नवीन लेखन...

माझा अक्षर छंद

कोणताही छंद एकदा का माणसाला जडला की तो त्याच्या जीवनाचा अविभाज्य असा भागच बनून जातो हे जे विधान मी आज जे करतो आहे त्यामागे माझी साठ वर्षांची धडपड आहे. या छंदानं माझी सोबत केली, माझ्या जीवनातल्या अनेक सुख दु:खांच्या क्षणात त्यानं सोबत केली. या छंदानं अनेक क्षेत्रातली माणसं जोडली

आणि हा जडलेला स्नेह तुटत नाही उलट ही प्रेमाची, स्नेहाची वीण दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालली आहे असं मला वाटतं.

खरं तर आजवरच्या छंदाकडं तटस्थपणानं पहायला कधी वेळच मिळाला नाही. संग्रह वाढत होता. नवी नवी हस्ताक्षरे संग्रहात जमा होत असताना त्याचे जतन तर व्हायलाच हवं पण त्याचबरोबर तो आपल्या कड्याकुलुपात बंदिस्त होऊन चालणार नाही तर तो प्रदर्शनाच्या रूपाने रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचला पाहिजे या ध्यासानं महाराष्ट्र गोवा, आंध्र अशा अनेक राज्यात जाऊन त्या निवडक हस्ताक्षरांची प्रदर्शने आयोजित केली त्या प्रेक्षकांशी स्नेह जुळला आणि तो आजपर्यंत टिकून आहे. चंद्रपूरला साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष कथाकार वामनराव चोरघडे होते. या संमेलनात प्रदर्शन भरविण्याची संधी चालून आली आणि महाराष्ट्राच्या नकाशातलं एका टोकाला चंद्रपूर मला जवळचं वाटलं. अनेकांशी परिचय झाला आणि तो स्नेहात, गाढ स्नेहात रुपांतर करणारा ठरला. अनेक मुलाखतीत मला एक प्रश्न सतत विचारला गेला आणि तो म्हणजे या छंदाने तुम्हाला काय दिले? आणि दुसरा प्रश्न असतो तुम्ही छंदाला काय दिलेत?

दोन्ही प्रश्नांची उत्तरे छंदानं साठी पार केल्यानंतर आज मी सहजपणाने देऊ शकतो. ”या छंदानं मला गावोगावी मझ्यावर, माझ्या आगळ्यावेगळ्या छंदावर मनापासून जीव झोकून देऊन प्रेम करणारी रसिक माणसे दिली. त्यानी अनेक प्रकारांनी माझ्याशी स्नेह जुळवला. तो आजही कायम आहे. माझ्या या प्रश्नाचं उत्तर प्रा.राम शेवाळकर यानी माझ्यावतीने नागपूरच्या एका प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी देऊन ठेवलंयं, त्या वेळी ते म्हणाले, या छंदानं आमच्या रामभाऊंना अनेक मित्र मिळाले. त्या मित्रांशी तुटू न देता हळू जोडावे या स्वभावाने सख्य केलं. त्यानीही स्नेह जुडवला. आणि सर्वात महत्वाची, मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, या छंदानं रामभाऊंना प्रत्येक गावात हक्काचं भाकरीचं घर मिळवून दिलं. कालमानाप्रमाणे काही व्यक्तींचा नियोग रामभाऊंना सहन करावा लागाला तरी त्या घरांशी कधी काळी जुडलेली नाळ कायम आहे.व्यक्ती गेल्या म्हणून घराशी असलेले संबंध सरले नाहीत उलट ते त्यांच्या आप्तांनी अधिकच प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधले आहेत. आणि हे सारं त्यांच्या या छंदानं केलंय हे मला आपल्याला मुद्दाम सांगावेसे वाटते.”

‘गेली साठ वर्षे माझी ही धडपड अव्याहत अविरत सरू आहे. नवनवे प्रयोग करण्यात मन सतत गुंतले असल्यामुळे तटस्थपणाने या छंदाकडे पहायला असा कधी वेळच मिळाला नाही. या छंदाची सुरुवात जरी एका जिज्ञासेतून झाली असली तरी या छंदानं मी जसा थोडासा आनंद रसिकांना देण्याचा प्रयत्न केला तरी या छंदानं मात्र मला माझ्या व्यथा वेदनांचा विसर पडला. तसा प्रयत्न केला हे मला मान्यच करावं लागेल. आणि या माझ्या आनंदात बालपणी आप्तांचा, आईचा, मित्रांचा, रसिकांचा आणि सर्वात मोठा वाटा माझ्यावर प्रेम करणार्‍या, छंदांवर प्रेम करणाऱ्या वि.स.खांडेकर, कुसुमाग्रजांपासून बा.भ.बोरकर, ना.ध.देशपांडे, राम शेवाळकर यांच्यापर्यंत अनेकांचा जसा वाटा आहे तसाच तो माझ्या पत्नीचाही आहे हे मला इथं सांगायलाच हवं. अनेकांनी या प्रवासात मला जो दुवा दिला तेवढीच माझी खरी कमाई आहे आणि या कमाईची वाटेकरी माझी पत्नी आहे. या माझ्या छंदाला तिने आई एवढेच प्रोत्साहन दिले, माझी उमेद वाढविली. आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागे पुढे न पाहण्याचं व्रत तिनं जन्मभर व्रतस्थपणाने जपले आहे. आज या छंदाकडे पहात असताना कवी यशवंतांच्या दोन ओळी मनावर कायमच्या कोरल्या गेल्यात त्याचे स्मरण होते, त्या ओळी होत्या –

”हे श्रेय येतसे आज माझिया करी!माझीच थोरवी सारी मी कशी म्हणावी तरी!”

या छंदांची सुरुवात कशी झाली? आपण होतो कुठे? आणि आता आहोत कुठे? पुढे कुठे जायचंय या प्रश्नांची उत्तरं शोधायचा हा एक प्रयत्न आहे. पुढची दिशा निश्चित करायला असं काही क्षण थांबणंच अधिक योग्य असतं.

बालवयात जडलेला छंद तुमचं अवघं जीवन व्यापून टाकतो. काही काळ तो मनोरंजनाचा भाग असतो खरा पण तोच तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे याची कल्पना नसते. आणि ती नसते म्हणून तर छंदातून आपण निखळ आनंद घेऊ शकतो. इतरांनाही तो भरभरून देऊ शकतो. जसजसं वय पुढे सरकत जातं ना अशा वेळी एखादा छंदच कंटाळवाण्या, व्यथावेदनांनी भरलेल्या नीरस जीवनात चैतन्य निर्माण करतो. मनाची प्रसन्नता कायम ठेवतो. असा छंद ज्यावेळी वाढीला लागतो त्यावेळी त्या छंदानं दिलेल्या आनंदाचं रुपांतर ब्रह्यानंदात कधी आणि कसं झालं ते कळत नाही.

ते शाळेचे दिवस. मराठी चौथीपर्यंतचा काळ खरोखरीने सुखाचा गेला. शारदा नाटकातील ती शारदा एका गीतात म्हणते तसा – ”बालपणीचा काळ सुखाचा आठवतो घडीघडी”

वडील मी नऊ वर्षाचा असताना गेले. अचानक गेले, ध्यानी मनी नसताना गेले. आणि त्यावेळी आई असूनही काही जरी जीवनात हरविल्याची भावना जी निर्माण झाली ती मात्र बालपण रम्य असते या कल्पनेने काहीशी खोटी ठरवली. वडील गेले आणि जाताना त्या आईच्या पदरात चार मुलांना देऊन गेले. आज प्रत्येक जण भावी जीवनाचा तटस्थपणे विचार करतो. वानप्रस्थाचं वाट्याला आलेलं जीवन अधिक सुखाचं व्हावं या साठी अनेक गोष्टची तरतूद करतो. पण मी ज्या काळात वाढले तो काळच वेगळा होता. अर्थातच त्या वेळच्या समस्यांचं स्वरूपच वेगळं होतं.

माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयीची सांगायचं झालं तर वडील अचानक गेले त्यामुळे हा विचारही कदाचित त्यांच्या मनात आला नसावा. मात्र एक गोष्ट खरी, की वडीलांच्या अशा अचानक जाण्यामुळे आईवर आई आणि वडील अशा दुहेरी जबाबदार्‍या पडल्या. त्याचा परिणाम कळत नकळत आम्हा भावंडांच्या कोवळ्या मनावर झाला. अकाली प्रौढत्व आलं. जे वय हसण्याखेळण्याचं त्या वयात ‘जबाबदारी’ या शब्दाचा काहीसा अर्थ कळला. आपली जबाबदारी आता आईवरची कशी कमी करता येईल याचा विचार सुरू झाला. आम्ही भावंडांनी आपापले मार्ग निवडले. धडपडलो, पडेल ती वाट्याला आलेली कामे केली आणि आईवरचा भार कमी करायचा, हलका करायचा प्रयत्न केला.

माझे वाचन, बर्‍यापैकी, आई वडीलांचे वाचन संस्कार बालवयात झालेले. वडीलांचे इंग्रजी – मराठी वाचन चांगले – चोखंदळ वाचक होते ते. अक्षरही छान होतं. घरी वृत्तपत्रे यायची, मासिकं यायची. गाण्याचा नाद यामुळे घरी ग्रामोफोन होता. नव्या नव्या ध्वनीमुद्रिका विकत घ्यायचे. त्या वेळी वाचनातलं किंवा गाण्यातलं आम्हाला कळत होतंच असं नाही. मात्र ते समजावून सांगायचं फार मोठं आणि महत्वाचं काम त्या काळात आई वडील आणि आमच्या एक आत्या होत्या त्यांनी केलं. लेखनाच्या बाबतीत तर वडीलांचा वाटा फार मोठा होता. अक्षर सुंदर असायला हवं हा जसा त्यांचा अट्टाहास होता तसंच ते शुद्धही असायला पाहिजे याकडे ते लक्ष द्यायचे. कुठे परगावी गेले तर ते आमच्यासाठी कधी खाऊ आणल्याचं आठवत नाही. मात्र ते गोष्टींची, थोऱ्या मोठ्यांच्या चरित्राची पुस्तके घेऊन यायचे. आत्या फार शिकलेली नव्हती ती बालविधवा होती, केशवपन केलेली. त्यामुळे ती नेहमी घरीच असायची. तिचं अक्षर छान, मोकळं, वळणदार. सतत ती काही ना काही लिहीत असायची. धार्मिक ग्रंथांचं वाचन ती करायची. संध्याकाळी दिवेलागण झाली की, स्तोत्रे म्हणून घ्यायची. रामायण – महाभारतातली एखादी गोष्ट सांगायची. पण या आत्याची आम्हाला एक गंमत वाटायची ती जशी अचानक यायची तशीच ती एक दिवस निघून जायची. आपल्या नातेवाईकांकडे तिचा हा स्वभाव साऱ्यांच्याच परिचयाचा होता. मात्र असं असलं तरी ती आली की, आम्हाला जसा आनंद व्हायचा तसा ती गेली की वाईटही वाटायचं. शाळेत आम्हाला शिक्षक लाभले ते संस्कार करणारे. पाठांतरावर भर असलेले. लेखनावर अधिक भर देणारे. या सार्‍यांचाच परिणाम आमच्या जडण घडणीवर झाला.

माझ्या छंदाची पूर्वपीठिका ही अशी आहे. वडील गेले. मामांनी आई व आम्हा भावंडांना कोल्हापूरला आणलं. हायस्कूलचे शिक्षण सरू झाले आणि तिथे माझं लेखन वाचनाचं वेड वाढीला लागलं. चांगलं वाचन करून घेणारे ्गुरु लाभले. आणि यातूनच या हस्ताक्षरसंग्रहाचा प्रारंभ झाला. शाळेत असताना वाचनामुळे लेखक त्यांच्या लेखनाशी जवळीक झाली. अक्षर चांगले. शुद्धलेखन यामुळे काही कामे करून मी माझा किरकोळ खर्चाचा आईवरचा भार कमी करयाचा प्रयत्न करत होतो. पण पोरकेपणाची भावना काही केल्या कमी होत नव्हती. माझ्या चांगल्या अक्षरामुळे इतरांच्याही चांगल्या अक्षराशी मैत्री झाली. आणि त्यातून लेखक एवढं चांगलं लिहितात मग त्यांचं अक्षर कसं असेल? याची जिज्ञासा निर्माण झाली. शाळेत असताना काही निमित्ताने पाहुणे आले की, त्यांच्या स्वाक्षरी घेण्याचा छंदाला सुरुवात झाली आणि यातूनच त्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीच्या हस्ताक्षराची कल्पना काही झालं तरी येत नाही, ती यायला हवी या जिज्ञासेचा जन्म झाला. आणि पुढे याच जिज्ञासेतून हस्ताक्षरांच्या संग्रहाचाही जन्म झाला. स्वाक्षऱ्या घेण्यापेक्षा हस्ताक्षर आणि स्वाक्षरी यांचा संग्रह करायच्या कल्पनेनं मूळ धरलं आणि यातूनच हस्ताक्षर संग्रहाचा छंद जन्माला आला. आता या घटनेला साठ वर्षे झाली.

त्या लेखकाशी समक्ष भेटीत संवाद साधणं, पत्रव्यवहार करणं, एखादा विषय देऊन त्यावर मजकूर लिहून घेणं सरू झालं. यासाठी मी माझी अशी पद्धत विकसित केली. ठराविक आकाराचा चांगल्या प्रतीचा कागद, संग्रहाची कल्पना स्पष्ट करणारे आणि अपेक्षा व्यक्त करणारे सविस्तर पत्र, माझ्याच कागदावर मजकूर लिहून स्वाक्षरीसह आणि जन्म स्थळ आणि जन्मतारखेची नोंद करून माझ्याच लखोट्यातून पाठवायचा अशी ती पद्धत होती. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या संग्रहात पहिले हस्ताक्षर समाविष्ट झाले ते किलेार्स्कर मासिकाचे ज्येष्ठ संपादक शंकरराव किर्लस्करांचे. हस्ताक्षरे गोळा होत होती. छोटी मोठी कामे करून जे चार पैसे हातात यायचे त्याचा उपयोग मी या संग्रहासाठी करत होतो. याच काळात वाचनाची भूक भागविण्यासाठी वाचनालयाची वर्गणी भरून सभासदही झालो होतो. एखादे नवे पुस्तक वाचायची माझी आधाशी वृत्ती. त्या वृत्तीला वाचनालयात ते पुस्तक नसणे किंवा असले तर ते कुणीतरी वाचायला नेलेले असण्याने छेद जात होता. यातूनच पुढे आपल्या आवडीचे पुस्तक आपल्याजवळ असायला हवे याचा जन्म झाला. यातूनच माझा ग्रंथसंग्रह वाढीला लागला. व्यवसाय बदलले तसे विषय बदलले आणि विषय बदलले तशी ग्रंथसंग्रहाची अभिरुचीही बदलत गेली. गरज आणि आवड, लेखन आणि त्याला ज्या ग्रंथांची संदर्भ म्हणून गरज आहे या निकषावर ग्रंथखरेदी सुरू झाली. आजही मी ग्रंथ खरेदी करताना हाच निकष लावत असलो तरी मला चरित्रे, आत्मचरित्रे आठवणी फार आवडतात. माणूस कसा घडतो किंवा घडला याचे दर्शन अशा पुस्तकातून घडते.

शालेय जीवन सरले. आणि आधी पोटापाण्याचा व्यवसाय शोधला. आईवरचा भार कमी करायचा प्रयत्न केला. जीवनात बरे वाईट अनुभव येत होते. आणि ते शहाणे करून जात होते. आपण स्वत:च्या पायावर उभे आहोत याचा आम्हा भावंडांना सार्थ अभिमान वाटत असला तरी आईला मात्र आपण मुलांसाठी काही करू शकत नाही याची खंत वाटत असावी. पण हळूहळू ती आम्ही कमी केली.

माझा छंद सुरु असतानाच एक घटना घडली. १९५९ साली मिरजेस साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष होते प्रा.श्री.के.क्षीरसागर. स्वागताध्यक्ष होते वि.स.खांडेकर. आणि वि.स.खांडेकरांच्या प्रेरणेने पहिले हस्ताक्षर प्रदर्शन मिरज साहित्य संमेलनात आयोजित केले. लेखकांच्या हस्ताक्षरांचे प्रदर्शन ही कल्पना सर्वांनाच अभिनव वाटली. पुढे साहित्यसंमेलनात हस्ताक्षरांचे प्रदर्शन तेही लेखकांच्या हस्ताक्षरांचे प्रदर्शन हे समीकरण कित्येक वर्षे ठरून गेले. पुढे जसजसा संमेलनात दिखाऊपणा आला तसतशी प्रदर्शने आयोजित होण्याचे प्रमाण कमी कमी होत गेले.

प्रदर्शन हा एक छंदाचा भाग होता. प्रदर्शने झाली नाहीत याचा परिणाम हस्ताक्षरसंग्रहावर कधीच झाला नाही. व आजही होत नाही. मिरजेच्या संमेलनामुळे जुन्या लेखकांची हस्ताक्षरे मिळविण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या (लेखकांच्या) वंशजांचा शोध घेणे, त्यांना जाऊन भेटणे, नातेवाईकांचा शोध घेणे आजही चालू आहे. (या सोबतच्या काही हस्ताक्षरांच्या नावावरून माझ्या या धडपडीची कल्पना वाचकांना येऊ शकेल.)

लेखक आणि त्यांचं साहित्य याचं नातं अतूट असतं म्हणूनच हस्ताक्षरे मिळविताना तो दृष्टिकोन नजरेसमोर ठेवला. एस.एम.जोशींना मी आयुष्याचा जमाखर्च मांडायला सांगितला. पी.सावळाराम यांच्याकडून गंगा यमुना डोळ्यात उभ्या का? हे गीत लिहून घेतले. ना.ह. देशपांडे यांना मेहेकरला भेटून डाव मांडून मांडून मोडू नको तर सुधांशू यांच्याकडून दत्त दिगंबर दैवत माझे अशी गीते लिहून घेतली आणि वाचकांना – प्रेक्षकांना ती आवडली.

हा हस्ताक्षरांचा संग्रह करत असताना एक घटना घडली. माझा एक मित्र चांगला श्रीमंत होता. घरात सर्व अधुनिक उपकरणे होती. रेकॉर्ड प्लेअर, टेप रेकॉर्डर – तोही स्पूलचा पाहून आम्हाला कौतुक वाटायचे. पण या कौतुकाला धक्का लागण्यासारखी घटना घडली. त्या मित्राचे वडील वारले. पुढे कालांतराने एकदा मी सहज विचारले की, तुमच्याकडे टेपरेकॉर्डर आहे मग वडिलांचा आवाज तुमच्याकडे असेलच त्यांनी नाही असे उत्तर दिले. वाईट वाटले. आणि यातूनच आपण थोरामोठ्यांच्या आवाजाचा संग्रह करायला हवा असं वाटलं. आणि माझ्या एका बेळगावच्या डॉक्टर स्नेह्यांनी आपल्या संग्रहातला टेपरेकॉर्डर माझ्या कामासाठी दिला. आणि नव्या छंदाचा प्रारंभ झाला. पुढे तो टेपरेकॉर्डर त्या डॉक्टरना साभार परत करून मला हवा होता तसा टेपरेकॉर्डर घेतला. आणि आज चाळीस – पंचेचाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेला आवाजांचाही छंद सातत्याने सुरू आहे.

असा हा छंद प्रवास आजही चालू आहे. या प्रवासात अनेक माणसे भेटली ज्यांना या धडपडीचे कौतुक वाटले, त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला. लंडन विद्यापीठाचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी संग्रह पाहून या संग्रहाचे पुढे काय करणार? असा प्रश्न विचारला त्या प्रश्नावर त्यावेळी मी नुसता हसलो पण आता मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रश्नाचा पाठपुरावा करत राहावे उत्तर कधी ना कधी निश्चित मिळेल यावर माझी श्रद्धा आहे.

हा छंद स्वत:च्या आनंदातून निर्माण झाला खरा. पण तो केवळ माझ्यापुरता मला आनंद देणारा ठरावा अशी आत्मसंतोषी वृत्ती ठेवली नसल्यामुळे या छंदाला लोकमान्यता मिळाली. तो वाचकप्रिय झाला. छंदाला लौकिक अर्थाने यश मिळाले. हे सांस्कृतिक विचारधन सर्वसामान्य रसिकांपर्यंत प्रदर्शनांच्या माध्यमातून पोचलं. बस्स! हा आनंद माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे.

– राम देशपांडे‘अक्षर’, आशियाना कॉलनी, जरगनगर २, कोल्हापूर ७

दूरध्वनी: ०२३१-२६३७४८८ मो: ८६००१४५३५३

— राम देशपांडे

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..