नवीन लेखन...

श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग १

भगवान जगदगुरु आदि शंकराचार्यांचे स्तोत्र वाङमय म्हणजे  परमानंदाचा शब्दावतार. यापैकी एकेका श्लोकाचा दररोज रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करुया, विद्यावाचस्पति प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या श्री शांकर स्तोत्ररसावली या आध्यात्मिक सदरातून…..


मुदा करात्तमोदकंसदा विमुक्तिसाधकं !
कलाधरावतंसकंविलासिलोकरञ्जकम् !!
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं !
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् !!१!!

भगवान श्री गणेशांच्या दिव्य वैभवाचे आनंदगायन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दकळा साकारतात,

मुदा करात्तमोदक- मुदा अर्थात आनंदाने. ज्यांनी आनंदाने हाती मोदक धारण केला आहे असे. आतून, आपला आपल्याला होणारा आनंद म्हणजे मोद. भगवान स्वत: त्या आनंदाने युक्त आहेत आणि भक्तांच्या जीवनात तो आनंद देण्यासाठी त्यांनी हातात मोदक घेतला आहे. मोद म्हणजे आनंद , तो निर्माण करतो तो मोद-क.
सदाविमुक्तिसाधक- हा आनंद प्राप्त होणे हेच मुक्‍तीचे स्वरूप. साधकांना सदैव मुक्ती प्रदान करणारा आहे माझा मोरया.

कलाधरावतंसक – कलाधर म्हणजे चंद्र. त्याच्या विविध कला असतात. ती चंद्रकला मस्तकावर धारण करून सौंदर्यपूर्ण असणारे ते कलाधरावतंसक.

विलासिलोकरञ्जक- स्वर्गाला विलास लोक असे म्हणतात. तेथे देवता तथा स्वर्गीय जीव विविध आनंदांचा चा उपयोग घेत विलास करीत असतात. त्या सगळ्यांना आनंद प्रदान करणारे मोरया विलासिलोकरञ्जक संबोधिले जातात.

अनायक-एकनायक- त्यांच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही म्हणून त्यांना म्हणतात अनायक. तसेच ते एकटेच सगळ्या विश्वाचे नायक असल्याने त्यांना म्हणतात एकनायक .

विनाशितेभदैत्यक- इभ म्हणजे हत्ती. हा सर्वाधिक बलशाली जीव. तसे जे भयंकर दैत्य ते इभदैत्य.

श्री मुदगल पुराणात आपल्याच आत असणाऱ्या काम, क्रोधादिक षट् विकारांना आणि ममत्व तथा अहंकार यांना राक्षस रूपात वर्णिले आहे. यासर्व महाभयानक राक्षसांचा विनाश करणारे श्री गणेश विनाशितेभदैत्यक असतात.

नताशुभाशुनाशक- नत अर्थात शरण आलेल्यांचे अशुभ अर्थात दुःख, दैन्य, दारिद्र्य, पीडा, व्यथा इ. आशु म्हणजे तत्काल नष्ट करणारे भगवान गणेश भक्तांसाठी नताशुभाशुनाशक आहेत असे भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत.

भगवान श्री गणेशांच्या याच स्वरूपाने आनंदित होऊन ते म्हणतात- नमामि तं विनायकम् !

भगवान गणेशांवर कोणाचीही नायकत्व चालत नाही त्यामुळे त्यांना वि-नायक म्हणतात. तसेच ते एकटेच सगळ्यांचे विशेष नायक असल्यानेही त्यांना वि-नायक म्हणतात.

अशा विनायक भगवान गणेशांना मी वंदन करतो.!! १!!

— प्रा. स्वानंद गजानन पुंड 

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

2 Comments on श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग १

  1. आदरणीय श्री. पुंड सर, शि.सा.न.
    मला आपण लिहिलेला श्रीगणेश पंचरत्न स्तोत्राचा अर्थ (भाग १) खूप आवडला. संपूर्ण स्तोत्राचा अर्थ मिळू शकेल का?

    त्यासाठी काय करावे लागेल? तसेच आपल्या इतर लिखाणाची माहिती कुठे मिळेल?

    • त्यांचे अनेक लेख आपल्याला या वेबपोर्टलवर वाचायला मिळतील. त्यांची इ-पुस्तकेसुद्धा http://www.marathibooks.com या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..