नवीन लेखन...

लेड पॉयझनिंग – आयुर्वेदाच्या चष्म्यातून 

Lead Poisoning Blood Lead Levels

लेड म्हणजे शिसे धातु, ह्याला संस्कृतमध्ये ‘नाग’ म्हणतात. रक्तात शिसे (लेड) गेल्यावर त्याचे खूप घातक परिणाम होतात हे आपल्या देशातील ‘नॅशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग’ या संस्थेनं सिद्ध केलं आहे.

लेडचे रक्तातील प्रमाण किती असावे, किती प्रमाणात वाढल्यास ते घातक समजावे, लेड रक्तात कोणत्या मार्गाने येते,  रक्तातील वाढलेल्या लेडच्या प्रमाणामुळे काय लक्षणे होतात, ते कसे टाळता येईल, वाढलेले प्रमाण कोणत्या औषधाने कमी करता येईल ह्या सर्व प्रश्नांची चर्चा ह्या लेखात केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केले आहे की, ४०० वर्षांपूर्वीच्या पूर्वजांपेक्षा आजच्या आधुनिक मानवी शरीरातील हाडांमध्ये दोनहजार पटीने जास्त शिसे आहे. हे शिसे एवढ्या प्रमाणांत मानवी शरीरात कोठून आले? त्याचे कारण हवेतील प्रदूषण, दूषित पाणी, फळे, धान्य, भाजीपाला यामधील किटनाशकांचा अंश, डबा / बाटली बंद पेय व इतर खाद्य पदार्थ,  व्यायामाचा अभाव, तंबाखूचे सेवन, सिगारेट ह्या सर्व कारणांमूळे मानवी शरीरातील शिसे व इतर घातक पदार्थांचे प्रमाण वाढले असा निष्कर्ष उपलब्ध झाला.

लहान मुलांमध्ये रक्तातील शिशाचे प्रमाण जास्तीतजास्त ५ मायक्रोग्रॅम प्रति डेसिलिटर पर्यंत असले तर धोक्याचे समजू नये. ह्यापेक्षा अधिक प्रमाण वाढणे धोक्याचे आहे. मोठ्यांमध्ये २० मायक्रोग्रॅम प्रति डेसिलिटर पर्यंत असले तरी चालू शकते.

रक्तातील शिशाचे प्रमाण वाढण्याची अनेक करणे आहेत.

१) वायु प्रदूषण : शिशाचे सूक्ष्म परमाणु श्वासमार्गातून फुप्फुसाद्वारे रक्तात शोषले जातात. प्रामुख्याने वाहने आणि औद्योगिक धुरामुळे शिसे वातावरणात पसरले जाते. वाहनांच्या यंत्राचे कार्य उत्तम राहण्यासाठी पेट्रोलमध्ये शिशाचा वापर योग्य आहे परंतु मानवी स्वास्थ्यावर त्याचा घातक परिणाम होत असल्याने अशा इंधनावर बंदी घातली गेली. अनलेडेड पेट्रोलचा वापर करण्यामागे हाच उद्देश होता. तरीपण अजूनही काही देशांमध्ये असे निकृष्ट इंधन वापरले जाते ही खेदाची गोष्ट आहे. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांच्या रक्तामध्ये शिशाचे प्रमाण खूप जास्त असते असे एका आढाव्यात दिसले.

२) आहारातून : भाज्या किंवा फळांच्या सेवानातून शिशाचे शोषण अन्नमार्गात होऊ शकते. जमिनीत असलेल्या धातूंचे सूक्ष्म अंश मुळांमधून झाडाच्या विविध भागात साठवले जातात व अन्न सेवनातून शरीरात प्रवेश करतात. विशेषतः सांडपाणीयुक्त दूषित गटारे जवळपास असतील तर ह्याची शक्यता अधिक संभवते. पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या पाईप्स मधूनही शिशाचे सूक्ष्म अंश शरीरात जातात. इलेकट्रोनिक वस्तू निकामी झाल्यावर त्या फेकून दिल्या जातात व त्या वस्तू जमिनीत डम्प केल्या जातात. त्या ठिकाणी काही वनस्पती वाढत असल्यास त्यातही शिसे आढळते. लेड ऑक्साईड, इंडस्ट्रियल डाय आणि इंजिन ऑईलसारख्या विषारी पदार्थांनी युक्त रंग जेव्हा नद्यांमध्ये सोडले जातात, तेव्हां पाणी अन् भूमी यांनाही प्रदूषित करतात. त्यामुळे कित्येक जलचर प्राण्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. अशा पाण्यातील मासे खाण्यात आल्यास रक्तातील शिशाचे प्रमाण वाढते. डबाबंद (टिनमध्ये उपलब्ध असलेले) अन्न किंवा शीतपेय जोडण्यासाठी (सील करण्यासाठी) शिशाचा वापर केला जातो. त्यामार्गे शिशाचे अंश सेवनात जाऊ शकतात.

३) स्पर्शातून : घरांच्या भिंती रंगवण्यासाठी वापरले जाणारे काही विशिष्ट रंग शिसेयुक्त असतात. त्यांच्या स्पर्शाने शिशाचे शोषण त्वचेतून होते. रंगकाम करणाऱ्यांना ह्याची बाधा हमखास होते. त्याचबरोबर इलेकट्रोनिक वस्तूंच्या दुरुस्तीसाठी सोल्डर करतांना शिशाचा वापर केला जातो. ते हाताळतांना ह्याचे त्वचेतून शोषण होते. सौंदर्यप्रसाधन म्हणून लिपस्टिकच्या वापरानेही शिशाचे शोषण होऊ शकते. काही लोक डोळ्यात घालण्यासाठी सुरमा वापरतात, त्यातूनही शिशाची बाधा होऊ शकते. वाहनांच्या बॅटरीत शिशाच्या जाळ्या व पत्रे असतात. जुन्या बॅटर्‍यांचे डिस्पोझल व दुरुस्ती होणार्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिशाचे प्रदूषण होते. (दुर्दैवाने शिसे न वापरल्या जाणार्‍या रिचार्जेबल बॅटर्‍यांचे तंत्रज्ञान – निकेल कॅडमियम वगैरे अजून खूप मागे आहे. त्यातून पाहिजे तितकी एनर्जी डेन्सिटी मिळत नाही त्यामुळे लेड अ‍ॅसिड बॅटर्‍यांना अजून तरी पर्याय नाही).

४) औषधातून : चिकित्सेसाठी काही आयुर्वेदिक औषधांमध्ये शिशाचा वापर केला जातो. हा वापर करतांना त्याचे शोधन – मारण करण्यात काही कसर राहिली तर शिसे ट्रेसेसच्या स्वरुपात शरीरात शोषले जाते.

लक्षणे –

लहान मुलांमध्ये शिशाचे दुष्परिणाम लवकर दिसून येतात. मोठ्यांमध्ये हे परिणाम कालांतराने होतात. शिसे हे शरीरासाठी विष आहे. शरीरावर त्याचा कोणताही चांगला परिणाम होत नाही. अन्न, पाणी किंवा मातीतून ते शरीरात गेल्यास त्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत. सर्वप्रथम हे रक्तात शोषले जाते. पुढे रक्तवहनातून नर्व्हज (वातानाड्या), वृक्क (किडनी), मेंदू, स्नायू आणि हृदय अशा अवयवांमध्ये त्याचा साठा होऊ लागतो. लहान मुलांमध्ये दात व हाडांमध्ये शिसे जमा होते. हाडात साठलेले शिसे अत्यंत स्थिर स्वरुपात असते, वर्षानुवर्षे साठून राहते. काही वर्षांनंतर हाडातील शिसे पुन्हा रक्तात येऊन शारीरिक लक्षणे उत्पन्न करू शकतात. मळातून आणि मूत्र मार्गातून त्याचे विसर्जन होऊ शकते. रक्तात शिशाचे प्रमाण वाढल्याने रक्ताल्पता (अॅनिमिया), डोकेदुखी, वृक्क विकार (किडनी फेल्युर), स्नायूंचे दौर्बल्य, रक्तदाब वाढणे (हाय ब्लडप्रेशर), मेंदूचे विकार, स्मरणशक्तीचा नाश, आकलनशक्तीचा नाश, वंध्यत्व, अकाली गर्भपात अशी लक्षणे होतात. शिशाचे प्रमाण ७० मायक्रोग्रॅम्स / डेसिलिटरहून जास्त झाले तर उलट्या, आतडी पिळवटणे (abdominal spasms), स्नायूंचा नाश, बेशुद्धावस्था (कोमा) आणि शेवटी मरण असे घातक परिणाम उद्भवतात. बाल्यावस्थेत वाढलेले शिशाचे प्रमाण पुढे वंध्यत्वाला कारणीभूत होऊ शकते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या झपाट्याने रोडावते तर स्त्रियांमध्ये बीजकोशाचे रोग होऊन वंध्यत्व येते. गर्भावस्थेत रक्तातील शिशाचे प्रमाण वाढलेले असेल तर गर्भाला त्यामुळे बाधा पोचू शकते. अर्थात,  अपरेतून (Placenta) हे सहजगत्या पार होते, त्याचे संरक्षण करण्याची किमया निसर्गाने प्रदान केलेली नाही. म्हणून गर्भावस्थेत रक्तातील शिशाचे प्रमाण १० ते १५ मायक्रोग्रॅम्स प्रति डेसिलिटर पेक्षा अधिक असू नये.

एक्सरे फ्लुरोसन्स नावाच्या क्षकिरण परीक्षणाने हाडातील साठलेल्या शिशाचे मापन करता येते. तसेच रक्तातील लेड लेव्हल (Blood Lead Level – BLL) करून देणाऱ्या काही आधुनिक प्रयोगशाळा मोठ्या शहरांमध्ये आहेत.

विषाचे १० गुण –

तीक्ष्णोष्णरूक्षविषदं व्यवाय्याशुकरं लघु । विकाषि सूक्ष्ममव्यक्तरसं विषमपाकि च ।। अष्टांगहृदय; उत्तर ३५-७

शिशाच्या शुद्धीचे महत्व –

सीसं निहन्ति विमलां तु शरीरशोभां । कुष्ठं किलासकमलं जानयेच्च नूनम् ।।

संधीन् प्रपीडयति पक्षवधं प्रकुर्यात् । संशुद्धिहीनमिह चत् खलु मारितं स्यात् ।।

शुद्धिपाकविहीनन्तु सीसकं परिशीलितम् । गुल्मं प्रमेहमानाहं श्वयथुंच भगंदरम् ।।

वन्हिमाद्यं त्वंसशोथं बाव्होर्निश्चेष्टतां तथा । शूल क्षायादिकान् रोगान् जनयेदविकल्पतः ।।

शिशाची शुद्धी न करता भस्म सेवन केले तर रक्त विकृत होते व सर्व शरीराची शोभा नष्ट होते, अनेक प्रकारचे त्वचारोग होतात, अस्थिसंधींमध्ये विकार होऊन पक्षघात होतो. ह्याशिवाय गुल्म, आनाह, शोथ, भगंदर, अग्निमांद्य, खांदेदुखी,  हातपाय निश्चल होतात. म्हणून शिसे शिशाचे शोधन करून मगच भस्म करावे.

ह्या श्लोकावरून स्पष्ट होते की ग्रंथकर्त्यांना शिशाचे दोष माहिती होते व ते शुद्ध करूनच वापरण्याचा निर्देश केला आहे.

आयुर्वेदात अनेक विषांचे औषधात रुपांतर करून वापर केला आहे. विषांमध्ये सूक्ष्म, आशुकारि, व्यवायी, विकाशि असे गुण असल्यामुळे आत्ययिक चिकित्सेत अशा द्रव्यांचा उपयोग अनन्यसाधारण आहे. परंतु ते शुद्ध स्वरुपात वापरणे तितकेच महत्वाचे आहे अन्यथा विनाशकारी ठरतात. ह्याचे उत्तम उदाहरण आहे अणुशक्ती. त्यामुळे शिशाचे दोष शरीरातून घालवण्यासाठी वरील गुणांच्या विरुद्ध असलेल्या द्रव्यांचा वापर करणे योग्य ठरेल.

चिकित्सा सूत्र विचार –

विषाच्या १० गुणांच्या बरोब्बर विरुद्ध १० गुण गोघृतामध्ये आहेत, म्हणून हे औषध “सिद्धघृत” स्वरुपात वापरणे योग्य आहे.

आधुनिक वैद्यक शस्त्रात लेड पॉयझनिंगच्या चिकित्सेत “चिलेशन थेरपी” उपयुक्त ठरेल असा निर्देश आहे. चिलेशनची व्याख्या अशी – A method of removing certain heavy metals from the bloodstream, used especially in treating lead or mercury poisoning. आयुर्वेदात पंचकर्माच्या आधी स्नेहन स्वेदानाचे महत्व आणि चिलेशनचा विचार ह्यात किती साधर्म्य आहे हे आपल्या लक्षात येईल. धातुगत दोषांना कोष्ठात आणण्यासाठी ह्यापेक्षा कोणता मार्ग अधिक चांगला असू शकेल ?

शिशाच्या शुद्धीसाठी वापरण्यात येणाऱ्या वनस्पती रक्तातील शिशाचे निर्हरण करण्यात उपयुक्त ठरू शकतील अशा विचारातून ह्या विषयाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली व अत्यंत उपयुक्त असे संदर्भ प्राप्त झाले. शिशाचे शोषण झाल्यावर ते विविध धातूंमध्ये साठवले जाते व त्या त्या धातूंमध्ये दोष उत्पन्न करते. संशोधनातून प्राप्त निष्कर्ष पाहिल्यास स्पष्ट दिसते की शिशाच्या शुद्धीसाठी वापरण्यात येणाऱ्या वनस्पती ह्या विशिष्ट धातूंमधील (येथे शारीरिक सप्तधातु असा अर्थ अभिप्रेत आहे) दोषांचे निर्हरण करून त्यांचे कार्य प्राकृत करण्यास समर्थ ठरतात. ह्या वनस्पती घृत स्वरुपात हमखास उपयुक्त ठरणार ह्यात दुमत होणे शक्य नाही.

हरिद्रा : (Curcuma longa) हरिद्रा ही उत्तम पेशीरक्षक (antioxidant) आहे. मेंदूच्या पेशींमध्ये शोषलेल्या धातूंना (metal toxicity) बाहेर काढून टाकण्याचे कार्य हिने होते. विशेषतः शिशाचे निर्हरण हरिद्रेने होते असे निदर्शनास आले आहे. ह्याचबरोबर गुग्गुळ हेही उपयुक्त असल्याचे संदर्भ मिळतात. शिशाच्या शुद्धीसाठी आयुर्वेदात हरिद्रा वापरण्याचा संदर्भ आहे.

मंडूकपर्णी : (Centella asiatica) हिच्या सेवनाने मेंदूच्या पेशींमधील क्रीशीलता वाढते हे प्रसिद्ध आहेच. अधिक निरीक्षणातून सिद्ध झाले आहे की ह्यातील सूक्ष्म कार्यकारी घटक रक्त व मेंदूच्या अडथळ्याला (Blood Brain Barrier) पार करून नाडीयंत्रणेतील रसायनांचा (neurotransmitters) समतोल राखून शिशाच्या परिणामांपासून मज्जायंत्रणेचे संरक्षण करते.

ब्राह्मी : मेंदूच्या पेशींमध्ये पोषक बदल करण्यासाठी ब्राह्मीचा उपयोग प्रसिद्ध आहे. शिशाचे प्रमाण वाढल्यामुळे मेंदूच्या पेशींवर विपरीत परिणाम होऊन त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. ब्राह्मीच्या सेवनाने सेरिब्रम (मोठा मेंदु), सेरिबेल्लम (लहान मेंदु), हिपोकॅम्पस (स्मरण यंत्रणा), फ्रॉन्टल कॉर्टेक्स, ब्रेन स्टेम ह्या सर्व भागात साठलेले पेशीविघातक घटकांचे (फ्री रॅडिकल्स) प्रमाण लक्षणीय मात्रेत कमी होते असे निदर्शनास आले. चिलेशन व पेशीसंरक्षण अशा दोन्ही प्रकारे ह्याची क्रिया होते.

जिरे : शिशाचे प्रमाण रक्तात वाढल्याने त्याचे उत्सर्जन स्तन्यातून होते. प्रयोगांती असे निदर्शनास आले की जिरे सेवनामुळे स्तन्यातील शिशाचे प्रमाण आश्चर्यकारकरित्या कमी होते व मलविसर्जनात शिशाचे प्रमाण वाढते. ह्या प्रयोगात जिरे, कर्चूर आणि आंबेहळद वापरून निरीक्षण केले. ह्या तीनही वनस्पती शिशाच्या निर्हरणात जवळ जवळ तुल्यबल असल्याचे आढळले.

भुईआवळा : ह्या वनस्पतीच्या फळाचा उपयोग विशेषतः शुक्रवह स्रोतसावर संरक्षक स्वरूपाचा होतो. शिशाच्या सेवनामुळे शुक्राणुंच्या शिर भागात दोष निर्माण होतो. त्यामुळे गर्भामध्ये बीजदोषजन्य विकार उत्पन्न होऊ शकतात. हे दोष नाहीसे करण्यासाठी भुईआवळ्याचा वापर करून जेनेटिक व्यंग होण्याची शक्यता कमी करता येते.

आमलकी : अस्थिमाज्जेच्या पेशी विभजनात महत्वाची भूमिका असलेल्या क्रोमॅटिड तंतूंचे तुटणे (क्लास्टोजेनेसिटी) थांबवून शिसे व अॅल्युमिनियमच्या घातक परिणामांपासून संरक्षण करण्याची किमया अॅस्कॉर्बिक अॅसिडमध्ये असते. रासायनिक पद्धतीने निर्मित अॅस्कॉर्बिक अॅसिड व आमालकीच्या घानाचा वापर करून तौलनिक अभ्यास केला. ह्या अभ्यासात आमालकीच्या घानाचा परिणाम अधिक प्रभावी ठरला असे निदर्शनास आले. अॅस्कॉर्बिक अॅसिड व्यतिरिक्त असलेल्या अन्य काही नैसर्गिक घटकांचा परिणाम होऊन हे लाभ होत असावेत असा निष्कर्ष संशोधनात व्यक्त केला. अस्थिमज्जा यंत्रणेवर होणारे शिसे व अॅल्युमिनियमचे दुष्परिणाम ह्याचा सेवनामुळे सेवनामुळे आटोक्यात आणता येतात.

काळे जिरे : शिशाचे सेवन केल्याने यकृत (लिव्हर), वृक्क (किडनी), प्लीहा (स्प्लीन), हृदय व रक्त अशा ठिकाणी शोषण होते. अॅटोमिक अॅब्सॉर्बशन स्पेक्ट्रोमेट्री पद्धतीने ह्याचे मापन केले जाते. काळ्या जिऱ्याच्या सेवनामुळे ह्या भागातील शिशाचा साठा कमी होतो असे निदर्शनास आले. वृक्कातील प्रमाण ६३.४%, हृदयातील प्रमाण ७२.३%, प्लीहेतील प्रमाण ६६.७%, रक्तातील प्रमाण ३९.५% व यकृतातील प्रमाण ७२.९% एवढ्या मात्रेत कमी झाल्याचे आढळले.

अगस्त्य पत्र : विविध धातूंचे सूक्ष्म अंश यकृतामध्ये संघटित होऊन त्यांची विषाक्त लक्षणे दिसू लागतात. वनस्पतींमध्ये असलेले अनेकविध पेशीसंरक्षक घटक निरनिराळ्या प्रकारे कार्य करून यकृताचे कार्य पूर्ववत करण्यास सहाय्यक ठरतात. अगस्त्याच्या पानांमध्ये ओलियानोलिक अॅसिड नामक कार्यकारी घटक आहे. ह्याने मिटॅलोथिओनिन नामक यकृतरोपक घटकाचे स्राव तीसपट वाढतात व यकृतातील धातूंचे विघटन होऊन स्वास्थ्य उत्तम राहते. ह्या संशोधनांतर्गत पारद,  कॅडमियम सारख्या अनेक धातूंवर प्रयोग झाले असून अद्याप शिशावर प्रयोग झालेले नाहीत. परंतु आयुर्वेदीय ग्रंथात दिल्यानुसार व त्याच्या अन्य धातूंवर होणाऱ्या परिणामांचा विचार करता, शिशावरही अगस्त्यपत्र तितकेच उपयुक्त ठरेल असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही.

अपामार्ग : शिशाचे संयुग (लेड अॅसिटेट) मुळे वृक्कात शिशाची विषाक्तता साठू लागते. गॅमा ग्लूटामिल ट्रान्सपेप्टिडेज (γ-GT), कॅथेस्पिन डी, अल्कलाइन फॉस्फेटेज (ALP), अॅसिड फॉस्फेटेज (ACP), बीटा ग्लूकोरॉनिडेज, लॅक्टेट डीहायड्रोजिनेज (LDH) सारख्या घटकांची वाढ झाल्याने वृक्कात दोष निर्माण झाल्याचे निश्चित झाले. त्यावर अपामार्ग चिकित्सा करून हे सर्व दोष पुन्हा आटोक्यात आल्याचे निदर्शनास आले.

तुलसी पत्र : शिशाच्या सेवनाने वृषणग्रंथीत विकार निर्माण होतात असे निदर्शनास आले. त्यायोगे शुक्राणूंची निर्मिती खंडित होते व त्यांचा विनाश झपाट्याने सुरु होतो. तुलसीपत्र सेवनाने त्या पेशींमध्ये वाढ, सुदृढ पेशींची निर्मिती व एकूण रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे निदर्शनास आले.

धान्यक पत्र : शाशाचे शोषण वृषण ग्रंथिंमध्ये होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. विविध मार्गातून शिशाचे शोषण रक्तात होऊन वृषण भागातील बहुतांशी पेशीरक्षक घटकांची कमतरता होऊ लागते. त्यामुळे सीरम टेस्टोस्टेरॉनची मात्रा व शुक्राणूंची घनता कमी झाल्याचे दिसते. धान्यक पत्र रसाच्या सेवनाने पेशींच्या स्तरावर हा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास आले.

सारांश –

आयुर्वेदात शिशाच्या शुद्धीकरणासाठी सांगितलेल्या अनेक वनस्पतींचा आढावा आधुनिक वैद्यक शास्त्राच्या चष्म्यातून घेतला. त्यापैकी काही वनस्पतींचा अभ्यास आधुनिक शास्त्रात झालेला आहे तर कित्येक वनस्पतींवर काहीही संशोधन झालेले दिसत नाही. हजारो वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ग्रंथांमध्ये दिलेल्या वनस्पतींपैकी फक्त सुमारे एक तृत्यांश वनस्पतींवर काही प्रयोग झालेले दिसतात. ह्यावरून आयुर्वेद किती प्रगत आहे हे आपल्या लक्षात येते. आयुर्वेदात फक्त समस्या देऊन त्याच्या निराकरणासाठी मार्ग दिलेला दिसतो तर आधुनिक शास्त्रात ही समस्या कशाप्रकारे सोडवता येते त्याविषयी प्रत्येक पायरीचा अभ्यास झालेला आढळतो. असा अभ्यास आयुर्वेदाच्या ग्रंथकर्त्यांनी करून त्याचा सारांश फक्त आपल्यासमोर सादर केला एवढाच फरक. म्हणून “आप्तवचन” समजून आयुर्वेदीय सूत्रांचे पालन करणे योग्य आहे असे समजावे. तात्पर्य, शिशाच्या विषाक्ततेपासून सुटका होण्यासाठी हरिद्रा, ब्राह्मी, मंडूकपर्णी, जिरे, भुईआवळा, आमलकी, कृष्णजीरक, अगस्त्यपत्र, अपामार्ग, तुलसीपत्र व धान्यक पत्र अशा वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप (घृत) उत्तम यशदायी ठरेल असे दिसते.

वैद्य संतोष जळूकर

drjalukar@akshaypharma.com

9969106404

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

7 Comments on लेड पॉयझनिंग – आयुर्वेदाच्या चष्म्यातून 

  1. लेख चांगला झाला आहे. सामान्य वाचकांपर्यंत अधिक पोहोचायला हवा.
    आयुर्वेदिक कंपन्या कशी काळजी घेतात यावरही विचार सागायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..