नवीन लेखन...

शिवकाल भूषण

भोसलेकुलोत्पन्न प्रथम पूजनीय प्रातःस्मरणीय युगपुरुष, शककर्त्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सार्थ, यथार्थ वर्णन समकालीन व्यक्तींपासून ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यात आधुनिक युगात बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव त्या मांदियाळीत अवश्यमेव घ्यावेच लागेल. बाबासाहेब नेहमीच सांगत आलेत, ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.’ काय खोटं आहे यात? शिवछत्रपतींना जर स्वातंत्र्याचा, स्वराज्य स्थापनेचा उत्कट, उत्तुंग ध्यास लागला नसता तर आज आपण कुठे असतो हा विचार ही करवत नाही.

मातोश्री जिजाऊसाहेबांच्या उदरात असतानाच रामायण, महाभारतातील कथा त्यांनी ऐकल्या. पिता सरलष्कर महाराजसाहेब शहाजीराजेंच्या मनात वसलेली अन् वारंवार उफाळून येणारी स्वतःचे राज्य स्थापण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, जिजाऊसाहेबांच्या उरात सातत्याने तेवत असलेली मायभूमी, मावळभूमी स्वतंत्र करण्याची धगधगती ज्योत ही शिवरायांनी अभिमन्यूप्रमाणे गर्भात असतानाच हृदयात भिनवली होती आणि त्याचेच मूर्तस्वरूप अखेरीस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या सुमुहूर्तावर रायगडावर झालेल्या शिवराजाभिषेकाद्वारे पूर्णत्वास आली असे निश्चितच सांगता येईल.

इसवी सन १६३० ते १६८० डवला तो खरोखरीच देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अतुलनीय, अजोड आहे. रामायण, महाभारता एव्हढेच कदाचित कांकणभर सरस असे हे शिवभारत याच कालखंडात घडले. एक अत्युच्च पराक्रमाची यशोगाथा या तेजस्वी युगात निर्माण झाली, म्हणूनच आज्ञापत्रकार रामचंद्रपंत अमात्य लिहून ठेवतात – ‘शिवरायांनी तो नूतन सृष्टीच निर्माण केली.’ जगनिर्मात्या ब्रह्मदेवानंतर हा मान फक्त आणि फक्त शिवछत्रपतींना प्राप्त झालाय हे आपण समजून घेणे फार फार महत्त्वाचे आहे.

अशा या दिगंतपराक्रमी, शककर्त्या शिवरायांचे वर्णन त्यांच्या समकालीन असलेल्या संस्कृत पंडित, बहुभाषाकोविद जयराम पिंड्ये, कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर, उत्तरेकडील महाकवी भूषण, स्वराज्यात आलेले अनेक परदेशी प्रवासी, वकील, समर्थ रामदास स्वामी, कृष्णाजी अनंत हिरेपारखी उर्फ सभासद, संकर्षण सकळकळे इत्यादी अनेकांनी केलेले आहेच. ‘शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे, कैसे असे….’ रामदास स्वामी, ‘साजि चतुरंग वीर रंग में तुरंग चढी सरजा सिवाजी जंग जीतन चलत है….’ हे प्रचंड आत्मविश्वासाने लिहिणारा कवी भूषण, असे गौरवोद्गार या अनेक दिग्गजांनी महाराजांविषयी नमूद करून ठेवलेले आहेत. या सगळ्यांनी आणि पुढेही अनेक विद्वान पंडित लेखकांनी शिवरायांबद्दल अनेक पैलूंनी लिखाण केलेले आहे. आणि आजच्या, ७०-७५ वर्षांपासूनच्या आधुनिक युगात हे महत्तम कार्य त्याच दिग्गजांचा वारसा श्रेष्ठत्वाने पुढे नेण्यासाठीच नव्हे तर घराघरात, मनामनात, नसानसांत बिंबवण्याचे काम बाबासाहेबांनी आपल्या अमोघ लेखणीने केलेले आहे. बाबासाहेबांच्या आधीही अनेकांनी शिवचरित्र लिहिले आहे, त्यातील घटना, प्रसंग, व्यक्तीरेखा मांडल्या आहेत. परंतु शिवचरित्राशी सर्वसामान्य माणसाला जोडले, समरस केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आदराने बघायला, बोलायला शिकवले ते मात्र बाबासाहेबांनीच. ओघवत्या, रसाळ शैलीत परंतु कुठेही इतिहासाला बाधा न येऊ देणारी शिवचरित्राची मांडणी, लेखन त्यांनी केले आणि लोकांनी ते मनापासून आपले मानले. ४०० वर्षांपूर्वीचा तो तेजःपुंज शिवकाळ तुमच्या आमच्या समोर त्याच ताकदीने उभा करण्याचे हे शिवधनुष्य बाबासाहेबांनी सहजतेने पेललेले आपल्याला दिसत असले तरी त्यांनी यासाठी घेतलेले अपरिमित परिश्रम हे आपण फक्त समजून घेतले तरी पुरेसे आहे.

बाबासाहेबांनी त्यांच्या आजवरच्या अवघ्या शंभर वर्षांच्या दमदार वाटचालीत श्वास कमी घेतलेत आणि या लोकमानसात घट्टपणे रूजून बसलेल्या, खरोखरीच्या जाणता राजा असलेल्या शिवरायांचे नाव त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेळा घेतले आहे हे नक्कीच. बाबासाहेबांचे व्याख्यान अनुभवताना ऐकताना श्रोत्यांना जाणवते की, अरे नक्कीच या माणसाला गतकाळात प्रवास करण्याची, परकायाप्रवेशाची कला अवगत असावी. कारण आदरणीय बाबासाहेब शिवचरित्र आपल्यासमोर मांडत नसतात, उभे करत नसतात तर थेट आपल्यालाच ३५०-४०० वर्षे मागे, होऊन गेलेल्या काळात सोबत घेऊन जातात. जो प्रसंग ते समरसतेने कथन करतात त्या त्या व्यक्तिरेखेच्या जणूकाही शरीरात प्रवेश करून, चुकलोच, खरेतर ती ती शिवकाळातील भाग्यवान माणसे बाबासाहेबांच्या शरीरात प्रवेश करून तो ज्वलंत इतिहास आपल्या नजरेपुढे तंतोतंत उभा करतात, सांगतात असेच आपल्याला वाटते.

कारण बाबासाहेबांच्या विलक्षण शब्दफेकीतून कधी तान्हाजीराव मालुसरे, कधी बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, कान्होजी नाईक, जेधे, देशमुख, कोंडाजी फर्जंद तर कधी प्रतापराव गुजर, सूर्याजी काकडे, नेताजी पालकर आपल्या डोळ्यांना दिसू लागतात. बाबासाहेबांच्या हातांच्या हालचालींतून कधी साल्हेर, वणी-दिंडोरी जवळील रण दिसू लागते, तर कधी जिवाच्या कराराने शिवरायांना सुरक्षितपणे पन्हाळगडाहून विशाळगडाकडे पालखीतून नेणारी, कातळकाळ्या अंधार्या रात्रीची, भयगर्जना करीत अवनीवर ओसंडणार्या प्रलयंकारी पावसाची किंवा निसरड्या, दगडधोंड्यांच्या वाटेने २१ तास अविरत वाटचाल करणारी बांदलसेना आणि ते वीर व त्यांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे ‘तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला’ या कानी पडणार्या शब्दांसह दिसतात, शिवरायांवरील आत्यंतिक निष्ठेपायी साक्षात मृत्यूला बेडरपणे हसत हसत मिठी मारणारा शिवा काशिद आणि ती सिद्दी जौहरची छावणी दिसू लागते किंवा थोडक्याच मर्द मावळ्यांनिशी शिंगे, कर्णे फुंकीत पन्हाळा काबीज करणारा कोंडाजी फर्जंद हेही आपल्याला दर्शन देऊन जातात.

फक्त आपण बाबासाहेबांना शिवचरित्रावर बोलताना एकरूपपणे, प्राण डोळ्यात आणून ऐकायला हवे, बघायला हवे…. अहो, भाग्य लागतं यालाही. कारण अशावेळी बाबासाहेब तर आधीच शिवकाळात जाऊन थडकलेले असतात, आपल्या पूर्वाश्रमीच्या सवंगड्यांशी राहिलेले हितगुज करायला आणि शिवरायांच्या आठवणीत रमायला. अशावेळी माझे तरी मन सांगते, होय, बाबासाहेबांचा निर्विवाद हक्कच आहे तो. काळाची पावलेच बाबासाहेब जणू उलटी टाकायला भाग पाडतात, घड्याळाचे काटेच मागे फिरवण्याइतकी ताकद, वजन त्यांच्या शब्दांत अन् लेखणीत आहे आणि अर्थातच शिवचरित्रात आहे.

बाबासाहेबांना नकला करायला खूप आवडते असे तेच वेळोवेळी सांगतात. पण अर्थोअर्थी बघायला गेलो तर ती नक्कल नसते तर त्या त्या व्यक्तिरेखेचं अस्सल रूपच आपल्याला नजरेसमोर दिसत असतं. शाहिस्ताखान लालमहालाजवळील त्याच्या शाही तंबूत झोपलेला असताना अकल्पितपणे शिवराय आणि त्यांचे सवंगडी विलक्षण गुप्ततेने डेर्यात शिरून त्याची बोटे तोडतात हा प्रसंग असो, किंवा आग्रा दरबारात खुद्द आलमगीर शहेनशहा औरंगजेबाला निर्भीडपणे ताठ मानेने सुनावलेले खडे, राकट, तेजस्वी बोल असोत, कधी पट्टराणी सईबाईसाहेबांशी हितगुज करतानाचा महाराजांचा स्वर असो किंवा मातोश्री जिजाऊसाहेबांशी मुलगा म्हणून बोलताना शिवबाचा संवाद असो, कान्होजींना अफजलखान स्वारीच्या वेळी वतनावर पाणी सोडण्यासाठी केलेली विनंतीवजा मागणी असो किंवा संस्कृत प्रकांडपंडित वेदमूर्ती गागाभट्टांशी आदराने बोलताना शिवरायांचा नम्रपणा असो, बाबासाहेब विलक्षण हातोटीने हे सगळे आपल्या आवाजाने असे काही मांडतात की असे वाटते, हे शब्द किंवा हा संवाद त्याकाळात असाच घडला असावा की काय? मात्र हे सारेच आपल्यापुढे मांडण्याआधी, लिहिण्याआधी बाबासाहेबांनी हजारो अस्सल कागदपत्रे, फरमानं, शकावल्या, करीना, बखरी, रुमाल किती वेळा वाचले असतील, त्यातील विविध सनावळ्यांची, प्रसंगाची संगतवार मांडणी कशी केली असेल हे नुसते मनात जरी आले तरी वाटतं की अलबत, बाबासाहेबांना सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी सदोदित भरून पावलेला आहे.
इतिहासाशी, सत्याशी, वास्तवाशी कोणतीही प्रतारणा न करता शिवकाळात घडलेला प्रसंग बाबासाहेब ज्या हातोटीने उभा करतात त्याला खरंच तोड नाही. शिवरायांचे हस्ताक्षर सापडत नाही म्हणून त्यांच्या विद्वत्तेवर शंका घेणार्यांना शालजोडीतून हाणताना मिश्किलपणे बाबासाहेब हळूच हेदेखील म्हणतात बरं, ‘जर हाच न्याय लावायचा झाला तर औरंगजेबाची विजारही सापडत नाहीये की,’ आता बोला. पण बाबासाहेबांनी इतिहास मांडताना, शिवचरित्र लिहिताना इतिहासाशी नकळतही प्रतारणा केलीय असे कधीही म्हणताच येत नाही. बाबासाहेब जन्मशताब्दी वर्षात प्रवेश केल्यानंतरही अतिशय विनम्रपणे म्हणतात, ‘मला अजून शंभर वर्षांचे आयुष्य मिळाले तर मी कदाचित शिवछत्रपतींना अजून जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेन.’ यात आयुष्य मागणे ही त्यांची भूमिका नसून, शिवचरित्र जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणणे हा स्थायीभाव आहे. सुज्ञांस सांगणेच नको. एका अर्थाने पाहिलं तर बाबासाहेब हेच एक शिवचरित्रकोष आहेत असं म्हटलं तर ते जराही उणे ठरू नये इतकी प्रचंड ध्येयासक्ती, निष्ठा, आदर बाबासाहेबांना शिवछत्रपतींबद्दल आहे.
इसवी सन १६७४ मध्ये शिवछत्रपतींच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मंगलदिनी रायगडावर झालेल्या देवदुर्लभ अशा राज्याभिषेकाच्या तीनशेव्या वर्धापनदिनी १९७४ ला दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध छत्रपति शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) बाबासाहेबांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली गेली होती. त्यावेळी घडलेला देदीप्यमान इतिहास लोकांसमोर मांडावा, लोकांनी तो समजून घ्यावा यासाठी. याच्याही बर्याच आधी बाबासाहेबांनी ‘राजा शिवछत्रपति’ हा अत्यंत मोलाचा असा ग्रंथ प्रकाशित केलेला होता आणि त्याच्या असंख्य आवृत्त्या आजतागायत निघत आहेत. हा ग्रंथ खर्या अर्थाने घराघरात, लोकांच्या हृदयात पोहोचला त्यामागे बाबासाहेबांनी किती किती कष्ट उपसले आहेत त्याची तुलना नाही.

‘शिवकल्याण राजा’ ही बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उतरलेली शिवचरित्रावरील अनेकविध गीतांची ध्वनीमुद्रिकादेखील शिवभक्तांच्या पसंतीसच उतरली नाही, तर लोकांनी अक्षरशः त्या ध्वनिमुद्रिकेला डोक्यावर घेतले. एक एक गीतांच्या सुरुवातीला असलेले बाबासाहेबांचे शब्द, विवेचन हे ऐकणे हादेखील अमृतयोग आहे. कधीही विसरता येणार नाही इतके सामर्थ्य त्या शब्दांत आहे. वानगीदाखल सांगतो, ‘सरणार कधी रण’ हे पावनखिंडीतील बाजीप्रभूंच्या आत्मार्पणाच्या वेळचे हृदय पिळवटून टाकणारे गीतातील शब्द आहेत. विशाळगडावर महाराज सुखरूप पोहोचल्यानंतर होणारे तोफांचे आवाज मृत्युशय्येवरील बाजींना ऐकू येत नसतात या प्रसंगावर हे अजरामर गीत आहे. या गीताच्या सुरुवातीला बाबासाहेबांचे निवेदन आहे, ‘देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथे घडला, या पावनखिंडीत, रक्ताचे अर्घ्य ओसंडत होते, प्रत्येक थेंब विनवीत होता – स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो!’ काळजालाच हात घातला जातो आपल्या. महाकवी भूषणाचे काव्य सादर करण्याआधी बाबासाहेब म्हणतात, ‘इथल्या मातीचे ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात आणि मग त्या इतिहासाचे कोडकौतुक गाण्यासाठी आपोआप झंकारून उठतात शाहिरांची डफ-तुणतुणी आणि थरारून उठते महाकवीची नवनवोन्मेषशालिनी लेखणी.’ शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून कवीराज भूषणांची प्रतिभा (रायगडावरील) गंगासागराप्रमाणे उफाळून आली. काय बोलावे यावर आपण सामान्य माणसांनी? बस्स, फक्त बाबासाहेबांना ऐकायचं, वाचायचं आणि त्या महान नृपतीचे, शिवरायांचे जमेल तेव्हा, जमेल तसे गुणगान करायचे.

बाबासाहेब हे ‘शिवकालभूषण’ तर आहेतच, शिवाय ते ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पुण्यभूषण’ आणि नुकतेच केंद्र सरकारच्या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले गेलेले आहेत. तरीही बाबासाहेबांना भेटायला कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती गेली तरी ते कधीही त्यांना भेट नाकारत नाहीत, मी कामात आहे असे उगाचच सांगत नाहीत. तर नेहेमी आपल्या ओळखीच्या माणसाच्या नावामागे ‘राव’ जोडूनच हाक मारतात. इतकं उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही कमालीचा साधेपणा, आपलेपणा हे बाबासाहेबांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्या अनेक शिवभक्तांनी, अभ्यासकांनी आणि टीकाकारांनी पण जाणले, अंगी बाणवले तर खूप बरे होईल.

त्यांची स्मरणशक्ती हा देखील संशोधनाचा आणि फार मोठ्या कौतुकाचा विषय आहे. शिवकाळातील एखादा प्रसंग कधी घडला याची पटकन नोंद दिवस, वार, दिनांकासहित सांगावी तर ती बाबासाहेबांनीच. शिवछत्रपतींच्या सहकार्यांची नावे, अनेकदा त्यांची गावे, कुटुंबकबिला याचीही माहिती बाबासाहेब शिवचरित्रावर बोलताना अगदी सहजपणे श्रोत्यांना देऊन जातात.

मगाशी जसं म्हटलं तसं त्यांनी ‘जाणता राजा’ हे शिवचरित्रावर आधारित महानाट्य तब्बल २००-२५० कलाकार, तोफा, पालख्या, हत्ती, घोडे, उंट, बैल आदी प्राण्यांसह, तीन मजली भव्य दिव्य नेपथ्यासह शिवप्रेमींसाठी रंगमंचावर आणले. ते निव्वळ महानाट्य नाहीये तर शिवचरित्राचा एक विलक्षण उत्कट, उत्तम, उत्कृष्ट असा जीवनानुभवच आहे. एक एक प्रसंग कसा अगदी चपखलपणे आपल्याला बघता येतो, अनुभवता येतो ‘जाणता राजा’ बघताना. शिवचरित्राचे सामर्थ, त्याची ४०० वर्षांनंतर ही भासणारी आवश्यकता यातून प्रकर्षाने अधोरेखित होते यातच सारे काही आले. हे सारे उभारताना बाबासाहेबांनी किती म्हणून बारकावे अभ्यासले असतील, खोलवर जाऊन विचार केला असेल, हजारो कागदपत्रे वारंवार चाळली असतील, रात्र रात्र विचारांत जागले असतील याची आपल्याला कल्पनाच येणे अवघड आहे. या नितांतसुंदर शिवचरित्रनाट्याची सुरुवात होते तीच आदिशक्ती तुळजाभवानी, जगदंबेच्या महाकाय प्रतिमेचे दररोज पूजन करूनच. नुकतेच निवर्तलेले खुद्द शिवछत्रपतींनी ज्या हडप घराण्याला प्रतापगडच्या भवानी देवीच्या पूजेची सनद दिली होते त्यांचे आताचे वंशज आदरणीय दादासाहेब हडप गुरुजी आणि स्वतः बाबासाहेब ही मनोभावे पूजा करत. एकदा माझ्यासारख्या सामान्याला पण या परम आदरणीय दिग्गजांसह पूजा करण्याचा बहुमान मिळाला हे माझे भाग्यच. वक्तशीरपणा हा सुद्धा बाबासाहेबांचा महत्त्वाचा गुण अंगिकारण्याजोगा आहे. ‘जाणता राजा’च्या प्रयोगाला कोणीही महनीय व्यक्ती का येणार असेना, प्रयोग ठरल्या वेळीच सुरू होणार, त्या मान्यवराची वाट न बघता. येणार्यांनाही बाबासाहेबांचा हा गुण बरेचदा माहिती असल्याने काहीही बोलता येत नाही त्यांना. असे अनेक प्रसंग अनेक वेळा ‘जाणता राजा’ बघताना मी ही बघितले आहेत.

अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाले तर बाबासाहेबांबद्दल असे सांगता येईल की शिवचरित्र लेखनासाठी व ते प्रकाशित करण्यासाठी त्यांनी काय काय केलं असावं याची गणतीच नाही. उन्हाळा असो थंडी असो वा पावसाळा, एखादा ऐतिहासिक कागद अथवा काही वस्तू अमुक ठिकाणी आहे असे नुसते कानावर आले तरी बाबासाहेब तडक मिळेल त्या वाहनाने प्रवास करत त्या ठिकाणी जाऊन शिवचरित्रासंबंधी काही हाती लागतंय का याची पाहणी करत. मग यात तहानभूक, दिवसरात्र, आपला पेहराव, थंडी-वारा-ऊन-पाऊस असल्या त्यांच्या दृष्टीने शुल्लक गोष्टींची यापुढे मातबरी काहीच नसायची. कित्येक आडवाटा, घाटवाटा बाबासाहेबांनी प्रत्येक ऋतूत चक्क सायकल हाकत पार केलेल्या आहेत हे अनेकांना ठाऊक असण्याचे काही कारणच नाही.

‘राजा शिवछत्रपति’ हा आबालवृद्धांना, सर्वसामान्य रसिक वाचकांना शिवछत्रपतींच्या चरित्राचे वेड लावणारा, मोहवून टाकणारा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी पैसे उभे रहावेत म्हणून बाबासाहेबांनी चक्क पुणे ते भायखळा असा ट्रेनने प्रवास करून भाज्या, कोथिंबीर वगैरेंच्या विक्रीचा यत्न करून बघितलेला आहे. शिवछत्रपतींवरील जाज्वल्य निष्ठेपायी बाबासाहेबांनी काय काय केलंय याचेच हे एक उदाहरण. पुढे त्यांना असंख्य असंख्य पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाला, पैसेही मिळाले, पण या इतिहासपुरुषाची पावले आजवर सदोदित जमिनीवरच राहिली. खरोखरीच, ‘विद्या विनयेन शोभते’ याची सार्थकता आणि उदाहरण म्हणजे बाबासाहेब. मिळालेली रक्कम वेगवेगळ्या संस्थांना देऊन त्यांनी फार मोठा आदर्श सगळ्यांसमोर ठेवलेला आहे.

तिकीट लावून शिवछत्रपतींवरील व्याख्याने करायची याचे प्रणेतेही तेच आहेत. सुरुवातीला अनेकांनी त्यांना वेड्यात काढायचा प्रयत्न ही केला यासाठी. पैसे देऊन व्याख्यान ऐकायला कोण येणार हा त्यांचा प्रश्न असायचा. पण बाबासाहेब तर स्वतःच्या व्याख्यानाला स्वतःच तिकीट काढून जायचे आणि अर्थातच हजारो, लाखो लोकांची मांदियाळी सुद्धा. आठ आठ, दहा दहा दिवस सलग शिवचरित्र व्याख्याने बाबासाहेबांनी करून समाजाला, तरुणाईला छत्रपती श्रीशिवाजीमहाराज या एका अलौकिक, अमौलिक बंधनात बांधले यात शंकाच नाही. बाबासाहेब नेहेमीच सांगतात, ‘छरींळेपरश्र उरीरलीेीं अर्थात राष्ट्रीय चरित्र जर आपणास निर्माण करायचे असेल तर शिवछत्रपती आणि शिवचरित्र हेच आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना ‘श्रीमंत योगी’ आणि ‘जाणता राजा’ या सर्वथैव सुयोग्य विशेषणांसह अन्य विशेषणांनी गौरविले आहे. महाकवी भूषणांनी देखील शिवरायांना असंख्य विशेषणांनी गौरवून त्यांची कीर्ती अखंड हिंदुस्थानात चाफा, मोगरा, प्राजक्ताच्या सुगंधासारखी पसरवली आहे. बाबासाहेबांचे ‘जाणता राजा’ हे महानाट्यही मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी आदी भाषांत अनुवादित होऊन आजवर अनेकदा देशविदेशात त्याचे प्रयोग झालेले आहेत. यामुळे शिवचरित्रमहिमा सह्याद्री, महाराष्ट्रापुरता मर्यादित न राखता तो देशविदेशातील लक्षावधी बहुभाषिक लोकांसमोर तो सार्थ, यथार्थपणे पोहोचता केलेला आहे हे फार फार महत्त्वाचे. बाबासाहेब म्हणतातच ना, ‘शिवचरित्र म्हणजे सामान्यांनी घडवलेला असामान्य इतिहास आहे.’ खरोखरच या शिवचरित्रात विलक्षण आकर्षण आहे, तेज आहे, ओढ आहे, जीवनात कसे वागावे याचे ठायीठायी मार्गदर्शन आहे, मुख्य म्हणजे स्वत्वाची जाणीव आहे.

समकालीन शिवचरित्रलेखक कृष्णाजी अनंत सभासद त्याच्या बखरीत शिवराज्याभिषेकासमयी लिहून ठेवतोय ना – ‘या युगी सर्वत्र म्लेंछ पातशाहा, हा मराठा राजा येव्हढा छत्रपति झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.’ कविराज भूषण तर याहीपुढे चार पावले जाऊन उद्गारतो आहे – ‘कासीहुकी कला जाती, मथुरा मसीद होती, अगर सिवाजी न होते तो सुनाति होत सब की!’ समर्थांनी शिवरायांना ‘निश्चयाचा महामेरू’च म्हटले आहे आणि या हिंदवी स्वराज्याला त्यांनी ‘आनंदवनभुवन’ अशी चपखल उपमा दिली आहे, जणू हे युगायुगानंतर पुनश्च या वसुंधरेवर अवतरलेले रामराज्य शिवराज्य. शिवनिधनानंतर शंभुछत्रपतींना लिहिलेल्या पत्रात रामदास स्वामी म्हणतात – ‘शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे, कीर्तीरूपे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. त्याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी विशेष, काय लिहावे?’ खरंच, शिवरायांची तुळणा व्हावी तो रामकृष्णांशीच असा दिगंत पराक्रम त्यांनी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात गाजवलेला आहे. सामान्यातील सामान्य माणूस सुखी कसा होईल याकडे अत्यंत बारीक लक्ष असायचे त्यांचे. याची अनेक पत्रेही उपलब्ध आहेत.

बाबासाहेबांनी हे सुवर्णयुग, शिवछत्रपती आणि त्यांचे शिवराज्य, हिंदवी स्वराज्य हे संपूर्ण आयुष्यभर कसोशीने प्रयत्न करून तुमच्या आमच्या समोर ठेवलेले आहे. इतिहास या तशा रुक्ष असलेल्या विषयाची गोडी जनमानसाला लावली हे महत्कार्य बाबासाहेबांनी केले आहे. शिवाजी या नामोच्चाराऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे सार्थ अभिमानाने आपणांस उच्चारायला उद्युक्त केलेले आहे. मागे एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे बाबासाहेबांचा सत्कार करताना त्यांच्या भाषणात म्हणाले होते, ‘बाबासाहेब तुम्ही शतायुषी तर होणारच आणि तोपर्यंत तुम्हांला नाबाद ठरवायला मी पंच म्हणून उभा असणार.’ आणि म्हणूनच या ऋषितुल्य इतिहासपुरुषाबद्दल त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे दोन शब्द लिहिताना नक्कीच म्हणावेसे वाटते, ‘गुरुवर्य बाबासाहेब, आपण शतायुषी झालातच, पण आमच्यासारख्या अनेकांच्या आयुष्यातील लागतील तेव्हढी वर्षे आपण हक्काने घ्या आणि द्विशतायुषी होऊन या महान शिवचरित्राचा डंका त्रैलोक्यात दुमदुमत ठेवा ही आई जगदंबेच्या, भवानीमातेच्या आणि शिवरायांच्या चरणी मनोमन प्रार्थना! बहुत काय मागावे?’

-प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..