत्त

श्री कमंडल कुंड या आश्रमाबाबत तेथील साधूंनी सांगितलेल्या माहितीनुसार सत्ययुगामध्ये या आश्रमात श्री दत्तगुरूंचा वास होता व आजही आहे. दररोज ते तिथे कोणत्या ना कोणत्या रुपामध्ये येवून जातात अशी आश्रमातील सर्व सेवकांची धारणा आहे. तिथे अन्नदानाच्या निमित्ताने जेवायला बसणारी प्रत्येक व्यक्ती ही साक्षात श्री दत्तगुरू आहेत या भावनेने तिथे जेवण वाढले जाते… तिथे “ते” येवून जातात याची प्रचीती त्यांना नेहेमी येते असे त्यांचे म्हणणे आहे….
जय श्री गुरुदेव दत्त

श्री दत्तात्रेयांची अखंड व जागृत धुनी या आश्रमात त्यावेळेपासून आजही आहे. गेली अनेक वर्षे दर सोमवारी भल्या पहाटे तिथे प्रचंड गर्दी असते. तेथील उपस्थित नाग़ासाधू मंत्रोपचार करत ब्राम्हमुहूर्तावर त्या धुनीवर पिंपळाच्या लाकडांची होळीमध्ये आपण करतो तशी रास करतात. कोणत्याही स्वरूपाच्या अग्नीने ती लाकडे प्रज्वलित केली जात नाहीत. नंतर मंत्र जप करत तिथेच समोर सर्व बसून राहतात. साधारण सकाळी सहाच्या सुमारास डोळ्याची पापणी लवते न लवते एव्हढ्यात तिथे अचानक दोन पुरुष उंच स्वयंभू अग्नी त्या धुनीमध्ये प्रज्वलित होतो. आम्ही गेलो तो गुरुवार होता. त्यामुळे यावेळी तो दैवी प्रकार पाहायचा राहून गेला. पण पुढच्या वेळी सोमवारी स्वत:च्या डोळ्याने हा दैवी प्रकार पाहायचे ठरवले आहे.

श्री कमंडल कुंड संस्थान व श्री गुरु दत्तात्रय गिरनार चॅरीटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांसह बऱ्यापैकी मैत्री व ओळख केल्यामुळे श्री कमंडल कुंड संस्थान आश्रमात पोहोचल्यावर आश्रमाच्या अधिकारी व्यक्ती श्री भंडारीबापु यांनी आमचे फार चांगले स्वागत केले. मला श्री दत्तगुरूंचे निवांत दर्शन घ्यायचे होते. ते शक्य नसल्यास निदान त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेत मुक्काम करून मंत्रजप, नामस्मरण करायचे होते.

मात्र त्यांच्या या घनदाट जंगलातील आश्रमात सर्वसामान्यांसाठी रहायची सोय नाही आहे…. स्त्रियांसाठी तर नाहीच. तरीही विश्वस्तांसह झालेल्या ओळखीचा फायदा व श्री दत्तगुरूंची कृपा व इच्छा यामुळे त्या आश्रमात आमची रहायची खास व वेगळी सोय करण्यात आली. तसेच मी सोबत नेलेल्या माझ्या काही खास वस्तू त्या धुनीच्या पायरीला लावून मला देण्यात आल्या हे माझे भाग्यच. श्री भंडारीबापूंनी त्या धुनीमधील दैवी अंगारा देखील प्रसाद म्हणून मला दिला.

आश्रमाच्या बाजूलाच थोड्या खाली अंतरावर श्री दत्तगुरूंची त्या काळची आंघोळीसाठीची जागा ही कमंडल कुंड या नावाने ओळखली जाते. तिथे पाण्याचे एक मोठे कुंड आहे. डोंगरावर एव्हढ्या उंचावर या स्थानी पाण्याची ही सोय पाहून फारच अचंबित व्हायला होते.

श्री कमंडल कुंड आश्रमात सतत अन्नदान सुरु असते. अतिशय चविष्ट व रुचकर असे जेवण तिथे पोहोचणाऱ्या सर्व भक्तांना तेथील सेवक मनोभावे वाढतात. अगदी आग्रह करून सर्वांना हे भोजन दिले जाते. डोंगरावर पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे फक्त पाण्याची नासाडी होवू नये याबाबत सर्व सेवक सतर्क असतात.

श्री कमंडल कुंड आश्रमासमोरच एका सरळसोट सुळक्यावर केवळ १० X १० फुट एव्हढ्या चिंचोळ्या जागेत श्री दत्तगुरूंनी तब्बल १२००० वर्षे तपस्चर्या केलेली आहे. ते स्थान लांबून पाहूनच मला भरून आले…. साधारण १५०० पायऱ्या चढल्यावर साक्षात श्री दत्तगुरूंचे ते स्थान येते.

कधी एकदा तिथे जावू असे आम्हाला झाले होते. पण का कोण जाणे वा कदाचित श्री दत्तगुरुंच्या प्रेरणेमुळे असेल श्री कमंडल कुंड आश्रमातील मुख्य पुजारी व अधिकारी श्री. भंडारीबापू यांनी आत्ता लगेच नाही तर संध्याकाळी ४ वाजता आम्ही उभयतांनी श्री दत्तगुरूंच्या स्थानी जावे असे सुचवले. तोपर्यंत श्री दत्तगुरूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आश्रमात राहून आम्ही नामजप व मंत्रजप करत राहिलो.

माझ्या काही अध्यात्मिक वस्तू मी अशावेळी सोबत बाळगतो. त्या मी तिथेही नेल्या होत्या. मला सांगितले गेले होते की श्री दत्तगुरूंच्या सगुण पादुकांसमोर फक्त दोन सेकंद कसेबसे उभे राहायला तुम्हाला मिळते. जागा छोटी असल्यामुळे नामस्मरण, मंत्रोच्चार, लोटांगण काहीही करायला मिळणार नाही. क्षणभर होणारे दर्शन घ्यायचे नजरेत साठवायचे व लगेच निघायचे. बंदुकधारी सिक्युरिटी उभाच असतो तिथे….

तिथली सर्व पूजा अर्चा करणारे पुरोहित श्री. योगेशजी हे महाराष्ट्रीयन आहेत ही माहिती सुदैवाने मला मिळाली होती. [ही माहिती सहज मिळत नाही… ती काढावी लागते व ती मी काढतो नेहेमी…. हे मी कसे करतो ते सांगायचे हे ठिकाण नाही. असो] संध्याकाळी ५ च्या दरम्यान आम्ही १०००० पैकी शेवटच्या १५०० पायऱ्या पार करून श्री दत्तगुरूंच्या प्रत्यक्ष स्थानापर्यंत पोहोचलो…. अंगावर रोमांच उभे राहिले होते…. प्रत्यक्ष गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता. दरवाजा अडवून बाहेर सिक्युरिटी उभा होता.

आत सायंकालीन पूजा अर्चा सुरु झाली होती. धीर गंभीर आवाजात पुजाऱ्याने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली….
श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पल लक्ष्मीनरसिंह राजा
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव
गेली अनेक वर्षे [न मोजता] मी म्हणत आलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे हे श्री सिद्धमंगल स्तोत्र आहे. [पिठापूरहून मुंबईमध्ये आणून हे स्तोत्र अनेक भाविकांना मी आजपर्यंत देत आलो आहे…. देत आहे…. [ज्यांना हवे असेल त्यांनी अवश्य संपर्क करा] खणखणीत आवाजात पुजाऱ्यासह ते स्तोत्र बाहेरून म्हणायला आम्ही सुरुवात केली.

या संपूर्ण तीर्थयात्रेदरम्यान मला आलेले सर्व अनुभव व सर्व साक्षात्कार मी कुणालाच सांगणार नाही. परंतु हा एक अनुभव मात्र सांगणार आहे. त्यामधून कुणी भाविकाने योग्य प्रेरणा घावी ही माझी मन:पूर्वक इच्छा आहे.

गर्दीच्या ठिकाणी मंदिरांमध्ये जायचे मी या गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे टाळत आलोय. कोणताही सण असतांना मी कोणत्याही देवस्थानी जात नाही. एखाद्या जागृत देवस्थानी गेलोच तर इच्छा व्यक्त करतो की मला तुझे निवांत व शांत दर्शन हवे आहे. शांत बसून मला मंत्रोच्चार व नामस्मरण करायचे असते. मात्र अतिशय चिंचोळ्या जागेमुळे इथे काही क्षणच राहायला मिळणार हे माहित होते.. मनाची तयारी केली होती तरी साकडे घातले “गुरुदेव दत्ता निवांत दर्शन दे रे राया”..

गाभाऱ्यातील पूजा झाली. दरवाजा भाविकांसाठी उघडण्यात आला. सर्वात पुढे आम्ही दोघे उभयता होतो. आपल्यासह श्री सिद्धमंगल स्तोत्र खणखणीत आवाजात म्हणणारी हे स्त्री-पुरुष कोण ते पहायला पुजारी श्री योगेशजी देखील उत्सुक होते….
[तिथे मराठीभाषिक कुणी नव्हते. शिवाय श्री सिद्धमंगल स्तोत्र ज्यांना म्हणायला येत होते असे आम्ही दोघे उभयताच होतो….] त्या महाराष्ट्रीयन तरुण पुजाऱ्यांनी अतिशय आत्मीयतेने आम्हाला थांबवले.
सिक्युरिटीवाला पुढे आला तसे पुजारी श्री योगेशजींनी त्याला सांगितले या दोघांना राहू दे… बाकीच्यांना पुढे सरकव…

मी सगुण पादुकांसमोर लोटांगणच घातले…. माझा मंत्रजप व नामस्मरण सुरु झाले….
श्री गुरुदेव दत्त….
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये….
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा….

काय त्या सगुण पादुका…. काय ती तिथे असलेली श्री दत्तगुरूंची दिव्य मूर्ती….डोळ्यातून घळाघळा अश्रू…. [आताही हे लिहित असतांना येताहेत….] गहिवरून आले…

पुजारी श्री योगेशजी एका साधूला सांगत होते…. दत्तगुरूंनी येथे १२००० वर्षे तपश्चर्या केली आहे…. आजही ते इथे आहेत…. फक्त तुम्हाला बघता आले पाहिजे…. त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती घेता आली पाहिजे….

धन्य धन्य…. आम्हाला आणखी काय प्रचीती हवी….

वेळ मिळत आहे असे लक्षात आल्यावर लगेच मी सोबत नेलेली श्रीपाद वल्लभांची माझ्यासोबत सदैव असणारी प्रतिमा, सिद्धमंगल स्तोत्र व पिठापूर येथून आणलेले व सोबत नेलेले अष्टगंध सहज म्हणून बॅगेतून काढून त्या दिव्य मूर्तीसमोर धरले….

पुजारी श्री योगेशजींनी आश्चर्याने ते पाहिले. माझ्या हातातून अतिशय भक्तिभावाने त्यांनी ते सर्व घेतले व मूर्तीवर व पादुकांवर ठेवले…. मला हर्षवायू व्हायचीच वेळ आली…. आम्ही दिलेले अष्टगंध पाउचमधून काढून भक्तिभावाने मूर्तीला लावून व पादुकांवर वाहून पुजाऱ्याने मंत्रोच्चार सुरु केला. देवा….. दत्तगुरू राया…. हे तर मी मागितले देखील नव्हते….

[हे सर्व कार्य पुजारी श्री योगेशजी यांच्याकडून का केले गेले हे पुढे येणार आहे….]

१०००० पायऱ्या चढून दिव्य पादुकांच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात येणारी गर्दी काही क्षण थांबून लगेच गाभाऱ्याबाहेर जात होती. वेळेच्या बाबतीमध्ये आम्हाला मात्र आता लॉटरीच लागली होती. मात्र तरीही काही क्षणात.. थोड्याच वेळात आम्हालाही येथून निघून जावे लागेल या विचाराने आम्ही उभयता जमेल तसे त्या सुंदर व दिव्य मूर्तीचे तेज व सगुण पादुका आमच्या डोळ्यात साठवून घेत होतो.

इथे काही भाविकांसाठी ही बाब सांगितलीच पाहिजे की सत्ययुगामध्ये अनुसूयेच्या दैवीशक्तीमुळे श्री दत्तगुरूंचे अस्तित्व निर्माण झाल्यावर कलीयुगामध्ये ई. स. १३२० मध्ये आंध्रप्रदेशातील पिठापूर या स्थानी त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्म घेतला. नंतर नृसिंह सरस्वती, समर्थ स्वामी यारुपाने ते जगात वावरले…. आपण श्री दत्तात्रेयांचा जो मंत्र नेहेमी म्हणतो…. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”…. यातील श्रीपाद वल्लभ म्हणजेच कलियुगातील दत्तदिगंबर होत….. [अनेकांना ही बाब माहित नाहीय हे लक्षात आल्यामुळे हे स्पष्टीकरण द्यावे लागते…. असो]

श्री कमंडल कुंड आश्रमातून वर श्री दत्तगुरुस्थानी जातांना भंडारीबापू यांनी अतिशय आत्मीयतेने सांगितले होते की आश्रमातील अतिशय जागृत अशा श्री दत्तधुनीसमोर संध्याकाळी ७ वाजता आरती होते. ती तुम्ही घ्यायची. मला त्याची आठवण झाली.

एव्हढ्यात पुजारी श्री योगेशजी यांनी विचारले की, “आरती कुठची घेणार तुम्ही? इथली की श्री कमंडल कुंड आश्रमातली”? नंतर ते स्वत: लगेच म्हणाले, “श्री कमंडल कुंड आश्रमातली आरती तुम्हाला उद्या सकाळी देखील मिळेल. आज इथलीच घ्या. सात वाजता होते आरती…. तोपर्यंत मूर्ती/पादुकांसमोर आवरून बसून घ्या”….

मी घड्याळात पाहिले साधारण ६ वाजत होते. म्हणजे तास ते किमान २ तास आम्हाला इथे राहायला मिळणार…. हर्षवायूचा पुढचा शब्द मराठीमध्ये कुठला वापरायचे तेच मला माहित नाहीय…. दत्ता दिगंबरा…. सद्गुरुराया…. पावलास रे बाबा असे म्हणत त्यांचे रूप डोळ्यात साठवत आम्ही तिथे बसून राहिलो….

खरं सांगतो…. मनापासून सांगतो…. “आज फिर जीनेकी तमन्ना है…. और आजही मरनेका इरादा है….. ही अवस्था म्हणजे काय हे मी त्यावेळी अनुभवले.

पुजारी श्री योगेशजी मूर्तीसमोर ध्यानधारणा करत होते…. भाविक येवून आमच्याकडे पहात तिथून निघून जात होते…. त्यांना अंगारा व प्रसाद द्यायला योगेशजींनी आम्हाला सुचवले. ते काम मग आम्ही पति-पत्नी करत राहिलो…..

साधारण पावणेसात वाजता सिक्युरिटीने गाभार्यामध्ये आत येणार्या भाविकांना थांबवुन आतील सर्वांना बाहेर काढायला सुरुवात केली.

आम्ही काय करायचे? हा विचार करत असतांना ध्यानधारणेतुन डोळे उघडून पुजारी श्री योगेशजी त्याला गुजरातीमध्ये म्हणाले. “यांना थांबू दे” त्यावेळचे त्या सिक्युरिटीच्या चेहेऱ्यावर आलेले भाव मला आज.. आत्ताही आठवत आहे….

परतीच्या मार्गावर २ मिनिटे त्या सिक्युरिटीसोबत बोलायची संधी मिळाली तेव्हा तो म्हणाला की सायंकाळच्या आरतीच्या वेळी गाभाऱ्यातून सर्वांना बाहेर काढले जाते. पुजाऱ्या व्यतिरिक्त कुणीही आत असलेला मी आजपर्यंत पाहिला नाहीय. तुम्ही दोघं पहिलेच…..

आमच्यावर आमचा देव…. दैव…. आणि पुजारी श्री योगेशजी एव्हढे मेहेरबान व्हायचे कारण काय? आम्हालाही कळेना….

आपल्याला मागितलेले तर मिळालेय…. शिवाय न मागताही भरपूर मिळत आहे ते आपली झोळी भरेपर्यंत घेत राहायचे….
गाभाऱ्यामध्ये आमच्या दोघांच्या साक्षीने आमच्या सदगुरुरायाची अप्रतिम अशी आरती केली गेली. डोळ्यातून आनंदाने निघणारे पाणी वाहू देत आम्ही तो दैवी प्रकार पाहिला.

आरती संपल्यावर दरवाजा उघडला व परत दर्शन सुरु झाले. तेव्हा श्री कमंडल कुंड आश्रमामध्ये जावून शक्य झाल्यास तिथली आरती घेण्यासाठी व त्यासाठी आज्ञा घेण्यासाठी आम्ही पुजारी श्री योगेशजी यांच्याकडे पाहिले….

ते म्हणाले “थांबा…. एकत्रच जावू…. काळजी करू नका…. तुम्ही थांबत आहात ना…. उद्या पहाटे ६ वाजता श्री कमंडल कुंड आश्रमातली आरती देखील तुम्हाला मिळेल पण आता एकत्रच जावू”….
[ती आरती आम्हाला दुसऱ्या दिवशी मिळाली]

१०००० पायऱ्या चढून आल्यावर जिथे दोन क्षणांचे दर्शन झाल्यावर कट्टर भाविकांना ते स्थान नजरेत साठवून सोडावेच लागते तिथे ३ तास थांबल्यानंतर देखील आम्हाला “थांबा…. जावू नका”…. अशी आज्ञा होत होती…. यापेक्षा मोठे भाग्य कोणा भाविकांचे असू शकते का??? असूच शकत नाही….

मात्र आमच्यावर आमचा देव…. दैव…. आणि पुजारी श्री योगेशजी एव्हढे मेहेरबान व्हायचे कारण काय? हे कोडे मात्र मला सुटता सुटेना….

त्याचे उत्तर मला थोड्यावेळाने मिळाले….

संध्याकाळी ९ वाजता श्री दत्तगुरूंचे ते मंदिर बंद करून पुजारी श्री योगेशजी, मी, पत्नी व सिक्युरिटी एकत्र परत निघालो तेव्हा या सर्वच उलगडा आम्हाला झाला….

तत्पूर्वी एक बाब सांगतो….
आंध्रप्रदेशातील पिठापूर या श्रीपादांच्या जन्मस्थानी दररोज सकाळी ९ वाजता अतिशय शास्त्रोक्त असा रुद्राभिषेक केला जातो. या विधीच्या वेळी श्रीपादांच्या सगुण पादुकांवर अष्टगंधाचे लेपण केले जाते. हे अष्टगंध नंतर भाविकांना देण्यात येते. शिवाय पिठापूरला वेळोवेळी तुम्ही काही धार्मिक विधी करता तेव्हा तिथल्या संस्थेद्वारे प्रसादासह ते अष्टगंध [पाउच] तुम्हाला घरपोच पाठवले जाते. तिथे जावून आणलेले व वेळोवेळी पोष्टाने मला आलेले प्रसाद व अष्टगंधाचे पाउच माझ्याकडे येणाऱ्या भाविकांना मी भक्तांची सेवा या भावनेने नेहेमी देत आलोय. तसेच सिद्धमंगल स्तोत्र व श्रीपादांचे चरित्रामृत देखील इच्छा व्यक्त करणाऱ्या अनेक भाविकांना मी देतो….

फेसबुकवरील अनेकानेक मित्र-मैत्रिणींनी माझ्याकडून या दैवी गोष्टी नेलेल्या आहेत.

अर्थात हे मी मनोभावे करतो ते माझ्या समाधानासाठी करतो. श्री दत्तगुरूंनी आजपर्यंत मला जे काही दिले आहे व देत आहे व देणार आहेत त्याबद्धल कृतज्ञता बुद्धीने व भक्तिभावाने त्यांच्या भक्तांची सेवा म्हणून हे मी निरपेक्षवृत्तीने करत आलो आहे…. करत रहाणार आहे….

आता तुम्ही म्हणाल…. या सर्वाचा तुमच्या या गिरनारयात्रेशी काय संबंध? तर आहे….

कसा आहे ते पहा….

माझ्यासोबत सदैव सिद्धमंगल स्तोत्र व अष्टगंधाचे पाउच असतात. यावेळी या तीर्थस्थानी निघतांना बॅग भरतांना इतर कुणा इच्छुक भाविकांना देण्यासाठी मी तसे ते सोबत घेतले होते. प्रवासात ते कुणाला देण्याचा योग आला नाही. मात्र वर लिहिल्याप्रमाणे श्री दत्तगुरूंच्या स्थानी जास्त वेळ थांबायला मिळाल्यावर अचानक इच्छा झाली व बॅगेतून श्रीपाद वल्लभांची माझ्यासोबत सदैव असणारी प्रतिमा, सिद्धमंगल स्तोत्र व पिठापूर येथून आणलेले व सोबत नेलेले अष्टगंध सहज म्हणून बाहेर काढून दिव्य मूर्तीची नजर त्याच्यावर पडावी म्हणून समोर मी ते धरले….

पुजारी श्री योगेशजींनी ते पाहिले. माझ्या हातातून भक्तिभावाने त्यांनी ते सर्व त्वरित घेतले व श्री दत्तगुरूंच्या मूर्तीवर व सगुण पादुकांवर ते सर्व ठेवले…..

श्री दत्तस्थानाहून निघतांना….. वाटेत याचे कारण त्यांनी सांगितले ते असे….

दोन दिवसांपूर्वी एका पुरुष व्यक्तीने त्यांना श्रीपादांचे चरित्रामृत आणून दिले होते…. त्याचे पारायण करायचा दृष्टांत त्यांना झाला. त्याप्रमाणे १ मार्चपासून पारायण त्यांनी सुरु केले. १ मार्चला एका महिलेने त्यांना गाणगापूरचे पवित्रजल त्यांना आणून दिले…. पारायणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २ मार्च रोजी आज आता कोणाला काय घेवून पाठवले जाणार? असा विचार ते मनात करत असतांना….

एक जोडपे/पती-पत्नी येतात काय…. गाभाऱ्यात सायंकालीन पूजा सुरु असतांना बाहेरून सिद्धमंगल स्तोत्र म्हणतात काय…. त्यांना गाभाऱ्यात घेतल्यावर श्रीपादांची प्रतिमा, सिद्धमंगल स्तोत्राची प्रत आणि मुख्यत्वे अष्टगंध काढून मूर्ती/पादुकांसमोर धरतात काय…. ते स्वत: अवाक झाले होते….

ते म्हणाले…. ‘कोण कोणत्या रुपात इथे येईल काही सांगू शकत नाही’…..

यावर आम्ही दोघंही त्यांना म्हणालो नाही हो दादा…. आम्ही फार म्हणजे फार सामान्य माणसे आहोत….

त्यावर त्यांचे म्हणणे होते…. “चरित्रामृत देणारा तो पुरुष, पवित्रजल आणून देणारी ती स्त्री आणि श्रीपादांच्या सगुण पादुकांवर लेपण केलेले अष्टगंध घेवून येणारे तुम्ही पती-पत्नी या सर्व व्यक्ती मनुष्य योनीतील जरी असल्या तरी ती सामान्य माणसे नाहीत.
त्या अशा व्यक्ती आहेत ज्यांचे नियोजन साक्षात श्रीपाद व दत्तगुरूंनी हे दैवी कार्य करण्यासाठी केले आहे. मग त्यांना सामान्य कसे समजायचे….
आमच्या देवाने निवडलेल्या व्यक्ती तुम्ही…. तुमचा पाहुणचार नको का करायला?
[खरोखर आमचा सुंदर असा पाहुणचार तिथे केला गेला…. श्री गुरुदेव दत्त ]

योगेशजी म्हणाले…. “साक्षात श्रीपाद व दत्तगुरूंनी दोघांनीही एका फार मोठ्या पवित्र कामासाठी म्हणजेच श्रीपादांचे अष्टगंध श्री दत्तगुरूंच्या स्थानी पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून तुम्हा दोघा पती-पत्नीला निवडले राव…. आता बोला”….
काय बोलणार????????? माझी बोलतीच बंद झाली….

तात्पर्य: माझी श्रीपादांवर प्रचंड श्रद्ध्दा आहे. प्रचंड म्हणजे महाप्रचंड…. त्यापुढे कोणतीही गोष्ट मला कधीही मोठी वाटत नाही. या प्रचंड श्रद्धेपोटीच त्यांच्या भक्तांची सेवा म्हणून पिठापूर इथून श्रीपादांचे चरित्रामृत, सिद्धमंगल स्तोत्र व श्रीपादांच्या चरणपादुकांवरचे अष्टगंध आणून भाविकांना देतो….
एका जवळच्या फार मोठ्या नातेवाईकाने हल्लीच एकदा मला विचारले होते….
हे सर्व करून तुला काय मिळते?????????????????????????
यातून काय मिळते???
आम्हाला कल्पना नसतांनाही काय मिळाले??
माझ्या भाविक मित्र-मैत्रिणींना ते नक्की कळले असेल….
श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

— श्री विनायक कुलकर्णी 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

2 Comments on श्री गुरुदेव दत्त

  1. नमस्कार,
    विनायक कुलकर्णी यांचा संपर्क नंबर किंवा ई-मेल मिळू शकेल का
    शेखर जोशी
    9821267244

  2. Dear Sir
    Namaskar
    Your experience is goosebumping giving spiritual ectasy.
    Please share more of your experiences of Lord Dattatreya and Siddha Mangal Stotram. I will blessed.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..