नवीन लेखन...

प्राण आणि श्वास

मानवी शरीराच्या रचनेचा विचार करताना आयुर्वेदाने शरीराचे तीन भाग केले आहेत. वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग याप्रमाणे ते भाग आहेत. यातील वरचा भाग हा कफाचा असतो. येथे प्राणशक्तिचे अस्तित्व असते. शांत, निवांत जागी प्राणाची जाणीव सहजतेने होते. ती होण्याकरीता सर्व मानवी प्राण्यांची धडपड असते. परंतु या धडपडीत मूळ उद्देश केव्हा बाजूला होतो हे कळत नाही धडपडीतच सहजता बाजूला पडून सदैव अशांतता, निवांत वेळी सुद्धा टी.व्ही. मोबाईल इ. चा वापर करून लक्ष दुसरीकडे वळवून आपण स्वत:ला अस्वस्थ करीत असतो. या मार्गांनी लाभणाऱ्या अशांतता, अस्वस्थता याचा दूरगामी परिणाम अर्थातच आपल्या प्राणशक्तिवर होऊन एकूणच जीवन असाहाय्य होते. यातून मग प्रतिकारशक्ती कमी होणारे बरेचसे विकार जन्म घेतात आणि मानवी जीवन अस्वस्थ करतात.

कफ हा दोष जल व पृथ्वी या महाभूतांनी तयार होतो. शांत समुद्र, संथ वाहणारी नदी, स्वच्छ तलाव हे पृथ्वीच्या वातावरणात केवळ शोभा देत नाहीत तर आनंदही निर्माण करतात. यातील बिघाडाने होणारे परिणाम सर्वांना माहितच आहेत. तसेच शरीराचे नाक, आठ, जीभ, छाती, फुप्फुस, हृदय इत्यादी जोपर्यंत सहजतेने काम करतात तोपर्यंत स्वास्थ्यता आणि आनंद याची प्रसन्न अनुभूती येते. यातील एखादे बिघडले तरी सर्व शरीरात अस्वस्थता, अस्थिरता निर्माण होते. शरीराच्या वरच्या भागाचे नियंत्रण प्राणशक्ती करीत असते. या प्राणशक्तीत बिघाड झाल्याने शरीराच्या मुलभूत गरजांमधल्या हवेचा बिघाड होतो. त्यामुळे अन्न व पाणी योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. याचाच परिणाम म्हणून पचन, प्रवाह, जीवनशक्ती सर्वच बिघडते. ती बिघडून उपचारासाठी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते.

या सर्वांमध्ये सर्वप्रथम श्वासामध्ये फरक जाणवतो. सर्व साधनांचा विचार करता योगाभ्यासामध्ये जीवनात आनंद उपभोग घेण्यात लयबद्ध श्वासोच्छ्वासाला सर्वात जास्त महत्त्व आहे. परंतु श्वासातील विघाडाने सूक्ष्म/स्थूल पातळीवर जीवनमान कमी होण्याची जाणीव होते. परिणामस्वरूप भीती, संताप याचे प्रमाण वाढून शरीराबरोबरच मन, बुद्धि देखील कमजोर होते. त्यामुळे मनुष्य ‘तणाव’ या महत्त्वाच्या रोगकारणात अडकतो. थोडक्यात श्वास न बिघडता, प्राणशक्तीचे संचारण शरीरात उत्तम प्रकारे कसे होईल हे पाहणे दैनंदिन जीवनशैलीत अतिशय आवश्यक आहे.

श्वास लयबद्ध सुरू असणे सर्वात आवश्यक आहे. त्यासाठी शरीराचा वरील भाग शांत ठेवणे आवश्यक असते. याकरीता नियमित ज्ञानेंद्रियांचा अभ्यास करावा. ऐकणे, पाहणे, वास घेणे, चव पाहणे, स्पर्श जाणीव यातून काय घडते आणि प्राणशक्तीला याची जाणीव होऊन वर सांगितल्याप्रमाणे शांतता, सहजता येणे आवश्यक आहे. असे न झाल्यास प्राणशक्तीवर ताण पडून हृदय, फुप्फुसावर परिणाम होऊन निरनिराळे, विकार जन्म घेतात.

नंतर शरीरात प्राणवायु नीट जाण्याकरीता वरच्या भागाची शुद्धी करण्याकरीता प्राणायामाचे सोपे प्रकार, कपालभाती ही योगिक शुद्धिक्रिया याबरोबरच सूत्रनेती, जलनेती सारखे प्रकार करावेत. तसेच जोडीला आहारामध्ये गरम, स्निग्ध, ताजे जेवण असावे. जेवताना खाण्यात लवंग, दालचिनी, आले, मिरी, तमालपत्र इ. मसाल्यांचा वापर जरूर करावा, जेवणाबरोबर साधे अथवा गरम पाणी किंवा पातळ वरण, सूप घ्यावे.

जेवताना न बोलता पूर्ण पदार्थांचा स्वाद घेणे आवश्यक असते. जेवणातील गोड पदार्थ सुद्धा गरम पदार्थांबरोबर घ्यावे. याने आहाराचा प्रवेश सहजतेने होतो व प्राणाला बळ मिळते. याबरोबरच विहार ने शरीराची हालचाल करावी. यात शरीरातील हालचाल घडवून आणणारी शक्ती प्राणामुळे घडते या जाणीवेतून शरीराकडून काम करून घेणे असे ठेवले तर आनंदाची अनुभूती येते. याकरीता चालणे, बोलणे, पळणे इ. व्यायाम करावेत.

थोडक्यात दमछाक न होता दमादमाने गोष्टी अधिक व चांगल्या घडतात याची जाणीव ठेवून जे होत आहे त्यातून शक्ती कशी मिळेल ते पाहावे. प्रख्यात आयुर्वेदाचार्य सुश्रुतांनी सांगितले आहे,

यावत कंठ गत प्राणः तावत् कार्या प्रतिक्रिया।।

आहार विहाराच्या जोडीला रसायन औषधींचे सेवन केले तर अधिकस्य अधिक फलम् याची अनुभूती येते. याकरिता, त्रिकटु चूर्ण: सुंठ+मिरी+ पिंपळी समभाग घेऊन चूर्ण खाण्या-पिण्याबरोबर घ्यावे. च्यवनप्राशावलेह १ ते २ चमचे नियमित खावा. जेष्ठमध, लवंग, वेलची दिवसातून अधुनमधून चघळावी. जेवणानंतर द्राक्षासव, अश्वगंधारिष्ट असे काही शक्तिवर्धक घ्यावे. या सर्व उपचारांमुळे प्राणशक्ती वाढून होणारा श्वास जीवनदायी ठरून प्रसन्न चेहऱ्याने स्वत: व समाज दोघांना आनंदी करता येते.

-डॉ. जगदीश भुतडा

(‘संतकृपा’ या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..