नवीन लेखन...

मुंबईतील पृथ्वी थिएटर

५ नोव्हेंबर १९७८ पासून मुंबईतील पृथ्वी थिएटर ची वास्तू रंगभूमीच्या सेवेत रुजू झाली.

शशी कपूर यांच्या चित्रपटांतील योगदानाबद्दल नेहमीच बोलले जाते पण त्यांनी रंगभूमी समृद्ध व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्याकडून राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या तीनही मुलांना चित्रपट व नाटकाचा सांस्कृतिक वारसा मिळाला. त्यापैकी राज व शम्मी कपूर हे चित्रपटांमध्येच जास्त रमले. मात्र शशी कपूर यांनी चित्रपट व नाटक या दोन्ही क्षेत्रांत महत्वाचे योगदान दिले.

पृथ्वीराज कपूर यांनी अनेक चित्रपटांत काम केलेले असले तरी त्यांचे पहिले प्रेम नाटकांवर होते. त्यामुळे १९४४ साली पृथ्वी थिएटर ही नाटक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी दौरे काढून नाटक करीत असे. पृथ्वी थिएटर नाटक कंपनी १६ वर्षे चालली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशातील युवकांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणारी नाटके पृथ्वीराज कपूर सादर करीत असत. त्याचबरोबर हिंदु व मुस्लिम यांच्यात बंधुभाव नांदावा म्हणून पृथ्वीराज कपूर यांनी सादर केलेल्या पठाण या नाटकाचे शेकडो प्रयोग तेव्हा झाले होते. मात्र नंतरच्या काळात चित्रपटांचा इतका बोलबाला सुरु झाला की, नाटक कंपन्यांचे वैभवाचे दिवस ओसरु लागले. त्यामुळे अखेर पृथ्वी थिएटर ही नाटक कंपनी बंद करुन पृथ्वीराज कपूर आपले सारे लक्ष चित्रपटांवर भूमिका करण्यावर केंद्रित केले. आपल्या पृथ्वी थिएटर या नाटक मंडळीला हक्काची वास्तू हवी असे स्वप्न पृथ्वीराज कपूर यांनी कायमच उराशी बाळगले होते. त्यासाठी त्यांनी १९६२ साली जुहू येथील एक प्लॉट लीजवर घेतलेला होता व तिथे ते एक तात्पुरता रंगमंचही उभारला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पृथ्वीराज कपूर यांना पृथ्वी थिएटरची कायमस्वरुपी वास्तू उभारण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे शक्य झाले नाही.

पृथ्वीराज कपूर यांचे २९ मे १९७२ रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेमके काय करावे असे विचार कपूर मंडळी करीत होती. ज्या वर्षी पृथ्वीराज कपूर यांचे निधन झाले त्याच वर्षी नेमके त्यांनी थिएटर बांधण्यासाठी घेतलेल्या प्लॉटच्या लीजची मुदत संपत होती. जुहू येथील तो प्लॉट कपूर घराण्यातील लोक विकत घेतील का अशी विचारणा झाल्यानंतर शशी कपूर व जेनिफर कपूर पुढे आले. पृथ्वीराज कपूर यांचे थिएटर बांधायचे स्वप्न आपण पूर्ण करायचे असा मनाशी निर्धार करुन तो प्लॉट शशी कपूर यांनी विकत घेतला.

वेद सेगन या वास्तुविशारदाने रंगभूमीच्या साऱ्या गरजा लक्षात घेऊन पृथ्वी थिएटरच्या वास्तूचा आराखडा तयार केला. त्यानूसार जुहू चर्च मार्गावरील पृथ्वी थिएटरची वास्तू बांधली गेली. या थिएटरच्या वास्तूची बांधणी होत असताना त्यावर शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कपूर बारीक लक्ष ठेवून होत्या.

५ नोव्हेंबर १९७८ पासून पृथ्वी थिएटरची वास्तू रंगभूमीच्या सेवेत रुजू झाली. नाट्यधर्मींच्या सेवेसाठी नुसते थिएटर बांधले म्हणजे आपले उत्तरदायित्व पूर्ण झाले असे मानणाऱ्यांतले शशी व जेनिफर दोघेही नव्हते. या थिएटरमध्ये रंगभूमीला पोषक ठरतील असे नवेनवे प्रयोग होत राहिले पाहिजेत ही जाणीव पहिल्यापासून या दोघांनी तेथे कार्यरत असणाऱ्या लोकांमध्ये रुजविली. पृथ्वीराज कपूर मेमोरियल ट्रस्ट अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करुन हिंदी नाटके व परफॉर्मिंग आर्टला जास्तीत जास्त लोकांसमोर नेण्याचा उद्देश शशी कपूर व जेनिफरने ठेवला. हे काम पृथ्वी थिएटरच्या मार्फत त्यांनी जोमाने केले.

जेनिफर कपूर यांनी पृथ्वी थिएटरच्या संचालनात संपूर्ण लक्ष घातले होते. १९८४ सालापर्यंत जेनिफर यांनी या थिएटरचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. शशी कपूर हे पृथ्वी थिएटरचे व्यवस्थापकीय संचालक होते. पण जेनिफर यांच्या निधनानंतर थिएटरचे दैनंदिन कामकाज त्यांचा मुलगा कुणाल कपूर व संजाना कपूर पाहू लागले.

पृथ्वी थिएटरची स्थापना झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्या नाटकांमध्ये गो. पु. देशपांडे लिखित उध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या हिंदी रुपांतरणाचा समावेश होता. त्यामध्ये नासीरुद्दीन शाह, ओम पुरी, बेंजामिन गिलानी यांनी काम केले होते. त्यानंतर इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनने (इप्टा) सादर केलेले व एम. एस. सत्यू यांनी दिग्दर्शित केलेल्या बकरी या हिंदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. पृथ्वी थिएटरने स्थापनेपासूनच नेहमीच वेगळ्या धाटणीच्या व प्रयोगशील नाटकांना प्रोत्साहन दिले आहे.

पृथ्वी थिएटर सुरु झाले त्यावेळी मराठी रंगभूमीवरही प्रयोगशील प्रवाह वाहातच होते. पण मुंबईत इंग्रजी नाटकांचा दक्षिण मुंबई परिसरात जास्त बोलबाला होता. गुजराती रंगभूमीवर फार्सनी धुमाकूळ घातला होता. या सग‌ळ्यातून वेगळी वाट काढून पृथ्वी थिएटरने हिंदी नाटकांना सक्रिय मदत केली. आपले नाट्यगृह इतरांपेक्षा कमी भाडे आकारुन शशी व जेनिफर कपूर हिंदी नाट्यकर्मींना उपलब्ध करुन देत असत. त्यामुळे १९७०च्या दशकात मुंबईत हिंदी नाटकांमध्ये जे प्रयोगशील वातावरण तयार झाले त्यात शशी व जेनिफर कपूर यांचाही सहभाग होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

१९८३ साली पृथ्वी थिएटरला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जो नाट्योत्सव झाला त्यात या कालावधीत पृथ्वी थिएटरमध्ये जी सर्वोत्कृष्ट नाटके सादर करण्यात आली होती ती पुन्हा दाखविण्यात आली. नाटकांशी असलेले या थिएटरचे प्रेम इतके आगळे होते की अगदी जेनिफर कपूर यांचे निधन झाले त्या दिवशीही नाट्यगृह बंद न ठेवता त्या दिवशीही तिथे नाटकांचे प्रयोग झाले.

१९९०च्या सुरुवातीला शशी व जेनिफर कपूर यांची मुलगी संजना हिने पृथ्वी थिएटरच्या कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली. अर्थात तिला शशी कपूर यांचे मार्गदर्शन लाभत होतेच. त्यातूनच संजना कपूरने पृथ्वी प्लेअर्स व लिटल पृथ्वी थिएटर्स (बालरंगभूमीिवषयक उपक्रम) असे दोन उपक्रम सुरु केले.

पृथ्वी थिएटरच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने एक विशेष टपाल तिकीटही काढले. आज पृथ्वी थिएटरमध्ये दरवर्षी विविध नाटकांचे ५४० शोज होतात. तेथील नाट्यमहोत्सवात कधी कधी मराठी नाटकेही सादर होतात. विविध भाषांतील रंगभूमीवरचे प्रवाह आपल्या रंगमंचावर यावेत यासाठी पृथ्वी थिएटरचे संचालक धडपडत असतात. त्यांना ही दूरदृष्टी शशी व जेनिफर कपूरमुळे. त्यांच्या नाट्यप्रेमाची ज्योत जिथे अखंड तेवत असते त्या पृथ्वी थिएटरच्या वास्तूलाही शशी कपूर यांच्या निधनाने नक्कीच गदगदून आले असेल.

— समीर परांजपे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..