नवीन लेखन...

सत्पात्री दान

नुकतीच एक बातमी वाचली की मुंबईतील भिकारी दरवर्षी रुपये १८० कोटी कमावतात. काय हा दानशूरपणा! खरोखरच भीक मागणे हा सुध्दा एक मोठा उद्योगच झालेला आहे.

मी लहान असताना माझ्या वडलांनी मला एक सत्य घटना सांगितलेली आठवते. माझे वडील सरकारी नोकरीत असताना तेव्हा त्यांना वारंवार मिरज पुणे प्रवास करायला लागायचा. त्याकाळी फक्त दोन तीनच रेल्वेगाड्या असायच्या. या गाड्यांमध्ये एक भिकारी वर्षानुवर्षे नियमितपणे भीक मागायचा. तो म्हातारा झाल्यावर एकदा एका प्रवाशाने कुतुहलाने त्याला त्याची माहिती विचारली. ती खरोखरच थक्क करणारी होती. त्या भिकार्‍याने वर्षानुवर्षे भीक मागुन मुलांचे शिक्षण तर केलेच पण घोरावाडी स्टेशनच्या समोर एक बंगलादेखील बांधला होता. तेथून गाडी जाताना त्याने तो दाखवलादेखील. तो म्हणाला, ‘आता मुले म्हणतात की बाबा बास झाले. आम्ही आता चांगले कमावते आहोत. शिवाय तुमचेही वय झाले त्यामुळे आता भीक मागणे सोडा. पण आयुष्यभर मी हेच केले त्यामुळे चैन पडत नाही.’

आपल्यापैकी बर्‍याच जणांना विविध कारणांनी कधीतरी दान करण्याचा झटका येतो. काहींना वाटते की लोकांनी आपल्याला दानशूर म्हणावे. काहींना पापमुक्तीचा हा एक उपाय करावासा वाटतो. तर काही जण समाजाचे ऋण फेडण्यासाठी वा कोणताही हेतू मनात न बाळगता दान करतात. अर्थात असे लोक फारच कमी असतात. माझा एक मित्र दुसर्‍याला मदत करायला सतत धडपडायचा. मी त्याला नेहमी सांगायचो की तुझ्यासारखे लोक खूप कमी असतात. त्यामुळे अशा लोकांनी दुसर्‍याला मदत करण्यापुर्वी दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत. एक म्हणजे त्या माणसाला त्याची गरज आहे का आणि दुसरे म्हणजे तुम्ही त्याला मदत करण्याची त्याची लायकी आहे का. जर या दोन्ही गोष्टींची उत्तरे होकारार्थी असतील तरच माझ्या मते त्याला मदत केली जावी. जर त्या माणसाला त्याची गरज नसेल तर तुमची मदत निरर्थक ठरते. जर त्याची लायकी नसेल तर तुमची मदत वाया जाते. एखाद्या आळशी माणसाला मदत करुन तुम्ही त्याचा आळशीपणा वाढवत असता. आणि म्हणूनच दान हे सत्पात्री असावे असे म्हटले जाते.

शिवाय असंही म्हटलं जातं की तुम्ही केलेली मदत ही दुसर्‍याला आपल्या पायावर उभी करायला लावणारी असावी, ती त्याला पांगळं करणारी असू नये. तुम्ही त्यांना सतत तुमच्यावर अवलंबून राहायची सवय लावलीत, तर ते आळशी तर बनतीलच पण प्रत्येक वेळी ते तुम्हाला गृहीत धरतील. त्यांचा हाच गैरसमज होईल की त्यांची मदत करणं ही तुमची गरज आहे!

काही वेळेला आपल्याला अशा टिप्पण्या ऐकू येतात की अमक्याने केवळ करसवलतीसाठी दान दिले किंवा तमक्याने गैरमार्गाने पैसा मिळवला आणि आता मारे दान करतोय. आता हे खरे की निखळ दानधर्म हा सगळ्यात चांगला. दानाच्या बाबतीत तर असे म्हटले जाते की उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातास कळू देऊ नये. पण समजा एखाद्याने करसवलतीसाठी दान दिले तर कुठे बिघडले? त्या निमित्ताने का होईना, दान तर दिले जाते. पाऊस सरळ पडला काय किंवा तिरका, पाऊस पडल्याशी मतलब. गैरमार्गाने पैसा मिळवणे हे केव्हाही चूकच, पण त्यातला थोडा पैसा चांगल्या कारणासाठी समाजाला मिळाला तर त्यात वाईट काय? तुम्ही त्याला गैरमार्गाने पैसा कमावण्यापासून रोखू शकत असाल तर जरूर रोखा पण ते शक्य नसेल तर त्याला दानधर्मासाठी प्रवृत्त करा. मी तर म्हणेन की देवाच्या किंवा पापाच्या भीतीने जर त्याने काही हिस्सा दान केला तर ज्या समाजाला त्याने लुटले त्याच्याकडे थोडा तरी भाग परत आला असे होईल.

दान हे कुठल्याही प्रकारचं असू शकतं- अन्नदान, पैसा, कपडे, औषधे, रक्तदान वगैरे. पण आज आपल्याकडे दोन गोष्टी चैन बनल्या आहेत- एक म्हणजे शिक्षण आणि दुसरे म्हणजे आरोग्यसेवा. माझ्या मते वर सांगितलेली पथ्ये पाळुन या दोन क्षेत्रात जर तुम्ही दुसर्‍याला मदत करू शकलात तर ते खुपच चांगले ठरेल. एखाद्या गरीब मुलाला वा मुलीला जर तुम्ही शिक्षणासाठी मदत केलीत तर तुम्ही त्याचे वा तिचे आयुष्य बदलून टाकाल. त्याचप्रमाणे एखाद्या गरीब रुग्णाला जर मदत केलीत तर त्याचे व त्याच्या कुटुंबाचे कल्याण होऊ शकते.

पण त्याचबरोबर आजच्या युगातील सर्वात मौल्यवान गोष्ट दुसर्‍याला देऊन तुम्ही त्याचे आयुष्य उजळून टाकू शकता आणि ती गोष्ट म्हणजे तुमचा वेळ. आजच्या युगात कुणाकडेच वेळ नाही आणि म्हणून ती खूप मौल्यवान चीज झाली आहे. तुम्ही आठवड्यातील एक तास तुमच्या सोसायटीतील एकटे राहणार्‍या वयस्कर लोकांसाठी काढून त्यांना भेटू शकता व गप्पा मारू शकता. अगदी ते एकटे राहात नसतील तरी तुम्ही त्यांना भेटू शकता कारण ते जरी इतरांबरोबर राहात असतील तरी ते एकाकीच असतील, कारण त्यांच्याबरोबर बोलणारे कुणी नसेल. त्यांच्याबरोबर संवाद साधल्यानंतर त्यांच्या सुरकुतलेल्या चेहेर्‍यावरचा आनंद अनुभवा. असं म्हणतात की दानाला घरापासून सुरुवात करावी. त्यामुळे तुम्ही ही सुरुवात तुमच्या घरातील तुमच्या वडीलधार्‍या माणसांपासून करु शकता. तुमच्या वेळेचं दान हे खुपच अमूल्य असेल.

— कालिदास वांजपे

Avatar
About कालिदास वांजपे 11 Articles
कालिदास वांजपे हे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असून ते वित्तपुरवठा, कायदेशीर कागदपत्रांचे ड्राफ्टिंग आणि कंपनी लॉ या विषयात सल्ला सेवा देतात.

2 Comments on सत्पात्री दान

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..