नवीन लेखन...

नकाशे

 

पर्यटनासाठी नकाशाचा आधार…
नकाशा म्हणजे पर्यटकांचे आधारकार्ड…

आता सर्वसामान्य माणसाचा आर्थिकस्तर उंचावल्याने आणि नोकरदारांची अनेक कार्यालये कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवास पर्यटनासाठी आर्थिक सवलती देत असल्याने लोकांचा विविध प्रकारच्या पर्यटनाकडे ओढा वाढलाय. गतिमान, यांत्रिक जीवनात आपली बॅटरी चार्ज होण्यासाठी लोकांनाही एक सुखद बदल म्हणून प्रवासाला जाण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे चार सहा दिवस वेगळ्या वातावरणातील पर्यटनाला जाण्यासाठी त्यांचा मनोदय असतो.

आपल्या नियोजित पर्यटन यात्रेसाठी पूर्वतयारीची एक बाब म्हणून आर्थिक व्यवस्थापन, स्वतःची प्रकृती, भौगोलिक स्थिती आणि पर्यटनासाठी लागणारा कालावधी याचाच प्रामुख्याने विचार होतो. परंतु नियोजित स्थळ दर्शनासाठी जाण्यास तेथील सचित्र माहितीसह नकाशा वाचन ही संकल्पना आपल्या समाजमनात रुजलेली नाही. नव्हे, तर नकाशांच्या आधारे पर्यटन ही संकल्पना रुजलेली नाही. परिणामी अनावश्यक वारेमाप पैसा, वेळ आणि श्रम खर्च करून प्रसंगी मनःस्तापाचे धनी होत आहेत.

प्रवास पर्यटन स्थळ निश्चित झाल्यावर त्या मार्गातील अन्य पर्यटन स्थळे, नजीकची सोयीची निवास व्यवस्था, रेल्वे, बस स्थानके यांचा अभ्यास करून लागणारा वेळ, नजीकचा वेळ वाचवणारा मार्ग याचे गणित ध्यानी येण्यासाठी सांगोवांगी, अर्धवट माहितीपेक्षा नकाशावाचन मार्गदर्शक ठरते.

परंतु आपल्या हौशी, उत्साही (आणि सुशिक्षितही ) पर्यटकांना नियोजित स्थळी रवाना होताना तेथील मान्यताप्राप्त मार्गदर्शक (गाईड) नकाशा वाचनबाबत अनभिज्ञ आहेत, हे जाणकार अभ्यासू पर्यटकांचे द्योतक नव्हे.

आपल्या दैनंदिन जीवनातही अनेक प्रसंग, घटकांचा संबंध नकाशा वाचनाशी जोडला गेला आहे याची जाणीव नाही. “नकाशा संबंध विकासाशी आहे” हेच खिजगणतीत नाही.

वास्तविक नकाशाशास्त्राची व्याप्ती मोठी आहे. त्याचा मागोवा घेताना प्राचीन इ. स. पूर्व काळापासून अनेक देशातून अज्ञात स्थळाच्या प्रवासासाठी नकाशा वाचन केल्याचे दिसते. ग्रीस, इजिप्त, बाबीलोनिया येथील प्राचीन नकाशांच्या खुणा आजही ‘वारसा’ म्हणून जपला आहे. त्याकाळी चिकणमाती साहाय्याने तसेच दगडात कोरलेले नकाशे ही तर प्राथमिक स्थिती. पण या नकाशांचा उपयोग प्रामुख्याने भव्य वास्तू उभारण्याबरोबर दर्यावर्दी साहसी प्रवाशांना अज्ञात स्थळी मार्गस्थ होण्यास झालेला आहे. यात अचूकतेचा अभाव असेलही. कैक शतकापूर्वी व्यापारउद्दीम करण्यासाठी ‘वास्को-द-गामा’ ‘सर थौमसरो’ यांच्या सागरी प्रवासासाठी त्यांना नकाशेच आधारभूत ठरलेत.

नकाशाचा साधा सरळ अर्थ म्हणजे Map is pictorial presentation of the Earth or a part of it तरीही आपल्या उद्देशानुसार नकाशांचे वर्गीकरण प्राकृतिक, ऐतिहासिक, राजकीय वाहतूक मार्गदर्शक इ. असे होऊ शकते.

प्रवास पर्यटनाला जाताना जो कागदी नकाशा असतो त्याद्वारे त्यातील सांकेतिक खुणा ज्या असतात. उदा. मंदिर, रेल्वे, बसस्थानक, राष्ट्रीय उद्यान, वारसा वास्तू इ. त्यांच्या लहान चित्राने पर्यटकांना दिशादर्शन घडवतात.

तसेच नकाशे प्रमाणानुसार असल्यास अचूकतेमुळे परस्पर ठिकाणातील अंतराची कल्पना येते. म्हणूनच सचित्र माहितीबरोबर नकाशा खूप बोलका ठरतो. पर्यटनाचे जे नकाशे असतात त्यातून निर्धार स्थळी मार्गस्थ होण्यास नजीकचा मार्ग, मार्गातील अन्य पर्यटनस्थळे, परस्परातील अंतराचे आकलन होऊन आपले पर्यटन सुखद होऊन वेळही वाचतो.

प्रत्यक्ष प्रवास काळात नवख्या माणसाला हाती असलेला नकाशा चालत्या बोलत्या मानवी मार्गदर्शकाइतकाच (गाईड) मार्गदर्शन करतो. कारण काही ठिकाणी भाषेची अडचण असल्याने चुकीच्या मार्गे मार्गस्थ होऊन पर्यटक पस्तावतात. काही स्थळी अल्प माहितीमुळे चुकीच्या मार्गे जाऊन आपला पैसा – वेळ, श्रम खर्ची पडतो… गेल्या शतकातील उत्तरार्धात पर्यटनाच्या अनेक शाखा निर्माण होऊन त्यांच्या लोकप्रियतेबरोबर त्या शाखांचा विस्तार होत आहे. त्यातील निसर्ग आणि वन्यजीव स्थळ दर्शनाबरोबर निसर्गाचे विराट दर्शन घडवताना मानवी जीवनात अत्यावश्यक ठरलेल्या परस्पर निसर्ग वाचनासाठी ‘वन पर्यटन’ शाखेकडे पर्यटकांचा ओढा वाढतोय. त्यातून पर्यावरणाचं मोलही ध्यानी येतयं हे विशेष.

परंतु शेकडो कि.मी. अजस्त्र वनक्षेत्र, अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यानातील स्थळं दर्शनासाठी जसा वनखात्याचा जाणकार कर्मचारी हवा, त्याच्या जोडीला त्या विशाल परिक्षेत्राचा नकाशाही नवख्या पर्यटकांना आधारवड ठरतो.

परंतु वनपर्यटनाची (ECO Tourism ) संकल्पनाच ध्यानी न आलेल्या, बेफिकीर, असंस्कृत पर्यटकांना नकाशाचे मोल कोण समजावून सांगणार? राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांचा प्रवेशद्वारी त्या-त्या वनक्षेत्राचा नकाशा, मोठ्या फलकावर असतो. एका दृष्टिक्षेपात त्या परिक्षेत्राची कल्पना यावी अशी कल्पना त्यापाठीमागे असतेच. परंतु मौज-मजेसाठी आलेल्या पर्यटकांना हा फलक वाचायला वेळ आणि स्वारस्यही नसते. क्षेत्रीय कार्यालयातून सचित्र माहिती पुस्तिका आणि नकाशा घेतल्यास आपला वन पर्यटनाचा हेतू साध्य होण्यास मदत होते.

हे नकाशे वनखात्याच्या सर्व्हेक्षण खात्यांनी तयार केल्याने ते प्रमाणानुसार (SCALE) अधिकृत आणि अचूक असतात. हे नकाशे तयार करताना अभ्यासपूर्वक स्थळ निर्देशक असे TOPOSHEET च्या सुत्रानुसार केले जातात. त्यामुळे विशाल वनक्षेत्रात स्वारस्य असलेल्या त्या स्थळी जाण्याचा मार्ग तेथील भौगोलिक स्थिती, तेथील धोके यांची माहिती प्राप्त होते. मात्र हे नकाशे खाजगी वितरणासाठी नाहीत.

याच नकाशांद्वारे क्षेत्रातील पाणथळ विभाग, नाले, गर्दझाडीचा भाग, वन्यजीव प्रमाणे पक्षी संचार क्षेत्र यांच्यासह परस्पर विभागातील अंतराची कल्पनाही येते. या विभागांना कंपार्टमेंट असे संबोधतात. त्यांना क्रमांक असल्याने वनातील प्रशासकीय इमारत, टेहाळणी बुरुज, भटकंतीचे अधिकृत सोयीचे मार्ग, धबधबे ही ठिकाणे दर्शवतात. त्यामुळे आपली वनातील भटकंती सुखकारक होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नकाशे निर्मिती

आपल्या गरजेनुसार नकाशे लागतात तर अज्ञात अफाट निसर्ग परिसर जाणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नकाशे निर्मितीसाठी जे प्रयत्न चालवलेत ते स्पृहणीय आहेत. त्यामुळे मानवी उर्जा, वेळेची बचत होऊन अचूक नकाशे प्राप्त होत आहेत.

पूर्वी जमिनीचे मोजमाप करून भूमापनाचे नकाशे तयार व्हायचे. पण आता विमानातून तसेच उपग्रहानी पाठवलेल्या छायाचित्राच्या आधारे नकाशे तयार करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. उपग्रहाद्वारे प्राप्त होणाऱ्या छायाचित्रास उपग्रही प्रतिमा म्हणजेच SATELLITE IMAGERY म्हणतात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राद्वारे संवेदन (REMOTE SENSING) संबोधतात. याव्दारे प्राप्त झालेली माहिती संगणकाच्या साहाय्याने रंगाचे पृथक्करण करून अखेर हवे ते अचूक नकाशे तयार केले जातात. पृथ्वीवरील अति सुरक्षा घटकांचे सादरीकरण उपग्रह प्रतिमांमुळे प्राप्त होते.

सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाची हाताळण्याजोगे जी उपकरणे आली आहे, त्यांनी तर नकाशाचे वास्तवदर्शन घडतेय. त्यात दूरभाष (MOBILE ) मधील विविध प्रकारचे Apps, Google आणि GPS उपकरणांनी शाळकरी विद्यार्थीपासून वयोवृध्दापर्यंत कुणीही उपलब्ध नकाशांव्दारे माहिती मिळवू शकतात.

GPS: चालता बोलता प्रवासी मार्गदर्शक

उपग्रहसचित्र वास्तवदर्शक नकाशे प्राप्त होत आहेत. त्याच्या साह्याने अज्ञात प्रदेशाचीही योग्य माहिती मिळत आहे. आता GPS (Global Positioning System ) म्हणजे सचित्र नकाशा दर्शन हे उपकरण हाताळणे तसे सोपे आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपरोक्त साधनापेक्षा परिश्रमपूर्वक नकाशा वाचनाचे मोल विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयात उपलब्ध करून देणे हे जाणकार अध्यापकांचे काम आहे. त्याद्वारे नकाशावाचन केल्याने अनोख्या पर्यटनाच्या अभिरुचीबरोबर सुजाण जाणकार-अभ्यासू पर्यटकही निर्माण होतील.

 

A MAP SAYS TO YOU
READ ME CAREFULLY
FOLLOW ME CLOSELY
DOUBT ME NOT
I AM THE EARTH IN THE
PALM OF YOUR HAND
WITHOUT ME YOU ARE ALUNE AND LOST

J.B. HARELY
(CARTO GRAPHIA)

-अरुण मळेकर

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..