नवीन लेखन...

प्रवास शब्दकळेचा

शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. आज एका नव्या प्रवासाला जायचं असतं. आजचं रमणीय विषयस्थान कोणतं असणार याची कुजबुज सुरु असते, किंवा ज्ञात असेल तर उत्सुकता असते. आणि या प्रवासाची वाहक, चालक, वाटाड्या, मार्गदर्शक जी all in one असते…. ती सामोरी येते, प्रसन्न, तेजस्वी, साक्षेपी. अत्यंत नम्र भावाने उपस्थित शब्दकळेच्या प्रवासी श्रोत्यांना नमस्कार करते आणि आजच्या शब्दप्रवासाच्या स्थानाचं नाव सांगते. सगळ्यांचेच चेहरे आनंदाने फुलतात. अगदी अर्ध्या मिनिटांसाठी तो आनंद एकमेकात वाटला जातो आणि शब्दकळेचा प्रवास सुरु होतो. प्रवास कोणताही कुठलाही असो, प्रवासीश्रोत्यांना आनंद असतो तो सोबत असणाऱ्या वाटाड्या(डी)चा.

अनेकदा आपला एखाद्या गाडीतून, बसमधून, टॅक्सीतून प्रवास सुरु झाला हे, सुरवातीलाच एक छानसा गचका बसून आपल्याला समजतं. अर्थात हे चालक किती तरबेज आहे त्यावरही असतं किंवा कित्येकदा प्रवाशांचा विचार न करता आपलं चालक कौशल्य दाखवण्याच्या दृष्टिकोनातूनही हे होत असतं. पण शब्दकळेच्या प्रवासाची चालक मात्र अंतरबाह्य, प्रवाशांचाच विचार करणारी असते. तिच्या बरोबरचे प्रवासीश्रोते वयाने ज्येष्ठ असतात. पण तिच्या मनातला भाव जबाबदारीचा असतो. आपण यांना शब्दकळेच्या प्रवासाला घेऊन निघालोय ना, मग त्याचं आकंठपान त्यांना करून द्यायचं. इथे मला भा. रा. तांब्यांची एक कविता आठवते,
या बाळांनो, या रे या ! लवकर भरभर सारे या !
मजा करा रे मजा करा !आज दिवस तुमचा समजा.
स्वस्थ बसे तोचि फसे; नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया,सुंदर ती दुसरी दुनिया !
खळखळ मंजुळ गाति झरे,गीत मधुर चहुबाजु- भरे
जिकडे तिकडे फुले फळे, सुवास पसरे, रसहि- गळे.
पर ज्यांचे सोन्याचे ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया नवी बघा या ही दुनिया
या कवितेतून बालकांना जसं संबोधित केलंय तसाच काहीसा या शब्दकळेच्या प्रवासातल्या चालकाचा भरभरून देण्याचा दृष्टिकोन असतो. फक्त ‘या बाळांनो’ ऐवजी ‘या साऱ्यांनो’ म्हणायचं.
आज तिला एक नवीन विषयस्थान शब्दांच्या माध्यमातून चारही बाजूनीं उलगडून दाखवायचं असतं, आणि ते ही आपण सर्वज्ञानी असल्याचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता. अलगद, अलवार, आनंदात हा प्रवास सुरु होतो. अनेकदा आपण म्हणतो,
“अरे सुरु झाली गाडी? कळलंच नाही”,
किंवा म्हणतो,
“पोटातलं पाणीही न हालता झाला प्रवास.”
अगदी तसाच संथ गतीने शब्दकळेचा प्रवास सुरु होतो. इथे ब्रेक, हॉर्न वाजवला जात नाही, वाटेत रहदारी लागत नाही. आनंदात न्हाऊन निघत आपण पुढे पुढे जात रहातो ते चालकाची विषयावरची पकड आणि शब्दप्रभुत्व पहात आणि ऐकत. आजच्या विषय स्थानाचं महत्व शब्दकळेतून वहायला सुरवात होते. आता हे आपल्यासमोर कोणत्या स्वरूपात येत असतं? तर लहान लहान प्रश्नांच्या, उदाहरणांच्या रूपात संवाद साधणाऱ्या त्या व्यक्तीरेखा उलगडून येतात चालकाच्या मुखातून.
म्हणजे ती आपल्यासमोर एक लहानसा प्रश्न उभा करते आणि त्याचं उत्तरंही लगेच देते. शिवाय एखाद्या सोप्या उदाहरणातून तेच उत्तर आणखी सुगम करून सांगते. त्यामुळे ते विषय स्थान तिच्या शब्दसौंदर्यानी सर्वार्थाने आपल्या मन:चक्षुसमोर उभं रहातं. आपले कान ते श्रवण करत असतात आणि त्याचवेळी डोळे ते सारं सारं अनुभवत असतात. मघा मी म्हटलेल्या कवितेनुसार हे सगळं अगदी रसाळ शब्दात, आणि जिवंत शब्दकळेमधून अगदी आपलेपणाने भरवलं जात असतं. आपण लहानग्याना नाही कां, एखादी गोष्ट सांगताना ती रंगवून सांगतो. ते मुलही त्या कथेमधल्या राजा, सिंह, पक्षी, राक्षस या व्यक्तीरेखांमध्ये अक्षरशः गुंग होऊन जातं , कारण आपल्या नजरेने ते विश्व मुल अनुभवत असतं . इथेही थोरांचं अगदी तेच सुरु असतं. प्रवासात येणाऱ्या व्यक्तीरेखा आपल्या डोळ्यांसमोर उभ्या करून शब्दकळेचा तो जिवंत अनुभव ती चालक आपल्याला सतत देत असते.
अगदी आत्ताचच सांगायचं तर कालिदास जयंतीच्या निमित्ताने मेघदूत रसास्वादच्या शब्दकळा प्रवासात अगदी यक्षाला मिळालेला शाप आणि त्याच्या एकांतवासापासून सुरु झालेला प्रवास त्याच्या निरोप्याचं काम करणाऱ्या ढगाबरोबर घडणाऱ्या संवादातून पुढे जात रहातो. यक्षाच्या मनातले प्रश्न आणि शंका ऐकत आणि ढगाच्या साथीने अनेक स्थानांना भेट देत आपण झगमगत्या अलकापुरीमध्ये कधी पोहोचतो ते लक्षातही येत नाही, इतके चालकाच्या शब्दकळेमध्ये आपण त्या प्रवासातलेच एक होऊन जात रहातो. हीच असते तिच्या भाषेची ताकद. शब्दनाट्य ! फक्त शब्दांनी उभं रहाणारं हे नाट्य आपल्याला एक सजीव अनुभव देऊन जातं. या प्रवासाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे या शब्दकळा श्रवणाचा कुठेही आणि किंचितही थकवा, कंटाळा येत नाही, कारण काय ? (मलाही चालकाची प्रश्नोत्तरांची सवय लागली ) तर ती घडाघडा, भडाभडा वहात नाही, तर झुळझुळ वहाते, आपल्याशी छान संवाद साधत रहाते. थोडक्यात ती आपल्याशी अगदी मोकळ्या गप्पा मारत वहाते. आणि तरीही त्यातून जे सांगायचं असतं, जे समजवायचं असतं ते मात्र नेमकेपणाने मांडत जाते. शब्दकळेच्या देहबोलीतून एकच भाव जाणवत असतो,
“हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले.”
“शहाणे करून सोडावे सकळ जन” ही जबाबदारी आपल्यावरच आहे हा भाव तिथे अजिबात जाणवत नाही, तर संतसहित्यामधल्या, आपल्या पुरातन संस्कृतीमधल्या ज्या चांगल्या, सुंदर, संस्कारी गोष्टी ज्ञात आहेत त्या तुमच्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचवायच्या आहेत, त्यातून काय घ्यायचं हे तुम्हीच ठरवा हा भाव दिसत असतो. अर्थात यातून काय घ्यायचं हे ही ती शब्दकळा सांगून जाते पण अगदी सहजपणे. सोबतच्या प्रवासी श्रोत्यांना मनापासून मोठेपण देत हे सगळं ती आपल्या मनावर रुजवत असते.
हे सारं अनुभवत , आणि शब्दकळेचा हा मन भारून टाकणारा प्रवास संपवून आपण पुन्हा वर्तमानातल्या आपल्या मूळ जागी कधी येऊन पोहोचतो हे कळतही नाही. जाणीव होऊ लागते, ‘किती सुंदर आहे हे सगळं. आपण मात्र आपल्या विचार आचारांनी आपलं जीवन गढूळ करून टाकत असतो. कशासाठी एव्हढं आत्मकेंद्रित होऊन मी -माझं -मला करत रहायचं. प्रवासात ऐकलेल्या या गोष्टींचा मनापासून आनंद घेऊया आणि इतरांना देऊया.’ आता ही भावना आपल्यामध्ये किती मिनिटं, किती तास, किती दिवस टिकते हा एक वेगळा विषय, पण ती भावना मनात उमलणं हेच असतं त्या शब्दकळेचं यश.
ती चालक मात्र या कशातही गुंतून न पडता एका नव्या प्रवासाची तयारी करत असते. मग कधी ती “विश्वरूपयोगदर्शनातून” कुरुक्षेत्रावर नेते, “दासबोधातली सौंदर्यस्थळं” वेचून दाखवते , जगन्नाथ पंडितानी लिहिलेल्या “गंगालहरी” मधून यथेच्च शब्द प्रवास करून आणते, “अभिज्ञानशाकुंन्तलं मधल्या शकुंतला- दुष्यन्त राजाच्या प्रेममिलन आणि वियोग या दोन्हीचा नेमका अनुभव देऊन जाते, युगंपुरुष स्वामी विवेकानंदांच्या शब्दभेटीचा प्रवास घडवून आणताना जितकी रंगून जाते तितकीच कबीर सांगतानाही तन्मय होते. असे अनेक विषय, अनेक प्रवास.
तिच्या शब्दकळेचा हा प्रवास सतत सुरूच असतो, सोबतचे प्रवासी श्रोते बदलत असतात, वाढत असतात, नवीन येत असतात. आणि गंमत म्हणजे हा प्रत्यक्षातला शब्दप्रवास असो, किंवा ध्वनीमुद्रित शब्दप्रवास असो अथवा दृकश्राव्य माध्यमातला प्रवास असो. शब्दकळेची तन्मयता तीच जाणवते आणि श्रोत्यांना एक सुंदर, मन भरून आणि भारून टाकणारा दैवी अनुभव देऊन जाते हे मात्र नक्की, कारण?….कारण तिचं ब्रिद एकच असतं, “हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले.”
नतमस्तक धनश्रीजी !
ऐकतो करून कान जीवाचे,
जणू वहाते निरझर शब्दांचे.
सचैल त्यात न्हाऊन निघायचं,
कानात उतरलेलं मनात जपायचं.
सारं आतून आलेलं असतं,
उथळ वरवरचं जराही नसतं.
भाषेचं सौंदर्य कोमलता शब्दांची,
विश्वरूपच मन:चक्षुसमोर अवतरतं.
नवा विषय नवी भूमिका,
न काही सिद्ध करण्याचा हेका.
साऱ्यांना घेऊन शिरायचं आत,
अलवार भूतकाळाच्या जगात.
पाहायचं सभोवार भानावर येऊन,
वर्तमानात परतायचं निव्वळ, आनंद घेऊन.
उरी कवळून ठेवा अनमोल,
हृदयात साठवून ठेवायचा सखोल.
व्यासंग विद्वत्ता श्रीमंती भाषेची,
जाणवते सोबत, त्याच्या सदैव कृपेची.
विलंसते मुखावर, आभा सदा तेजाची,
जणू मूर्ती उभी सामोरी सरस्वतीची.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..