नवीन लेखन...

ओवाळूं आरती : भाग – १/५

भारत हा उत्सवप्रिय, सणप्रिय देश आहे. भारतात सण भरपूऽर , आणि, सण म्हटलें की,  पूजा-अर्चा-आरत्या आल्याच !  त्यातील ‘आरती’ या विषयावर कांहीं ऊहापोह करावा म्हणून हा लेख.

भाग

भारतातीलच काय , पण सर्व जगातील बरेच लोक ‘अस्तिक’ आहेत. ‘अस्ति’ म्हणजे,  ‘(तो/ती/ तें) अस्तित्वात आहे’ . अति-पुरातन काळीं, ‘अस्तिक’ या शब्दाचा अर्थ ‘वेदांना मानणारा’ असा होत असे. कारण वेद हे अपौरुषेय , म्हणजेच ईश्वरीय, मानले जात. परंतु, आतां, म्हणजे गेल्या बर्‍याच शतकांपासून, ‘अस्तिक’ म्हणजे, ‘ईस्वराचें अस्तित्व मानणारा’ असा अर्थ घेतला जातो.

आदिम काळापासून, जगभर  मानवप्राणी ईश्वराचें अस्तित्व मानत आलेला आहे, आणि हा विचार हजारों वर्षें अप्रतिहत सुरूंच आहे, अजूनही आहे. कांहीं काळापासून, ‘नास्तिकपण’, म्हणजे ‘ईश्वराचें अस्तित्व न मानणें’, म्हणजेच ‘निरीश्वरवाद’ , हा विचार समाजातील कांहीं व्यक्ती मानूं लागल्या आहेत. अर्थात्, जसजसा समाजात विज्ञानाचा प्रसार-प्रचार होत गेला, होत आहे, तसतसे, ‘निरीश्वरवाद’ मानणारे ‘बुद्धिवादी’, ‘इहवादी’ लोक कांहीं अंशीं तरी वाढत आहेत. मात्र, ‘इहवाद’ हा भारतास नवीन नव्हे, तर हा अनेक शतकें-सहस्त्रकें जुना आहे.  ज्याला ‘चार्वाकवाद’ अथवा लोकायत’ म्हणतात, तें दर्शनशास्त्र इहवादीच आहे. अर्थात्, ‘ईश्वराचें अस्तित्व मानणें’ हा श्रद्धेचा भाग आहे. आणि, बोजड , कंपल्सरी व ‘अंगावर  येणार्‍या’ कर्मकांडात  न अडकून पडलें, तर, ईश्वरावर (देवावर) भरोसा ठेवून जीवनक्रमण करणार्‍यांना कांहीं अंशीं तरी जीवन सुकर होतें, व त्यांचा मानसिक ताण कमी होतो, हें मानणें क्रमप्राप्त आहे. आपण आरत्यांबद्दल बोलत आहोत, त्यामुळे, ‘अस्तिक्याबद्दलच’ चर्चा करणें अपेक्षित आहे.

पुढे जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट ध्यानात घेऊं या, आणि ती आरत्यांच्या संदर्भात महत्वाची आहे. ती गोष्ट अशी की, यहुदी (ज्यू), ख्रिस्ती, इस्लाम हे धर्म एकेश्वरवादी आहेत, म्हणजेच ते फक्त ‘एकच-ईश्वर’ मानतात. तसें हिंदू धर्माचें नाहीं. हिंदू धर्म हा, अगदी वैदिक काळापासून अनेकेश्वरवादी आहे. ‘तेहतीस कोटी’ देव अशी संकल्पना आहेच. तसेंच, ‘अवतार’ ही संकल्पनाही हिंदू धर्मात आहे. अवताराची संकल्पना सुरुवातीला, आणि त्यानंतर बराच काळ, जरी विष्णूच्या संदर्भात निर्माण झाली, तरी नंतरच्या काळात, इतरांच्या बाबतीतही ही संकल्पना मानली जाऊं लागली. गणपतीही वेगवेगळ्या युगांमध्ये पुन्हा-पुन्हां अवतरत असतो, अशी संकल्पना आहेच. हल्लीच्या काळाचा संदर्भ घेतला तर,’शिरडीचे साईबाबा हे सूफी संत, ‘दत्ताचा अवतार’ मानले जातात, तर ‘सत्य साईबाबा’ हे मूळ शिरडीच्या साईबाबांचा अवतार मानले जातात.

याचा अर्थ असा नाहीं की हिंदू धर्मात एकेश्वरवाद नाहींच. तोही आहे. उदाहरणार्थ , आदि- शंकराचार्यांचा ‘अद्वैतवाद’ म्हणजेच आत्मा-परमात्मा यांचें ऐक्य. अर्थातच, तिथें एकेश्वरवाद हा अध्याहृत आहेच.

महत्वाची गोष्ट अशी की, हिंदू धर्म हा, एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद यांच्यातही समन्वय साधतो. वैदिक कालातही इंद्र, मित्र, वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) इत्यादी दैवतें  मानली जात होती. आजही, हिंदू हे, गणपती, शंकर, राम, कृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश, बालाजी , स्कंद / कार्तिकेय / षण्मुगम् (षण्मुखम् ),  खंडोबा, म्हसोबा, वगैरे अनेकानेक नांवांच्या  देवांना ; तसेच रेणुका, महालक्ष्मी, दुर्गा, काली, पार्वती, सरस्वती, इत्यादी अनेकानेक नांवांच्या देवींना भजतात. ( ही केवळ उदाहरणें आहेत. त्यामुळे, इतर देव-देवींच्या नांवाचा उल्लेख न केल्याबद्दल क्षमस्व) .  आणि, असे अनेक देव-देवी मानूनही, ‘परमेश्वर’, ‘परमात्मा’ ही  ‘सर्वश्रेष्ठ’ शक्ती मानलेली आहेच. परत, व्यंकटेश म्हणजे विष्णू, पांडुरंग म्हणजे कृष्ण,  राम व कृष्ण हे विष्णूचे अवतार, असें ऐक्य मानलेले आहेच.(ज्येष्ठ संशोधक कै. रा, चिं ढेरे म्हणतात की, विठ्ठल व बालाजी ही ‘लोकदैवतें’ आहेत. म्हणजेंच, विठ्ठल व बालाजी हें एक भिन्न प्रकारचें ऐक्य झालें). त्यामुळे, हिदूंमध्ये अनेक देवतांचें पूजन-अर्चन होतें. याचा अर्थ असा की , ‘unity in diversity’ हें तत्व हिंदूंच्या बाबतीत अनेक अर्थांनी  खरें आहे.

पूजन व अर्चन हे बहुतांशी बरोबरच (together, साथसाथ) जातात. पूजाअर्चा (हिंदीत : पूजा- अर्चन) अशा जोड-शब्दप्रयोग आपण नेहमीच वापरतो. पूजन/पूजा  व अर्चन/अर्चा  हे संस्कृत शब्द आहेत. व्ही.एस्. आपटे यांचा संस्कृत-इंग्लिश शब्दकोश त्यांचे असे अर्थ देतो :  पूजन : To worship, To revere.       अर्चन : To salute, To welcome with respect, To honour, To praise,  To worship.  याचा अर्थ असा की  पूजन व अर्चन हे दोन्ही शब्द जवळजवळ समानार्थी आहेत. पण , जर दोन्ही एकच असते, तर त्याच्या जोड-वापरानें पुनरुक्ती झाली असती ( जसें की, ‘पिवळा पीतांबर’). म्हणजेच,  दोहोंत थोडाफार तरी फरक आहे, खास करून प्रॅक्टिकली. पूजन हा मुख्यत: कार्मिक (इथें त्याचा अर्थ आहे, ‘कृतीशी संबंधित’) विधी आहे , तर  अर्चन / अर्चना  हें मुख्यत: ‘वाचिक’ कार्य आहे. ( अर्थात्, अर्चनेच्या संगें थोडीफार कृती येतेच. त्याबद्दल आपण पुढे पाहूं ).

उपासना व पूजन म्हटलें, तर, तें अनेक देवदेवतांचें तर असतेंच, पण तसेच तें अनेक साधू-संतांचेही असतें. शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांची प्रत्यक्ष पूजा होवो न होवो, महाराष्ट्रीय लोक त्यांची ‘मानसपूजा’ तर करतातच. ( शिवरायांच्या स्वत:च्या काळातील किंवा नंतरच्या काळातील, त्यांच्यावरील पोवाडे आहेत, मराठी-हिंदी काव्यें आहेत, बखरीतील उल्लेख आहेत, पण आरत्या दिसत नाहींत. शिवरायांच्या आधुनिककालीन आरतीचा संदर्भ आपण पुढे जोडूं. पण तात्पर्य काय, तर, महापुरुषांवरही आरत्या असूं शकतात ).

पूजाविधी पाहिले तर, नेहमीच्या, म्हणजे दररोजच्या  (घरातील अथवा मंदिरातील) पूजाविधींबरोबरच, सणासुदीचे पूजाविधी आहेत ; अभिषेक-लग्न-मुंज-गर्भाधान- वास्तुशांती-उदकशांती- नामकरणविधी (बारसें)-व्रतवैकल्यपूर्ती/उद्यापन  वगैरे विविध प्रसंगीं करावयाचे पूजाविधी आहेत ; परत, सत्यनारायण, सत्यविनायक असे विशिष्ट पूजाविधी आहेतच.

अर्चना वा वाचिक ‘वंदन’ अनेक प्रकारचें असतें. प्रार्थना, भजन, कीर्तन, स्तोत्र-श्लोक-ऋचा-मंत्र यांचें पठण, अध्यात्मिक-धार्मिक-भक्तीपंथीय निरूपण, दैवी घटनांचें व देवादिकांशी आणि संतांशी संबंधित कथांचें गद्यपद्यात्मक कथन-गायन , (कधीकधी, संगतीनें नृत्यही) , दैवतांची ( किंवा संतांची / गुरूची ) स्तुती व पदवंदना, नाम-जप, (तपासहित वा त्याव्यतिरिक्त), अशा अनेक प्रकारें हें वंदन होतें. आरत्या हा त्यातलाच एक प्रकार.

‘आरती’ या पद्यप्रकाराकडे ‘एक साहित्यप्रकार’ म्हणून आस्वादायचा प्रयत्न करूं नये, कारण साहित्याच्या निकषांवर तोलायचें तें काव्य नव्हेच.  अर्थात्, तो जरी एक काव्यप्रकार असला, तरी त्याचा संबंध, श्रद्धा, भक्ती, धार्मिक बाबी, इत्यादी गोष्टींशी असतो. तेव्हां, त्या दृष्टीकोनातूनच  ‘आरती’च्या पद्यांकडे पाहणें योग्य ठरेल.

आरती हा शब्द संस्कृतच्या ‘आरात्रिका / आरात्रिकम्’ या शब्दापासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ आपटे यांचा शब्दकोश असा देतो : (1)  ‘Waving a light in front of an idol’ ; (2) The light.

म्हणजेच, ‘आरती’ हा शब्द मूलत: ज्योतीशी संबंधित आहे, आरती म्हणजे ‘त्याप्रसंगीं म्हटलेलें पद्य’ हा अर्थ नंतर जोडला गेलेला आहे.

त्यामुळे, आज असें आहे की,

  • आपण ‘उच्च-रवानें वाचिक उच्चारण’ करतो म्हणजे, मोठ्यानें चालीवर म्हणतो, तीही आरतीच ;

( हा अर्थ नंतर प्राप्त झालेला दिसतो) ;

(अशा प्रकारें मोठ्यानें ‘म्हणण्याला’ — जें गाण्याच्या क्रियेहून भिन्न आहे —– उर्दूत, ‘तरन्नुम नें सुनाना’ म्हणतात, अर्थात् तो शब्द उर्दूत साधारणपणें गझलच्या संदर्भात वापरला जातो, तिथें आरतीचा संबंध नाहींच. चालही वेगळी. मात्र क्रिया तीच .)

  • त्याचप्रमाणें, त्या प्रसंगी पेटवलेल्या निरांजनात ज्योत, प्रकाश, हातात घेऊन आपण आराध्याला ओवाळतो, ती ओवाळण्याची क्रियाही (हिंदीत : ‘आरती उतारना’),  आरतीच.

( हा मूळ अर्थ आहे ) ;

  • आणि, तो निरांजनाच्या ज्योतीचा प्रकाश म्हणजेही आरतीच,

( हाही मूळ अर्थ आहे ) .

आरती मराठीत इतकी भिनली आहे की, मराठीत ‘आरती ओवाळणें’ हा एक वाक्प्रचार झालेला आहे. व्यंगार्थानें, चेष्टेनें, किंवा हिणवूनही, ‘आतां तुझी आरती ओवाळूं कां’, किंवा ‘आरती ओवाळायचीच बाकी राहिली आहे’ अशा  प्रकारचे वाक्प्रचार सर्रास वापरले जातात.

(पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

लेखकाचे नाव :
सुभाष स. नाईक
लेखकाचा ई-मेल :
vistainfin@yahoo.co.in
सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..