नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग १०

शाळेमध्ये असल्यापासून पिसाचा झुलता मनोऱ्या विषयी कमालीचे कुतूहल होते. पाडोवातून निघाल्यानंतर जेंव्हा, आमच्या बस ने आम्हाला पिसाच्या मनोर्‍याच्या परिसरामध्ये सोडले तेंव्हाचा तो क्षण खरचं खूप अविस्मरणीय ठरला.पुस्तकांमधून वाचलेले चित्र मनावर कोरले गेले होतेच. ते लख्खपणे समोर दिसले.मन आणि काया दोन्हीही मोहरून जायला झाले.आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन ते बघतोय! हेच मुळी स्वप्नवत होते!

पिसा येथे, स्क्वायर अॉफ मिरॅकल्स या ठिकाणी, असणाऱ्या तिन्ही वास्तू खरोखरच अप्रतिम ! बांधकाम कलेचे उत्कृष्ट उदाहरण. तीनही पांढऱ्या शुभ्र संगमरवरी पासून बनवलेल्या. सभोवतालच्या हिरवळीवर आणि आकाशी अंबराच्या पार्श्वभूमीवर तर या चांदण्यां सारख्या चकाकत होत्या. अशा या सौंदर्यपूर्ण इमारतींना सामावून घेणारा हा चौक म्हणूनच स्क्वायर ऑफ मिरॅकल्स या नावाने ओळखला जातो. एवढ्या विशाल इमारती, त्यावर असणारी शिल्पकला, त्याचे आर्चस् ,त्यावरील अगणित नाजूक दिसणारे असंख्य खांब हे सारं अक्षरशः एखाद्या चमत्कारा सारखंच आहे. बघता क्षणीच या जागेला दिलेले नाव अगदी साजेसं आहे असे लक्षात आले.

बापेस्ट्री,कॅथॅड्रल व लेनिंग टॉवर ऑफ पिसा या संगमरवरी वास्तू लांबून बघितल्या असता, एका सरळ रेषेत असाव्यात असे वाटते. पण जवळ गेल्यानंतर प्रत्येक वास्तू केवढ्या तरी अंतर ठेवून स्वतंत्रपणे उभ्या असलेल्या दिसून येतात.

बापेस्ट्री. बापेस्ट्री ,हा चर्च चाच एक प्रकार.पण प्रार्थने शिवाय येथे इतर धर्मियांचे धर्मांतर करून त्यांचा ख्रिश्चन धर्मात समाविष्ट केले जाते,ते ठिकाण.अशी माहिती मिळाली.

संपूर्णपणे गोलाकार असणारी ही वास्तू ,आपल्या कर्नाटकातील विजापूरच्या गोलघुमटाची आठवण करून देते. इटलीमध्ये आर्चस् चे जरा जास्तच महत्त्व आहे असे दिसून आले.या वास्तूला ही भरपूर छोटे-मोठे आर्चस् असून प्रचंड मोठा व्यास असणारी ही वास्तू आहे.तिचे आज किती महत्त्व आहे माहीत नाही, पण इटलीच्या प्राचीन इतिहासात ही अतिशय महत्त्वाची असणार एवढे मात्र नक्की. इतिहासाचा मागोवा न घेता पर्यटनाचा आनंद लुटावयाचा या हेतूने केलेले आमचे पर्यटन मात्र सफल होत आहे हे लक्षात आले.

कॅथेड्रल,आयताकृती रचनेतून साकारलेले पण त्यावर भरपूर आर्चस्, पुतळे असणारे हे चर्च खूपच मोठे आहे.कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ असू देत, मंदिर,मज्जीद ,चर्च किंवा आणखीन कोणतेही तेथे गेले की, ती वास्तू प्रसन्नपणे आपल्याकडे बघून स्मित हास्य करत,आपल्या डोक्यावर आशीर्वादाचा हात फिरवत असल्याचा भास होतो.आपले मनही आनंदून जाते.आपल्या डोळ्यात मावणार नाही असे हे कॅथेड्रल कितीतरी लोकांना मन:शांती बहाल करते.
लेनिंग टॉवर ऑफ पिसा, ज्याला आपण पिसाचा झुलता मनोरा असे संबोधतो.सकृत दर्शनी हा मनोरा म्हणजे, कॅथॅड्रल चाच एक भाग असावा असे वाटते. पण जवळून बघितल्या नंतर दोन्ही स्वतंत्रपणे उभे आहेत हे लक्षात येते.इ.स.१११३मध्ये ‘बोनॅन्नो पिसानो’ नावाच्या अभियंत्याने या मनोऱ्याचे डिझाईन बनवले.जगातल्या सात आश्चर्यांच्या ओळीत बसलेला हा मनोरा नंतर मात्र ओळीतून बाहेर पडला.

एकूण आठ माळ्यात बनलेला हा मनोरा आहे.सर्वच माळे गोलाकार आहेत.तर समान अंतरावर असणाऱ्या एकावर एक चढवलेल्या पिलर्स वर हा मनोरा उभा आहे प्रत्येक पिलर ला जोडणारे आर्चस् अत्यंत रेखीव आणि आकर्षक आहेत. संपूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी पाषाणात बांधलेला हा मनोरा, त्याचे बांधकाम चालू असतानाच साधारण चौथ्या माळ्या पासून झुकत चाललाय हे लक्षात आले. ३.९०अंश ते ५.५०अंशाने मनोरा एका बाजूला झुकल्याचे दिसून येते.जाणकारांच्या मते,या मनोऱ्याचा पाया हा सॉफ्ट ग्राउंड वर बांधला गेला आहे. त्यामुळे वर चढत गेलेले मनोर्‍याच ओझे हा पेलू शकला नाही. म्हणूनच हा झुकला असावा. या मनोऱ्यावर चढण्यासाठी एकूण २८४ पायऱ्या आहेत.चढावयास ३० मिनिटे लागतात.एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत यात लोकांना आत प्रवेश करता येतो. बाकी सहा महिने मात्र बाहेरूनच बघावा लागतो. आत मध्ये मोठ्या मोठ्या घंट्या ( बेल्स) लावलेल्या आहेत.

पिसाचा हा मनोरा जरी किंचित झुकलेला आहे,तरीही त्याचे सौंदर्य अद्वितीय आहेच. आपल्या डोळ्यांमध्ये तो जास्तीत जास्त साठवून ठेवावा असेच प्रकर्षाने वाटते.शेवटी कॅमेरात कैद केलेले सौंदर्य हे डोळ्यांनी बघितलेल्या सौंदर्यापुढे केंव्हाही गौणच.स्क्वायर आॅफ मिरॅकल्स चा हा नजराणा दृष्टीआड होईपर्यंत आपली नजर हटूच नये त्यावरुन असे वाटत रहाते,हे मात्र अगदी खरे!

यानंतर आम्ही उंच टेकडीवरअसणाऱ्या,’पिझ्झाल्ले माईकॅंजेल्लो’ या चौकात आलो. येथे भव्य उंचच उंच असा, संपूर्ण उभा असणारा डेव्हीड चा पुतळा आहे. संपूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत असणाऱ्या या पुतळ्याचे अंगावरचे केस अन केस तसेच पोटाच्या आतील अवयवांचा बाहेरुन दिसणाऱ्या खुणांसह एवढा अप्रतिम बनवलेला आहे की तो हुबेहूब डेव्हीडच वाटतो.

इटली हा कला,संस्कृती, इतिहास यांनी संपन्न असणारा देश आहेच. कलेचे माहेरघर आहे. शिल्पकला चित्रकला संगीत क्षेत्रातले खूप नावाजलेले जास्तीत जास्त कलाकार इटलीमध्ये आहेत.

तेथे आपल्याला रस्त्यांवर सुद्धा ठिक ठिकाणी आपली कला सादर करत असणारी कलाकार मंडळी चौका चौकातून दिसतात.

डेव्हिडच्या भव्य पुतळयाला बघितल्यानंतर आम्हाला याच टेकडीवरून फ्लोरेन्स शहराचे दुर्बिणीतून दिसणारे विहंगम दृष्याने मनाला मोहूवून टाकले., कितीतरी टॉवर्स आणि कॅथॅड्रल चे डोंब तसेच सर्वच घरांची लाल रंगाची छतं हे नयनमनोहर चित्र आपल्याला विलक्षण भावते.

दिवसभर केलेल्या इटलीतील या साऱ्या गोष्टींची मनातल्या मनात समाधानाने उजळणी करत करतच आम्ही फ्लॉरेन्स शहरात प्रवेश केला. जवळजवळ युरोपभर किंबहुना, इटलीमध्ये जरा जास्तच प्रमाणावर, हॉटेलिंग करणारे लोक हॉटेलच्या बाहेर टेबल खुर्च्यांवर बसून लंच डिनर वगैरे घेताना दिसून येतात.या लोकांची आवडती जागा किंवा पद्धत म्हणता येईल ही. हॉटेल्सच्या डायनिंग मध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेणारे खूपच कमी लोक असतात तेथे.
फ्लॉरेन्सला रात्रीचा आराम घेत सकाळी नाश्ता आटोपत, आम्ही रोम या राजधानीच्या शहरात प्रवेश केला. येथून उतरलो, आणि ‘Rome is not built in a day’ ही प्रसिद्ध म्हण आठवली.

‌व्हॅटिकन सिटी,हा धार्मिक अधिष्ठानावर उभा असणारा एक स्वतंत्र देश. रोम शहरातच वसलेला, पवित्र चर्चेस साठी प्रसिद्ध.सर्वात कमी लोकसंख्या असणारा (केवळ एक हजार) आणि सर्वात कमी क्षेत्रफळ. म्हणून हा जगातील सर्वात लहान असा स्वतंत्र देश आहे.

मुस्लिमांना मक्का मदीना जेवढे पवित्र, तेवढेच ख्रिश्चन लोकांना पवित्र असणारी ही व्हॅटिकन सिटी. छोटा आहे तरीही या देशाला आपली स्वतःची अशी राज्यघटना, राष्ट्रध्वज, चलन,पासपोर्ट या सर्व गोष्टी आहेत. त्यांचे मुख्य धर्मगुरु पोप हेच या देशाचे राजे असतात. त्यांचे वास्तव्य येथे असते.या देशातील चर्च फारच बघण्यासारखी आहेत. एक कोटींपेक्षा जास्त अनुयायी असणारे हे पवित्र ठिकाण आहे.

व्हॅटिकन म्युझियम व सिस्टीन चॅपेल ही दोन्ही ठिकाणे अप्रतिमच. चित्रकलेचा राजा असणाऱ्या मायकेलअँजेलोने काढलेले सुंदर सुंदर पेंटिंग्ज व थक्क करून टाकणारी सिलिंग पेंटिंग्ज बघून,”आ वासून बघणे”, म्हणजे काय असते?याचा प्रत्यय येतो. म्युझियम मध्ये चित्रकलेशिवाय शिल्पकला स्थापत्यकला यांच्या एकापेक्षा एक सुंदर सुंदर नमुन्यांचा अक्षरशः भरणा आहे. त्यांची भव्यता दिव्यतेच्या साथीने आपल्याला थक्क करून टाकते.

सिस्टीन चॅपेल हे येथील पोप यांचे निवासस्थान. सिलिंग पेंटिंग या कलेचा आणि त्याचबरोबर चित्रकलेचा कळस गाठणारी ही ठिकाणं. एवढ्या प्रचंड उंचीवर पेंटिंग्ज कशी साकारली गेली असावित? या विचाराने मती गुंग होऊन जाते.केवळ शब्दातीत असणारे हे सौंदर्य बघून आपले डोळे दिपून जातात,हे वेगळे सांगणे नकोच.

पवित्र बॅसिलिका या वास्तूला भेट हा एक अनोखा अनुभव होता. बॅसिलिका म्हणजे एक विशेष प्रकारची डिझाईन केलेली भव्य अशी पवित्र वास्तू. प्राचीन काळात राजकीय आणि कायदेविषयक चर्चा करण्याकरता या वास्तूचा उपयोग व्हायचा.बॅसिलिका म्हणजे मोठ्ठे असे पवित्र कॅथॉलिक चर्च. येथे मुख्य धर्मगुरूंचे वास्तव्य असते. या वास्तूचे पावित्र्य आणि स्टेटस् उच्च स्थानी रहाण्याची परंपरा कायम राखली जाते.बॅसिलिका हे स्थापत्य कलेचे वैभव संपन्न ठिकाण आहे.

रोम शहरातच असणारी पण स्वतंत्र देशाचा दर्जा राखणारी,ही पवित्र नगरी व येथील ठिकाणं आपल्याला आपल्या चार धाम यात्रेच्या पावित्र्याची आणि मांगल्याची आठवण करून देतात हे खरे.

भाग १० समाप्त.
क्रमशः

© नंदिनी म. देशपांडे

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

1 Comment on मला भावलेला युरोप – भाग १०

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..