नवीन लेखन...

मटालोखा मॉल

या लेखातील मॉल पूर्णतः काल्पनिक आहे. जनजागृतीसाठी सदरचा लेख लिहिला आहे. कोरोना काळात समाजातील अपप्रवृत्ती नष्ट व्हाव्यात हाच सद्हेतू या लेखापाठी आहे. या माझ्या लेखाची प्रेरणा, हिंदी न्यूज चॅनलवरील विविध स्वरूपाच्या अपप्रवृत्तीच्या बातम्या, हीच आहे. मराठी चॅनलवर काही दाखवत नाहीत पण हिंदी चॅनलवर हे गैरप्रकार उघडपणे दाखवतात. त्यामुळं हे लिहावं असं वाटलं. समाजानं स्वतः मध्ये सुधारणा घडवून आणायला हवी, तर आणि तरच मटालोखा प्रवृत्ती बंद होईल, असं मला वाटतं.


मनात नव्हतं पण ‘ त्या ‘नं बोलावल्यावर नाईलाज झाला होता.
” अरे कोविड च्या काळात एवढा मोठा मॉल सुरू करतोय, किमान पाहून तरी जा ”
असं म्हटल्यावर माझ्याकडे पर्याय राहिला नव्हता.
मी मास्क लावून, सगळे नियम पाळून तिथे गेलो.
मॉल प्रशस्त होता, हायफाय होता, आकर्षक होता. चकचकीत होता आणि अत्याधुनिक होता.
इंटिरिअर भुरळ पडणारे होते.
कुठल्याही बाजूने पाहिले तरी सहज दिसणारे, उंचावर असणारे, रंगीत, झगमगीत असे मॉलचे नाव खुणावत होते.

मटालोखा मॉल

मॉलच्या आत प्रचंड गर्दी होती.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या गोष्टी कटाक्षानं पाळल्या जात होत्या.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड गर्दी असुनही कमालीची शांतता होती.
असह्य, जीवघेणी आणि अंगावर येणारी शांतता !

मी गेलो तेव्हा ‘ तो ‘ स्वागताला पुढं आला.
आणि मी काही बोलण्याअगोदर तोच म्हणाला,
” मॉलच्या नावाबद्दल कुतूहल असेल ना ? सांगतो त्याबद्दल. पण अगोदर सगळा मॉल दाखवतो. पाच मजली मॉल आहे. आणि प्रत्येक मजल्यावर प्रशस्त गाळे आहेत. सध्या दोन मजलेच भरून गेले आहेत दुकानांनी, पण नजीकच्या काळात सगळे गाळे भरून जातील. हो एक सांगायचं राहिलं, या अशाप्रकारच्या मॉल ची कल्पना अगदी अलीकडे सुचली मला. कोविड च्या काळात धाडस करावं की नाही या विचारात होतो, पण गर्दी बघितल्यानंतर माझं धाडस सार्थकी लागलं. आणखी एक सांगायचं तर या मॉल मध्ये कॅश, ऑनलाईन आणि उधारी या सगळ्या प्रकारातून विक्री करतो आम्ही. कुणीही फसवत नाही आम्हाला. ”
तो बोलायचा थांबला.

आम्ही प्रवेशद्वारातून आत गेलो.
आणि तो प्रत्येक सेक्शनमधल्या प्रॉडक्शनची माहिती देऊ लागला.

” हे बघ, प्रत्येक सेक्शन हा अगदी जीवनावश्यक झाला आहे. नव्हे कल्पकतेनं मी तो ग्राहकांच्या गळी उतरविण्यात यशस्वी ठरलो आहे. त्यामुळं इच्छा असो नसो, किंमत कितीही असो, गुणवत्ता न बघता प्रत्येकजण इथली वस्तू खरेदी करण्यासाठी जीव टाकत असतो. जी वस्तू बाहेर सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि जी आत्यंतिक गरजेची आहे अशी सार्वत्रिक सामुदायिक भावना बळावते, ती वस्तू इथे नक्की विकत मिळते. ग्राहकांच्या या विश्वासावर माझा मॉल प्रचंड पैसा कमावतोय. आता हेच बघ ना, बाहेर रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन काँसंट्रेटर्स आणि सिलेंडर्सचा तुटवडा जाणवतोय, त्याअभावी कोरोनाचे रुग्ण दगावतायत. तो ऑक्सिजन माझ्याकडे कितीही टन, कोणत्याही साईझच्या सिलेंडर्समध्ये सहज उपलब्ध असतो. जो ग्राहक जास्त पैसे देईल त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे पुरवठा करतो मी केवढं पुण्य मिळतंय मला. हां आता शासनाला ते मिळत नाहीत,पण मला कुठून मिळतात ते विचारायचं नाही. आता हे गठ्ठे बघ. मेल्यानंतर मृत देहावर घालायला लागणारी कफनं, यात आहेत.चारशे रुपयांना एक असं मी विकतो. गंमत महित्येय का, ही कफनं, मी स्मशानातूनच आणतो, धुतो, इस्त्री करतो, नवं लेबल लावतो आणि पुन्हा पुन्हा विकतो. कारण इथून गेलेलं कफन परत आणायला माझीच माणसं मी पाठवतो. पुन्हा धुतो, पुन्हा इस्त्री,लेबल..प्रचंड चालतोय हा आयटम. पलीकडे ती लॅब दिसतेय ना तिथे प्लाझ्मा प्रिझर्व्ह करून ठेवतो, मला नाही माहीत,अशा प्रिझर्व्ह केल्याचा किती उपयोग होतो, पण मला धंद्याशी मतलब. त्या पलीकडच्या शॉप मध्ये सॅनिटायझर्स आणि मास्कच्या डुप्लिकेशनचा धंदा आहे. त्यापलीकडे अंतिम संस्कारासाठी लागणारी लाकडे, गोवऱ्या आहेत. ते सगळं फार महाग आहे, तरीही खपतं.तिथेच बॉडी जाळण्यासाठी लागणाऱ्या जागेचं रिझर्वेशन मी करून देतो. ग्राऊंडला अनेक ऍम्ब्युलन्स आहेत, त्यांचा दर एका किलोमीटरला पाच हजार रुपये इतका आहे, तरीही त्या सगळ्या रिझर्व्ह झाल्या आहेत. पलीकडच्या लॅबमध्ये निगेटिव्ह टेस्ट पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या निगेटिव्ह करून, तसं सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था आहे. आज अनेक ठिकाणी माझी माणसे बेड्सवर झोपवून ठेवली आहेत, त्यांना दिवसाला दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा आणि रोख एक हजार रुपये मी देतो. कुणी श्रीमंत रुग्ण आला की मी माझ्या माणसाला निगेटिव्ह सर्टिफिकेट देऊन अन्यत्र हलवतो आणि श्रीमंतला दिवसाला दोन लाख रुपये रेटने बेड पुरवतो. औषधे, पीपीई किट्स, इंजेक्शन्स, व्हॅक्सिन, वाट्टेल त्या ब्रॅण्डची दारू मी मनाला येईल त्या किमतीला विकतो. घेणारासुद्धा हे बनावट आहे की नाही याची शहानिशा न करता घेतो. पलीकडे असलेल्या शॉपमध्ये काही अतिचलाख मजूर आहेत, रुग्ण दगावला की मला मेसेज येतो, मग मी त्यांना पाठवतो, ते पॅक केलेल्या बॉडीमधील वस्तू लांबवतात. प्रेतांची अदलाबदल झाली असेल तर प्रकरण मिटवतात. पलीकडे जे पॉश ऑफिस आहे ते कोर्टात जाणाऱ्यांसाठी मदत पुरवणारे आहे. प्रोटेक्शन मनी घेऊन मी असंख्याना संरक्षण पुरवतो. शासनाकडून मिळालेले धान्य लांबवून मी ते अन्यत्र विकतो. टीआरपी वाढवण्यासाठी लोकांच्या आक्रोशाची व्यवस्था करून, न्यूज चॅनल्सना पुरवतो. मृतांच्या परिजनांना रडवणे आणि त्यांचे व्हिडीओज व्हायरल करणे यासाठीही मला मजबूत पैसा मिळतो. त्यासाठी याच मॉलमध्ये स्वतंत्र रेकॉर्डिंगची व्यवस्था असलेला अत्याधुनिक स्टुडिओ उभारला आहे. खऱ्या खोट्या बातम्या पसरविण्यासाठी आणि समाज पॅनिक करण्यासाठी माझ्याकडे सोशल मीडियाचा आयटी सेल आहे. तो वरच्या मजल्यावर आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून समाज कोरोनाच्या बाबतीत अस्थिर करण्यासाठी मी पैसे घेऊन व्यवस्था करतो. ते ऑफिस वरच्या मजल्यावर आहे. समाजात ऑनलाईन खरेदीचा फंडा इतका आहे की मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतो आणि सहजगत्या सगळ्यांना फसवतो, ते एक टेक्निक आहे, त्याचं शॉप वेगळं आहे. या सगळ्यातून मी खूप कमावतो. टॅक्स नाही. फक्त मला वाचवणाऱ्यांना प्रोटेक्शन मनी दिला की झालं. शिवाय एक शॉप दाखवायचं राहिलं. ती अत्याधुनिक लॅब आहे, निराधार मृत रुग्णांचे अवयव….”

मला चक्कर आली.
मी त्याला थांबवलं.
सगळं असह्य होत होतं.

” तू चक्क मढयाच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांचा मॉल चालवतोयस !”
” हो, मी कुठं नाकारतोय. माझ्या मॉलचं नावच ते आहे. मटालोखा मॉल! मढयाच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांचा मॉल ! हे एक उघड गुपित आहे. काय आहे माहीत आहे का, की तुम्ही लोक व्यवस्थेवर विश्वास न ठेवता, पॅनिक होऊन, स्वतः खाजगी असं अधिक काहीतरी मिळवायला जाता आणि मग माझ्यासारख्यांचा धंदा होतो. इतरांपेक्षा लवकर, अधिक चांगलं असं तुम्हाला हवं असतं. भावनिक होऊन बळी पडणं तुमच्या वृत्तीत असतं. तुम्ही हलक्या कानाचे आहात. व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर तुमचा जास्त विश्वास असतो. खरं तर तुमचा विश्वास डॉक्टरांवर, नर्सेसवर, पोलिसव्यवस्थेवर, औषधांवर आणि शासकीय व्यवस्थेवर असायला हवा, तसा तो नसतो म्हणून तर माझा मॉल चालतो. अजून काही दिवसांनी या मॉलचे पाचही मजले भरून जातील. आणि मग माझ्यासारखा सुखी माणूस मीच असेन, कारण मला आता टाळूवरील लोण्याची चटक लागलीय…”

तो आणखी काही काही बडबडत होता. मला काहीच कळत नव्हतं.

माझी शुद्ध हरपत चालली होती…

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
९४२३८७५८०६
————-
या लेखातील मॉल पूर्णतः काल्पनिक आहे. जनजागृतीसाठी सदरचा लेख लिहिला आहे. कोरोना काळात समाजातील अपप्रवृत्ती नष्ट व्हाव्यात हाच सद्हेतू या लेखापाठी आहे.

आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही.

तोपर्यंत हात वारंवार धुवा.
सॅनिटायझर चा वापर करा.
सोशल डिस्टन्सिंग पाळा.
मास्क चा वापर करा.
आणि समाजात अशाप्रकारचे गैरप्रकार चालले असतील तर पोलीस वा संबधित यंत्रणेला कळवा

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..