नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग ८

‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’असे आपण नेहमी म्हणतो. त्या प्रमाणे प्रत्येक टूरच्या यशामागे टूर लीडरचा सहभाग फार महत्त्वाचा, असे म्हणावेसे वाटते. आपली टूर कशा प्रकारे पार पडली आणि आपण त्यातून किती आनंद मिळवला, हे सर्वस्वी आपल्याला लाभलेल्या टूर लिडरवर खूपसे अवलंबून असते .असे माझे वैयक्तिक मत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण टूर करणार असू , तर टूर लिडर खूपच शार्प,तात्काळ पण योग्य निर्णय क्षमता असणारा, याशिवाय त्याला स्वतःला त्या सर्व ठिकाणांची ओळख, अभ्यास असावयास हवा.वेळेचे गणित जमवून आणणारा तर तो असणे अत्यावश्यकच.

सुशांत,आमचा टूर लीडर.एक-दोन दिवसातच आम्हा सर्वांच्या फॅमिलीतला मेंबर बनून गेला होता. मृदू भाषा पण ठाम निर्णय त्याच प्रमाणे वेळेच्या बाबतीत अगदीच वैशिष्ट्यपूर्ण असा होता. आपण घेऊन आलेल्या समूहाला जास्तीत जास्त कोणत्या नियोजनातून आनंद देऊ शकतो याचा सातत्याने विचार करणारा होता.

वेळोवेळी प्रत्येक ठिकाणांची योग्य तेवढी माहिती देत ते विशिष्ट ठिकाण, बघण्यास आमची उत्सुकता वाढवत ठेवण्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरला. त्याच्याशी संवाद साधला असता तो गेल्या पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात उतरलेलाआहे.तर आठ वर्षांपासून केवळ आंतरराष्ट्रीय टूर्सचेच नियोजन तो सांभाळत आहे असे लक्षात आले. बऱ्याच वेळी वाटले की, आपली सहल सुशांत मुळेच आनंददायक झाली आहे.कारण युरोपातही पर्यटन क्षेत्रात प्रत्येकाच्या तोंडी त्याचेच नाव असायचे. वर्षभरात अर्ध्यापेक्षा जास्त दिवस युरोपात वास्तव्य असते, हे त्यामागील गुपित होते हे समजले.

जेवणाची व्यवस्था सांगितल्यानुसार चोख आहे किंवा नाही, हे बघण्यासाठी तो हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम हातावर पदार्थ चाखून बघायला विसरायचा नाही. त्या वेळी नव्यानेच संसारात पाऊल टाकलेल्या नव्या नवती ची आठवण झाली. ती पण स्वयंपाकात हात बसेपर्यंत असेच करत असते.सुशांतचा उद्देश स्वयंपाक करावयाचा नव्हे तर, तो चवीला कसा झाला आहे? ओके आहे ना?हे बघण्याचा असायचा हे निश्चित.

पूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे युरोपातील हॉटेल्समध्ये मनुष्यबळ फारच कमी. त्यातही त्यांचा गोंधळलेला चेहरा बघितला की हा पठ्ठ्या स्वतः त्यांना अगदी जेवण सर्व्ह करण्यापासून मदत करत असायचा. त्यामुळे वेळेचे गणितही बरोबर चालायचे आणि आमचीही गैरसोय टाळली जायची. शिवाय युरोपियनांनाही तो खूप कामाचा मदतनीस आहे असे वाटायचे.म्हणजे सुशांत एका दगडात किती पक्षी मारायचा बघा!

असे असले तरीही मी स्वतः मात्र सुशांतला एका बसणी दुपारचे जेवण घेताना कधीच बघितले नाही.क्वचित वेळेला रात्रीचे जेवण तो व्यवस्थित बसून घेत असायचा.आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे या जाणिवेतून मी सुशांतला जेवणाविषयी आठवण करून द्यायची.

बाकी टूर वर असताना वाहनांची व्यवस्था, तेथील सर्व तिकीट व्यवस्था, आवश्यक तेथे गाडीची व्यवस्था, वगैरे कामं तो चोख बजावत होताच.त्यामुळेच तर आमच्यासाठी पोटातले पाणी न हलता आमची टूर व्यवस्थित एन्जॉय करू शकलो आम्ही . आपण आयोजित केलेल्या पर्यटनासाठी योग्य असा टूर लीडर मिळणे हा नशिबाचाच एक भाग म्हणता येईल. तोच जर आळशी असेल तर तुमच्या सहलीचा ‘फज्जा’उडालाच असे समजावे. पण टूर लीडरचा हा जॉब म्हणजे तारेवरची कसरतच असते. तर त्याच्यासाठी प्रत्येक टूर म्हणजे एक स्वतंत्र कसोटीच होय.

देशाच्या वेगवेगळ्या विभागातून,निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या एज ग्रुपचे तीस चाळीस जण एकत्र आणत त्यांच्या स्वभावधर्मानुसार, त्यांना, त्यांच्या मानसिकतेला सांभाळणे म्हणजे अक्षरशः डोके गरगरवून टाकणारी गोष्ट होय. केवळ तो आणि तोच या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करू जाणे. म्हणूनच कोणत्याही टूर च्या यशाचे श्रेय हे आपल्या टूर लीडरला द्यावेच लागते. यासाठी सुशांतला,त्याच्या सहन शक्तीला सलाम करत मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.

युरोपातील देश अंतराने आणि आकाराने ही जवळजवळ आणि छोटी आहेत. पण लंडन ते रोम पर्यंतच्या प्रवासात जाताना जेवढ्या देशांतून आपण प्रवास करत जाणार आहोत, त्या त्या देशातील एका तरी शहराचे वैशिष्ट्य बघत, त्या देशाची तोंड ओळख करून घ्यावी नि,मग पुढे जावे हा सुशांत चा अट्टहास असायचा. परिणामी आम्हालाही आपण बर्‍याच देशांच्या जमिनीवर पाऊल ठेवले.तेथे काहीतरी बघितले. आणि आपल्या पासपोर्ट वर एवढ्या देशांत आपण जाऊन आलो आहोत, याची एन्ट्री बघून समाधान मिळाले. संपूर्ण प्रवासात निसर्गाकडून तर यथेच्छ नयन सुख मिळणार होते हा भाग वेगळा.

लेंचेस्टाईन,जगातला सर्वात लहान देशांपैकी क्रमांक दोन वर असणारा एक देश.लोकसंख्येने तर केवळ ३७ हजार.’ऑं’ म्हणण्याची वेळ आता तुमची आहे. आपल्या देशात लहान लहान तालुक्याची लोकसंख्या सुद्धा या पेक्षा नक्कीच जास्त असते. एखाद्या टुमदार घरा प्रमाणे हा एक सुंदर असा देश. या देशाची राजधानी ‘वडूज’. शहरामध्ये संपूर्ण शहराला ट्राम मध्ये बघून फेरफटका मारला.अवघ्या तासा भरात शहरभर फिरून झाले! सुरुवातीला वडूज म्हटले की एका महाराष्ट्रीयन गावाचे नाव वाटतेय या कल्पनेने हे अगदीच आपल्याला जवळचे आहे असा भास झाला.या राजधानीच्या शहराची लोकसंख्या तर केवळ पाच हजार. पाहताना मजा आली. पण हे सत्य आहे.ट्राम मधून बसत प्रवास करण्याचा हा अनुभव खूप आनंद देऊन गेला. या दरम्यान दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या बिल्डिंग्ज व दृश्य याबाबतीत देण्यात येणारी माहिती इत्यंभूत होती. येथील बंगल्यांचे आर्किटेक्चर डिझाईन मात्र खूपच सरस असे दिसले.
मनाला खूप भावले ते .फेरफटका मारून आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात तर आमच्या पासपोर्टवर त्या देशात जाऊन आल्याचा शिक्का मारून मिळाला आम्हाला!तो मारून घेण्याची सक्ती नव्हतीच पण आम्ही आवश्यक ती फीस भरत, तो हौसेने घेतला आमच्या पासपोर्टवर.

यानंतर आम्ही प्रवेश केला तो ‘आॅस्ट्रिया’ या देशात. स्वारोव्हस्की या क्रिस्टल वर्ल्डला भेट देत. अतिशय अप्रतिम पद्धतीने विस्तारित केलेल्या या क्रिस्टल वर्ल्ड मध्ये. जुन्या काळी बनवलेल्या क्रिस्टल्स च्या काही वस्तू, वस्त्र यांचे सुंदर प्रदर्शन आहे.हे रंगीबेरंगी प्रदर्शन बघताना आपले डोळे दिपून न गेल्यास नवल ते काय! आपणही काही वेळेपुरते या सुंदर जगताचाच एक भाग बनून जातो. या खड्यांच्या दागिन्यांचा मनाला मोह होतो.आणि पर्यायाने आपली खरेदी होतेच.

वॅटन नावाच्या व्यक्तीने बनवलेले विशाल असे क्रिस्टल वर्ल्ड बघावयास प्रवेश करताना एका राक्षसाच्या मुखातून पडत असणारा पाण्याचा धबधबा आपल्याला बराच वेळ खिळवून ठेवतो.आजूबाजूचा हिरवागार परिसर या राक्षसी चेहऱ्याला संपूर्णपणे हिरव्या तृणाचा विळखा आणि या हिरव्या पार्श्वभुमीवर त्याच्या डोळ्यात बसवलेले मोठे मोठे क्रिस्टल्स आपले लक्ष वेधून घेतात.

या खड्यांच्या दुनिये भोवती असणारा रम्य परिसर आरामात बसून विश्रांती घेण्यासाठी खुणावतो आपल्याला. त्याच्या साथीला आल्हाददायक हवामान भुरळ घालत रहाते.

लेंचेस्टाईन मधून इन्सब्रुक ला म्हणजे आॅस्ट्रिया पादाक्रांत करत असताना दिसणारा निसर्गही अप्रतिमच. चारही बाजू डोंगरांनी वेढलेल्या. हिरवळीने नटलेल्या येथील पहाडांचे सौंदर्य हे स्वित्झर्लंड च्या पहाडी प्रदेशा पेक्षा निराळेच. हे पहाड प्रथम आपल्याला केवळ पांढऱ्या काळया पाषाणाची दिसतात. पण मध्येच कुठे तरी त्याची बर्फाळ शिखरं उंच होत, आपल्याला बघत आहेत असे वाटते.आल्प्सच्याच पर्वत रांगा पण प्रत्येकाचे आपले सौंदर्य वेगळे.विशेष म्हणजे बाराही महिने ही काही शिखरं बर्फाच्छादित असतात.अशी सुशांतने माहिती दिली आम्हाला.

स्वाराव्हस्की ते ईन्सब्रुक प्रवासा पासून सुरू झालेली वायनरीची दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवी गर्द शेती, थेट रोम पर्यंत आपला पाठलाग चालू ठेवतात.

त्या दिवशीचा आमचा नियोजित मुक्काम ईन्सब्रुक शहरात होता. पर्यायाने आम्ही जुन्या ईन्सब्रुक शहरात प्रवेश केला. पंधराव्या शतकात ऑस्ट्रियाचा राजा मॅक्स मिलन याने आपली दुसरी बायको,मारिया थेरोसीन कोरझा हिच्या हट्टापायी बांधलेली सोन्याचे छत असणारी विशेष बाल्कनी बघितली.

‌ ‘तुम्ही माझ्यासाठी विशेष असे काही बनवू शकाल का?’ असा प्रश्न विचारत राजाला आव्हान दिले.आणि राजाकडून तिने स्वतःसाठी बनवून घेतलेल्या या बाल्कनीच्या छताला २६५७ सोन्याच्या टाइल्स लावलेल्या आजही चांगल्या अवस्थेत आहेत. स्त्रीहट्ट फार पुरातन काळापासून चालू आहे यावर विश्वास बसला. या भागातील जुन्या युरोपियन इमारती बघून त्या काळातही युरोप चांगलेच प्रगतीपथावर होते याची प्रचिती आली.

एकाच दिवशी आम्ही ब्रेकफास्ट स्वित्झर्लंड च्या झ्यूरिच मध्ये,लंच लेंचेस्टाईन चर्या वडूज मध्ये तर,डिनर आॅस्ट्रिया च्या ईन्सब्रुक मध्ये घेतले आणि एकाच दिवशी युरोपातील तीन देशांना भेटी दिल्याचा अनोखा आनंद लुटला.

अशा पद्धतीने, लेंचेस्टाईन आणि ऑस्ट्रियाची ही धावती भेट सुध्दा आमच्या पारड्यात थोडाफार आनंद टाकूनच गेली असे म्हणता येते. संपूर्ण प्रवासात निसर्ग तर वेगवेगळ्या अँगलने आपले रूप दाखवत तृप्ततेचा नजराणा आम्हाला बहाल करत होता हे सांगणे न लगे.

‌‌भाग ८ समाप्त
क्रमश:

© नंदिनी म.देशपांडे

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..