नवीन लेखन...

सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके

“श्रीकृष्ण खंडेराव कोंडके म्हणजेच दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईमधील नायगाव परिसरातील एका गिरणी कामगाराच्या घरी झाला. त्यांचा जन्म गोकुळाष्टमीच्या दिवशी झाल्यामुळे त्यांचे नांव श्रीकृष्ण ठेवले. लहानपणापासून दादा वात्रट असल्यामुळे मस्ती खूप करायचे. ते ज्या विभागात रहात म्हणजे परळ -नायगाव भागात खोड्या आणि भांडणे करणारा म्ह्णून दादाची त्या परिसरात खरी ओळख होती. त्यांच्या रोजच्या मस्तीला त्यांची आई सखुबाई खूप वैतागाची. आपल्या मुलाचे कसे होणार ह्यामुळे त्यांच्या आईवडिलांना चिंता होती. त्यांचे वडील गिरणीत कामाला होते. सतत गुंडगिरी करणाऱ्या मित्रांच्या सहवासात असल्यामुळे त्यांचे अभ्यासात कधीच लक्ष नव्हते.

आपल्या मुलाची मस्ती कमी व्हावी म्ह्णून त्यांना ‘ अपना बझार ‘ मध्ये नोकरीला लावले . पुढे ते राजाराम गोलटकर या नवीन चित्रपट दिग्दर्शकाकडे नोकरीला लागले त्या चित्रपटाची ‘ सलगता ‘ लिहीण्याचे काम त्यांच्याकडे होते परंतु त्यांच्या हातून सतत चुका झाल्यामुळे त्यांना बोलणी खावी लागत होती. या दरम्यान त्याच्या वडिलांचे आणि पाठोपाठ आईचे निधन झाल्यावर दादांनी शिक्षणाला रामराम ठोकला.

त्यांच्या जवळ असलेल्या श्रीकृष्ण बँड पथकात त्यांचे येणे-जाणे होते. बँड पथकाच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्र सेवादलाच्या कार्यालयात मोठमोठ्या व्यक्ती येत असत त्यांना जवळून पाहता यावे म्ह्णून दादा सेवादलामध्ये भरती झाले. दादा त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम भागही घेऊ लागले आणि तेथेच त्यांची निळू फुले आणि राम नगरकर यांच्याशी मैत्री झाली.

पुढे ते कलापथक बंद झाल्यावर दादांनी ठरवले आपण स्वतःच निर्मिती करावी आणि एखादे लोकनाट्य रंगभूमीवर आणायचे. जवळ पैसे नसल्यामुळे यांनी काही मित्रांकडून पैसे उसने घेतले आणि वसंत सबनीस यांनी लिहिलेले ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ हे लोकनाट्य दादांनी रंगभूमीवर सादर केले. दादा कोंडके यांनी साकारलेली हवालदाराच्या भूमिका तुफान गाजली. प्रत्येक प्रयोगाला त्यादिवशी किंवा जवळपास घडलेल्या घटना , त्या प्रसंगावर विनोदी कोट्या असल्यामुळे ते लोकांना आवडले आणि ते अनेकांकडून परत परत बघीतले गेले . राजकीय लोकांवर टीका-टिप्पणी करत त्यामुळे तो प्रयोग रंगात येत असे. ‘ विच्छा ‘ मुळे दादा कोंडके हे नांव सर्वाना परिचित झाले. त्यांचे लोकनाट्यातील यश बघून भालजी पेंढारकर खूश झाले आणि त्यांना त्यांच्या ‘ तांबडी माती ‘ या चित्रपटात घेतले. हा चित्रपट फारसा चालला नाही.

पुढे दादांना भालजी पेंढारकर यांनी चित्रपटनिर्मितीचा सल्ला दिला. परंतु अनेक अभिनेत्रीनी दादांबरोबर काम करण्यास नकार दिला तेव्हा दादांनी उषा चव्हाण यांना नायिकेची प्रमुख भूमिका दिली. पुढे त्यांची ही जोडी खूप गाजली. या चित्रपटाचे नाव होते ‘ सोगाड्या ‘ . ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते गोविंद कुलकर्णी यांनी. भालजी पेंढारकर यांच्या सांगण्यावरून दादांनी अर्धी विजार , गुडघ्यापर्यंत लोंबणारी नाडी आणि सैल सदरा असा ‘ नायक ‘ साकारला आणि त्या नायकाला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले परंतु चित्रपट प्रदर्शित व्ह्यायच्या आधी दादांनी अनेक खटपटी करून तो ‘ भानुविलास ‘ मध्ये लावला आणि त्याने चक्क रौप्य महोत्सव साजरा केला. सलग २५ आठवडे चालला . दादांनी मराठी , हिंदी मध्ये सलगपणे १९ चित्रपट निर्माण केले, आणि त्यामध्ये भूमिकाही केल्या. दादांनी आपल्या नऊ चित्रपटांची ‘ सिल्वर ज्युबिली ‘ साजरी केली आणि त्याची नोंद ‘ गिनीज वल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ‘ झाली.

दादा कोंडके यांच्या चित्रपटात डबल मिनींगची वाक्य असतात म्हणू त्यांचा सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचा नेहमी वाद होत असे. परंतु दादा जबरदस्त बुद्धिमान होते ते बोलता बोलता असा शब्द फिरवत की ऐकणारा आपण आधी काय ऐकले ह्यावर विश्वास ठेवू शकत नसे. ह्याचा अनुभव मी घेतला आहे . वरळीच्या करिअर डबिंग स्टुडिओमध्ये मी आणि माझा मित्र प्रवीण दवणे त्यांच्या ‘ ह्योच नवरा पाहिजे ‘ या चित्रपटाचे डबिग चालू होते , तेव्हा तेथे गेलो होतो. बलात्काराच्या प्रसंगाचा सीन होता हा सीन जयश्री टी जी या चित्रपटाची नायिका होती आणि मोहन कोठीवान ह्या दोघांचे डबिंग चालू होते त्यावेळी जयश्रीबाई यांनी उत्तमपणे डबिंग केले तेव्हा दादा पटकन तीन शब्दांचे एक वाक्य बोलले आणि आम्ही एकमेकांकडे चमकून पाहिले. दादांना लक्षात आले की आपण भलतेच बोलूवून गेलो आणि क्षणार्धात त्या शब्दाची फोड अशी केली की त्यांच्या वाक्याचा अर्थच बदलून गेला. अर्थात मी तो शब्द इथे सांगू शकत नाही. दुसरा प्रसंग नगारा वाजवण्याचा होता , स्टुडिओमध्ये नगारा नव्हता करणार काय ? क्षणार्धात दादा त्या माईकसमोर गेले स्वतःचा शर्ट वर करून स्वतःचे पोट माईकसमोर आणून असे वाजवले की नगार्याच्या आवाजाचे फिलींग निर्माण झाले असे दादा कोंडके . रेकॉर्डिंग रूम मध्ये त्यांना त्या चार तासात मी स्वस्थ एका जागी बसलेले काही पाहिले नाही. ते सतत काही ना काहीतरी करत होते , कुणाला तरी सूचना देत होते , तर कुणाशी बोलत होते.

दादा कोंडके यांनी वीस चित्रपटात कामे केली, तांबडी माती , सोगाड्या , एकटा जीव सदाशिव , आंधळा मारतो डोळा , ह्योच नवरा पाहिजे , एकटा जीव सदाशिव , तुमचं आमचं जमाल , मुका घ्या घ्या मुका तर हिंदीत अंधेरी रात मे दिया तेरे हात मे , खोल मेरी जुबान , आगे की सोच या हिंदी चित्रपटात तर गुजरातीमध्ये चंदू जमादार आणि राम राम आमथाराम ह्या चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या.

दादा कोंडके यांनी काही भाषणेही केली ‘ शिवसेनेच्या ‘ सभेत. तीपण खूप गाजली.

दादा कोंडके यांच्यावर खूप काही लिहू शकतो परंतु एकच सांगतो परत दादा कोंडके होणे नाही.

दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी अचानक दादर येथे निधन झाले आणि मराठी चित्रपटाला संजीवनी देणारा निर्माता , कलाकार आपल्यातून निघून गेला.

मनात विचार येतो आज दादा हयात असते तर त्यांना किती नमुने मिळाले असते आणि त्यावेळी आपल्या ‘ शेणसार ‘विभागाबरोबर त्यांची किती झुंपली असती .

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..