नवीन लेखन...

तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी स्टालिन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांचा जन्म दि. १ मार्च १९५३ रोजी झाला.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीअसलेले स्टालिन यांचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन आहे. सोव्हिएत संघ युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टालिन यांच्या नावावरुन एम. के. यांच्या नावामागे स्टालिन लावण्यात आलं. स्टॅलिन हे एम. करुणानिधी आणि त्यांची दुसरी पत्नी दयालू अम्मल यांचे चिरंजीव होत. एम. के. मुथू आणि एम. के. अलागिरी हे त्यांचे बंधू होत.करुणानिधी यांनी स्टालिन यांना आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. त्यानंतर त्यांना आपला भाऊ अलागिरी यांच्याशी सत्तासंघर्ष करावा लागला होता. करुणानिधी यांच्या निधनानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये स्टालिन यांची DMKच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते आणि माजी मुख्य मंत्री एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलीन यांनी बहुमत मिळवत द्रमुकचे प्रमुख आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले स्टॅलिन यांनी चेन्नईच्या चेटपेटमध्ये ख्रिस्टियन माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर चेन्नईच्याच विवेकानंद कॉलेजमधून बारावी तर प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. स्टॅलिन यांनी द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक)च्या एका स्थानिक कार्यकर्त्याच्या स्वरुपात आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. स्टॅलिन द्रमुकच्या युवा शाखेचे सरचिटणीस बनले, त्यानंतर त्यांच्यावर घराणेशाहीची टीका झाली. मात्र, आपली निवड फक्त करूणानिधी यांचे चिरंजीव म्हणून झालेली नसल्याचं स्टॅलिन यांनी लवकरच सिद्ध केलं हे विशेष. १९६० च्या दशकाच्या अखेरीस स्टॅलिन यांनी गोपालपुरम येथील तरुणांना सोबत घेऊन युथ DMK नामक एक संघटना स्थापन केली. महत्त्वाच्या नेत्यांचे जन्मदिवस साजरे करणं, हा त्यांच्या या मागचा उद्देश होता. एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन, नंजील मनोहरन आणि पी. यू. शनमुगम यांच्या सारख्या नेत्यांनीही या संघटनेच्या बैठकांमध्ये सहभाग नोंदवला होता. पुढे याच संघटनेला द्रमुक पक्षाची युवा शाखा म्हणून मान्यता देण्यात आली.

स्टॅलिन यांना थाऊजंड लाईट्स मतदारसंघाच्या ७५ व्या सर्कलचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आलं. द्रमुक पक्षातील हे त्यांचं पहिलंच अधिकृत पद होतं. हे पद अत्यंत कनिष्ठ पातळीवरचं होतं. १९६८ च्या चेन्नई महानगरपालिका निवडणुकीत स्टॅलिन यांनी द्रमुकसाठी प्रचार केला. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं सुरू केलं. द्रमुकच्या विविध सार्वजनिक सभांमध्ये ते भाषण देऊ लागले.

१९७५ मध्ये स्टॅलिन यांचा विवाह दुर्गावती उर्फ सांता यांच्याशी झाला. याच्या काही महिन्यांनंतर संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी तामीळनाडूमध्ये द्रमुक पक्ष सत्तेत होता. तत्कालिन मुख्यमंत्री करुणानिधी हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सहयोगी होते. पण आणीबाणीला त्यांचा विरोध असल्यामुळे हे सरकार पडलं. स्टॅलिन यांना १९७६ मध्ये गोपालपुरम येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांना जबर मारहाणही झाली. एक वर्ष तुरुंगवासात काढल्यानंतर त्यांना जानेवारी १९७७ मध्ये मुक्त करण्यात आलं. तुरुंगात जाईपर्यंत स्टॅलिन यांना फक्त मुख्यमंत्री करुणानिधी यांचा मुलगा म्हणून ओळखलं जायचं. पण तुरुंगवास भोगून परतल्यानंतर त्यांना एक नवी ओळख मिळाली.

द्रमुकच्या युवा शाखेसाठी काम करणं स्टॅलिन यांनी सुरुच ठेवलं. जून १९८० मध्ये द्रमुकच्या युवा शाखेची अधिकृत घोषणा झाली. त्यावेळी याचे नेते म्हणून स्टॅलिन यांची निवड करण्यात आली होती. त्या काळात द्रमुक पक्षाची कामगार शाखा सर्वांत मजबूत म्हणून ओळखली जायची. पण हळुहळु याची जागा युवा शाखेने घेतली.अधिकृतपणे युवा शाखेची घोषणा झाल्यानंतर काहीच दिवसात युवा शाखेने पाळंमुळं रोवायला सुरुवात केली. पुढे द्रमुक पक्षाची सर्वांत मजबूत शाखा म्हणून युवा शाखेचं नाव घेतलं जाऊ लागलं. तामिळनाडूच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात तसंच गावागावात पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाखेचे सदस्य निवडून आले. आता युवा शाखेचं स्वतंत्र कार्यालय उघडण्याची मागणी होऊ लागली. पण जर यांनी पक्षनिधी म्हणून १० लाख रुपये जमवले तर त्यांना अनबगम नामक एक इमारत देण्यात येईल, असं पक्षाने म्हटलं.

त्यावेळी स्टॅलिन यांनी ११ लाख रुपये जमा केले. त्यानंतर युवा शाखेच्या कार्यालयासाठी अनबगम इमारत ही देण्यात आली. स्टॅलिन यांनी १९८४ मध्ये निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवलं. त्यावेळी त्यांनी थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.१९८९ मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. यावेळी त्यांचा विजय झाला. त्यानंतर १९९१ ला सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली. पण पराभूत झाले. त्यावेळी राजीव गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेसचे सहयोगी असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाची लाट होती. पुन्हा १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून स्टॅलिन यांनी विजय मिळवला. दरम्यान त्यांनी चेन्नई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूकही लढवली आणि विजय मिळवला.

चेन्नईचे महापौर म्हणून काम करताना त्यांच्या कामाच्या पद्धतीने सर्वांचं लक्ष वेधलं. सिंगारा चेन्नई उपक्रमाअंतर्गत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. याच दरम्यान त्यांनी ब्युटीफूल चेन्नई प्रकल्पाची सुरुवात केली होती. त्यामुळेच त्यांना फादर ऑफ द सिटी असं संबोधलं जाऊ लागलं. २००१ मध्ये थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून स्टॅलिन यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यावेळी ते पुन्हा महापौर बनले होते. पण नव्या कायद्यानुसार एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही त्यामुळे त्यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला.

साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात स्टॅलिन यांचं कर्तृत्व वडिलांइतकं मोठं नाही. स्टॅलिन यांनी राजकारणाबरोबरच दोन चित्रपट आणि एका मालिकेमध्येही काम केलं होतं. ओरे रथम या चित्रपटात त्यांनी दलित शहिदाची भूमिका केली होती. तर कुरिनजी मलार या मालिकेमधून त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली होती. पण हे क्षेत्र आपल्यासाठी नसल्याची जाणीव झाल्याने त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला. स्टॅलिन यांना कर्नाटक संगीत ऐकण्याची आवड आहे.

२००६ मध्ये द्रमुक पक्ष तामिळनाडूमध्ये पुन्हा सत्तेत आला. त्यावेळी त्यांना स्थानिक प्रशासन मंत्रिपदी नियुक्त करण्यात आलं. त्यांनी आपले अधिकारी स्वतः निवडून योग्य प्रकारे काम केलं. दरम्यान, पक्षाची प्रतिमा नकारात्मक बनत चालली होती. पण स्टॅलिन यांचं काम चांगलं असल्याचं मानलं गेलं.

त्यानंतर एम. के. स्टॅलिन यांना पक्षाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. तसंच त्यांना उपमुख्यमंत्रिपदही देण्यात आलं. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा पराभव झाला. त्यानंतर २०१४ ला त्यांना लोकसभा निवडणुकीतही पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर २०१६ च्या विधानसभा निवडणुकीलाही त्यांना पराभवाचंच तोंड पाहावं लागलं.

दुसरीकडे, एम. करुणानिधी आरोग्याच्या समस्येमुळे राजकारणातून निवृत्त झाले. त्यावेळी. एम. के. स्टॅलिन यांना द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं. पक्षाची कमान स्टॅलिन हेच सांभाळतील, असं करुणानिधींनी सांगितलं होते. २०१८ मध्ये करुणानिधी यांचं निधन झाल्यानंतर पक्षाची सूत्र स्टॅलिन यांच्या हातात गेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवण्यात आली. यामध्ये ३९ पैकी ३७ ठिकाणी पक्षाने विजय मिळवला.

संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4333 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..