नवीन लेखन...

ताकद पैशाची

पैशात मोठी शक्ती असते, ताकद असते. विविध वाक्प्रचारांतून पैशाच्या संदर्भातलं ढळढळीत सत्य ठळकपणे अधोरेखीत होतं. अठराव्या शतकापर्यंत पैसा हा प्रकार वापरात नव्हता. पैशाचा वापर न करता नगाला नग, मालाच्या बदलात माल, सेवेच्या बदल्यात सेवा, मालमत्तेच्या बदल्यात मालमत्ता अशा प्रकारची वस्तुविनिमय ही  पध्दत बार्टर या नावाने प्रचलीत होती. विनिमयाच्या बार्टर पध्दतीला खूपच मर्यादा होत्या. याच कारणाने इ.स. पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या स्वरूपातलं चलन पैसा हे माध्यम म्हणून वापरात आलं. तर शिस्तबद्ध रितीनं नियमानुसार कामकाज करणाऱ्या बँकांचं अस्तित्व अठराव्या शतकातलं आहे.

चलनातला जास्तीत जास्त पैसा बँकाच्या माध्यमातून सतत फिरता रहाणं अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेचं लक्षण मानलं जातं. बँकांवरच्या विश्वासार्हतेमुळे ग्राहक ठेवींच्या रुपात पैसा जमा करतात. ठेवी रूपाने बँकांमध्ये जमा होणारा हाच पैसा लहान मोठे उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या, कारखाने यांच्या उभारणीबरोबरच त्यांच्या वृध्दीसाठी आवश्यक असतो. असा वित्तपुरवठा करून देशाची समृध्दी व उत्कर्ष होतो, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. यासाठी बँकांच्या व्यवहारात पारदर्शकता हवीच शिवाय त्याला विश्वासार्हतेची जोडही हवी.

आपल्याकडच्या बँकामधले पैशांचे रोखीचे व्यवहार बँकांच्या कॅश काउंटरवर तर इतर लहान मोठे असंख्य व्यवहार चेक स्वरूपात होत असत. मात्र 1980 साली बँकांच्या व्यवहारात क्रेडीट कार्डाचा सुरु झालेला वापर म्हणजे बँकिंग क्षेत्रातलं एक मोठ स्थित्यंतर म्हणायला हवं. केडीट कार्डाच्या वापरामुळे पैशाचे लहानसहान व्यवहार काही प्रमाणात बँकांच्या बाहेरही होऊ लागले. कार्डधारकाच्या बँक खात्यात पैसे नसतांनाही एखादी खरेदी ताबडतोबीनं करता येणं शक्य होऊ लागलं. कारण क्रेडीटकार्डाद्वारे कार्डधारकाला छोट्याप्रमाणावर कर्ज स्वरुपात पैसा उपलब्ध होऊ लागला आणि लहान मोठी खरेदी, हॉटेलींग इत्यादीसाठी खर्च करता येणं शक्य झालं, ते देखील खिशात रोकड पैसे नसतांना. क्रेडीटकार्ड हरवण्यासारख्या घटनांमुळे त्या काळात क्रेडीटकार्डाच्या वापरावर मर्यादा मात्र निश्चितच येऊ लागल्या.

खातेदारांना बँकांच्या बाहेर कॅश देऊ शकणारं असं पहिलं एटीएम सेंटर 1987 च्या सुमारास मुंबईत सुरू झालं. कॅशिअर नसलेलं, पण पैसे अदा करणारं असं हे अत्याधुनिक मशीन होतं. मुंबईतलं पहिलं एटीएमसेंटर विलेपार्ल्याला एचएसबीसी (Hongkong Shanghai Banking Corporation) बँकेच्या बाहेर उघडण्यात आल्याचं मला स्मरतय.

नंतरच्या काळात आलेल्या डेबीट कार्डचा वापर कॅश काढण्यासाठीही करता येऊ लागला. या डेबीटकार्डची खासियत ही होती की ते बँकेतल्या तुमच्या खात्याला थेट जोडलेलं होतं. खात्यात पैसे असले तरच रक्कम एटीएम सेंटरमधून मिळवता यायची, अर्थात बँकेच्या आत न जाता! एटीएमचा ‘एनी टाइम मनी’ असा फुलफॉर्म असलेल्या शब्दाचा ‘असेल तर मिळेल’ असाही फुलफॉर्म होऊ शकतो हे आमच्या बँकेचं हेड ऑफिस असलेल्या साताऱ्याने आम्हाला शिकवलं. नंतरच्या काळात डेबीट कार्डाचा प्रवास इंटरनॅशनल झाला!

गेल्या दशकात बँक व्यवहार झटपट होण्याच्या प्रकारात फार मोठी उत्क्रांती घडून आली. स्मार्ट मोबाईल फोन आणि त्यामधला क्यूआरकोडच्या स्कॅनरचा वापर हा या उत्क्रांतीचा गाभा होता. त्यासाठी अनेक कंपन्यांचे अ‍ॅप्स तयार करण्यात आले. विक्रेत्यांना देण्यात आलेला क्यूआरकोड स्मार्टफोनद्वारे स्कॅन करून एका क्षणात किरकोळ विक्रेत्याचं बिल बिनबोभाट चुकतं करता येऊ लागलं. बँकिंग हमारे मुठ्ठीमे करण्याची आणि तसं म्हणण्याची किमया खऱ्या अर्थाने हाताच्या तळव्यात मावणाऱ्या छोट्याशा मोबाईल रूपी कॉम्प्युटरमुळे प्रत्यक्षात घडवून आणली आहे. आपल्या देशातल्या बँका आधुनिक तंत्रज्ञानाचे बोट घट्ट धरून पुढची वाटचाल दमदारपणे करणार आहे असंच म्हणावस वाटतं.

-प्रकाश जोशी

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..