नवीन लेखन...

राजमुकुटाची चोरी

खारच्या सोळाव्या रोडवरील “निवांत” ह्या बंगल्यात नेहमीप्रमाणेच शांतता होती.
तो बंगला खाजगी डिटेक्टीव्ह यशवंत धुरंधर ह्यांचा होता.
बंगल्यात ते, त्यांचा भाचा व मदतनीस चंद्रकांत नवलकर, त्यांच्या घराची व्यवस्था पहाणाऱ्या आत्या नसलेल्या पण आत्याबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वयस्क बाई, सदू नांवाचा एक अर्धवेळ काम करणारा पण तिथेच रहाणारा व शिकणारा गडी, रहात.
निवांत जरी निवांत असला तरी निवांतकडे एक एसयुव्ही वेगाने येत होती आणि त्यांत बसलेले दिवाण अस्वस्थ होते.
ती गाडी निवांतसमोर येऊन उभी राहिली.
तेव्हा यशवंत भाच्याला म्हणाले, “चंदू, बाहेर जाऊन दिवाणजींचे स्वागत कर आणि त्यांना आंत घेऊन ये.”
चंदू गोंधळला.
त्याने विचारले, “हे कोण दिवाणजी ?”
यशवंत हंसले आणि म्हणाले, “अरे, मध्यप्रदेशमधील XXपूर संस्थानचे दिवाण आहेत ते.
आत येतांच ते ओळख करून देतीलच की स्वत:ची.”
दिवाणजी सोफ्यावर घाम पुसत बसले व आत्याबाईंनी ठेवलेल्या ग्लासातील पाणी घटाघटा प्याले.
दिवाणजी चंदुकडे पहात होते.
यशवंत म्हणाले, “बोला दिवाणजी ! इथलं बोलणं बाहेर जाणारं नाही.”
दिवाणजींनी घसा खांकरला व बोलायला सुरूवात केली, “तुम्हाला कसं कळलं की मी दिवाण आहे ते ?”
यशवंत म्हणाले, “दिवाणजी, राजमुकुटाच्या चोरीची बातमी बाहेर जाऊ नये म्हणून तुम्ही खूप आटापीटा केलात पण एका सायंदैनिकाने दोनच ओळींची बातमी दिली आहे.
त्यासंबंधात महाराज कोणाला तरी माझ्याकडे पाठवणार याची मला खात्री होती.
एका कार्यक्रमांत आपला व त्यांचा फोटो मी पूर्वीच पाहिला होता.”
दिवाणजी म्हणाले, “माझे वडिल संस्थानचे दिवाण होते.
ते गेल्यानंतर गेली वीस वर्षे मी कारभार सांभाळतोय.
एक रूपया इकडचा तिकडे होत नाही.
आता ही चोरी झाली ! कशी झाली समजत नाही.”
यशवंत म्हणाले, त्याबद्दल असणारी सर्व माहिती सांगा तुम्ही.
अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीही सांगा.”
दिवाणजी म्हणाले, “राजमुकुट संस्थानच्या म्युझियममध्ये असतो, हे सर्वांना माहित आहे.
म्युझियमच्या दुसऱ्या मजल्यावर एका छान कपाटांत आम्ही तो ठेवतो.
रत्नजडीत मुकुट हे म्युझियमचं प्रमुख आकर्षण आहे.
ब्रिटनच्या राजाच्या मुकुटाहून तो छान आहे.”
यशवंत म्हणाले, “कधी लक्षात आलं ? किती तारखेपर्यंत मुकुट म्युझियममध्ये होता ? म्युझियम प्रेक्षकांसाठी फक्त दुपारी दोन ते पांचच खुला असतो ना !”
दिवाणजींनी मान डोलावली“
“सुरक्षेची काय व्यवस्था ?” यशवंतनी विचारले.
दिवाणजी म्हणाले, “त्याचं असं आहे की दुसऱ्या मजल्यावरचा मुकुट हा नकली आहे.
अगदी खऱ्या मुकुटासारखाच वाटतो पण खरा मुकुट पहिल्या मजल्यावरील एका तिजोरीत बंद होता.
नकली मुकुट अजून दुसऱ्या मजल्यावरच आहे.
ते कपाट सहज उघडतां येऊ शकेल.
पहिल्या मजल्यावरील तिजोरी उघडणे सोपे नव्हते.
त्यासाठी पासवर्ड होता व तो फक्त महाराज आणि राणीसाहेब ह्या दोघांनाच माहित होता.
तो पासवर्ड इंग्रजी अक्षरे व अंक मिळून तयार केला होता.”
यशवंत म्हणाले, “तो पासवर्ड त्यांनी कुठे लिहून ठेवला होता कां ?”
दिवाणजी म्हणाले, “दोघांनीही तो आपल्या खाजगी डायरींत लिहून ठेवला होता.”
“आणि कांही ?” दिवाणजी म्हणाले,
“दुसरे म्हणजे मुकुटाच्या रचनेत “टॅग” होता.
जर तो बाहेर नेला तर मोठा “अलार्म” होईल असा.
त्यामुळे तो बाहेर नेणे कठीण होते.”
यशवंत म्हणाले, “तो तिजोरीत असतो, हे आणखी कोणाला माहित होते कां ?”
दिवाणजी म्हणाले, “बहुदा नाही परंतु महाराजांची सापत्न माता देविकाराणी ह्यांना ठाऊक असण्याची शक्यता आहे.”
“महाराजांना त्यांचा संशय आहे कां ?”
“खरं सांगायचं तर त्यांच्यावरच संशय आहे.
म्हणूनच ही बातमी सर्वत्र करण्यांत आली नाही.
कारण चोर जर घरांतच असला तर नंतर बेअब्रू होणारच.”
“मग देविकाराणींना टॅगबद्दलही माहिती होतं कां ?.”यशवंत म्हणाले.
दिवाणजी म्हणाले, “पासवर्ड मिळवला असेल तर त्यांना टॅगबद्दलही माहिती बहुदा असेलच.”
यशवंत म्हणाले, “महाल आणि म्युझियम वेगळ्या इमारतीत आहेत. ते कुठे जोडले आहेत कां?”
दिवाणजी म्हणाले, “हो ! तो जोडणारा रस्ता भुयारी आहे.
महाराजांच्या दालनातील एका दरवाजांतून जिना खाली जातो.
दालनांत एक मोठ्ठी फोटोफ्रेम आहे.
तिच्या मागे त्या दरवाजाची कळ आहे.
तिथून थेट म्युझियमच्या पहिल्या मजल्यावर रस्ता जातो.
तिथेही तो अशाच कळीच्या दरवाजाने उघडतो.”
यशवंतनी विचारले, “तिथून जर मुकुट नेला असला तर ?”
“नाही नेता येणार. कारण त्या रस्त्याने नेल्यासही टॅगमुळे अलार्म झालाच असता.”
“बरं ! महालांत आणखी कोणाकोणाचा वावर असतो ?”
दिवाणजी उत्तरले, “दोन दासी आहेत.
एक देविकाराणीं बरोबर रहाते.
दुसरी राणीसाहेबांची दासी.
ती सकाळी आठ ते रात्री आठ असते.”
यशवंत भेट संपवत म्हणाले, “दिवाणजी, आम्ही उद्या सकाळी कारने प्रवासाला निघू.
दोन वाजेपर्यंत पोहोचू.
आम्ही प्रत्यक्ष पाहूनच प्रकरणाचा छडा लावू.
महाराजांना निर्धास्त रहायला सांगा.”
दिवाणजींना दरवाजापर्यंत सोडायला यशवंत आणि मागोमाग चंदू दोघे गेले.
दार बंद करून परत आल्यावर चंदू म्हणाला, “मामा, हे घरांतलच काम आहे नक्की ! दिवाणजींचही असू शकतं !”
यशवंत म्हणाले, “दिवाणजी पिढीजात आहेत आणि गेली वीस वर्षे दिवाण आहेत.
तेव्हा ते नसावेत ह्यांत.
कळेलच आपल्याला तिथे गेल्यावर.”
चंदू म्हणाला, “तुमचा अंदाज काय आहे ?”
यशवंत म्हणाले, “चंदू, इतकी वर्षे माझ्याबरोबर काम करून तुला समजले नाही कां ? मी अंदाज बांधत नाही. मी सत्य शोधतो.”
चंदू थोडा शरमला आणि म्हणाला,
“मामा, मला विचारायचं होतं की आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून तुम्ही तर्काने कोणता निष्कर्ष काढला आहात ?”
यशवंत आरामांत कोचावर रेलत म्हणाले, “एक गोष्ट निश्चित आहे की तो राजमुकुट अजून त्या म्युझियममध्येच आहे.
तो जर बाहेर नेण्याचा प्रयत्न झाला असता तर अलार्म झाला असतां.”
चंदू म्हणाला, “बरोबर आहे पण ह्यांनी तर म्युझियमचा काना कोपरा शोधलाय ना !”
यशवंत म्हणाले, “हो. त्यांनी शोधलाच आहे पण आपण तिथेच परत आपल्या पध्दतीने शोधू.
उद्या ड्रायव्हरला बोलावून घे.”
“नको मामा ! ड्रायव्हर कशाला ?
मी आहे की ! जाऊ आपण रमत गमत.
बरं बॅगेत किती दिवसांचे कपडे घेऊ ?”
यशवंत म्हणाले, “आपण परवांच परत यायचं आहे. परवा सकाळी परत निघू.”
चंदूचा मामांवर पक्का विश्वास होता.
तो बॅगा भरायला निघणार, तोंच आत्याबाईंनी संध्याकाळचं जेवण तयार असल्याचे कळवले.
दुसऱ्या दिवशी पहाटेस ते दोघे निघाले.
वाटेत दोघांचे फारसे बोलणे झाले नाही.
यशवंतांनी कारमधला एसी बंद ठेवून कांचा खाली घेतल्या होत्या.
हवा अत्यंत आल्हाददायक होती.
दोन्ही बाजूला हिरवी किंवा पिवळी शेते डुलत होती.
चंदूने वाटेत एका ठिकाणी धाब्यावर कार थांबवली आणि दोघांनी नाश्ता केला. चहाही घेतला.
यशवंत तिथली वर्तमानपत्र पहात होते.
एका सिक्युरीटी कंपनीची जाहिरात पहात यशवंतानी मोबाईलवर वेळ पाहिली. मग आपल्या सिक्युरीटी कंपनीचा मालक असणाऱ्या मित्राला फोन केला.
फोनवर मित्राचा आवाज ऐकताच ता म्हणाले, “अशोक, झोपेतून उठवलं कां मी तुला ?”
अशोक म्हणाला, “ती तुझी होस्टेलपासूनची संवय आहे ना!
बोल. मी आज मगाशीच उठलोय.”
यशवंत म्हणाले, “एखाद्या वस्तूशी अलार्म टॅग केला असेल आणि एरिया मार्क केला असेल तर तें सर्किट तोडतां येते कां ?”
“येते पण त्याच सिक्युरीटी कंपनीच्या मदतीशिवाय नाहीच.”
अशोकने सांगितले.
यशवंतनी त्याला विचारलं, “तू सांगणार नाहीस, हे माहित आहे तरी विचारतो, अलिकडे कुणी तुमच्याकडे अशी विनंती घेऊन आलं होतं कां ?”
अशोक मोठ्याने हंसला आणि म्हणाला, “तू आधीच ‘मी उत्तर देणार नाही’ म्हणत प्रश्न विचारला आहेस.
तरी मी मगाशी दिलेली माहिती पूर्ण करतो.
तीच सिक्युरीटी कंपनी तो टॅग काढू शकते.
तसंच ती कंपनी हेही पहाते की टॅग काढण्याची विनंती त्याच किंवा त्याच व्यक्तीच्या वा संस्थेच्या अधिकृत जबाबदार प्रतिनिधीतर्फे ती आली आहे.
वाटेल तो सोम्या-गोम्या पैसे देऊन टॅग काढून मागेल तर आम्ही देत नाही.”
“धन्यवाद, अशोक. तू नेहमीच मला परीक्षेचा पेपर सोडवायची प्रक्टीस द्यायचास.”
यशवंतनी हंसत हंसत फोन खाली ठेवला.
ते चंदूला म्हणाले, “सावकाश ने गाडी. तो मुकुट लागलीच त्या म्युझियममधून बाहेर जाऊ शकत नाही.
XXपूरला येऊन चंदूने गाडी महालाच्या पोर्चमध्ये लावली.
सदू त्यांचे सामान घ्यायला आला पण फक्त चंदूच्या हातांत एक शोल्डर बॅग होती.
तीच त्याला मिळाली.
दिवाणजी पुढे आले. “चला, महाराज वाट पहात आहेत.”
यशवंत म्हणाले, “दिवाणजी, महाराजांकडे जाण्याआधी आपण पांचच मिनिटे म्युझियममध्ये जाऊन येऊया.”
दिवाणजी त्यांची विनंती नाकारू शकले नाहीत.
चंदू, यशवंत आणि दिवाणजी तिघे म्युझियममध्ये गेले.
यशवंत म्हणाले, “दिवाणजी, मला प्रथम तो डुप्लिकेट मुकुट दाखवा.”
दिवाणजी त्यांना दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले.
तिथे कपाटांत राजमुकुटाचा डुप्लिकेट चमकत होता.
यशवंत म्हणाले, “जरा कपाट उघडा आणि मला तो मुकुट नीट पाहू द्या.”
दिवाणजींनी एका चावीने कपाट उघडले आणि मुकुट काढून यशवंतांच्या हातांत दिला.
यशवंत तो घेऊन थेट भरभर चालत दरवाजाकडे गेले.
दिवाणजी आणि चंदू मागे धांवले.
यशवंतांनी एक पाऊल बाहेर ठेवलं आणि एकदम आलार्म बेल जोरांत वाजू लागली.
ती महालांतही वाजू लागली.
महाराज आणि महाराणी दोघेही तिथे आले.
यशवंत त्यांच्या हाती तो राजमुकुट देत म्हणाले, “महाराज, हा घ्या तुमचा खरा राजमुकुट”.
महाराज, दिवाणजी आणि चंदू आश्चर्याने पहात होते.
शेवटी महाराज म्हणाले, “यशवंत धुरंधर हे नांव आजपर्यंत ऐकून होतो. आज अनुभव घेतला पण यशवंतराव, हे कसं ओळखलं तुम्ही, तें तर सांगा.”
यशवंत म्हणाले, “खरा राजमुकुट बाहेर गेला नव्हता, हे निश्चित होतं.
शोधूनही तुम्हाला तो सांपडला नव्हता.
चोराने तात्पुरता तो डुप्लिकेटच्या जागी ठेवून डुप्लिकेट तिजोरीत ठेवायचा प्लॅन केला.
डुप्लिकेटच्या जागी खरा मुकुट नेऊन ठेवला पण ऐन वेळी डुप्लिकेट तिजोरीत ठेवायला वेळ मिळाला नाही.
त्यामुळे त्याने तो बाहेर नेला.
डुप्लिकेट मुकुटाला टॅग नव्हता.
आलार्म होण्याची शक्यता नव्हती.
आता हे केलं कुणी ?
तर महाराणींची दासी तिथे रहाणारी नाही.
फक्त तीच डुप्लिकेट मुकुट घेऊन बाहेर जाऊ शकत होती.
देविकाराणींचा ह्यांत संबंध नाही.
देविकाराणींची दासी महालांतच रहाते.
त्यामुळे हे काम महाराणीच्या दासीचे आहे.
तिला अडवून ठेवा.
तिचा बाहेर कोणी साथीदारही असेल.
आपण प्रश्न विचारताच ती तुमची माफी मागेल.”
चंदूने विचारले, “सर, पण तुम्ही त्या सिक्युरिटी कंपनीबद्दल काय बोलत होता ?”
यशवंत म्हणाले, “खरा मुकुट डुप्लिकेटच्या जागी ठेवणाऱ्याला आशा होती की तो दोन दिवसांत टॅग नादुरूस्त करण्याची युक्ती शिकून घेईल आणि मग मुकुटाचा टॅग नादुरूस्त करून तो घेऊन जाऊ शकेल.
पण कंपनीच्या अटीप्रमाणे तें करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे ठरले.
त्यामुळे आता घाई नाही, हे माझ्या लक्षांत आले.”
महाराणींनी आपल्या दासीला बोलावले पण ती “बरं वाटत नाही” असं सांगून वाड्यांतून आधीच निघून गेल्याचे समजले.
दिवाणजी म्हणाले, “तिची तक्रार मी आतां पोलिसांत करीन.”
एवढ्यांत भोजन तयार असल्याची वर्दी आली व सर्वजण समाधानाने धुरंधरांची स्तुती करत जेवायला गेले.
*- अरविंद खानोलकर.*
*ह्या गुरूवारपासून पारंपारिक पध्दतीच्या रहस्यकथा लिहायचे ठरवले आहे. यशवंत मामा हे खाजगी डिटेक्टीव्ह व त्यांचा भाचा चंदू हे सर्व कथांत असणार. हा माझा विनम्र प्रयत्न आहे. वाचक सूज्ञ आहेतच.

अरविंद खानोलकर
https://youtu.be/1UZFr-fl_lA?si=Bxq6V1PP-tSpG0B2
युट्यूबवर शेवटचे वाक्य व तळटीप रेकॉर्ड झालेली नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..