नवीन लेखन...

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग १)

(पडदा उघडतो. एक गृहस्थ सैरावैरा होऊन रंगमंचावर येतो. १५ ऑगस्टचा दिवस असल्यामुळे सगळीकडे गजबजाट आहे. आनंदाचे वातावरण आहे. हे ऎकून पाहून तो अस्वस्थ होतो आणि…)

गृहस्थ – बंद करा हा आवाज, गप्प बसा… अरे गप्प बसा ना… शांत… एकदम शांत. हा आवाज ऎकला की माझ्या कानठळ्या बसू लागतात. मनाचा उद्रेक होतो. भूतकाळाच्या स्मशानात पहूडलेली आठवणींची प्रेतं अकस्मात तांडव घालू लागतात. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, देशाभिमानाची गाणी, फडफडणारा तिरंगा, सैनिकांची मानवंदना, लोकांचा गजबजाट ऎकला की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. स्वातंत्र्य? स्वातंत्र्य म्हणे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य मिळाले ते तुम्हाला… आम्हाला नव्हे. आम्हाला मिळाले ते पारतंत्र्यापेक्षाही दळभद्री आयुष्य.

(स्वतःला सावरत) तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की कोण आहे हा मनुष्य? जो कारण नसतानाही आम्हाला दोषी ठरवतोय. मी?… मी बिनचेहर्‍याचा माणूस आहे. होय, चेहरा नसलेला माणूस. कारण मी… निर्वासित आहे आणि निर्वासिताला चेहरा नसतो. त्याच्याजवळ असतात फक्त व्रण. वर्षानुवर्षे परंपरा म्हणून जोपासलेले व्रण. ह्याच परंपरेवर आमच्या पिढया जगल्या मेल्यागत. जागोजागी फाटलेल्या आयुष्यावर हरघडी ठीगळे चिकटवीत आलो. पण आता बस्स…. ज्याला आयुष्य म्हणावे असे आयुष्य म्हणून काहीच उरले नाही. उरली आहेत फक्त ठीगळे. एखादया ओबडधोबड भयाण पिशाच्चाप्रमाणे गतकाळाच्या आठवणींनी माझे अंतःकरण ग्रासून टाकले आहे. १५ ऑगस्ट १९४७ हा आम्हा निर्वासितांच्या आयुष्यातला काळा दिवस. एकीकडे आमचे राज्यकर्ते नि लोक उत्साहात मग्न होते तर दुसरीकडे रस्त्यांवर पाचोळ्याप्रमाणे कलेवरांच्या राशी पडल्या होत्या. एकीकडे लोक आनंदाच्या मखमली मृदूल बाहूपाशात निजलेले असताना, दुसरीकडे आमच्या आयाबहींणींच्या अब्रुंची लक्तरे उडत होती. त्यावेळी…. त्यावेळी मी केवळ ५ वर्षांचा होतो. माझी आई थकलेल्या हातांनी मला जेवण भरवत होती “हा घास काऊचा, हा घास चिऊचा, हा घास….”… आणि अचानक वादळ यावं असं कुणीतरी आलं नि मला गर्रकन भिरकावून दिलं. क्षणभर कळलंच नाही काय झालं? मी रडत होतो हुंदके देत होतो. डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. मला काहीच कळत नव्हतं, काही कळण्यासारखं ते वय नव्हतं. चार-पाच जण माझ्या आईला काहीतरी करत होते. मी मात्र काहीच करु शकलो नाही. केवळ आई आई म्हणून विव्हळत होतो. कळायला लागलं तेव्हा कळलं की माझ्या आईवर धर्मांधांनी बलात्कार केला होता. आईईईई आईईईई (मोठ्याने रडतो)…

माझ्या काकांनी मला पाकीस्थानातून भारतात आणले. पण आम्हाला भारतात आश्रय मिळाला नाही. निर्वासित होऊन जगावं लागलं आम्हाला. आपल्याच हक्काच्या मातृभूमीवर निराश्रित झालेल्या माझ्या अनेक बांधवांना मी मरणाचा आश्रय घेताना पाहिलंय. गेली अनेक वर्षे हे वादळ काळजात साठवून जगत आहोत आम्ही. पण आता बस्स…आता बस्स. आता एक घाव दोन तुकडे. (असे म्हणत बंदूक काढतो).

क्रमशः

पुढचा भाग लवकरच

— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री 12 Articles
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..