नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेत्री वसुंधरा पौडवाल

ज्येष्ठ अभिनेत्री वसुंधरा पौडवाल यांचा जन्म १४ मे १९२० रोजी ठाणे येथे झाला.

वसुंधरा पौडवाल यांनी कलाक्षेत्रात आपलं स्थान निश्चित निर्माण केलं ते स्व:कर्तृत्वावर यासाठी त्यांना खूप कष्ट पडले. पण त्यांनी ते हौसेनं स्वीकारलं. विशेष म्हणजे वैवाहिक जीवनात पदार्पण केल्यानंतर त्यांचं कलाजीवन सुरू झालं. त्या काळात दैवज्ञ ब्राह्मणातील सारख्या प्रतिष्ठीत घराण्यातील लेकी सुनांनी तोंडाला रंग लावून लोकासमोर येणं म्हणजे भयंकरच. गाणं वगैरे एकवेळ क्षम्य पणू नाटक-सिनेमातून कामं करणं म्हणजे महापापच !

पण दुर्गा खोटे व लीला चिटणीस, यासारख्या बड्या घराण्यातील मराठी मुली सुनांनी चित्रसृष्टी गाजविल्यामुळं वसुंधराबाईंना ते खूपच सोपं गेलं त्यात प्रत्यक्ष पतीच पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे त्यांचा मार्ग सुकर होणं, उत्साह वाढणं सहाजिकच होते.

वसुंधरा पौडवाल या माहेरच्या रोझा वगळ. त्यांचे वडील वसंतराव वगळ हे बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये चांगल्या हुद्यावर नोकरीला होते. त्यांची आई आगासकर घराष्यातली.(ही एकूण ५ भावंडं – ४ बहिणी,१ भाऊ.)

वसुंधराबाईचं बालपण गेलं मुंबईतील ठाकुरद्धारला. शिक्षण झालं एस्. एन्. डी. टी. कन्या शाळेत. सीताबाई अण्णेगिरी या त्यांच्या मुख्याध्यापिका होत्या. शाळेच्या वार्षिक संमेलनातून होणाऱ्या एकांकिका, नाटिका, नृत्य-गायनाच्या कार्यक्रमात त्या हमखास चमकत ते सीताबाईंच्या प्रोत्साहनामुळंच. ऐन तारुण्यात मात्र त्यांना हा अभिनयाचा विशेष शौक नव्हता. त्याकाळी त्या चित्रपटात आल्या असत्या तर नायिका म्हणून निश्चित गाजल्या असत्या. शिकत असताना त्या एकदा आपल्या आते बहिणीकडे दहिसरला गेल्या होत्या. तेव्हा आताच्या सारखा दहिसर भाग विकसित झाला नव्हता. डोंगर, जंगलच तेथे फार. सारा भाग झाडांझुडपांनी व्यापलेला त्यामुळे चित्रपटाचं बाह्यचित्रण बऱ्याच वेळा तेथे होई. असंच बॉम्बे टॉकीजच्या ‘झूला’ या गाजलेल्या चित्रपटाच चित्रण दहिसरला चाललं होतं. अशोककुमार व लीला चिटणीस यांच्यावरील गाणं चित्रित होत होतं. रोझापण आपल्या आते बहिणीबरोबर केवळ कुतूहल म्हणून चित्रण पहायला गेली होती? असेल तेव्हा ती पंधरा सोळा वर्षांची. ‘पण जन्मतःच. अंगापेरान मजबूत असलेली रोझा वयाच्या मानानं बरीच थोराड वाटे. केतकी सारखा रंग, बदामी भावपूर्ण डोळे, नीटस् रेखीव चेहेरेपट्टी या मुळे त्या चारचौघीत उठून दिसत. येथेही चित्रणाच्यावेळी त्यांनी सिनेमावाल्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंच. त्यामुळं अशोककुमार लीला चिटणीस यासारख्या लोकप्रिय सिने कलावंतांना अगदी जवळून पहाण्याची संधी त्यांना मिळाली. चार शब्दही त्या त्यांच्याशी बोलूही शकली. बॉम्बे टॉकीजच्या प्रॉडक्शन मॅनेजरनं तर वसुंधरा पौडवाल यांना विचारलं – देखील की आमच्या चित्रपटात काम कराल का म्हणून. कारण आकर्षक, चिकन्या, चुपड्या हिरो हिरॉईनचाच तो जमाना होता. त्यामुळे रोझा वगळ सारख्या देखणी तरुणी सहज नायिका बनू शकली असत्या. पण सिनेमात काम करण्याच्या नुसत्या कल्पनेनंच त्यांचे अंग भयानं शहारले. ‘नाही रे बाबा, आपल्याला नाही सिनेमात काम करायचं!’ एवढंच ती तेव्हा लाजत लाजत म्हणाली होती. पण याच लाजाळू रोझा वगळ वसुंधरा पौडवाल झाल्यावर मात्र मराठी रंगभूमीवर धीटपणे उभी राहिल्या. चित्रपटातून समररसून काम करू लागल्या. त्यामुळे कौतुकाचा विषयही बनल्या.

१९४३ साली त्यांचे लग्न शंकरराव पौडवाल यांच्या बरोबर झाले. शंकरराव पौडवाल यांचा मूळ पिंड शिक्षकाचा खरा पण स्वातंत्र्यसंग्रामाकडेही त्यांचा तितकाच ओढा. १९४२ सालच्या चलेजाव चळवळीत शंकररावांनी स्वतःला झोकून नि होतं. पुढे लग्न झाल्यावरही त्यांना अनेकदा कारावासही भोगावा लागला. स्वातंत्र्य सैनिकांचा ताम्रपट त्यांना मिळाला होता. उरण ही त्यांत जन्मभूमी व कर्मभूमीही. शंकरराव पौडवाल हे उरण नगरपालिके सतत वीस वर्ष सभासद होते. १९६३ ते १९६८ या कालावधी ओळीनं पाच वर्ष ते नगराध्यक्षही राहिले होते. शिवाय अनेक सरकारच्या समित्यावर त्यांनी काम केलं होते. असा समाजसेवक पती लाभल्यामुळे तशी संसाराची खूप मोठी जबाबदारी वसुंधराबाईंवरच येऊन पडली. त्यात १९४४ साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. दिलीपचा जन्म झाला.. अत्यंत गोड, गोंडस, गोरापान दिलीप पहाणाऱ्याच्या डोळ्यात चटके भरणारा. दोन वर्ष केव्हाच निघून गेली. चुणचुणी दिलीप कमालीचा हुशार निघाला पण नियतीला हे पहावलं नाही, एका अल्पशी तापाच्या आजारात दिलीप यांच्यावर पोलीओचा हल्ला झाला. पाय लुळे पडले. कुबड्यांच्या आधाराखेरीज चालणं अवघड झालं. त्या वेळी परिस्थिती बरीचशी खालावली मग गरजेपोटी वसुंधराबाईंनी नाटक-सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. चटकन नोकरी मिळाली असं त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं की त्यांच्याजवळ कसलीही सनद-डिप्लोमा नव्हता. अभिनय कला अंगी होती व आकर्षक व्यक्तिमत्व होतं. तसेच पतीकडून तसा कधी ललितकलांच्या प्रांगणात उतरण्यासाठी विरोधही नव्हता. पण जेव्हा लोकांनी विचारलं तेव्हा नकार देणाऱ्या वसुंधरा बाईंना यावेळी मात्र वेगळाच अनुभव आला. एका मुलाच्या आईला नायिका म्हणून स्वीकारायला, लोकांपुढे पेश करायला चित्रपट निर्माते तितकेसे राजी नव्हते. उलट एका निर्माता दिग्दर्शकानं चक्क उपदेशच केला की बाई तुमच्यासारख्या गृहिणीने आपलं संसारातच रमलेलं बरं.. आचार्य अत्रे यांच्याकडून उत्तर आलं, ‘ बाई, उशीर झाला. थोडं लौकर आला असता तर माझ्या चित्रपटाची नायिकाच बनविली असती.

पण प्रभा नाईक नावाच्या एका मैत्रिणीच्या ओळखीमुळे वसुंधराबाईंना सर्वप्रथम चित्रपटात काम मिळालं ते माशुकामध्ये. मुकेश व सुरैय्या यांच्या या चित्रात प्रमुख भूमिका होत्या.. त्यांना काम मिळालं ते सुरैय्याच्या मैत्रिणीचं. लक्षात रहावी अशीच ती भूमिका पण चित्रपटाला फार मोठं व्यावसायिक यश लाभलं नाही. पण येथूनच त्यांना चित्रपटांतून कामं मिळू लागली. आकाश, दर्दे दिल, अब देहली दूर नही यासाररूया कितीतरी चित्रपटांतून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका मन लावून केल्या.

आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘श्यामची आई’ मध्ये श्यामच्या काकूचं काम दिलं. त्यांच्याच महात्मा फुलेमध्ये त्या बालविधवा बनल्या. ‘पोस्टातली मुलगी’ मध्ये उषा किरण यांच्या सावत्र आईची त्यांची भूमिका बरीच गाजली. ज्येष्ठ अभिनेते धुमाळ त्यांत त्यांचे पती होते. विशेष म्हणजे प्रथमच त्यांना पडद्यावर गायची संधी लाभली होती. ‘कुलदैवत’ व ‘शशी’मधीलही भूमिकांचं असं कौतुक झालं आणि मग चित्रसृष्टीत त्यांचं असं वेगळे स्थान निर्माण झालं ‘अजब तुझे सरकार, नाव मोठं लक्षण खोटं, लक्ष्मण रेषा आणि दाम करी काम यासारख्या चित्रपटातील भूमिकांनी मात्र त्यांना चांगलं समाधान दिलं.

वसुंधरा पौडवाल यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं ते नाटय निकेतनच्या ” भटाला दिली ओसरी ” या नाटकात. मो. ग. रांगणेकर या नाटकाचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक. त्यांनीच वसुंधराबाईना रंगभूमीवरील अमिनयाचे पहिले धडे दिले, त्या त्यांना म्हणूनच गुरुस्थानी मानत असत. नाटय निकेतनमध्ये त्यांचा चांगलाच जम बसला. मुख्य म्हणजे त्यांच्या अंगच्या अभिनयाचा उत्तम विकास झाला. नाट्य निकेतनच्या भटाला दिली ओसरी, लीलाव, भूमिकन्या सीता राधामाई, अमृत व माझे घर या सारख्या गाजलेल्या नाटकातील त्यांच्या भूमिकांचाही चांगलाच बोलबाला झाला. त्यामुळे पुढं मराठी रंगभूमीवर त्यांना सातत्यानं काम मिळत गेली.

बाबुराव गोखले लिखित व दिग्दशित ‘करायला गेलो एक आचार्य अत्रे यांचं प्रीति संगम यासारख्या खूप गाजलेल्या नाटका तील वसुंधराबाईंच्या भूमिका तर संस्मरणीय ठरल्या. खणखणीत आवाजात संवादफेक करणार्या वसुंधराबाई एंट्रीला टाळी घेत. राघामाई मधील त्याची यशोदा देखील अशीच लक्षात राहिली ती त्यांच्या सौजन्यशील सौम्यशीतल व्यक्तिमत्वामुळं पण हीच सालस सात्त्विक यशोदा प्रीतिसंगममध्ये कजाग सासूच्या भूमिकेतही तेवढीच समरसून जाई म्हणूनच भाबड्या, भाविक प्रेक्षकांचे शिव्याशाप त्यांना खावे लागत. अर्थात वसुंधराबाईंच्या अंगच्या कलागुणांचा विचार करता त्यांच्या वाट्याला फारच थोड्या भूमिका आल्या की त्यातं त्यांच्या अभिनयाला आव्हान लाभलेलं आहे. पण त्यांनी भूमिकेची कधी लांबी रुंदी पाहिली नाही. मोजली नाही. वाट्याला आलेली भूमिका सन लावून करायची. आपलं कसब त्यात ओतायचं एवढंच त्या जाणतात त्यामुळंच आजही त्यांना सतत काम मिळतच आहे.

श्री स्टार्सच्या ‘करायला गेलो एक मध्ये त्या झेलमची भूमिका करीत असत तेव्हा त्यांच्या एंट्रीकडे प्रेक्षकांचे डोळे लागलेले असत. कारण एक तर रंगभूषेनं, वेषभूषेनं त्यांचं सौंदर्य खुले आणि दुसरं म्हणजे त्यांचा अभिनय दिलखुलास असे. एक दोन नव्हे चांगल्या दोनशे प्रयोगात त्यांनी ही झेलम रंगविली, गाजविली. आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीति संगम’ चे साडे सहाशे प्रयोग त्यांनी रंगविले. ‘संत सखू’च्या जीवनावरील या नाटकात त्यांची कजाग सासू हेही प्रमुख वैशिष्ट्य ठरलं होतं.

वसुंधरा पौडवाल यांनी संत तुलसीदास, महाभारत, दर्दे दिल, माशुक, बगदाद का चोर, श्यामची आई, महात्मा फुले, दाम करी काम, पोस्टातील मुलगी, नंदादीप, लक्ष्मणरेषा, माझा होशिल का भाग्यवती मी या संसारी, गारंबीचा बापू, बाईल वेडा, फटाकडी, हळदी कुंकू, आयलय तुफान दर्याला, चुडा वाहते मी समिदरा, हिरवा चुडा आणि श्रीमंत मेहुणा पाहिजे यासारख्या हिंदी-मराठी चित्रपटांबरोबरच भटाला दिली ओसरी, लीलाव, भूमिकन्या सीता, माझे घर, राधामाई, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, प्रीती संगम, हंगामी नवरा पाहिजे, अकुलिना, संतोषीमाता, प्रेयसी मी ब्रह्मचाऱ्याची, मिळवती मुलगी व करायला गेलो एक यासारख्या नाटकांतूनही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या. या खेरीज संशय कल्लोळ, स्वयंवर, हॅम्लेट, मानापमान तुझं आहे तुजपाशी व सौभद्र यासारख्या मराठी रंगभूमीवर इतिहास घडविणाऱ्या नाटकातूनही त्यांनी कामं केली.

वसुंधरा पौडवाल यांचे २० मार्च १९९७ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..