कोकणाचा कुलाचार भावे पाळतो वरूण
इथे निसर्ग भरतो अन्नपूर्णेचे बोडण
सह्याद्रिचे कातळकडे जणू मांडिले चौरंग
हिरवट रानवेली, रांगोळीत पुष्परंग
शेते-खाचरे रेखीव मांडलेल्या काथवटी
त्यात केळीची ग पाने हिरवळीची गोमटी
ताडामाडांसह उभे स्वागता आगर
सुवासिनींचे चरण धुतो अरबी सागर
सुरंगी-अबोलीचे देवीलागी वळेसर
आंबे फणस जांभळे नैवेद्याला फलाहार
अष्टगंधाचा दरवळ देती बनात केवडे
देवीच्या पूजेला नारळ-सुपारी अन् विडे
तृणकुसुमे शोभती देवीलागी अलंकार
रिमझिम सनईचा आकाशी झंकार
घन गर्जना करून गाती मंगल आरती
विद्युल्लता तळपती तबकात जणू ज्योती
वृक्षांच्या माथ्याला काजव्यांची रोषणाई
कोकणकन्यांची बोडणालागी घाई
मनःपूत कोसळती मग पर्जन्याच्या धारा
पंचपात्रे भरभरून जणू पंचामृतधारा
आनंदाचे झरे खळाळती हिरव्या रानी
भरे बोडण तृप्तीचे वसुंधरेच्या सदनी
पलिकडे मावळात वारकर्यांचे रिंगण
इथे कोकणात भरे अन्नपूर्णेचे बोडण!
– गौरी बावडेकर
Leave a Reply