नवीन लेखन...

ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम

चंद्रकला कदम यांचा जन्म १५ डिसेंबर १९५७ रोजी झाला.

कुंचल्यातील कला जोपासताना चंद्रकला कदम यांनी साकारलेली चित्रे म्हणजे, जिवंतपणाचाच साक्षात्कार घडवणारी, तर काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून पोलिसांना मदत करत त्यांनी गेली ३५ हून अधिक वर्षे आपली कला समाजकार्य म्हणून जोपासली आहे.

राष्ट्रीय दर्जाच्या चित्रकार चंद्रकला कुमार कदम यांच्या कुंचल्यातून उमटलेली चित्रे तेजाने वलयांकित होऊन आजवर कलारसिकांच्या मनावर बिंबली. इतकेच नाही तर कधी एक्झिबिशनच्या माध्यमातून तर कधी पोट्रेट, रेखाचित्रे, तैलचित्रांच्या माध्यमातून ती घराघरांतच नाहीत तर संसद भवन, गुजरात विधानसभा, नवीन विधान भवन, तर नवी मुंबई महापालिकेमध्येही झळकली. विविध दिवाळी अंक, मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकून ती घराघरांत पोहोचली आणि कलेला दाद मिळवून देणारी ठरली.

चंद्रकला कदम यांच्या कुंचल्यातून उमटणा-या कलेला वडिलोपार्जित वारसा मिळाला आहे. त्यांच्या कलेला जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या माध्यमातून नवनवे पैलू पडत गेले. विविध पुस्तके, जाणकार, दिग्गज चित्रकार यांच्या मार्गदर्शनाने झालेले सोपस्कार त्यांच्या चित्रांमध्ये जिवंतपणा चितारणारे ठरले आणि अवतीभवतीच्या निसर्ग, डोंगर-द-या, पर्वतरांगा डोळय़ांत मावताना रेखाटलेली चित्रे कधी राष्ट्रीय दर्जाची बनली ते त्यांना कळलेच नाही.

चंद्रकला कदम यांचे माहेर अलिबागचे. बालपणी वडिलांसोबत रेवस ते मुंबई हा प्रवास समुद्रातून लाँचने करताना एक-दीड तास बोअर व्हायला व्हायचे, अशावेळी वडील हातामध्ये बाईडिंग केलेल्या को-या पेपरचा बंच द्यायचे. यावेळी अनेक कॅरेक्टर आपसुकच चित्रासाठी मिळायची. अनेक चेहरे आणि त्यांच्या वेगवेगळय़ा हेअर स्टाईल रेखाटताना या प्रवासात जवळपास पन्नास एक चित्र रेखाटून व्हायची. यावेळी अनेक कलाकारही पाहायला मिळायचे. चेहरे रेखाटण्याचे कौशल्य, खुबी, साकारताना निसर्गाच्या सान्निध्यात कलेला एक प्रकारची पोच मिळायची. यामुळे कला जणू बहरत गेली आणि रेखाचित्रच नाही, तर अनेक राष्ट्रपुरुषांच्या चित्र, तैलचित्रांच्या माध्यमातून यशस्वितेचा टप्पा गाठता आला, असे चंद्रकला कदम सांगतात.

पार्लमेंटच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते चंद्रकला कदम यांनी साकारलेले वीर सावरकर यांचे तैलचित्र तसेच गुजरात विधानसभेतील वीर सावरकर यांचे तैलचित्र हे उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या हस्ते लावण्यात आले. १९८८ साली म. जोतिबा फुले यांच्या चित्राचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी चंद्रकला कदम यांचा सत्कारही करण्यात आला. नांदेड येथे नाटय़गृहात चंद्रकला यांनी साकारलेले शंकरराव चव्हाण यांचे तैलचित्र लावण्यात आले. माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचे तैलचित्र त्यांना वाढदिवसाला भेट देण्यात आले.

त्याचप्रमाणे नवीन विधान भवनामध्ये चंद्रकला कदम यांनी रेखाटलेली सर्व मुख्यमंत्र्यांची तैलचित्रे, नाटय़गृहांमध्ये नाटय़ कलाकारांची तैलचित्रे, नवी मुंबई महापालिकामधील राष्ट्रपुरुषांची तैलचित्रे. विनय आपटे, शांता जोग, सयाजीराव गायकवाड, याचप्रमाणे स्केच, पोट्र्रेटची निर्मिती चंद्रकला कदम यांच्या कुंचल्यातून साकारलेली आहेत. गेली ४० वष्रे त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.

चित्रे साकारताना ती सहजतेने कलारसिकांना लुभावण्याचे कौशल्य चंद्रकला कदम यांच्या चित्रांतून दिसून येते. चित्रं हुबेहूब वठविण्यासाठी करावी लागणारी मेहनत, रंगसंगती, चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी त्या व्यक्तीचे डोळे, चेह-यावरील हावभाव, त्यांचा पोशाख, त्यांचे व्यक्तिमत्त्व चित्रातून साकारताना चंद्रकला कदम यांच्या कलेचा अप्रतिम दर्जा जिवंतपणाची अनुभूती देऊन जातो.

एक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे. प्रीती राठी अॅ्सिड हल्ला प्रकरणी चंद्रकला कदम यांनी रेखाटलेल्या गुन्हेगारांच्या रेखाचित्रांमुळे गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले. गेली ३५ वर्षे त्या पोलीस डिपार्टमेंटला मदत करत आहेत. २०११ मध्ये सिंधुदुर्ग येथे पोलिसांसाठी रेखाचित्र कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्गमध्ये धुमाकूळ घालणा-या चेन स्नॅचर गुन्हेगारांचीही रेखाचित्रे काढून देऊन गुन्हेगार पकडण्यासाठी पोलिसांना महत्त्वपूर्ण मदत झाली. पुणे बॉम्ब स्फोटावेळीच्या घटनेतही संशयितांची रेखाचित्रे रेखाटून पोलिसांना मदत झाली आहे. आजवर विविध केसेसमधील गुन्हेगारांची रेखाचित्रे रेखाटल्याचे चंद्रकला कदम सांगतात. बँकेतील दरोडा केसेस, गुंगी देऊन दागिने लुबाडणे, दागिने पॉलिशच्या नावाखाली दागिने चोरी करणे आदी घटनांतून आजही जरी सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी रेखाचित्रांचा पोलिसांना फायदा होत असल्याचे त्या सांगतात.

चंद्रकला कदम यांनी साकारलेली राष्ट्रपुरुषांची तैलचित्र संसदेत, महापालिकेत आपला ठसा उमटवून राहिली आहेत. संसदेत लागलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र चंद्रकला कदम यांनी चितारले आहे. एका महिलेच्या कलेचा ठसा जो राष्ट्रीयस्तरापर्यंत पोहोचतो, ही महिला वर्गासाठी सन्मानपूर्णच बाब म्हणावी लागेल.

जिथे कला जन्म घेते, तिथे ती जगवली गेली तरच त्या कलेचा तो सन्मान ठरू शकतो. समाजात अनेक मुलांमध्ये उपजत कला असते. मात्र त्या कलेला काहीवेळा वाव मिळत नाही. कधी आर्थिक तर काही कारणांनी ती कला तिथेच सोडून दिली जाते. आज विविध कोर्सच्या माध्यमांतून कला जिवंत राखण्याचे प्रयत्न होतात, मात्र ते प्रत्येकाला शक्य नसते, यावेळी दिग्गजांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून किंवा सातत्य आणि सरावाच्या माध्यमातून आपली कला जिवंत ठेवता येते. करिअरसाठी कलेचे माध्यमही यशस्वी ठरू शकते. यासाठी कमर्शिअल आर्टच्या माध्यमातून कलाकारांची कला छंद म्हणूनही जोपासता येते. चंद्रकला कदम यांनी चित्रे ही एक्झिबिशनच्या माध्यमातूनही कलारसिकांच्या पसंतीस पडली; यावेळी चित्रांना परदेशातूनही चांगली पसंती, प्रतिसाद दिसून आला.

चंद्रकला कदम यांच्या चित्रांची जहांगीर आर्ट, सचिवालय जिमखाना, आदी ठिकाणी भरविण्यात आलेली चित्रप्रदर्शने तसेच चित्रे आणि रेखाचित्रांच्या माध्यमातून सुरू असणारे समाजकार्य पाहता, त्यांचे कार्य वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल.

— प्रियानी पाटील.

संकलन:

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..