नवीन लेखन...

पुराणपुरुष

Image : Kedar Pitkar….

जंगलातल्या मोकळ्या माळावर चरणांरा ‘रानगवा’ एवढ्या बेफिकिरीत वावरत असतो, की तो जणु काही त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राटच आहे. त्याची ताकदच तशी प्रचंड असते. शरिराचा विलक्षण सुंदर घाट आणि पिळदार स्नायू यामुळे तो दिसतोही उत्तम शरीर कमावलेल्या पैलवानासारखा. व्यायामानं जसं पैलवानाचं शरीर चमकत असतं तशीच त्याची त्वचाही चमकत असते. त्याचं ते ‘बेरड’ रूपंच सगळ्या जंगलविश्वाला टरकावत असतं. आपल्या कडे जरी त्याला ‘रानगवा’ किंवा ‘रानहेला’ म्हणत असले तरी सर्वसाधारणपणे त्याला ‘गौर’ म्हटलं जातं. हे गौर जगातले सगळ्यात मोठे ‘वाइल्ड कॅटल’ आहेत. सहा फूट उंचीचा, आठ नऊ फूट लांबीचा, दोन हजार पौंड वजनाचा…. बलवान शिंगांचा तरणाबांड गवा हा अफाट शारीरिक ताकदीचं प्रतिक असतं. गवे हे याक आणि इंडोनेशियन बनतेंग यांच्या कुळातले आहेत व उत्तर अमेरिकेतल्या ‘बायसन’च्या कुळाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे मला अजून कळलंच नाहीये कि आपल्या कडच्या गव्यांना ‘बायसन’ का म्हटलं जातं.

मध्य आणि दक्षिण भारतातल्या जंगलात ते बहुसंख्येने असले तरी नर्मदेच्या दक्षिणेपासून ते पूर्वेतल्या मानस अभयारण्यापर्यंतच्या विस्तृत प्रदेशातही त्यांची वस्ती आहे. वयात आलेल्या गव्याचा रंग गडद तपकिरी असतो. उतरत्या वयात तो काळपट होत जातो. नर आणि मादी दोघांच्याही पायाचा खुराकडचा भाग पांढरे मोजे घातल्यासारखा असतो.

त्यांचा वावर सर्वसाधारणपणे डोंगराच्या कडेच्या जंगलात आणि बाम्बुंच्या दाट बनांच्या परिसरात असतो. ते मुख्यत: गवत खातात पण कोवळे बांबू, जंगली फळांची टरफळं, झाडांची पानही खातात. गवे सकाळच्या पहिल्या प्रहरात आणि तिन्हीसांजेला विशेष कार्यरत असतात. एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना बघणं आणि त्यांची फोटोग्राफी करणं सोयीस्कर असतं. हिवाळ्यात ते दाट जंगलात निघून जातात.

त्यांचा कळप साधारणपणे दहा पंधरा जणांचा असतो. याही पेक्षा मोठा कळप असल्याच्याही नोंदी आहेत. कळपामध्ये गायी, वासरं देखील असतात. पण डिसेंबर-जानेवारी या त्यांच्या विणीच्या काळात मात्र सतत बदल होत असतात. कळपाच्या प्रमुख पदासाठी मत्त नरांमध्ये सतत संघर्ष होत असतो. जंगलात त्यांच्या टकरींचे भयकारी आवाज रात्रभर घुमत असतात. माजावर आलेला नर माद्यांना आकर्षित करण्यासाठी वारंवार वेगळाच आवाज करत राहतो.

आफ्रिकेच्या जंगलात सिंह गव्यांना मारतात. भारतात मात्र वाघ हा त्यांचा एकमेव शत्रू आहे. त्यातही तो मोठ्या वासरांची शिकार करतो. कान्हाच्या जंगलात एका वाघाविषयी मी ऐकलं होतं कि तो फक्त गव्यांचीच शिकार करतो. तो वाघ नक्कीच निष्णात शिकारी असावा.

एकदा मी १९९६च्या जून मध्ये बंदीपूरच्या रानात संध्याकाळी राउंड घेत होतो. माझ्या गाईडने अर्धवट खाल्लेला गवा दाखवला. नक्कीच त्याला वाघाने मारलेलं असावं. मी जीप मधून उतरून रेकॉर्ड साठी काही फोटो काढले आणि परत फिरलो. मला जंगलातले अलिखित कायदे चांगलेच माहित होते. वाघ त्याच्या या शिकारीच्या नक्कीच आजूबाजूला फिरत होता. दुसर्या दिवशी सकाळी त्या मृत प्राण्याचा अजून मोठा भाग खालेल्ला होता. नंतर त्या परिसरात आम्हाला वाघ दिसलाही.

त्याच्या आधल्या वर्षी म्हणजेच मे १९९५ मध्ये मी गव्यांचा कळप बघितला होता. त्यात तीन गायी आपल्या वासरांबरोबर होत्या. मी उत्तेजित होऊन ताबडतोब ते दुर्मीळ दृष्य कॅमेर्यात टिपायला लागलो. खरं म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही की त्यावेळी प्रकाश अगदी कमी होता. त्यात अधिक प्रतिकूल गोष्ट म्हणजे कॅमेर्यामध्ये १०० ए.एस. ए. ची स्लो फिल्म होती व कॅमेरा ट्रायपॉड देखील लावलेला नव्हता. माझ्या बरोबरच्या दुसर्या जीप मध्ये विवेक सिन्हा हे भारतातले नामांकित वाइल्डफोटोग्राफर फोटो न काढता ते अपूर्व दृष्य मस्त एन्जॉय करत होते. त्यांना पक्कं माहित होतं की त्यावेळी काढलेले फोटो अपुर्या प्रकाशामुळे चांगले येणारच नव्हते. तुम्हाला सांगतो की … त्यांच्या सारख्या मास्टर फोटोग्राफरची जंगलातली वागणूक दुरून बघूनही बरंच काही शिकता येत होतं. अगदी एवढी वर्ष भरपूर फोटोग्राफी करूनही मला वाटतं वाइल्डलाइफ फोटोग्राफीत शिकण्याची प्रक्रिया सतत चालू असते…. एवढी वेगवेगळी नाटय जंगलात सतत घडत असतात… आणि मला प्रकर्षानं असंही वाटतं की मीही शेवट पर्यंत विद्यार्थीच राहणार ….

(हा लेख शेअर केलात तर आनंदच होईल … मात्र लेखकाच्या नावासह शेअर करावा)

– हिरा पंजाबी

— शब्दांकन – प्रकाश पिटकर
7506093064
9969036619

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..