नवीन लेखन...

नोटबंदीनंतरच्या गावगप्पा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहीर करुन आता लवकरच दोन वर्ष पुर्ण होतील. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्याच्या परिणामांची व्रुत्तपत्र व दूरदर्शन वरील विविध वाहिन्यांवर चर्चा बरेच दिवस रंगली. नुकत्याच रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार साधारण ९९ % जुन्या रु. ५०० व रु. १००० च्या नोटा जमा झाल्या अहेत.

वरील अहवाल जाहीर झाला व तथाकथित पुरोगामी म्हणवून घेणारे पत्रकार त्याची निस्प्रुह व्रत्तपत्रे व तथाकथित निरपेक्ष मिडिया यांनी आपला मोदी विरोधी राग आळवण्यास सुरुवात केली. ९९ % वर नोटा ज्या अर्थी बँकेत जमा झाल्या त्याअर्थी मोदींची नोटबंदी पुर्णपणे फसली व त्यांनी विनाकारण सर्व देशाला दोन महीने वेठीस धरले होते व त्या वितीरीक्त नवीन नोटा छपाई साठी पाच सहा हजार कोटींचा भुर्दंड देशाला सहन करावा लागला. त्या बद्दल मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे अशा पध्दतीने मोदींवर टिका केली. त्या ऊठवळ टिकेला कॉंग्रेसच्या बोलघेवड्या पुढाऱ्याची सुध्दा साथ लाभली. आता ज्यांनी टूजी, स्पेक्ट्रम, व कोळशाच्या खाणीत लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करुन आपले हात काळे कलेत त्यांनी नवीन नोटा छपाईसाठी झालेल्या पाच सहा कोटी खर्चासाठी अश्रू ढाळावेत या सारखा दुसरा विनोद असु शकत नाही.

आता विरोधकांच्या आक्षेपा बद्दल. त्यांचे म्हणण्यानुसार ९९ % च्या वर जर जुन्या नोटा परत आल्या व त्यामुळे आता तो सर्व पैसा व्हाईट झाला. त्यामुळे यात देशाचा काहीच फायदा झाला नाही व काळा पैसा असणाऱ्यांनी त्यांचा पैसा बँकेत भरुन पांढरा करुन घेतला. हा विनोदाचा पुढचा षटकार. कारण जो पैसा बँकेचे खात्यात जमा झाला त्याची छाननी आयकर विभागाने करून आक्षेपार्ह भरणा करणाऱ्या लाखो लोकांना नोटीस पाठवून त्यांनी भरणा केलेल्या रकमेबाबत खुलासा मागितला आहे व ज्यांचा खुलासा समाधान कारक नाही त्यांना आता कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. इन्कमटॅक्स विभाग त्यांचे नियम व कायदे या नुसार कारवाई करत असतो. सध्या जी स्कृटीनी सुरू आहे आर्थीक वर्ष २०१५-१६ च्या रिटर्नची सुरु आहे. नोटबंदी आर्थीक वर्ष २०१६-१७ मधे झाली होती.त्यामुळे त्या आर्थीक वर्षातील रिटर्नची छाननी ही नियमानुसार जानेवारी २०१९ नंतर सुरु होईल व मग ज्यांनी खात्यात पैसे जमा केलेत त्यांची चौकशी व कारवाई सुरु होईल. आता जे पोपट किती काळा पैसा परत आला असे तोंड वर करून विचारतायत तेच पोपट मोदींनी आकसापोटी कारवाई केली अशी बोंब मारतील हे नक्की.

आता खात्यात जो काळा पैसा जमा झाला तो अर्थव्यवस्थेसाठी कसा फायदेशीर झाला ते पाहू. समजा एखाद्या व्यक्तीने रु. १० लाख काळा पैसा रोख स्वरुपात दडवून ठेवला असेल तर तो रु.५०० व रु. १००० च्या नोटातच ठेवला असणार हे ऊघड आहे. आता नोटबंदी नंतर त्याला तो पैसा त्याला त्याचे खात्यात भरणे भाग पडले. आता त्याने ती रक्कम खात्यात भरल्याने तो सर्व पैसा व्हाईट झाला असे म्हणणे भाभडे पणाचे ठरेल. त्या व्यक्तीच्या खात्यात १० लाख जमा झाले असल्याने तो निश्र्चीतच आयकर खात्याच्या नजरेस येणार व त्याला ३० % आयकर भरावा लागणार. म्हणजेच सरकारला आयकर रुपाने ३ लाख व सरचार्ज एवढा महसूल मिळणार.आता जर नोटबंदी झाली नसती तर त्या व्यक्तीने ते दहा लाख असेच बेहिशोबी खर्च केले असते. काही खरेदी ही पावती न घेता रोखीत केली असती. त्या व्यवहारात ज्याच्याकडुन खरेदी केली त्याने तेवढ्या रकमेवरील सेल्सटँक्स ( जी.एस.टी. ) चुकवला असता शिवाय ती रक्कम त्याचे हिशोबात न धरल्याने त्यावरील नफा सुध्दा हिशोबात धरला नसता व त्यायोगे त्या नफ्या वरील आयकर चुकवला असता. व त्यातून पुन्हा काळ्य पैशाची निर्मिती झाली असती.रु.१० लाख खात्यात जमा झाल्याने त्यावरील आयकर तर सरकारला मिळालाच त्याच बरोबर पुढील साखळी खंडित होऊन काळापैसा निर्मीतीस काही प्रमाणात पायबंद बसला. हे एक छोटेसे ऊदाहरण झाले.असे जे अनेक लोक आयकराच्या जाळ्यात आले त्यानी जी दडवलेली रक्कम खात्यात जमा केली जी साधारण एक लाख पन्नास हजार कोटींपेक्षा अधिक आहे त्यामुळे सरकारी तिजोरीत किती भर पडू शकते याचा अंदाज आपणास येऊ शकतो.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी हा एकमेव ऊपाय होता अशी मोदींच्या सरकारची भुमिका खचितच नव्हती पण त्याची ती सुरुवात होती. यानंतरही अन्य जे काळा पैसा निर्मीतीचे मार्ग आहेत त्यावर सुध्दा गदा येणारच आहे. नोटाबंदीवर टिका करणाऱ्यांनी जसा रिझर्व बँकेचे अहवालाचा आधार घेऊन नोटबंदी फसली अशी टिका केली त्यांनी एकदा आयकर विभागाने नवीन वाढलेल्या आयकर भरणाऱ्या लोकांची जाहीर केलेली संख्या आयकर महसुलात किती वाढ झाली तोही अहवाल त्याच्या नजरेखाली घातला तर अशा टिकाकारांची नजर स्वचछ होण्यास मदत होईल. अर्थात जे काळा चश्मा लाऊनच सर्वत्र पाहतात त्या टिकाकारांना या सकारात्मक बाबी दिसणार नाहीत त्यासाठी तुमच्या माझ्या सारखी सामान्य माणसाचीच नजर पाहिजे. कारण तो पुर्वग्रहदुषीत नजरेतून पहात नाही. ज्या सामान्य जनतेसाठी एवढा मोठा निर्णय घेतला त्यांची याबाबत फारशी तक्रार नव्हतीच व जी काही थोडीशी नाराजी होती ती पैसे काढताना जी थोडीफार गैरसोय झाली त्या बद्दल होती निर्णया बाबत निश्र्चीतच नव्हती. नोटबंदीचा निर्णय हा योग्य आहे हे त्यांना पटले होते हे मी बँकेत त्या कालावधीत प्रत्यक्ष काम केले असल्याने खात्रीपूर्वक सांगू शकतो. व जे लोक नोटबंदीला विरोध करतात ते का करतायत हे लोक अगदी मोकळेपणाने बोलून दाखवत होते. त्यामुळे हे जे मिडीयावरील पोपट चिवचिवाट करतायत ते काही फारसे गांभीर्याने घ्यायची गरज नाही. भारतीय मिडीया अशा बाबतीत किती गंभीर आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तिथे फक्त आपल्या मालकाची तळी उचलणे हेच चालते व बहुतेक मिडियाची मालकी परकीय लोकांच्या हातात आहे हे उघड गुपित आहे.

येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.

सुरेश काळे
सातारा
दिनांक.४ सप्टेंबर २०१८

*****

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..