नवीन लेखन...

नोटा बदली आणि अटलजी 

८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .  ५०० रुपयांच्या नवीन नोटा ही यथावकाश सर्वसामान्य नागरिकांना हळूहळू मिळू लागल्या आणि त्या त्यांच्या आर्थिक व्यवहारात फिरू ही लागल्या . २००० रुपयांच्या नोटेचे सुटे मिळणे हा आधी त्रासाचा आणि नंतर काही प्रमाणात विनोदाचा असणारा विषय अनुभवाचा भाग झाला .  १००० रुपयांच्या नवीन नोटा ही येणार अशी चर्चा जरी सुरु असली तरी त्याला अधिकृत सूत्रांकडून अजून तरी दुजोरा मिळालेला नाही .

दरम्यानच्या काळात रोकड – विरहीत अर्थव्यवस्थेकडे ( आपल्या नेहमीच्या मराठी मधे बोलायचे तर ” कॅश – लेस एकॉनमी ” ) भारतीय अर्थव्यवस्था नेण्याची चर्चा आणि प्रक्रिया ही जोमात सुरु झाली . ” कॅश – लेस एकॉनमी ” कि ” लेस – कॅश एकॉनमी ” असे शाब्दिक , तात्विक , बौद्धिक , व्यावसायिक , व्यावहारिक सामने खेळून झाले .  त्यात कधी सहभागी होत , अनेकदा पूर्णपणे दुर्लक्ष करत सरकारी पातळीवर ही योजना अंमलात आणण्याचे ( राबवले जाण्याचे मुद्दामच म्हणले नाही )प्रयत्न सातत्याने केले जात आहेत . ” लकी ग्राहक योजना ” आणि ” डिजी धन मेळा ” या योजना देशभर अंमलात आणण्यात येत आहेत . UPI , USSD , AEPS , Rupay Card , Digital Wallets असले शब्द सर्वसामान्य भारतीय नागरीकांच्या आधी दररोजच्या वापरातील शब्द – कोशांचा आणि नंतर धीरेधीरे दररोजच्या व्यवहारांचा हिस्सा बनू लागले .

हा निर्णय एका अर्थाने ” क्रांती ” असला किंवा ” नसला ” तरी ही नवीन व्यवहार – पद्धति आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतली ” उत्क्रांती ” नक्कीच आहे .

आजमितिला याबाबत जाणवण्याइतका झालेला महत्वाचा बदल म्हणजे आता हा निर्णय हे आपले अटळ विधिलिखित आहे हे मान्य होत आहे .  एखाद्याला सैद्धांतिक द्रुश्त्या ही गोष्ट कितीही अमान्य असली तरी आता हे अटळ आहे ही जाणीव मूळ धरू लागली आहे . सरकार आणि विरोधक या दोन्ही बाजूनी गेल्या दोन – अडीच महिन्यात हा विषय असा काही लावून धरला कि आता त्याची अंमलबजावणी हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला . त्यातून एक गोष्ट अशी झाली कि राजकारण हा पूर्णवेळचे काम नसलेले तुमच्या – माझ्या सारखे सामान्यजन हा निर्णय आपण आपल्या आयुष्यात कसा अंमलात आणू शकू याचा जास्त सक्रियतेने विचार करायला लागलो .  त्यामुळे चर्चा कमी आणि काम जास्त हा प्रकार सुरू झाला .  त्यामुळे ATM मधून पहिल्यांदा २५०० रुपये , नंतर ४५०० रूपये  आणि आता १०००० रूपये एका वेळेस काढता येणॆ शक्य होणे आपण मोकळ्या मनाने स्वीकारू लागलो . यात ” गरजवंताला अक्कल नसते ” असे म्हणणारे नसतीलच असॆ नाही .
पण प्रा . वसंत कानेटकर यांच्या ” हिमालयाची सावली ” या जुन्या नाटकाचा नायक जसे ” विचारांती असॆ ठरते कि . . . ” असॆ म्हणतो तसेच सध्याचे केंद्र सरकार म्हणत आहे कि काय असे वाटू लागते .  ते नाटक स्त्री – शिक्षणाचे मूलभूत काम करणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आयुष्यावर आधारित आहे . त्यावेळी हा विषय काळाच्या पुढे असणारा वाटत होता . निदान तत्कालीन समाजाच्या विचार – आचार आणि समज यांच्यापेक्षा  वेगळा नक्कीच होता . पण त्यावेळी चिकाटीने आणि धाडसानी महर्षी कर्व्यानी ते केले . त्यातून नंतरच्या काळात आपला समाज बदलला . सुधारला .  विद्यमान केंद्र सरकारच्या नोटा – बदलिच्या निर्णयाने आपली आर्थिक व्यवहारांची पध्दती बदलेल . बदलू शकेल . त्यामुळे हा निर्णय जाहीर झाल्यापासून माझ्या मनात सारखे येते कि कालांतराने नोटा – बदलीच्या या निर्णयाकडे बघताना , किंवा बोलताना , विद्यमान सरकार  आणि / किंवा भाष्यकार ” विचारांती असे ठरते कि . . . . ” असे म्हणू शकतील का ? ( त्या नाटकात तो नायक ” विचारान्ती असे ठरते की . . . ” असे जरी वारंवार म्हणत असला तरी बहुतांश वेळी तो निर्णय त्याचा एकट्याचाच असायचा . . . . अर्थातच त्याचा तेवढा तजुर्बा ही . . . . )

असे वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या निर्णयाने आपल्या सगळ्यांची व्यवहार करण्याची , आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धतीबद्दल विचार करण्याची सवय बदलावी लागेल . या निर्णयाने एखादा व्यवहार करू नका असे सरकार सांगत नाहीये तर तो व्यवहार अशा पद्धतीने करा इतकेच सांगत आहे . हा प्रकार आपल्या देशात काही पहिल्यांदाच होत नाहीये . आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रात Depositoryचा कारभार सुरू होण्याआधी सर्वच भारतीय गुंतवणूकदार त्यांनी गुंतवणूक केलेले शेअर्स कागदी प्रमाण – पत्रांच्या ( Physical Share  Certificates ) स्वरूपात सांभाळत होते . Depository चा कारभार सुरू झाल्यावर शेअर्स कागदी प्रमाण – पत्रात नसतात असे नव्हे ; फक्त ” डिमेट ” Dematerialised स्वरूपात सांभाळून त्यांचे व्यवहार करणे आणि त्यांची नोंद ठेवणे सर्वांनाच , अगदी सर्वच संबंधित मंडळीना सोयीचे जाते .

जे काम शेअर – बाजारातील शेअर्स सर्टिफिकेटस बाबत Dematerialisation ने केले तेच काम काही प्रमाणात इतर व्यवहारांबाबत Demonetisation करू इच्छित आहे . त्याच्या यशस्वी अंमलबजावणी साठी आधी आपली विचार करायची आणि नंतर प्रत्यक्ष व्यवहार करण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे .

असा बदल करायचा हा मुद्दा आला कि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान माननीय श्री . अटलबिहारी वाजपेयी ( अटलजी ) यांच्या भाषणातल्या एका वाक्याची मला हमखास आठवण येते .  ” हमे तारीख नही ; तवारीख बदलनी हैं ” हे ते वाक्य .
तवारीख म्हणजे विचार करायची पद्धत . तवारीख म्हणजे व्यवहार करण्याची पद्धत .  तवारीख म्हणजे निर्णय घेण्याची पद्धत . तवारीख म्हणजे कारभार करण्याची पद्धत .
हे सगळे या नोटा – बदलीच्या निर्णयालाही तंतोतंत लागू पडते याबाबत कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही .

१९७५ साली लागू झालेली आणीबाणी उठल्यानन्तर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आमच्या डोम्बिवलिच्या सभेत अटलजीनी हे वाक्य म्हणले होते हे मला अजून आठवत आहे .  त्यावेळी रात्री बारा वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी असॆ . त्यादिवशी अटलजी डोम्बिवलिच्या सभेत पोचले तेंव्हाच रात्रीचे बारा वाजायला जेमतेम १५ – २० मिनिटे बाकी होती . त्या सभेत अटलजी भाषणाला उभे राहताच पोलीस आधिकार्यानी वेळेच्या मर्यादेची अटलजीना आठवण करून दिली . दिल्या वेळेत आपले भाषण पूर्ण करणाऱ्या त्या भाषणातले अटलजीन्चे भाषणातले पहिले वाक्य होत . . . . . ” तारीख नही ; तवारीख बदलनी हैं . ”
राजकीय आणीबाणी उठल्यावरच्या त्या भाषणातले हे वाक्य आर्थिक आणीबाणी येऊ नाही म्हणून वेळेआधीच घेतलेल्या निर्णयाला लागू पडणारच ना . . .

नोटा – बदलिच्या निर्यणाबद्दल तशी अपेक्षा निश्चितच आहे . आपले आर्थिक निर्णय आम्ही आमच्या सोयिने घेऊ ; परकीय दबावानी नाही हा वैचारिक बदल ( तवारीख ) सुचवनारा हा निर्णय आहे .

आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आता सेवा – क्षेत्र प्रधान आहे आणि आपले सेवा – क्षेत्र हे तरुणाई – प्रधान आहे . त्यामुळे ते , त्यांच्या सवयी केंद्र – बिंदू मानून धोरणे आखली जातील हा व्यावहारिक बदल (तवारीख ) सांगणारा हा निर्णय आहे .

नोटा – बदलीच्या निर्णयांच्या संदर्भात अटलजी आणखीन एका कारणासाठी मला आठवतात .  मोदी सरकारच्या या निर्णयांच वर्णन अनेकांनी अनेकदा ” सर्जिकल स्ट्राइक ” असॆ केले आहे . सध्या तो शब्द चलनात आहे . त्या शब्दाचा TRP सॉलिड आहे म्हणून तो वापरणे कदाचित बरोबर ही असेल . त्यात बड्या – बड्या मंडळीनी त्या निर्णयांच तसे वर्णन केल्यावर मी पामर माणूस काय म्हणणार ?
पण खरं म्हणजे , मोदी सरकारच्या नोटा – बदलीच्या निर्णयांची तुलना अटलजी ( वाजपेयी ) सरकारच्या ” पोखरण अणुचाचण्या ” च्या निर्णयाशी करणे जास्त सयुक्तिक होईल . या दोन्ही निर्णयाने जागतिक पातळीवर काही संकेत , संदेश जरूर पाठवले . पण या दोन्ही निर्णयांचा पाया देशांतर्गत होता आणि आहे . या दोन्ही निर्णयातले घटक , संदर्भ , साधने राष्ट्रीय जास्त , आणि आंतरराष्ट्रीय कमी आहेत . आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कोणत्या मुल्याच्या नोटा असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात हा नोटा – बदलिच्या निर्णयांचा पाया आहे . त्याचा सर्जिकल स्ट्राइक शी काय संबंध किंवा साम्य ?  सर्जिकल स्ट्राइक तर दुसर्याच्या भूभागात जाऊन करतात .  उद्या जर मोदी सरकारने अमेरिकी डॉलर किंवा युरो च्या तुलनेत आपल्या भारतीय रुपयाचे मूल्य वाढवले (Revaluation ) तर तो ” आर्थिक सर्जिकल स्ट्राइक ” . आताचा मोदी सरकारचा नोटा – बदलिचा निर्णय म्हणजे Demonetisation .  ना ते Rupee  Devaluation असणे अपेक्षित आहे ना ते इतर चलनाच्या तुलनेत Rupee Revaluation असणे अपेक्षित आहे .  मग ते सर्जिकल स्ट्राइक म्हणणे कितपत योग्य आहे ?

आताचा नोटा – बदलिचा निर्णय अणुचाचण्या सारखा आपल्याच भूभागात जमिनीच्या खाली पण महत्वपूर्ण आणि जिगरबाज स्फोट घडवून आणत आपल्या निर्णय – क्षमतेचा साक्षात्कार जगाला घडवणारा ! !

याबाबत अजून एक गोष्ट ” उल्लेख ” करण्याजोगी .  अगदी नुकतेच  ( जानेवारी २०१७ )एन . पी . उल्लेख  यांचे ”  The Untold Vajpayee : Politician and Paradox ” हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे  . ( या पुस्तकाविशयी स्वतंत्र लेख नंतर कधीतरी . ) अटलजी काहींना Paradox ( विरोधाभास ) वाटत असतीलही ; पण अटलजी Pandora ‘s Box नव्हतेच नव्हते .
त्याच धर्तीवर मोदी सरकारचा नोटा – बदलिचा निर्णय काहिजनाना  विरोधाभासी ( विशेषतः ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द ठरवत असतानाच २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणे हा भाग )वाटेल ही ; पण तो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी Pandora ‘s Box ठरणार नाही हीच अपेक्षा आहे .

अटलजी , नोटा – बदलीच्या निर्णयांच्या संदर्भात आणि निमित्ताने आमचे आम्हालाच सांगणे आहे कि . . . . ”  हमे तारीख नही , तवारीख बदलनी हैं ” .

चंद्रशेखर टिळक
१८ जानेवारी  २०१७ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
एमेल . . . tilakc@nsdl.co.in

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..