नवीन लेखन...

स्त्रियांच्या रजोदर्शन काळातील अस्पर्शता आणि त्याविषयीच्या भूमिकेमध्ये बदलाची आवश्यकता

मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील एक शारीरिक नैसर्गिक गोष्ट आहे. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने विचार करता मासिक पाळीचे महत्व स्त्रीच्या आयुष्यात महत्वाचे आहे.नवीन जीवाला जन्माला घालण्याची ही क्षमता स्त्रियांचे पुरुषांपेक्षा असेलेले वेगळेपण दाखविते.असे असले तरी हिंदू परंपरेमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अस्पर्श किंवा अशुद्ध समजले जाते. सदर शोधनिबंधात या विषयी काही नवा विचार मांडण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न केला आहे.

वैदिक कालखंडापासून भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये स्त्रियांचे स्थान महत्वपूर्ण आहे.वैदिक काळातील स्त्रिया शिक्षित असत आणि त्याजोडीने त्या कुटुंबातील त्यांच्या जबाबदा-याही पार पाडत असत. धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग असे.विश्वावरा आत्रेयी हिचा वैदिक साहित्यात यज्ञकर्त्री असा उल्लेख या दृष्टीने महत्वाचा ठरतो.

असे असले तरी प्राचीन काळापासून मासिक धर्माच्या काळात, स्त्रियांना धार्मिक कृत्यात सहभागी होणे किंवा त्या दिवसात दैनंदिन कामात सहभाग घेणे यापासून दूर ठेवण्यात आले आहे.

आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरु होते आणि साधारण पन्नास वर्षे वयाला थांबते.आयुर्वेदानुसार या महत्वाच्या दिवसात स्त्रीने विश्रांती घेतली पाहिजे तसेच काही नियम पाळले पाहिजेत ज्यामुळे तिला या दिवसात शारीरिक दृष्ट्या ताणरहित वाटेल.

प्राचीन धर्मशास्त्रकारांनीही स्त्रीला या चार दिवसात धार्मिक कृत्यात सहभागी होण्यास मनाई केली आहे तसेच घरातील दैनंदिन कामापासूनही तिने दूर रहावे असे सुचविले आहे. कृत्यकल्पतरु या ग्रंथात नोंदविले आहे की मासिक पाळी स्त्रीला अस्पर्श बनवते. शिक्षापत्री या ग्रंथात मासिक पाळीच्या काळात स्त्रीला रज:स्वला असे संबोधिले आहे आणि या काळाला ‘मासिक व्रत’ असे म्हटले आहे.या ग्रंथांनी ,मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ केल्यानंतरच स्त्री घरातील कामात भाग घेवू शकते तसेच देव आणि पितृकार्यात सहभागी होवू शकते असे नियम सांगितले आहेत.या नियमांनुसार स्त्रीने या काळात जमिनीवर झोपावे. माती वा लोखंडाच्या ताटात जेवावे.तीन दिवस अंघोळ न करता रक्तस्रावाचे जुने कपडेच धारण करावेत!. डोक्याला तेल न लावणे, दात न घासणे,दिवसा न झोपणे असेही काही नियम यात आहेत. अग्नी प्रज्वलित करणे,देवाच्या पूजेसाठी फुले गोळा करणे ,आकाशातील ग्रह तारे पाहणे या गोष्टीही तिला वर्ज्य असत.

वर नमूद केलेले काही नियम चमत्कारिक व आरोग्याला अपायकारक असे आहेत हेही यातून लक्षात येते.

काळाच्या ओघात मासिक धर्माच्या काळात स्त्रियांनी पाळायच्या नियमात काही बदल झालेलेही दिसून येतात. ज्यामध्ये स्त्रियांनी घरातील कामात थेट भाग घेतला नाही तरी धान्य निवडणे यासारखी कामे स्त्रियांनी घरातच बाजूला बसून करायची असत.

आधुनिक काळात वैद्यकीय सुविधांमुळे मासिक पाळी च्या काळात स्त्रीला स्वत:ची चांगली काळजी घेणे शक्य झाले. या दिवसांमध्येही त्या घरातील व बाहेरील कामेही सहजपणे करू लागल्या. एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून जागतिकीकरणाच्या रेट्यात विभक्त कुटुंबे अस्तित्वात आली.स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रा सक्रीय झाल्या.

असे असले तरीही आधुनिक काळातही हे अनुभवाला येते की समाजातील वयस्कर स्त्रियाच नव्हेत तर उच्च शिक्षित युवतीही मासिक पाळीच्या काळात धार्मिक कृत्यात सहभागी होण्यास संकोच बाळगतात. परंपरेच्या बंधनातून बाहेर पडता येणे त्यांना मानसिक दृष्ट्या शक्य होते असे नाही त्यामुळे धार्मिक विधी, सण, उत्सव ,व्रते या काळात मासिक धर्म अपेक्षित असेल तर औषधी उपाय करून मासिक पाळीची योजना बदलणे असा उपाय स्त्रिया करताना दिसतात. वैद्यक शास्त्र मात्र अशा उपायांच्या विरोधात दिसते कारण अशा औषधांनी स्त्रीला शारीरिक अपायही होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रागतिक जगात वावरताना मासिक पाळीकडे स्त्रियांनी आणि एकूणच समाजाने सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे असे वाटते.

निष्कर्ष-

जो समाजाची धारणा करतो तो धर्म. हिंदू धर्म -संस्कृतीने स्त्रियांच्या आरोग्याचा मूलभूत विचार तिच्या मासिक धर्माच्या संकल्पनेच्या माध्यमातून मांडला आहे. तथापि तो योग्य पद्धतीने समजावून घेण्याची गरज आहे.

ज्ञानार्णवतन्त्र या ग्रंथात सांगितले आहे- ‘ज्याला धर्म आणि अधर्म याचे ज्ञान आहे , त्याच्या दृष्टीने विष्ठा,मूत्र,मासिक स्राव,नखे आणि हाडे प्रत्येक गोष्ट शुद्ध आहे.शरीरच मासिक पाळीचे रक्त तयार करते ,त्यामधून कोणी मुक्तीपर्यंत पोचेल असा दोष का द्यावा?’

वरील सर्व विवेचनावरून असे नोंदवावेसे वाटते की ईश्वराप्रती मनात असेल्या आदर आणि श्रद्धा बाळगूनही स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात नि:शंक मनाने धार्मिक कृत्यांमध्ये भाग घ्यावा. जर तिला काही शारीरिक त्रास असेल तर तिच्या इच्छेनुसार तिने भाग घेणे टाळावे पण जर तिचे मन आणि शरीर सशक्त असेल तर तिने पवित्र मनाने धार्मिक कृत्यात भाग घ्यावा तसेच स्वत:ला या काळात अस्पृश्य मानू नये.

मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या शरीराची स्वच्छताच आहे. आधुनिक काळातही धर्मशास्त्राचे काही अभ्यासक या मताला दुजोरा देताना दिसतात.ते म्हणतात की ‘समाजाने स्त्रियांचा रज:स्वला धर्म या मागचा शास्त्रीय दृष्टीकोण समजून घेतला पाहिजे आणि त्यामागची अतिशयोक्तीही टाळली पाहिजे.’

— आर्या आशुतोष जोशी

Avatar
About आर्या आशुतोष जोशी 21 Articles
संस्कृत विषयातील विद्यावाचस्पती पदवी. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास या विषयातील संशोधन आणि लेखन, व्याख्याने आणि शोधनिबंध

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..