नवीन लेखन...

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग १

 

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह भाग १

भाविकांच्या मते, भगवान शंकराचे माहात्म्य व साधेपणा सांगणारे, शिवमहिम्न स्तोत्र हे अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे. त्याच्या कालासंदर्भत विविध अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत. या स्तोत्राचा रचयिता पुष्पदंत शिवभक्त, गंधर्वांचा राजा होता. त्याच्या संदर्भात कथा अशी की तो शिवपूजेच्या हेतूने एका उद्यानातून सुंदर फुले अदृश्य रूपात चोरून आणत असे. नगरीच्या राजाने चोराला पकडण्यासाठी मार्गावर शिवनिर्माल्य पसरून ठेवले. ते तुडवले गेल्याने पुष्पदंताकडून प्रमाद घडला व त्याच्या मायावी शक्ती नष्ट झाल्या. त्याला शिक्षा झाली. त्या शिक्षेच्या दरम्यान त्याने पश्चात्ताप होऊन हे स्तोत्र रचले. त्याचा पहिलाच शब्द  ‘ महिम्न ’ असल्याने त्याला शिवमहिम्न स्तोत्र असे नाव पडले असावे पण पुष्पदंताने मात्र त्याचा “धूर्जटिस्तोत्र” असा उल्लेख केलेला आहे.

ह्या स्तोत्रातील 43 श्लोकांपैकी पहिले 32 श्लोक पुष्पदंताचे आहेत. बाकी श्लोक फलश्रुती अथवा प्रक्षिप्त असावेत. काही अभ्यासकांनी या ३२ संख्येचा संबंध रुद्राक्ष माळेतील रुद्राक्षांची संख्या किंवा ३२ दातांशी जोडलेला दिसतो. त्यावरून ह्या कवीचे नावच पुष्पदंत किंवा कुसुमदशन असे रूढ झाले असावे.

ह्या स्तोत्रामुळे पुष्पदंताच्या मनातील दुःख, कष्टांची जाणीव संपून गेली आणि त्यास शिवलोक प्राप्त झाला.

हे स्तोत्र मुख्यत्वे शिखरिणी (गण – य म न स भ ल ग) या भक्तिरसाशी अत्यंत जवळच्या वृत्तात (श्लोक १-२९), तसेच हरिणी (गण – न स म र स ल ग), (श्लोक ३०),–मालिनी (गण – न न म य य) (श्लोक ३१ ते ३४,३७,३८), वसंततिलका(गण – त भ ज ज ग ग) (श्लोक ४३) व अनुष्टुभ ( ३५,३६,३९ ते ४२)छंदात रचले आहे.

शिवभक्तांमध्ये या स्तोत्राला फार वरचे स्थान आहे.

अथ शिवमहिम्न स्तोत्रम् –

महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः ।
अथावाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्
ममाप्येषस्तोत्रे हर ! निरपवादः परिकरः।।१।।

मराठी- हे शंभो, तुझ्या थोरवीचा थांग न लागणार्‍या माझ्यासारख्या अजाणत्याकडून केलेली स्तुती जरी अनुचित असेल (तर काहीच आश्चर्य नाही, कारण) ब्रह्मा इत्यादींची वाणीही तुझ्या बाबतीत अपुरी पडते. त्यामुळे आपल्या मगदुराप्रमाणे तुझी स्तुती करणार्‍या कोणालाच नावे ठेवता कामा नये. म्हणून माझीही ही सुरुवात दोषास्पद ठरणार नाही.

मला मूर्खा मोठी महति तव माहीत न जरी
विरंची, देवांची स्तुतिस तव वाणीहि अपुरी ।
नसे कोणी केली स्वमति स्तुति निंदास्पद खरी
म्हणोनी माझे हे स्तवन शिवशंभो सुरु करी ॥ ०१॥


अतीतः पन्थानं तव च महिमा वाङ्मनसयो
रतव्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि ।
स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः
पदेत्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः।।२।।

मराठी- (हे शंभो) तुझी थोरवी वाणी आणि मन या दोन्हींच्या (आवाक्या) पलिकडे आहे. वेदसुद्धा त्या मोठेपणाच्या विभिन्नतेमुळे चकित होऊन ‘ नेति नेति’ असे म्हणू लागतात त्याची स्तुती करणे कोणाला शक्य होईल ? त्याचे अंगभूत गुण किती ? त्याला (कोणत्या इंद्रियाच्या माध्यमातून) समजून घ्यायचे ? तू धारण केलेल्या नवीन रूपामध्ये कोणाचे मन आणि वाणी गुंतणार नाही (बरे) ?

तुझ्या लौकीकाला वचन-मन सीमा न पडती
तुझ्या वैविध्याने चकित श्रुतिही नेति म्हणती ।
गुणे कोण्या जाणू, विषय कुठला गान स्तुतिचे
नव्या रूपीं शंभो, मन-वचन कोणास न रुचे ॥ ०२॥


मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवत
स्तव ब्राह्मंकिम्वागपि सुरगुरोर्विस्मयपदम् ।
मम त्वेतां वाणी गुण कथन पुण्येन भवतः
पुनामीत्यर्थेऽस्मिन्पुरमथनबुद्धिर्व्यवसिता  ।।3।।

मराठी-  मधुरतेने अत्यंत संपन्न, अमृताप्रमाणे वाणीच्या निर्मात्या हे ब्रह्मज्ञ शंभो, देवगुरु बृहस्पतीची स्तुतीपर वाणी तरी तुला विस्मयकारक वाटेल का (त्या शब्दांनी तरी तू प्रसन्न होशील का) ? हे त्रिपुरारी माझी तर ही वचने आपल्या गुणांचे वर्णन करण्याच्या पुण्याने पावन करणाचा माझा निश्चय आहे.

सुधे जैसी वाणी मधुर वचने थोर जनका
सुराचार्यें केली तरिहि स्तुती वाटेल प्रिय का ?
गुणां गाई शंभो तव सकल, वाणी मम खरी
शुची होवो पुण्ये, त्रिपुररिपु, वाचा मम बरी ॥ ०३॥


तवैश्वर्यं यत्तज्जगदुदय रक्षा प्रलयकृत्
त्रयीवस्तुव्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु ।
अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं
विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः।।4।।

मराठी- हे (भक्तांना) वर देणार्‍या शंभो, या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय करणार्‍या, ज्याची तिन्ही (वेदां)त स्तुती केली गेली आहे, वेगवेगळी शरीरे (ब्रमा-विष्णू-महेश) व्यापणार्‍या तीन गुणांच्या (सत्-रज-तम) पलिकडे असणारे तुझे ऐश्वर्य नष्ट करण्यासाठी काही मूर्ख दुर्जन लोक अप्रिय कटू निंदानालस्ती करतात.

वरां देसी सर्वां, उगम स्थिति संहार करिसी
तिन्हीं वेदां वर्ण्य, त्रिगुण तनु पल्याड अससी ।
क्षती ऐश्वर्याला तव करविण्या वापरत ते
कटू निंदा शब्दां अनुचित महामूर्ख भुरटे ॥ ०४॥


किमीहः किङ्कायः स खलु किमुपायस्त्रिभुवनम्
किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च ।
अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसरदुःस्थो हतधियः
कुतर्कोऽयं कांश्चिन्मुखरयति मोहाय जगतः ।।5।।

मराठी – (हे महादेवा), तुझ्या कल्पनातीत ऐश्वर्याच्या बाबतीत (रहस्य न उलगडल्यामुळे) काही असमयोचित दुःखी जन, जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ‘तो ब्रह्मा कोणत्या इच्छेने (काय कारणाने), कोणत्या शरीराचा वापर करून, कोणत्या साधनांचा उपयोग करून, कोणत्या पायावर आधारित आणि काय हेतूने या तीन लोकांची उत्पत्ती करतो’ असा वाईट तर्क पसरवतात.

म्हणे निर्मी ब्रह्मा जगत परि त्या काय असती
तनू पाया हेतू धन कुशलता वा हिकमती ?
करंट्याना ठावे अगणित तुझे वैभव नसे
कुशंका मांडूनी करित जगता मूर्खहि कसे ॥ ०५॥


अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगताम्
अधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति ।
अनीशो वा कुर्याद् भुवनजनने कः परिकरो
यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे  ।।6।।

मराठी- हे देवांमध्ये श्रेष्ठ (महादेवा), या सर्व (भू, भुव इ. सप्त) लोकांचे विविध विभाग आहेत. पण ते काय जन्मरहित आहेत का ? या जगतांच्या नियामकाचा अनादर करून विश्वाची जगरहाटी चालू शकते का ? ईश्वराखेरीज (दुसरा कोणी)  करेल म्हणावे, तर या जगाला निर्मिण्यासाठी आवश्यक साधने त्याचेकडे आहेत का ? ते लोक मंदबुद्धी आहेत या कारणाने तुझ्यावर संशय घेतात.

जगांची उत्पत्ती नियमन तसे कोण करते
उपेक्षा शास्त्याची करुन कसले कार्य जमते ?
दुजापाशी कोणा गरजभर साहित्य असते
तुझ्या संबंधाने गरळ वदती मठ्ठ जन ते ॥ ०६॥


त्रयी साङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च ।
रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषा
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ।।7।।

मराठी- तीन वेद, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, शांकर तत्त्वज्ञान, वैष्णव पंथ अशा अनेक उपासना पद्धतींमध्ये, हा संप्रदाय श्रेष्ठ, तो योग्य अशा वेगवेगळ्या आवडींच्या सरळ वा वेड्यावाकड्या मार्गांवरून चालणार्‍या माणसांचे लक्ष्य तूच एक आहेस, जसे समुद्र हे (नद्यांच्या वाहणार्‍या) पाण्याचे असते.

श्रुती, सांख्याच्या वा पथ हर-हरी, योग पथ वा
असे मोठे छोटे सरळ तिरके मार्ग अथवा ।
हव्या त्या रस्त्याची निवड परि तू ध्येय असशी
जलौघाला वाटे जलधिप्रतिची ओढच जशी ॥ ०७॥


महोक्षः खट्वाङ्गं परशुरजिनं भस्म फणिनः
कपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम् ।
सुरास्तां तामृद्धिं दधति तु भवद्भूप्रणिहितां
न हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति ।।8।।

मराठी- हे वरदात्या शंकरा, तुझी स्वतःची अशी नंदी, खाटेचा पाय (दंडुका), परशु (त्रिशूल), (पांघरण्यासाठी) कातडे, भस्म, नाग, भिक्षापात्र (कवटी) हीच साधनसामग्री आहे. देवगणांना त्यांचे ऐश्वर्य केवळ तुझ्या भुवईच्या इशार्‍यावर प्राप्त होते. तसेच आपल्या आत्म्यात रममाण होणार्‍या तुला सांसारिक विषयांची मृगतृष्णा विचलित करू शकत नाही.

मिळे देवा त्यांचे विभव भुवई तू हलविसी
तुझी सामग्री ती वृष भुजग नी चर्म फरशी ।         (भुजग- साप)
चिता-रक्षा, भिक्षा-चषक, वर सोटा, पकडसी
निजानंदी मग्ना, विषय परितोषी न रमसी ॥ ०८॥


ध्रुवं कश्चित्सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं
परो ध्रौव्याध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये ।
समस्तेऽप्येतस्मिन्पुरमथन तैर्विस्मित इव
स्तुवञ्जिह्रेमि त्वां न खलु ननु धृष्टा मुखरता ।।9।।

मराठी- हे त्रिपुरांचा नाश करणार्‍या शंकरा, हे सारे जग अढळ स्थायी आहे असे एकजण म्हणतो, तर ते अस्थिर चंचल आहे असे दुसरा म्हणतो. तर आणरवी कोणी म्हणतो की हे जग स्थायी व अस्थायी गोष्टींचे बनलेले आहे. या सर्व वादविवादामुळे आश्चर्यचकित होऊनही तुझी स्तुती करताना मला लाज वाटत नाही. कारण वाचाळता उद्दामच असते.

कुणी सांगे स्थायी अढळ जग हे सर्व असते
दुजा अस्थायी हे जगतच वदे जे न टिकते ।
अशा वादंगाने चकित वदनी गान स्तुतिचे
तुझ्या, कां लाजावे, वटवट करी बाष्कळ वचें  ॥ ०९॥


तवैश्वर्यं यत्नाद् यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः
परिच्छेत्तुं यातावनलमनलस्कन्धवपुषः ।
ततो भक्तिश्रद्धाभरगुरुगृणद्भ्यां गिरिश यत्
स्वयं तस्थे ताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति ।।10।।

मराठी- हे गिरीराजा, तुझ्या आगीच्या लोळासमान असलेल्या तेजाचा थांग लावण्यासाठी ब्रहमदेवाने वरच्या दिशेने व विष्णूने खालच्या बाजूने प्रयत्न केले परंतु ते अपुरे पडले (त्यांना यश आले नाही). त्यानंतर त्यांनी श्रद्धा आणि भक्तीने तुझे गुणगान केल्यावर तू त्यांच्यासमोर प्रकट झालास. खरोखर, तुझे अनुसरण करण्याचे फळ मिळतेच, नाही का ?

प्रभा अग्नीलोळासम तव तिचा तर्क करिती
हरी जाई खाली कमलज तसा जाय वरती ।          (कमळज – ब्रह्मा)
परी त्यांच्या यत्ना यश न म्हणुनी गान करिती
स्तुतीचे ज्यायोगे तव, फळ प्राप्त करिती ॥ १०॥


अयत्नादापाद्य-त्रिभुवनमवैर–व्यतिकरं
दशास्यो यद्बाहूनभृत रणकण्डूपरवशान् ।
शिरः पद्मश्रेणीरचितचरणाम्भोरुहबले:
स्थिरायास्त्वद्भक्तस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम्  ।।11।।

मराठी- हे तिन्ही नगरांचा नाश करणार्‍या शंकरा, तुझ्या चरणकमलांवर आपल्या दहाही शिरकमलांची मालिका रचणार्‍या रावणाच्या तुझ्या ठायी असलेल्या भक्तीचा हा प्रभावच होय की, तो तिन्ही लोकांना सहजासहजी शत्रुविरहित करणारे खुमखुमी असणारे हात धारण करू शकला.

तुझ्या पायी दाही शिर कमल-माला सजविली
दशग्रीवें भक्ती अचल तव ठायी फुलविली ।    (दशग्रीव – रावण)
भुजांचा डोलारा रणखुमखुमी ज्यास जडली
तिहीं लोकीं तेणे जरब रिपुमाजी बसविली  ११॥

***********************

— धनंजय बोरकर.

(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 51 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..