नवीन लेखन...

‘नुक्कड’ची पस्तीस वर्षे

तो १९८५-८६ चा काळ होता. दूरदर्शन चा विस्तार देशभर होउ लागला होता. टिव्ही संच गावो गावी, घरा घरात दिसू लागले होते. रविवारचा चित्रपट आणि चित्रहार हेच मुख्य मनोरंजन असलेले दूरदर्शन आता वाढत्या विस्ताराला पूरक असलेल्या टिव्ही सिरीज घेउन येत होते. १९८४ मधे सुरु होउन १९८५ मधे नुकतीच संपलेली ‘हमलोग’ ने लोकांना सिरीज हा प्रकार आवडतोय हे दूरदर्शन च्या बाबूलोकांना लक्षात आणून दिलं होतंच.

अशा वेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतल्या नामवंतांना टिव्ही सिरीज बनवण्यासाठी पाचारण करायला सुरवात केली. रामानंद सागर, जी पी सिप्पी, बी आर चोप्रा, शंकर नाग सारख्या नामचीन लोकांनी काळाची पावले ओळखून टिव्ही माध्यमाकडे लक्ष द्यायला सुरवात केली. पुढे यातूनच बुनीयाद, रामायण, मालगुडी डेज आणि महाभारत सारख्या एपीक आणि प्रचंड लोकप्रिय सिरीयल्स जन्माला आल्या. याचवेळी नवीन काहीतरी करायचय; पण बॉलीवूडच्या व्यवसायीक गणितात आपल्या प्रतिभेला वाव मिळेल असे, समाधान देईल असे काम करता येत नाही, म्हणून दूरदर्शन कडे एका नव्या दृष्टीने पाहणारी तरुण मंडळीही वळाली, त्यात अगदी सुरवातीला जे लोक पुढे आले होते त्यात कुंदन शाह, सईद मिर्झा आणि अख्तर मिर्झा ही मंडळी होती. त्यांच्या डोक्यातून आलेली भन्नाट संकल्पना म्हणजे १९८६ ची लोकप्रिय दूरदर्शन सिरीयल, ‘नुक्कड’.

तो काळ असा होता की अद्याप नवीन अर्थव्यवस्थेचे वारे वाहिले नव्हते. ‘ग्लोबलायजेशन’ आणि ‘अर्थव्यवस्थेचे खुलीकरण’ अद्याप खूप दूर होते. त्यामुळे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यातली दरी वाढत होती. मोठ्या शहरांमधे वाढत चाललेल्या बकाल वस्त्यांमधे राहून जीवनाशी संघर्ष करणारा एक मोठा वर्ग त्याकाळी विशेषतः शहरांमधे जागोजागी दिसू लागला होता. या वर्गाला प्रतिनिधित्व देणारी सिरीयल करायचा प्रस्ताव कुंदन शाह आणि मिर्झा बंधूंनी दूरदर्शनला दिला. यात सिस्टीमवर सरळसरळ प्रहार न करता विनोदी अंगाने समाजातल्या विसंगती दाखवण्याचे व सामाजीक ऐक्य वाढवणारे एपिसोड्स करण्याचे आश्वासन या तिघांकडून घेउन, दूरदर्शनच्या बाबूलोकांनी १०० एपिसोड्ससाठी नुक्कडला परवानगी दिली आणि पस्तीस वर्षांपूर्वी १९८६ मधे ही सिरीयल ‘ऑन एअर’ आली.

या सिरीयलचे वैशिष्ठ्य असे की ही पूर्ण गोष्ट मुंबइतल्या झोपडपट्टीसदृष्य एका विशीष्ठ गल्लीत, मोहल्ल्यात घडते. ज्याला इथले रहिवासी नुक्कड म्हणतात. या नुक्कडमधे बरेच कष्टकरी कष्ट करुन पोट भरताहेत आणि ते करताना प्रत्येकजण स्वतःची एक वेगळे आयुष्यही जगताहेत. त्यांचे हे सोशल आणि पर्सनल आयुष्य प्रत्येक एपिसोडमधे हळूहळू उलगडण्याचे काम ही सिरीज करु लागली. हळूहळू ही नावे लोकांना परिचीत होउ लागली.

इलेक्ट्रीकचे दुकान चालवणारा व या नुक्कडचा गँग लिडर असलेला गुरु (दिलीप धवन), (बाकी ‘गुरु’ या नावातच लिडरशिप आहे ना..), सगळ्या नुक्कडवासियांचा भेटण्याचा अड्डा असणारे रेस्टॉरंट चालवणारा कादरभाई (अवतार गिल), सायकल रिपेअरचे दुकान चालवणारा हरी (पवन मल्होत्रा), कायम पिउन टुन्न असणारा पण तरी नुक्कडवासियांना आवडणारा खोपडी (समीर कक्कर), बोल बच्चनचा पहिला अवतार म्हणता येईल असा सुटाबुटात फिरुन फक्त मोठमोठ्या गोष्टी फेकणारा पण तसे काही काम न करणारा राजा (हैदर अली), शाळेत शिकवणारी विधवा टिचरजी (रमा वीज), मोलकरणीची कामे करणारी राधा (संगीता नायक), त्या भागात तैनात असणारा पोलीस हवालदार गणपत (आपला मराठमोळा चेहरा अजय वढावकर), नुक्कडच्या प्राईम जागी बसून भिक मागणारा गन्छू भिकारी (चक्क आपले सुरेश भागवत), हसतमुख चौरसिया पानवाला (श्रीचंद मखीजा), आपल्या तोंडाचा पट्टा कायम चालू ठेवणारा करीम हजाम (जावेद खान), सर्वांना आपल्या शायरीने बोर करणारा ‘दुखीया’ शायर (सुरेश चटवाल) अशी धमाल मुख्य पात्रे नुक्कड मधे होती. याशिवाय अधून मधून डोकावणारी कुंडू मोची, नुक्कडचा बनिया गुप्ता सेठ, थंबी वेटर, आणि गुप्ता सेठची सुंदर मुलगी मधू ही पात्रेही या सिरीयलची अविभाज्य भाग होती.

आठवड्यातून एकदा येणारी ही सिरीयल १०० भाग म्हणजे तब्बल दोन वर्षे चालली. सुरवातीच्या काही एपिसोड्समधे टिव्ही पाहणाऱ्या भारतीयांना लक्षात आले की ‘हे’ काहीतरी वेगळंच व अफालातून रसायन आहे. सतत खळखळून हसवणारं, कधीतरी रडवणारं..अधेमधे गुदगुल्या करणारं..तर कधी आपल्याच संकुचित मानसिकतेला छानसा चिमटा काढणारं छोट्या पडद्यावरचं रसायन ..!! दोन वर्षात या नुक्कडवासियांच्या जीवनात, सुखदुःखात, हसण्या रडण्यात आपण कधी सामील झालो हे भारतवासियांना कळालेच नाही.

या मुख्य कथानकात अनेक उपकथानके होती. व्यक्त अव्यक्त प्रेम होतं, भांडणे होती, खुन्नस होती, तक्रारही होती आणि जिवापाड मैत्रीही.. गुरु आणि टिचरजी यांची सायलेंट व मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी खास होती. विधवा आणि धर्माने ख्रिश्चन असलेली टिचरजी आणि डोक्याला पट्टी बांधणारा गरम डोक्याचा गुरु यांची प्रेम कथा यशस्वी व्हावी म्हणून आपण मनोमन प्रार्थना करायचो. दुसरीकडे राधाचे हरीवर एकतर्फी प्रेम आणि त्याचवेळी तो बनियाच्या पोरीवर, मधुवर, लाईन मारतो म्हणून राधाचा होणारा जळफळाट पाहतानाही असेच वाटायचे की साला हरीला कान धरुन सांगावं..’साल्या ती राधा तुझ्यावर मर मर मरते आणि तू..?’

पोलीस हवालदार गणपत आणि पियक्कड खोपडी (त्याचे खरे नाव गोपाल असते पण सगळे त्याला खोपडी नावानेच बोलवत असतात) यांची नोकझोक पण तरीही निखळ मैत्री मजा आणायची. समीर कक्करने ‘कायम टाइट’ खोपडीची भूमिका इतकी समरसून केली होती की, मला वाटत नाही तसा अस्सल बेवडा पुन्हा कोणाला आजवर उभा करता आलाय. (समीर कक्करला सिंगीतम श्रीनीवासराव ने ही भूमिका पाहून पुष्पक सिनेमात महत्वाची भूमिका दिली यातच त्याच्या कामाची पावती आहे. )

आपल्या रेस्टॉरंटमधे येउन उधारीवर चहा पिणाऱ्या अनेक फुकट्या नुक्कड वासियांवर उखडणारा पण तरीही कधी उधारी बंद न करणारा कादरभाई मनाला भावणारा होता. मनमौजी राजा आणि त्याची लंबी फेकुगिरी ऐकायला मजा यायची. त्याची पर्सनॅलिटीही तशी प्रभावित करणारीच होती.

नुक्कडच्या प्रत्येक भाग कोणत्यातरी एका पात्रावर बेतलेला असायचा. त्यामुळे सुरवातीच्या पाच मिनीटात अंदाज यायचा की आजचा भाग गंच्छू भिकारी वर आहे का दुखिया शायरवर आहे, तंबी वेटर वर केंद्रित आहे की कुंडू मोची वर. मला अजून आठवते एक भाग बेंगाली बँडवालावर होता..ज्यात तो यापुढे मी कधीच वाजवणार नाही असा ‘पण’ करतो. सर्व नुक्कडवासिय त्याला मिळून समजवतात पण तो ऐकत नाही. एपिसोडच्या शेवटी मात्र सगळे झोपी गेल्यावर तो आपल्या बँडच्या युनिफॉर्ममधे येतो आणि त्याच्या ट्रंपेटवर ‘अपनी कहानी छोड जा….मौसम बिता जायsss’ वाजवतो आणि नुक्कडवासियांबरोबर आपल्याही डोळ्यात पाणी आणतो.

असे अनेक प्रसंग, एपिसोड..आज सारे स्मृतीच्या पडद्याआड गेलेत. लहानपणी पाहिलेले हे सगळे भाग आज निटसे आठवतही नाहीत. पण ही सारी पात्रे अगदी आजही हृदयाच्या जवळची वाटतात.. शेवटपर्यंत वाटत राहतील. कारण ही सारी पात्रं रसरशीत जिंवतपणा काय असतो हे दाखवणारी होती. कितीही अडचण असो, एकमेकाच्या सहाय्याला धावणारी, दुसऱ्याच्या सुखात आपलं दुःख विसरुन सहभागी होणारी, एकमेकांच्या दुःखात मात्र जवळ करणारी ही सारी नुक्कड मंडळी. याच्या टायटल साँग मधेच एक वाक्य होतं..’अजब तमाशा है ये नगरी, दुख मे हसते गाते है..अपने बर्बादीका यारो ये तो जश्न मनाते है..’ बस्स..यातच नुक्कडचे सार आहे.

नुक्कडबरोबर आमच्या लहाणपणाची दोन वर्षे कशी सरले हे कळालेच नाही. आज चाळिशीत किंवा त्यापुढच्या पिढीतले, ज्यांनी ही सिरीयल तेंव्हा पाहिलीय, ते नुक्कड कधीच विसरु शकणार नाहीत.

८७ मधे ही सिरीयल संपली.

मला शेवटचा भाग मात्र अजून आठवतो. राजकीय धेंडांना हाताशी धरुन बिल्डर लॉबीने ही जागा खाली करवलीय, पूर्ण नुक्कड पाडले गेलय. इथली सारी नुक्कडवासीय निघून गेलेत. मागे उरलाय ‘ऑन ड्यूटी’ बंदोबस्तावर इथेच आपली काठी घेउन फिरणारा विमनस्क गणपत हवालदार. त्या भग्नावशेषात तो आपल्या मित्रांच्या आठवणी जागवतोय.. कधी हसतोय..कधी डोळे पुसतोय. अशा सॅड-नोटवर सिरीयल संपली. गणपत प्रमाणेच भारतातल्या तमाम घरातून या सिरीयलला निरोप देताना असंख्य डोळे पाणावले होते.

नुक्कडमधली सारे अभिनेते तेंव्हा फिल्म स्टार पेक्षा कमी नव्हते. अर्थात त्यांच्या पुढच्या वाटचालीला मात्र आकाशातले स्टार्स कितपत अनुकूल होते हा संशोधनाचा भाग राहिल. नुक्कडला इतकी लोकप्रियता मिळाली की दूरदर्शनने तिचा दुसरा भाग ‘नया नुक्कड’ नावाने १९९२-९३ साली आणला. पण त्याचवर्षी १९९२ मधे ‘झी टिव्ही’ च्या माध्यमातून सॅटेलाइट टिव्ही चा आणि त्या आधी केबल टिव्हीचा उदय झाला होता. नया नुक्कड मधे आधीचे बरेच कलाकार असूनही पहिल्या नुक्कडप्रमाणे ती लोकांच्या बदलत्या टेस्टला अपील करु शकली नाही. आजही नुक्कडचे अनेक भाग यूट्यूबवर आहेत. लोक ते पाहतात..शेअर करतात..नॉस्टॅल्जिक होउन कमेंट्स करतात.

असो, एका गोष्टीची मात्र मला खात्री आहे की..भारतीय टेलिव्हीजनचा इतिहास जेंव्हा कधी लिहीला जाईल तेंव्हा समाजातल्या सर्व सामान्य माणसाची नाळ टिव्हीशी जोडणारी सिरीयल म्हणून नुक्कडची नोंद सुवर्णाक्षराने होइल हे नक्की..!!

— सुनील गोबुरे.

ता.क.- नुक्कड चे शिर्षक गीत त्याकाळी फार लोकप्रिय होते. त्याची लिंक देत आहे. नक्की पहा.

शिर्षक गीत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..