नवीन लेखन...

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी झाला.

गुजराथ मधील आणंद हे त्यांचे गाव. जवळच असलेल्या करमसाद या गावी त्यांची वडिलार्जित शेती होती. वडील झव्हेरीभाई यांच्या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. वडिलांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता. त्यामुळे वल्लभभाई यांच्यावर घरीच राजकीय संस्कार झाले होते. त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि बोरसाड येथे वकिली सुरू केली. वल्लभभाई प्रत्येक केसचा बारकाईने अभ्यास करीत. एक अभ्यासू वकील म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पुढे १९१३ साली ते प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढून बॅरिस्टर झाले. पुढे त्यांनी अहमदाबाद येथे वकिली सुरू केली. उलटतपासणीच्या वेळी ते कसलेल्या साक्षीदाराचीही बोलती बंद करीत. विरोधक कोणते मुद्दे मांडतील याचा अभ्यास करून ते आपला बचाव तयार ठेवत असत. न्यायालयात ते अत्यंत निर्भीडपणे वागत असत. एक निष्णात वकील म्हणून त्यांचा अल्पावधीतच लौकिक झाला. वकिली बरोबरच त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढवली. तिथून त्यांचा राजकारण प्रवेश झाला.

१९१७ मध्ये खेडा जिल्ह्यत प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे खरिपाचे पीक पूर्णपणे गेले. पुढे उंदरांचा सुळसुळाट तसंच अन्य कीटकांमुळे रब्बीचेही पीक गेले होते. २५ टक्क्यांपेक्षाही पीक उत्पादन कमी येईल, अशी परिस्थिती होती. या दुष्काळामुळे शेतसाऱ्याची वसुली पुढे ढकलावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. १८ हजार सह्याचे असलेले एक निवेदन १५ नोव्हेंबर १९१७ रोजी सरकारला देण्यात आले. दयालाल येथील होमरूल लीगच्या सभासदांनी असेच निवेदन सरकारला दिले. परंतु याचा काही उपयोग झाला नाही. इंग्रज सरकारने शेतकऱ्यांवर जप्तीचे आदेश काढले आणि भांडीकुंडी जप्त करून सारावसुली सुरू केली. काही शेतकऱ्यांनी जमिनीचा काही हिस्सा विकून तर काहींनी व्याजाने रक्कम काढून शेतसारा भरला. या अन्यायात शेतकरी भरडला जाऊ लागला. महात्मा गांधी यांनी सक्तीच्या शेतसाऱ्याच्या वसुलीविरोधात खेडा जिल्ह्यतील हजारो शेतकऱ्यांची सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीचे नेतृत्व त्यांनी सरदार पटेल यांच्याकडे सोपविले. सरदार पटेल यांनी ६०० गावांतील हजारो सत्याग्रही शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत निर्धाराने यशस्वी केले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले आणि महात्मा गांधींच्या सहवासात ते वाढले– फुलले आणि एक कणखर, धाडसी नेता म्हणून लौकिकप्राप्त झाले.

महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारविरुद्ध सन १९२०–१९२२ या काळात भारतीय पातळीवर असहकार चळवळ सुरू केली. या सहकार चळवळीत लाखो लोक सामील झाले. या असहकार चळवळीत पं. मोतीलाल नेहरू, सी. आर. दास, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राज गोपालचार्य आणि चिंतामणी केळकर यांनी आपल्या वकिलीचा त्याग केला. न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकला. सन १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून सरदार पटेल यांनी सन १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेतला. इंग्रज सरकारने ९ ऑगस्ट १९४२ च्या पहाटेच गांधीजींसह सरदार वल्लभभाई पटेल, पं. नेहरू, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद, गोविंद वल्लभपंत, असफअली या काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. या वेळी दुसरे महायुद्ध चालू होते. इंग्रज सरकार अडचणीत होते. अमेरिकेच्या मदतीमुळे दोस्त राष्ट्रांचा– इंग्लंड–फ्रान्सचा विजय झाला. तरीही या युद्धात इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताचा राज्यकारभार पाहण्याकरिता काँग्रेस, मुस्लीम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार सप्टेंबर १९४६ साली नियुक्त केले. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत–पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर हिंदू–मुस्लीम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीमध्ये कणखर भूमिका घेऊन त्यांनी जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळिकीविरुद्ध जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लीम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिरपेक्षता होती. दरम्यान, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

स्वतंत्र भारताचा राज्य कारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती. सरदार पटेल यांनी तत्कालीन ५६५ संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला. सरदार पटेल यांची ही मोठी ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांच्या या कामगिरीने सरदार पटेल खऱ्या अर्थाने पोलादी पुरुष आहेत हे इतिहास सिद्ध झाले.

इंग्लंडचे माजी पंतप्रधान चर्चिल हे भारतद्वेषी होते. भारताच्या विरुद्ध कट–कारस्थानं करण्यात इंग्लंडच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चिल आघाडीवर होते. भारतातील ५६५ संस्थानांचं स्वतंत्र राज्य असावं अशी चर्चिल यांची योजना होती. त्यांची ही योजना पटेल यांना अस्वस्थ करीत होती. चर्चिल यांच्या योजनेनुसार कॅबिनेट मिशनने १२ मे आणि १६ मे १९४६ रोजी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. पहिल्या घोषणेनुसार जेव्हा ब्रिटिश भारतात एक किंवा दोन सरकारं अस्तित्वात येतील तेव्हा राजसत्तेचा संस्थानांवरचा अधिकार आपोआपच संपेल. या राज्यांनी मांडलिकत्व स्वीकारताना ब्रिटिश राजसत्तेला दिलेले अधिकार त्यांना परत दिले जातील. ही राज्यं नंतर नव्या सरकारबरोबर संघराज्यात सामील होतील किंवा स्वतंत्र राजकीय व्यवस्था निर्माण करतील. यामुळं हे राजे एका रात्रीत स्वतंत्र राजे होतील; ही स्थिती अतिशय धोकादायक आहे हे पटेलांनी तात्काळ ओळखले. १६ मे १९४६ रोजी ब्रिटिशांनी पत्रक काढून या संस्थानांच्या सार्वभौमत्वावर जवळपास शिक्कामोर्तब केलं. या राज्यांचं स्वामित्व ब्रिटिश राजसत्ता स्वत:कडे ठेवणार नाही आणि नव्या सरकारकडे ते देणार नाही, असं या पत्रकात म्ह्टलं होतं. याप्रमाणे चर्चिल यांना भारतातील ५६५ संस्थानांचं ‘प्रिन्सेस स्थान’ करायचं होतं. म्हणजे चर्चिल यांना जाता जाता भारताचे अधिकाधिक तुकडे करून भारत दुबळा करायचा होता. पोलिटिकल डिपार्टमेंटचे सचिव कॉनराड कोरफिल्ड यांनी २६ मार्च १९४७ रोजी माऊं टबॅटन यांच्या स्टाफ मिटिंग वेळी सांगितलं की, भारतीय संघराज्यात काही संस्थानांनी सामील व्हायचं नाही असा कट रचला होता. आणि या कटाला आपला पाठिंबा होता. अशा संस्थानिकांची एक तिसरी शक्ती उभी करण्याचा आपण प्रयत्न करीत होतो. चर्चिल यांच्या कल्पनेतील ‘प्रिन्सेसस्तान’ ते हेच होतं. संस्थानांच्या विलिनीकरणात सरदार पटेल यांनी जी कणखरता दाखवली तिचं महत्त्व या पाश्र्वभूमीवर लक्षात येतं.

२ सप्टेंबर १९४६ ते १५ डिसेंबर १९५० या काळात सरदार पटेल गृहमंत्री होते. पंतप्रधान पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात तीव्र मतभेद होते. हे मतभेद प्रबळ व्यक्तित्ववाद, दृष्टिकोन आणि कार्यपद्धती यांतील फरक यामुळे होते. गांधी, पटेल आणि नेहरू यांच्यात कितीही मतभेद असले तरी या तिघांचे राष्ट्रहिताचे विचार परस्परांना पूरक होते. गांधींनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. पटेलांनी या लाखो लोकांना संघटित केलं. एक लढाऊ शक्ती उभी केली. हे तिघंही अत्युच्च ताकदीचे नेते होते. तिघांमध्येही प्रचंड ऊर्जा होती. तिघांनीही देशासाठी मोठा त्याग केला. सरदार पटेल नेहरूंबरोबर स्वातंत्र्यसंग्रामात ३० वर्षे खांद्याला खांदा लावून इंग्रजांविरुद्ध लढले होते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना सोडून जाणे पटेल यांच्या मनाला योग्य वाटत नव्हतं. राजकीय मतभेद असले तरी नेहरूंवर त्यांचं धाकटय़ा भावांसारखं प्रेम होतं. पटेल यांनी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात आपलं मन मोकळं केलं आहे. ते म्हणतात, कोणत्याही दोन प्रामाणिक सहकाऱ्यांत असतात तसे आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण आम्ही परस्परांच्या विरोधात आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. सरदार पटेल मनाने कणखर आणि विचारांचे पक्के होते. सच्चे होते. त्यामुळेच नेहरूंबरोबरच काय, पण गांधीजींबरोबरचे मतभेद व्यक्त करायलाही ते कचरत नसत. सरदार पटेल यांना मंत्रिमंडळात घेताना नेहरूंनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. ते या पत्रात म्हणतात, ‘‘तुम्हाला मी केवळ औपचारिकता म्हणून हे पत्र पाठवीत आहे. खरं तर माझ्या मंत्रिमंडळाचा तुम्हीच सर्वात भक्कम आधार आहात’’. या पत्राला पटेल यांनी नम्रपणे नेहरूंना पत्र पाठवून उत्तर दिले. या पत्रात सरदार पटेल म्हणतात, ‘‘गेल्या ३० वर्षांतील आपली मैत्री आणि आपण एकत्रितपणे केलेलं कार्य पाहता आपल्यात कुठलीही औपचारिकता असूच शकत नाही. तुम्ही देशासाठी एवढा त्याग केलाय की, तुमच्यावरील माझं प्रेम आणि निष्ठा अखेपर्यंत कायम आणि वादातीत राहील. तुमच्यासाठी मी कायम उपलब्ध आहे. आपलं ऐक्य अभंग राहील आणि तीच सर्वात मोठी शक्ती आहे.’’

सरदार पटेल यांचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..