नवीन लेखन...

एसआयपीचा पुरेपूर लाभ घ्या

“गितू, इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय ते बघितलं, उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये जानेवारी १९९५ ला १ लाख रुपये गुंतवले असते आणि २ जूलै २०१५ला त्याचे पूर्ण रिडम्प्शन केले असते तर ४७ लाख रुपये मिळाले असते हे बघितलं. इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत याची दखल घेतली. मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते, हा म्युचुअल फंडाचा वैधानिक इशाराही लक्षात घेतला. १९९५ साली फक्त एकदाच केलेल्या १ लाख रुपयाच्या गुंतवणूकीतून हा लाभ झाला खरा, पण विम्याचे हप्ते सहसा दिले जातात वार्षिक पध्दतीने. मग तसंच २५ वर्ष जर इक्विटी म्युचुअल फंडात नियमित गुंतवणूक करत राहिलो असतो तर किती लाभ झाला असता?” विक्रमजीतने विचारले.

“मागच्यावेळी बघितलं, ३५ वर्षाच्या व्यक्तीला २५ वर्षे मुदतीच्या ४० लाख सम अॅशुअर्डच्या एन्डावमेंट प्लॅनसाठी एका कंपनीचा वार्षिक प्रिमियम होतो १,५१,२४० रुपये आणि त्याच कंपनीच्या त्याच मुदतीच्या, ४० लाखाच्याच टर्म प्लॅनसाठी वार्षिक हप्ता होतो ९,८८४ रुपये. एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर बाकीचे १,४१,३५६ रुपये वार्षिक इतके इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात. विमा हप्ता मासिक, त्रैमासिक, वार्षिक असा दिला जातो. म्युचुअल फंडातही गुंतवणूक या पध्दतीने करता येते. दर महिन्याला नियमितपणे म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी ही फार लोकप्रिय पध्दत आहे. तेव्हा एसआयपी म्हणजे काय ते आधी बघू, एन्डावमेंटपेक्षा जास्त लाभ किती होऊ शकेल ते नंतर बघू,” संयोगिता म्हणाली.

“शिस्तशीर जाऊ, ” विक्रमजीतची मस्करी.
“एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ज्या प्रकारे मासिक विमा हप्त्याची रक्कम किंवा बॅंकेतील रिकरींग डिपॉझीटची रक्कम बॅंक खात्यातून परस्पर वळती होते, तसंच एसआयपीद्वारेही बॅंक खात्यातून ठरावीक रक्कम, ठरवलेल्या म्युचुअल फंडात परस्पर गुंतवता येते. याची फ्रिक्वेन्सी दरमहा किंवा त्रैमासिक असते. सहसा दरमहा हा पर्याय निवडला जातो. महिन्यातील १०, १५ इत्यादी एका विशिष्ट तारखेला गुंतवणूकदारांच्या बॅंक अकाऊंटमधून ठरलेली रक्कम डेबीट होते आणि ती ठरवलेल्या म्युचुअल फंडाकडे वळती केली जाते. एसआयपीचा फायदा हा की दरमहा नियमित स्वरुपात म्युचुअल फंडात गुंतवणूक होत राहते. कमीत कमी ५०० रुपयांपासून आपण एसआयपी सुरु करु शकतो. काही फंडात त्याहीपेक्षा कमी रकमेची एसआयपी सुरु करु शकतो. इक्विटी म्युचुअल फंडाबाबत त्याचा एनएव्ही कमी-जास्त होत राहतो. शेअरमार्केट वर गेले तर सहसा एनएव्ही वाढतो, खाली आले तर तो कमी होतो. एनएव्ही कमी झाला असेल तर आपल्याला म्युचुअल फंडाचे जास्त युनिट मिळतात आणि एनएव्ही वर गेला असेल तर कमी युनिट मिळतात, थोडक्यात कधी जास्त भावात खरेदी तर कधी कमी भावात खरेदी यामुळे कॉस्ट ॲव्हरेजिंग होते. ”

“एकरकमी गुंतवणूक ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ही खूपच चांगली सोय आहे. ह्या एसआयपीची मुदत किती वर्ष असते? ”
“ती आपण ठरवू तशी, १ वर्ष, २ वर्ष, १० वर्ष इत्यादी किंवा आपण बंद करा सांगेपर्यत कायमची अशी मुदत राहू शकते. म्युचुअल फंडाला आधी सूचना देऊन कधीही ती बंद करता येते, तसेच मधेच पैसे हवे असतील तर युनिट्सचे रिडम्प्शन करुन पैसे घेऊ शकतो. एसआयपी मात्र पुढे सुरु ठेवू शकतो. ”
“आता एन्डावमेंट प्लॅनच्या तुलनेत किती लाभ मिळेल ते बघू. ”

“एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर वार्षिक १,४१,३५६ रुपये गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात, म्हणजे दरमहा सुमारे ११७५० रुपये. एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये दरमहा ११७५० रुपयांची एसआयपी १० जानेवारी १९९५ला सुरु केली असती आणि जमा झालेल्या सर्व युनिट्सचे ६ जुलै २०१५ला रिडम्प्शन केले असते तर ५ कोटी ८१ लाख रुपये मिळाले असते, म्हणजे एन्डावमेंट प्लॅनपेक्षा सुमारे ५ कोटी जास्ती. एसआयपीद्वारे आपण गुंतवलेल्या एकूण २८ लाख ९० हजार ५०० रुपयांवर हा लाभ झाला असता. फ्रॅन्कलीन इंडिया ब्ल्यूचीप आणि इतरही काही फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमधील एसआयपीमधूनही असा चांगला लाभ मिळाला असता. २० वर्ष ६ माहिने इतक्या दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकीतून हा लाभ मिळाला आहे. समजा एचडिएफसीसी इक्विटी फंडातील हीच एसआयपी १० जानेवारी १९९५ ऐवजी १० जानेवारी १९९९ला सुरु केली असती तर गुंतवलेली रक्कम झाली असती एकूण २३ लाख २६ हजार ५०० आणि रिडम्प्शन घेऊन मिळाले असते २ कोटी १९ लाख ५४ हजार रुपये. लवकरात लवकर गुंतवणूकीला सुरवात करणे किती आवश्यक आहे ते यातून कळतं. बॅंकेतील मुदतठेवीवर चक्रवाढ व्याज मिळतं तेव्हा पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो, तसाच इथे दिसतो. ”

“विमा हा विषय जरा बाजूला ठेऊ. पण एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये १९९५ ला फक्त २००० रुपयांची २० वर्ष मुदतीची एसआयपी सुरु केली असती आणि मार्च २०१५ मध्ये रिडम्प्शन घेतले असते तर ४ लाख ८० हजाराच्या गुंतवणूकीतून १ कोटी रुपये मिळाले असते. २००० रुपयांची एसआयपी सुरु करणं तर कोणालाही सहज शक्य आहे. तसंच इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत त्यामुळे आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्याने गुंतवणूक करावी. ”

वैधानिक इशारा: म्युचुअल फंडाच्या मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते. (सर्व आकडे ढोबळमानाने व केवळ माहितीसाठी)

टीप: लेख मी मराठी लाईव्ह दैनिकात ११ ऑगस्ट २०१५ ला प्रकाशित झालेला आहे.

उदय कुलकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..