नवीन लेखन...

मार्कांचा महापूर…!

मार्कांचा महापूर आणि हिरवी आशा…!

(ज्यांना दहावीच्या निकालात खुप चांगले मार्क्स मिळाले आहेत त्यांचं खुप जास्त अभिनंदन करुन माझ्या लेखाला सुरवात करतो…)

गेल्या काही वर्षांपासून दहावी-बारावीच्या ‘प्रचंड फुगत चाललेल्या’ निकालाचा अभ्यास केला तर सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे…1991 च्या नव्या आर्थिक धोरणानं भारतात आलेल्या जागतिकीकरणानंतर जन्माला आलेल्या पिढ्या 2006-2007 नंतर दहावीच्या बोर्डाची परिक्षा देऊ लागल्या तेव्हापासूनच मार्कांच्या महापूराला सुरवात झालीय…!

आता हाच अधिक मार्कांचा महापुर भविष्यात किचकट समस्यांना जन्माला घालणार असल्याचे स्पष्ट संकेत देखील मिळायला लागले आहेत…!

कालच जाहीर झालेल्या मार्काच्या महापूराचा सगळेच आनंद साजरा करत आहेत.

सुखावणाऱ्या आनंदानंतर एकमेकांच कौतुक करण्यासाठी नातेवाईक…मित्रमंडळी आणि शिक्षकांचे मेसेज, काॅल्स आणि व्हिडीओ काॅल्स यांची रेलचेल चालू आहे.

अर्थातच आनंद साजरा करायलाच हवा; नाही असं नाही.

पण ह्या आनंदाच्या उत्सवात सहभागी होता-होताच आपण मार्कांच्या महापुराची ‘कारणं’ आणि भविष्यातले सांभाव्य परिणाम देखील पहायला हवेत…!
चला आपण पाहुयात.

#अधिक मार्कांची संभाव्य कारणे-

१) सुशिक्षित आणि सुरक्षित मध्यमवर्गाचा उदय-

जागतिकीकरणानंतर भारतात अाणि त्यासोबतच महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गाचा उदय झाला…हा मध्यमवर्ग मुलांच्या शिक्षणाबाबतीत खुप गंभीर आहे. अशाच गांभीर्यातून ‘चांगल्या शिक्षणाच्या शोधात’ अनेक पालक जवळच्या शहरात स्थलांतरित होत आहेत…!
आपल्या मुलांना दर्जेदार शाळा काॅलेजमध्ये दाखल करत आहेत.
सोबतच अधिक मार्क्स मिळविण्यासाठी आवश्यक असणारे ‘स्कील्स’ आणि ‘ट्रीक्स’ आपल्या मुलांना अवगत व्हावेत म्हणून हे पालक शक्य त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार असतात.
मध्यमवर्गीय पालकांच्या अशाच जाणीवपूर्वक प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून फुगलेल्या मार्कांकडे पाहता येऊ शकेल.

ह्यात लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे
कालच्या 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी…कामगार…किंवा इतर निम्न उत्पन्न वर्गातल्या घरांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची थोडीफार संख्या असली तरी ती संख्या अपवादात्मक बातम्यांइतकीच मर्यादित आहे…ह्यातले बहुसंख्य विद्यार्थी सुखवस्तू मध्यमवर्गात जन्माला आलेले आहेत.(असतील)

२) जबाबदारी आणि ताणतणावांचा अभाव-

पूर्वी भारताची 75 % पेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती…अर्थातच शेतशी संबधित असणाऱ्या कुटुंबातून येणाऱ्या मुलांची संख्या सहाजिकच अधिक होती…
शेतीची पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांवर ‘गुरे चारणे…शेतीची काम करणे…दुध डेअरीला घालणे अशा विविध जबाबदाऱ्या शाळेत असल्यापासूनच अंगावर पडत असत.
1991 नंतर विभक्त आणि स्वतंत्र कुटुंबात जन्माला आलेल्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या अधिक लाडात वाढत आहेत…घरात निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध असल्यानं अशा घरातल्या विद्यार्थ्यांना घरातल्या कामांत अथवा शेतात अथवा इतर ठिकाणी मदत म्हणून कोणतीही वेळखाऊ काम करावी लागत नाहीत…अशी कामं केल्यानंतर येणाऱ्या कंटाळ्यापासून देखील ही मुलं दूर असतात. केवळ ‘अभ्यास आणि अभ्यास’ इतकच मर्यादित उद्दिष्ट ठेवून इतर कोणत्याही कौंटुबिक ताणतणावाशिवाय वाढणाऱ्या मुलांनी बोर्डाच्या परिक्षेत असं यश मिळवणं ह्यात शंकास्पद काहीही वाटणार नाही.

३) उदार शिक्षकांची नवी लाट-

नव्या आर्थिक धोरणानं भारतात चैनीच्या अनेक नव्या सोईसुविधांचं आगमन झालं. अशा सोईसुविधांच्या मागणीला भविष्यात पूर्ण करण्यासाठी असंख्य नवे रोजगार निर्माण होणार होते…!
भविष्यातल्या अशा रोजगारांसाठी विविध कौशल्य असणाऱ्या तरुणांची आवश्यकता भासणार असल्यानं नव्या शाळा अाणि शिक्षकांची अधिक गरज भासणार होती.
यादरम्यान अनेक खाजगी शिक्षणसंस्थांना शाळा खोलण्यासाठी किंवा पूर्वीच्या शाळांचा विस्तार करण्यासाठी शासनमान्यता मिळाली.

कौशल्य आणि गुणवत्तेचा किंचितही विचार न करता ‘सत्ता…पैसा…प्रतिष्ठा आणि कौटुंबिक संबधांच्या’ किरकोळ पात्रतेनं उदारीकरणानंतर शिक्षक बनलेले आजचे शिक्षक ‘मुक्त हस्ते’ मार्कांचं भरमसाठ वाटप करत असतात.
उदारीकरणानंतर अधिक उदार बनलेल्या ‘शिक्षकांची नवी लाट’ मार्कांच्या महापूराचं एक कारण असू शकतं.

४) अधिक सोप्या आणि सहज परिक्षा-

बोर्ड परिक्षेत प्रत्येक विषयासाठी करण्यात येणाऱ्या 100 गुणांच्या मुल्यमापनाची सहज फोड केली असता असं जाणवतं की ह्या शंभर पैकी साधारणं 40 मार्क्स खुप सहज मिळविता येण्यासारखे असतात…!
ह्यापैकी 20 मार्क्स असणारी अंतर्गत मूल्यमापन अर्थात ‘तोंडी’ परिक्षा 9 वी मध्ये 70% पेक्षा अधिक मार्क्स मिळविणारांसाठी पूर्ण मार्कांची पूर्ण हमी असणारी परिक्षा आहे.

आणि 80 मार्कांसाठी असणाऱ्या लेखी परीक्षेत 25-30% असणाऱ्या ‘वस्तुनिष्ठ प्रश्नांनी’ ही लेखी परिक्षा अधिक सोपी बनते.
त्यातच लेखी परीक्षेत येणारे प्रश्न पुस्तकातल्या धड्याखालच्या ‘स्वाध्यायातूनच’ येत असल्यानं ह्या परिक्षा तुलनेनं अधिक सोप्या बनतात…!
अर्थातच अशा सोप्या आणि आधीच ठरलेल्या प्रश्नांच्या परिक्षांतून अधिक मार्क्स मिळविण्याची संभाव्यता सहाजिकच वाढताना दिसून येते.

५) गाईड, मार्गदर्शक आणि इतर पूरक शैक्षणिक साधनांचा सर्वत्र प्रसार-

1991 पुर्वी अशा पुरक साधनांवर विशिष्ट सधन वर्गाचीच मक्तेदारी होती. परंतु नव्या आर्थिक धोरणानंतर लोकांच्या हाती पैसा आल्यानंतर प्रत्येक घरात अशा पुरक शैक्षणिक साधनांचा पुरवठा मुक्तपणे होऊ लागल्यांनं मुलांना ‘तयार उत्तरं’ सहजपणे मिळायला लागली.
‘पाठांतरात पारंगत असणाऱ्या’ आणि ‘नवनीत सारख्या तयार उत्तरांच्या’ साधनांची पोहोच असणाऱ्या आणि घरात अभ्यासाची किमान शिस्त असणाऱ्या ‘संस्कारी’ मुलं आता राजरोस 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळवत असतात.

६) उत्तर लेखन एक कला…आणि ‘लिहिणं’ शिकविणारा बाजार-

पण अलिकडच्या काळात खाजगी बनत चाललेल्या शिक्षणव्यवस्थेत शाळा काँलेज व्यतिरिक्त ‘खाजगी क्लासेस’ च्या बाजाराची निर्मिती झाली असून शिक्षणसंस्थांत अनुदानित जागेवर ‘सत्ता…पैसा…प्रतिष्ठा आणि कौटुंबिक संबधांच्या’ अभवानं संधी न मिळालेल्या महत्वांकांक्षी पण बेरोजगार शिक्षकांनी ह्या ‘क्लास’ नावाच्या बाजाराची पायाभरणी केली अाहे…अशा बाजारात हुशार विद्यार्थ्यांना अधिक तीक्ष्ण बनविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आणि क्ल्युप्त्यां उपलब्ध आहेत.
उत्तर लेखनाची कला
परिक्षा गृहात वेळेचं व्यवस्थापन.
परीक्षेपूर्वीचं नियोजन.
पेपरला जाण्याआधी आणि पेपरवरून आल्यानंतर.
हवं तेव्हा समुपदेशन.
अशा विविध गोष्टींच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्यानं…अभ्यासाची थोडीशी सवय आणि किमान आवड असणाऱ्या मुलांना असे अधिक मार्क मिळविणं अधिक सहज आणि सोपं बनलं आहे.

७) मुलींची (स्त्रियांची) सामाजिक स्थिती आणि त्यांचे अधिक मार्कांचे निकाल.

भारतीय पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीयांवर अनेक बंधनं लादलेली आहेत. भारतीय मुलांना ज्याप्रमाणे मनमोकळेपणाने फिरता येतं मित्रांमध्ये खेळता येतं त्याप्रमाणे मुलींना मात्र खेळता-फिरता येत नाही.
सहाजिकच मुली एकतर स्वयंपाकघरात लक्ष घालतात किंवा अभ्यासात…
मात्र अलीकडील काळात मुलगा-मुलगी भेदभावाचं निर्मूलन झालेल्या काही घरामध्ये मुलींना स्वयंपाकघरापासून लांब ठेवत पूर्णपणे ‘शिक्षणासाठी’ तयार केलं जातं…असं असलं तरी इतर सामाजिक बंधन मात्र तशीच राहतात.
अर्थातच अशा परिस्थितीत अनेक मुली स्वतःला अभ्यासात पूर्णपणे वाहून घेतात त्याचाच परिणाम म्हणून अनेक शाळांमधल्या पहिल्या तीन क्रमांकात मुलींनी बाजी मारलेली दिसते.
एकुणच फुगलेल्या मार्कांचं हे देखील एक कारण असू शकतं.

#सांभाव्य परिणाम-

१) ‘क्षमतांवर’ प्रश्न नाही…पण ‘मर्यादा’ लवकरच कळतील.

कालच्या 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळविलेल्या मुलांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह नाही…त्यांनी केलेल्या अपरिमित कष्टाचं त्यांना मिळालेलं फळ आहे हे.
70-75 ते 90% दरम्यान मार्क्स मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील प्रचंड आहे.

दर्जेदार भविष्य ‘मोजक्यांचच’ आहे इतरांना ज्याच्या-त्याच्या मर्यादा हळूहळू कळायला लागतील.

जेव्हा अधिक मार्कांनी आज खुश झालेल्या विद्यार्थ्यांना ‘नोकरीच्या बाजारात’ असणारं भयानक वास्तव कळेल तेव्हा ‘कदाचित’ भविष्यात फुगलेले मार्क्स, मार्क्स देणारे शिक्षक, प्रतिष्ठा वाढविण्यासाठी जास्त निकाल लावणाऱ्या शिक्षणसंस्था आणि एकूण शिक्षणव्यवस्थेचा तिरस्कार करणारे ‘अस्वस्थ नागरिक’ मर्यांदांच्या ओझ्याखाली दबलेले असतील.

२) ‘आनंद क्षणिक आहे…निराशा प्रचंड असेल’

कालच्या निकालात 83,000+ मुलांना 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळालेत.
महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना ढोबळमानानं सरासरी 1000-2000 मुलांना 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळाल्याचं आपण गृहित धरुयात…
असं असेल तर जिल्ह्यातल्या पहिल्या दोन-तीन प्रतिष्ठित काॅलेजची Merit list किती जास्त असेल ह्याचा ढोबळ अंदाज तुम्ही बांधू शकता.

जिल्ह्यात Top ला असणाऱ्या College ला किंवा हव्या त्या College ला Admission न मिळाल्याचं दुःख तुम्हाला कुणाला माहिती आहे काय…?

आयुष्यात आत्तापर्यंत कोणत्याही गंभीर ताणतणावांचा सामना न केलेल्या अनेक कोवळ्या-निरागस मुलांना लवकरच अशा दुःखाचा अाणि त्यातून येणाऱ्या नैराश्याचा सामना करावा लागेल…ह्यात कुणालाही कुठलीही शंका नसावी.

३) उत्तुंग भरारीच्या मोठ्या आकांक्षा पण झेप घेण्यासाठी मर्यादित आणि छोटं आकाश-

काल मिळालेल्या अधिक मार्कांनी मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी भविष्याची अनेक ‘रंगीत स्वप्नं’ रगंवली असतील…!
पण,
अतिमहत्वाकांक्षी असणं इथं अधिक धोक्याचं आहे…कारण इथं ‘मोठ्या आकांक्षांसाठी खुप छोटं आकाश’ उपलब्ध आहे.
मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मर्यादित आहेत. त्यात प्रचंड कष्ट आहेत…ताणतणाव आहेत.
तिथपर्यंत घेऊन जाणाऱ्या वाटेत असंख्य काटे आहेत.
आज विषेश किंवा अतिविषेश प्राविण्यासह उत्तीर्ण झालेली मुलं असजशी शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करतील…कदाचित तेव्हा देखील त्यांना असेच फुगलेले मार्क्स मिळत जातील…
पण हळूहळू त्यांच्या दहावी-बारावीच्या मार्कांनी वाढलेल्या ‘मोठ्या महत्वाकांक्षांना’ भरारी घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित आणि छोट्या आकाशाची त्यांना जाणीव होईल…!
तेव्हा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याजवळ कोणता मार्ग उपलब्ध असेल…?

४) जातीय तिरस्काराचं बीज.

दहावीच्या निकालानंतर अकरावीचे अॅडमिशन आरक्षणाच्या नियमानुसार होतील.
अकरावीच्या अॅडमिशनमध्ये एखाद्या जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित काॅलेजचा सायन्स चा कट आॅफ 95% लागला तर… त्यापेक्षा कमी मार्क्स मिळालेले पण 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळालेले विद्यार्थी सहाजिकच नाराज होतील.
पण,
अशा विद्यार्थ्यांना जेव्हा समजेल की त्यांच्यापेक्षा 7-8 % कमी मिळालेल्या त्यांच्याच मित्रांचं ‘त्याच’ काँलेजला अँडमिशन झालय…तेव्हा त्यांच्या कोवळ्या मनात आरक्षणाबाबतीत ‘मर्यादित माहिती असल्यानं’ संबधित जातींबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतील.

ह्या गोष्टी याआधीही होत होत्या…नाही असं नाही.
पण यावेळी 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळवून देखील संबंधित विद्यार्थ्यांचं अँडमिशन प्रतिष्ठित काँलेजला होणार नसल्यानं त्याची गंभीरता आणि दाहकता अधिक असेल.

५) वर्ग आणि विषमतेची जाणीव.

कोटा पद्धतीतून प्रत्येक खाजगी काँलेजला काही अँडमिशन सर्रास होत असतात.
पैसा…प्रतिष्ठा…सत्ता आणि कौटुंबिक संबंध अशा गोष्टींच्या माध्यमातून ‘अत्यंत कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचं’ अँडमिशन प्रतिष्ठित काॅलेजला झालेलं ‘तुलनेनं अधिक मार्क्स असणाऱ्यां त्यांच्याच मित्रांना कळेल’ तेव्हा विशिष्ट वर्गाबद्दल ‘त्यांच्या’ मनात तिरस्काराची भावना निर्माण झाल्याशिवाय राहिल काय…?

#पुढची वाट-

काल दहावीचा निकाल लागला त्यादिवशीच भारताचं ‘नवं शैक्षणिक धोरण’ जाहीर झालयं…त्यात बोर्ड परीक्षेचं आणि त्यात मिळणाऱ्या मार्कांचं महत्व कमी करण्याबाबत भारतीय जनतेला आश्वस्त करण्यात आलयं. त्याची अंमलबजावणी 2021-2022 पासून होणार आहे.
असं असलं तरीही…
अधिक वेगानं किंवा कसल्याशा जादूई चमत्कारानं अवाढव्य विस्तारलेली शिक्षणव्यवस्था चुटकीसरशी बदलणारं नाही.
पण ‘हिरवी आशा ठेवणं’ सोडून आपल्या हातात दुसरा कोणता पर्याय तरी आहे काय….??

ता.क.
माझी वैयक्तिक गोष्ट सांगतो जाता-जाता.

मला दहावीला 84% तर बारावीला 88% मार्क्स होते.
पुढे Graduation ला देखील मला 84% मिळालेत.

असं असलं तरी…मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो… मला देखील नोकरीच्या बाजाराची सोबतच भविष्याची भिती वाटत आलीय नेहमीच…!
मी तर ‘हमेशा डरा-डरा…घबरायासा रहता हूँ’

स्पेशल ता.क.
ह्यातली मतं वैयक्तिक आहेत.
वेगळ्या मतांना आणि दृष्टिकोनांना प्रचंड ‘आदर’

— श्याम दाताळ

— Shyam Datal

लेखकाचे नाव :
श्याम दाताळ
लेखकाचा ई-मेल :
muraleesahebrao@gmail.com

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..