व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली नितीन प्रवीण शिंदे यांची हि कविता
थांग पाणावून गेला सागराचा
तीर जेथे, दूर तेथे जावयाचे.
चांदण्यांचे पंख लाभो, वा न लाभो
काजव्यांना सोबतीला घ्यावयाचे.
तूच नाही एकला मार्गस्थ येथे
जात आहे जन्म ओलांडीत जो तो.
पैल जायाचे कुठे ? ठाऊक नाही
गात आहे आसवे सांडीत जो तो.
राख आहे ही पहा येथे कुणाची ?
हे असे आयुष्य आहे नामधारी.
शून्य मागे, शून्य पुढती लागलेले
फेडणे आहे इथे थकली उधारी.
युद्ध आहे हे स्वतःशी, सज्ज हो तू
घे उचल गांडीव हाती, पार्थ हो तू.
का कसे ? हे प्रश्नं सारे फेर धरतील
प्रश्नं नाही…कृष्ण की तो, अर्थ हो तू.
तीच बोटे, त्याच हातांच्या मुठी या
ओंजळींना शाप आहे मागण्याचे.
नीज झालेली पुरेशी, ऊठ वेड्या
पातले संदेश दारी जागण्याचे.
– नितीन प्रवीण शिंदे
Leave a Reply